Thursday, September 22, 2016

ज्ञानेश्वरी अध्याय १३, संत ज्ञानेश्वर




ज्ञानेश्वरी / अध्याय तेरावा / संत ज्ञानेश्वर
ओवी १ ते ७१
 क्षेत्रक्षेत्रज्ञयोगः।

आत्मरूप गणेशु केलिया स्मरण, सकळ विद्यांचें अधिकरण,
तेचि वंदूं श्रीचरण, श्रीगुरूंचे ॥ १ ॥
 
अधिकरण,=अधिष्ठान वस्ती

जयांचेनि आठवें, शब्दसृष्टि आंगवे,
सारस्वत आघवें, जिव्हेसि ये ॥ २ ॥
 
आंगवे,=स्वाधीन होते  

वक्तृत्वा गोडपणें, अमृतातें पारुखें म्हणे,
रस होती वोळंगणें, क्षरांसी ॥ ३ ॥
पारुखें=मागे सर म्हणते वोळंगणें=सेवा करणे

भावाचें अवतरण, अवतरविती खूण,
हाता चढे संपूर्ण, तत्त्वभेद ॥ ४ ॥
(श्रोतियांची स्थिती )

श्रीगुरूंचे पाय, जैं हृदय गिंवसूनि ठाय,
तैं येवढें भाग्य होय, उन्मेखासी ॥ ५ ॥
उन्मेखासी=ज्ञान

ते नमस्कारूनि आतां, जो पितामहाचा पिता,
लक्ष्मीयेचा भर्ता, ऐसें म्हणे ॥ ६ ॥
भर्ता,=पती


श्रीभगवानुवाच।
इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते।
एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः ॥ १॥


तरी पार्था परिसिजे, देह हें क्षेत्र म्हणिजे,
जो हें जाणे तो बोलिजे, क्षेत्रज्ञु एथें ॥ ७ ॥


क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत।
क्षेत्रक्षेत्रज्ञयोर्ज्ञानं यत्तज्ञानं मतं मम ॥ २॥


तरि क्षेत्रज्ञु जो एथें, तो मीचि जाण निरुतें,
जो सर्व क्षेत्रांतें, संगोपोनि असे ॥ ८ ॥

क्षेत्र आणि क्षेत्रज्ञातें, जाणणें जें निरुतें,
ज्ञान ऐसें तयातें, मानूं आम्ही ॥ ९ ॥

निरुतें,=स्पष्ट नीट

तत् क्षेत्रं यच्च यादृक्च यद्विकारि यतश्च यत्।
यो यत्प्रभावश्च तत् समासेन मे श्रुणु ३॥

 
तरि क्षेत्र येणें नावें । हें शरीर जेणें भावें ।
म्हणितलें तें आघवें । सांगों अतां ॥ १० ॥

हें क्षेत्र का म्हणिजे । कैसें कें उपजे ।
कवणाकवणीं वाढविजे । विकारीं एथ॥ ११ ॥

हें औट हात मोटकें । कीं केवढें पां केतुकें ।
बरड कीं पिके । कोणाचें हें॥ १२ ॥
 
इत्यादि सर्व । जे जे याचे भाव ।
ते बोलिजती सावेव । अवधान दें ॥ १३ ॥

पैं याचि स्थळाकारणें । श्रुति सदा बोबाणे ।
तर्कु येणेंचि ठिकाणें । तोंडाळु केला ॥ १४ ॥
 
बोबाणे=बडबडणे  तोंडाळु=खूप बोलणारा  

चाळिता हेचि बोली । दर्शनें शेवटा आलीं ।
तेवींचि नाहीं बुझविली । अझुनि द्वंद्वें ॥ १५ ॥
 
चाळिता= चर्चा करकरून

शास्त्रांचिये सोयरिके । विचळिजे येणेंचि एकें ।
याचेनि एकवंकें । जगासि वादु ॥ १६ ॥
 
विचळिजे =मोडणे      एकवंकें= एकमत एकवाक्यता 

तोंडेसीं तोंडा न पडे । बोलेंसीं बोला न घडे ।
इया युक्ती बडबडे । त्राय जाहली ॥ १७ ॥
 
त्राय=त्रासली गोंधळली

नेणों कोणाचें हें स्थळ । परि कैसें अभिलाषाचें बळ ।
जे घरोघरीं कपाळ । पिटवीत असे ॥ १८ ॥

नास्तिका द्यावया तोंड । वेदांचें गाढें बंड ।
ते देखोनि पाखांड । आनचि वाजे ॥ १९ ॥
 
पाखांड=खोटेपणा नास्तिकता

म्हणे तुम्ही निर्मूळ । लटिकें हें वाग्जाळ ।
ना म्हणसी तरी पोफळ । घातलें आहे ॥ २० ॥  

पोफळ=पैजेचाविडा

पाखांडाचे कडे । नागवीं लुंचिती मुंडे ।
नियोजिली वितंडें । ताळासि येती ॥ २१ ॥
 
कडे=समूह   नागवीं =नग्न लुंचिती केस उपटून  मुंडे=बोडके डोके
वितंडें=भांडण  ताळासि=ताळ्यावर

मृत्युबळाचेनि माजें । हें जाल वीण काजें ।
तें देखोनियां व्याजें । निघाले योगी ॥ २२ ॥
 
वीण काजें=कामाविन व्याजें=कारणे म्हणून

मृत्यूनि आधाधिले । तिहीं निरंजन सेविलें ।
यमदमांचे केले । मेळावे पुरे ॥ २३ ॥
आधाधिले=भयाने  निरंजन-=अरण्य

येणेंचि क्षेत्राभिमानें । राज्य त्यजिलें ईशानें ।
गुंति जाणोनि स्मशानें । वासु केला ॥ २४ ॥
 
ईशानें=शंकर

ऐसिया पैजा महेशा । पांघुरणें दाही दिशा ।
लांचकरू म्हणोनि कोळसा । कामु केला ॥ २५ ॥
 
कामु=मदन

पैं सत्यलोकनाथा । वदनें आलीं बळार्था ।
तरी तो सर्वथा । जाणेचिना ॥ २६ ॥
 
 सत्यलोकनाथा=ब्रह्मदेव 

ऋषिभिर्बहुधा गीतं छन्दोभिर्विविधैः पृथक्।
ब्रह्मसूत्रपदैश्चैव हेतुमद्भिर्विनिश्चितैः ॥ ४॥


एक म्हणती हें स्थळ, जीवाचेंचि समूळ,
मग प्राण हें कूळ, तयाचें एथ ॥ २७ ॥

जे प्राणाचे घरीं, अंगें राबती भाऊ चारी,
आणि मना ऐसा आवरी, कुळवाडीकरु ॥ २८ ॥
 
भाऊ चारी, =उदाण व्यान समान आपण
कुळवाडीकरु=कारभारी

तयातें इंद्रियबैलांची पेटी, न म्हणे अंवसीं पाहाटीं,
विषयक्षेत्रीं आटी, काढी भली ॥ २९ ॥
 
पेटी =समुही   अंवसीं=संध्याकाळ     आटी,=पिक

मग विधीची वाफ चुकवी, आणि अन्यायाचें बीज वाफवी,
कुकर्माचा करवी, राबु जरी ॥ ३० ॥

तरी तयाचिसारिखें, असंभड पाप पिके,
मग जन्मकोटी दुःखें, भोगी जीवु ॥ ३१ ॥
 
असंभड= प्रचंड

नातरी विधीचिये वाफे, सत्क्रिया बीज आरोपे,
तरी जन्मशताचीं मापें, सुखचि मवीजे ॥ ३२ ॥
 
मवीजे= मोजणे

तंव आणिक म्हणती हें नव्हे, हें जिवाचेंचि न म्हणावें,
आमुतें पुसा आघवें, क्षेत्राचें या ॥ ३३ ॥

अहो जीवु एथ उखिता, वस्तीकरु वाटे जातां,
आणि प्राणु हा बलौता, म्हणौनि जागे ॥ ३४ ॥
 
उखिता=फक्त पाहुणा   बलौता=बलुतेदार

अनादि जे प्रकृती, सांख्य जियेतें गाती,
क्षेत्र हे वृत्ती, तियेची जाणा ॥ ३५ ॥
 
वृत्ती=जमीन

आणि इयेतेंचि आघवा, आथी घरमेळावा,
म्हणौनि ते वाहिवा, घरीं वाहे ॥ ३६ ॥
 
आथी =असे  वाहिवा=लागवड

वाह्याचिये रहाटी, जे कां मुद्दल तिघे इये सृष्टीं,
ते इयेच्याचि पोटीं, जहाले गुण ॥ ३७ ॥
 
रहाटी=चक्र

रजोगुण पेरी, तेतुलें सत्त्व सोंकरी,
मग एकलें तम करी, संवगणी ॥ ३८ ॥
 
सोंकरी=रक्षणे  संवगणी=काढणी

रचूनि महत्तत्त्वाचें खळें, मळी एके काळुगेनि पोळें,
तेथ अव्यक्ताची मिळे, सांज भली ॥ ३९ ॥
 
काळुगेनि=काळ रुपी  पोळें=बैल सांज=सांजवेळ होणे

तंव एकीं मतिवंतीं, या बोलाचिया खंतीं,
म्हणितलें या ज्ञप्ती, अर्वाचीना ॥ ४० ॥
 
ज्ञप्ती=ज्ञान  अर्वाचीना=नूतन 

हां हो परतत्त्वाआंतु, कें प्रकृतीची मातु,
हा क्षेत्र वृत्तांतु, उगेंचि आइका ॥ ४१ ॥

शून्यसेजेशालिये, सुलीनतेचिये तुळिये,
निद्रा केली होती बळियें, संकल्पें येणें ॥ ४२ ॥
 
सुलीनतेचिये =पूर्णपणे लीन तुळिये=गादीवर

तो अवसांत चेइला, उद्यमीं सदैव भला,
म्हणौनि ठेवा जोडला, इच्छावशें ॥ ४३ ॥
 
निरालंबींची वाडी, होती त्रिभुवनायेवढी,
हे तयाचिये जोडी, रूपा आली ॥ ४४ ॥
 
निरालंबींची=परब्रह्म

मग महाभूतांचें एकवाट, सैरा वेंटाळूनि भाट,
भूतग्रामांचे आघाट, चिरिले चारी ॥ ४५ ॥

महाभूतांचें=पंच महाभूत एकवाट=एक गट
सैरा वेंटाळूनि =सारखी करून भाट=पडीक जमीन

आघाट=हद्द विभाग चिरिले=वेगळे केले

यावरी आदी, पांचभूतिकांची मांदी,
बांधली प्रभेदीं, पंचभूतिकीं ॥ ४६ ॥
 
मांदी =मूळ  प्रभेदीं=वेगळे केले

कर्माकर्माचे गुंडे, बांध घातले दोहींकडे,
नपुंसकें बरडें, रानें केलीं ॥ ४७ ॥
 
गुंडे=दगड धोंडे   रानें केलीं =कसदार शेत केले

तेथ येरझारेलागीं, जन्ममृत्यूची सुरंगी,
सुहाविली निलागी, संकल्पें येणें ॥ ४८ ॥
 
सुरंगी=भुयार  सुहाविली=सुंदर तयार केली  
निलागी=निराश्रय  लाग ना लागणारे  

मग अहंकारासि एकलाधी, करूनि जीवितावधी,
वहाविलें बुद्धि, चराचर ॥ ४९ ॥
 
एकलाधी=ऐक्य  जीवितावधी=पूर्ण जीवन  वहाविलें=राबवणे

यापरी निराळीं, वाढे संकल्पाची डाहाळी,
म्हणौनि तो मुळीं, प्रपंचा यया ॥ ५० ॥

यापरी मत्तमुगुतकीं, तेथ पडिघायिलें आणिकीं,
म्हणती हां हो विवेकीं, कैसें तुम्ही ॥ ५१ ॥
 
मत्त मुगुतकी =मत रुपी  मोती पाहून      
पडिघायिलें=पुढे आले सरसावले  विवेकीं=पंडित

परतत्त्वाचिया गांवीं, संकल्पसेज देखावी,
तरी कां पां न मनावी, प्रकृति तयाची ? ॥ ५२ ॥
 
सांख्यतत्वी मानलेली प्रकृती मान्य का न करावी

परि असो हें नव्हे, तुम्ही या न लगावें,
आतांचि हें आघवें, सांगिजैल ॥ ५३ ॥

तरी आकाशीं कवणें, केलीं मेघाचीं भरणें,
अंतरिक्ष तारांगणें, धरी कवण ? ॥ ५४ ॥

गगनाचा तडावा, कोणें वेढिला केधवां,
पवनु हिंडतु असावा, हें कवणाचें मत ? ॥ ५५ ॥
 
तडावा=छत

रोमां कवण पेरी, सिंधू कवण भरी,
पर्जन्याचिया करी, धारा कवण ? ॥ ५६ ॥

तैसें क्षेत्र हें स्वभावें, हे वृत्ती कवणाची नव्हे,
हें वाहे तया फावे, येरां तुटे ॥ ५७ ॥
 
वाहे =वहन, जतन करणे  फावे=मिळणे
येरां तुटे=इतरा मिळणार नाही

तंव आणिकें एकें, क्षोभें म्हणितलें निकें,
तरी भोगिजे एकें, काळें केवीं हें ? ॥ ५८ ॥
 
निकें, =छान !! उद्गार वाचक
एकें, काळें =एकटा काळ (कसा भोगतो )

तरी ययाचा मारु, देखताति अनिवारु,
परी स्वमतीं भरु, अभिमानियां ॥ ५९ ॥
 
मारु =तडाखा  ययाचा=काळाचा अभिमानियां=अभिमानी जन

हें जाणों मृत्यु रागिटा, सिंहाडयाचा दरकुटा,
परी काय वांजटा, पूरिजत असे ? ॥ ६० ॥
 
दरकुटा=दरी वांजटा,=व्यर्थ (बडबड) पूरिजत असे =पूरी होईल का

महाकल्पापरौतीं, कव घालूनि अवचितीं,
सत्यलोकभद्रजाती, आंगीं वाजे ॥ ६१ ॥
  
परौतीं=पलीकडे कव=मिठी भद्रजाती=हत्ती
आंगीं वाजे=भीती वाटणे

लोकपाळ नित्य नवे, दिग्गजांचे मेळावे,
स्वर्गींचिये आडवे, रिगोनि मोडी ॥ ६२ ॥

आडवे=रान   रिगोनि=शिरून

येर ययाचेनि अंगवातें, जन्ममृत्यूचिये गर्तें,
निर्जिवें होऊनि भ्रमतें, जीवमृगें ॥ ६३ ॥

न्याहाळीं पां केव्हडा, पसरलासे चवडा,
जो करूनियां माजिवडा, आकारगजु ॥ ६४ ॥

चवडा=पंजा   माजिवडा = मध्ये (स्वाधीन करून ठेवणे)
आकारगजु=विश्वरूपी हत्ती

म्हणौनि काळाची सत्ता, हाचि बोलु निरुता,
ऐसे वाद पंडुसुता, क्षेत्रालागीं ॥ ६५ ॥

निरुता=खरा

हे बहु उखिविखी, ऋषीं केली नैमिषीं,
पुराणें इयेविषीं, मतपत्रिका ॥ ६६ ॥

उखिविखी,=चर्चा   मतपत्रिका=लिहिलेले लेख

अनुष्टुभादि छंदें, प्रबंधीं जें विविधें,
ते पत्रावलंबन मदें, करिती अझुनी ॥ ६७ ॥

मदें=अभिमाने

वेदींचें बृहत्सामसूत्र, जें देखणेपणें पवित्र,
परी तयाही हें क्षेत्र, नेणवेचि ॥ ६८ ॥

आणीक आणीकींही बहुतीं, महाकवीं हेतुमंतीं,
ययालागीं मती, वेंचिलिया ॥ ६९ ॥

हेतुमंतीं=बुद्धिवान

परी ऐसें हें एवढें, कीं अमुकेयाचेंचि फुडें,
हें कोणाही वरपडें, होयचिना ॥ ७० ॥

फुडें =खरोखर वरपडें,=प्राप्त स्वाधीन

आतां यावरी जैसें, क्षेत्र हें असे,
तुज सांगों तैसें, साद्यंतु गा ॥ ७१ ॥

http://dnyaneshwariabhyas.blogspot.in/