Wednesday, June 29, 2016

ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा १९७ ते २४४



 

 

ज्ञानेश्वरी / अध्याय अकरावा / विश्वरूप दर्शन / संत ज्ञानेश्वर


ओव्या १९७ ते २४४


अनेकवक्त्रनयनमनेकाद्भुतदर्शनम्।
अनेकदिव्याभरणं दिव्यानेकोद्यतायुधम् ॥ १०॥


मग तेथ सैंघ देखे वदनें, जैसी रमानायकाचीं राजभुवनें,
नाना प्रगटलीं निधानें, लावण्यश्रियेचीं ॥ १९७ ॥
 

सैंघ=खूप अनेक  श्रियेचीं=लक्ष्मी


कीं आनंदाची वनें सासिन्नलीं, जैसी सौंदर्या राणीव जोडली,
तैसीं मनोहरें देखिलीं, हरीचीं वक्त्रें ॥ १९८ ॥
 

सासिन्नलीं =बहरली   राणीव=राज्य


तयांही माजीं एकैकें, सावियाचि भयानकें,
काळरात्रीचीं कटकें, उठवलीं जैसीं ॥ १९९ ॥
 

सावियाचि =सहज, सवे, स्वाभाविक     कटकें=सैन्य


कीं मृत्यूसीचि मुखें जाहलीं, हो कां जें भयाचीं दुर्गें पन्नासिलीं,
कीं महाकुंडें उघडलीं, प्रळयानळाचीं ॥ २०० ॥


पन्नासिलीं= पसरली ,उभी राहिली   


तैसीं अद्भुतें भयासुरें, तेथ वदनें देखिलीं वीरें,
आणिकें असाधारणें साळंकारें, सौम्यें बहुतें ॥ २०१ ॥
 

साळंकारें=स +अलंकार


पैं ज्ञानदृष्टीचेनि अवलोकें, परी वदनांचा शेवटु न टके,
मग लोचन तें कवतिकें, लागला पाहों ॥ २०२ ॥
 

टके=दिसणे


तंव नानावर्णें कमळवनें, विकासिलीं तैसे अर्जुनें,
डोळे देखिले पालिंगनें, आदित्यांचीं ॥ २०३ ॥
 

पालिंगनें=समुदाय


तेथेंचि कृष्णमेघांचिया दाटी-, माजीं कल्पांत विजूंचिया स्फुटी,
तैसिया वन्हि पिंगळा दिठी, भ्रूभंगातळीं ॥ २०४ ॥
 

स्फुटी=चक चकाट    पिंगळा=पिंगट पिवळसर


हें एकैक आश्चर्य पाहतां, तिये एकेचि रूपीं पंडुसुता,
दर्शनाची अनेकता, प्रतिफळली ॥ २०५ ॥


मग म्हणे चरण ते कवणेकडे, केउते मुकुट कें दोर्दंडें,
ऐसी वाढविताहे कोडें, चाड देखावयाची ॥ २०६ ॥
 

दोर्दंडें=बळकट बाहू


तेथ भाग्यनिधि पार्था, कां विफलत्व होईल मनोरथा,
काय पिनाकपाणीचिया भातां, वायकांडीं आहाती ? ॥ २०७ ॥
 

वायकांडीं=न टोचणारा ,निष्फळ बाण  पिनाकपाणी =शंकर, पिनाक धनुष्य घेतलेला


ना तरी चतुराननाचिये वाचे, काय आहाती लटिकिया अक्षरांचे साचे ?,
म्हणौनि साद्यंतपण अपारांचे, देखिलें तेणें ॥ २०८ ॥
 

साचे =ठसे, साचा   साद्यंत=संपूर्ण


जयाची सोय वेदां नाकळे, तयाचे सकळावयव एकेचि वेळे,
अर्जुनाचे दोन्ही डोळे, भोगिते जाहले ॥ २०९ ॥


चरणौनि मुकुटवरी, देखत विश्वरूपाची थोरी,
जे नाना रत्न अळंकारीं, मिरवत असे ॥ २१० ॥


परब्रह्म आपुलेनि आंगें, ल्यावया आपणचि जाहला अनेगें,
तियें लेणीं मी सांगें, काइसयासारिखीं ॥ २११ ॥
 

लेणीं=अलंकार


जिये प्रभेचिये झळाळा, उजाळु चंद्रादित्यमंडळा,
जे महातेजाचा जिव्हाळा, जेणें विश्व प्रगटे ॥ २१२ ॥


तो दिव्यतेज शृंगारु, कोणाचिये मतीसी होय गोचरु,
देव आपणपेंचि लेइले ऐसें वीरु, देखत असे ॥ २१३ ॥

 
मग तेथेंचि ज्ञानाचिया डोळां, पहात करपल्लवां जंव सरळा,
तंव तोडित कल्पांतींचिया ज्वाळा, तैसीं शस्त्रें झळकत देखे ॥ २१४ ॥


आपण आंग आपण अलंकार, आपण हात आपण हतियार,
आपण जीव आपण शरीर, देखें चराचर कोंदलें देवें ॥ २१५ ॥


जयाचिया किरणांचे निखरपणें, नक्षत्रांचे होत फुटाणे,
तेजें खिरडला वन्हि म्हणे, समुद्रीं रिघों ॥ २१६ ॥
 

निखरपणें=प्रखरतेने खिरडला=मागे फिरणे अवमानीत होणे


मग कालकूटकल्लोळीं कवळिलें, नाना महाविजूंचें दांग उमटलें,
तैसे अपार कर देखिले, उदितायुधीं ॥ २१७ ॥


दांग=अरण्य उदितायुधीं=उगारल्या शस्त्रासह

दिव्यमाल्याम्बरधरं दिव्यगन्धानुलेपनम्।
सर्वाश्चर्यमयं देवमनन्तं विश्वतोमुखम् ॥ ११॥


कीं भेणें तेथूनि काढिली दिठी, मग कंठमुगुट पहातसे किरीटी,
तंव सुरतरूची सृष्टी, जयांपासोनि कां जाहली ॥ २१८ ॥
 

कंठमुगुट=कंठ व मुगुट


जिये महासिद्धींचीं मूळपीठें, शिणली कमळा जेथ वावटे,
तैसीं कुसुमें अति चोखटें, तुरंबिलीं देखिलीं ॥ २१९ ॥
 

वावटे=विसावली     तुरंबिलीं=धारण केली


मुगुटावरी स्तबक, ठायीं ठायीं पूजाबंध अनेक,
कंठीं रुळताति अलौकिक, माळादंड ॥ २२० ॥
 

स्तबक=फुलांचा गुच्छ


स्वर्गें सूर्यतेज वेढिलें, जैसें पंधरेनें मेरूतें मढिलें,
तैसें नितंबावरी गाढिलें, पीतांबरु झळके ॥ २२१ ॥
 

पंधरे=सुवर्ण


श्रीमहादेवो कापुरें उटिला, कां कैलासु पारजें डवरिला,
नाना क्षीरोदकें पांघरविला, क्षीरार्णवो जैसा ॥ २२२ ॥
 

पारजें=पारा


जैसी चंद्रमयाची घडी उपलविली, मग गगनाकरवीं बुंथी घेवविली,
तैसीं चंदनपिंजरी देखिली, सर्वांगीं तेणें ॥ २२३ ॥
 

 बुंथी=पांघरून


जेणें स्वप्रकाशा कांतीं चढे, ब्रह्मानंदाचा निदाघु मोडे,
जयाचेनि सौरभ्यें जीवित जोडे, वेदवतीये ॥ २२४ ॥
 

निदाघु=दाह     वेदवतीये=पृथ्वी


जयाचे निर्लेप अनुलेपु करी, जे अनंगुही सर्वांगीं धरी,
तया सुगंधाची थोरी, कवण वानी   ॥ २२५ ॥


अनंगु=मदन (देह नसूनही )


ऐसी एकैक शृंगारशोभा, पाहतां अर्जुन जातसें क्षोभा,
तेवींचि देवो बैसला कीं उभा, का शयालु हें नेणवें ॥ २२६ ॥
 

शयालु=निजलेला


बाहेर दिठी उघडोनि पाहे, तंव आघवें मूर्तिमय देखत आहे,
मग आतां न पाहें म्हणौनि उगा राहे, तरी आंतुही तैसेंचि ॥ २२७ ॥


अनावरें मुखें समोर देखे, तयाभेणें पाठीमोरा जंव ठाके,
तंव तयाहीकडे श्रीमुखें, करचरण तैसेचि ॥ २२८ ॥


अहो पाहतां कीर प्रतिभासे, एथ नवलावो काय असे ?,
परि न पाहतांही दिसे, चोज आइका ॥ २२९ ॥


कैसें अनुग्रहाचें करणें, पार्थाचें पाहणें आणि न पाहणें,
तयाही सकट नारायणें, व्यापूनि घेतलें ॥ २३० ॥


म्हणौनि आश्चर्याच्या पुरीं एकीं, पडिला ठायेठाव थडीं ठाकी,
तंव चमत्काराचिया आणिकीं, महार्णवीं पडे ॥ २३१ ॥
 

ठायेठाव=  ठिकाणाहून 


तैसा अर्जुनु असाधारणें, आपुलिया दर्शनाचेनि विंदाणें,
कवळूनि घेतला तेणें, अनंतरूपें ॥ २३२ ॥
 

विंदाणें=कौशल्य


तो विश्वतोमुख स्वभावें, आणि तेचि दावावयालागीं पांडवें,
प्रार्थिला आतां आघवें, होऊनि ठेला ॥ २३३ ॥
 

विश्वतोमुख=विश्वरूप दर्शन


आणि दीपें कां सूर्यें प्रगटे, अथवा निमुटलिया देखावेंचि खुंटे,
तैसी दिठी नव्हे जे वैकुंठें, दिधली आहे ॥ २३४ ॥
 

कां =किंवा        निमुटलिया=विझल्यावर


म्हणौनि किरीटीसि दोहीं परी, तें देखणें देखें अंधारी,
हें संजयो हस्तिनापुरीं, सांगतसे राया ॥ २३५ ॥

प्रकाशात दिसते तसेच ते अंधारात दिसते


म्हणे किंबहुना अवधारिलें, पार्थें विश्वरूप देखिलें,
नाना आभरणीं भरलें, विश्वतोमुख ॥ २३६ ॥


आभरणीं=अलंकार


दिवि सूर्य सहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता।
यदि भाः सदृशी सा स्याद्भासस्तस्य महात्मनः ॥ १२॥


तिये अंगप्रभेचा देवा, नवलावो काइसया ऐसा सांगावा,
कल्पांतीं एकुचि मेळावा, द्वादशादित्यांचा होय ॥ २३७ ॥


तैसे ते दिव्यसूर्य सहस्रवरी, जरी उदयजती कां एकेचि अवसरीं,
तऱ्ही तया तेजाची थोरी, उपमूं नये ॥ २३८ ॥ 


आघवयाचि विजूंचा मेळावा कीजे, आणि प्रळयाग्नीची सर्व सामग्री आणिजे,
तेवींचि दशकुही मेळविजे, महातेजांचा ॥ २३९ ॥
 

दशकुही=दहा


तऱ्ही तिये अंगप्रभेचेनि पाडें, हें तेज कांहीं कांहीं होईल थोडें,
आणि तया ऐसें कीर चोखडें, त्रिशुद्धी नोहे ॥ २४० ॥
 

त्रिशुद्धी=खचित


ऐसें महात्म्य या श्रीहरीचें सहज, फांकतसे सर्वांगीचें तेज,
तें मुनिकृपा जी मज, दृष्ट जाहलें ॥ २४१ ॥


मुनि=व्यास ऋषी

तत्रैकस्थं जगत्कृत्स्नम् प्रविभक्तमनेकधा ॥
अपश्यद्देवदेवस्य शरीरे पांडवस्तदा ॥ १३॥


आणि तिये विश्वरूपीं एकीकडे, जग आघवें आपुलेनि पवाडें,
जैसे महोदधीमाजीं बुडबुडे, सिनानें दिसती ॥ २४२ ॥
 

पवाडें,=विस्तार कीर्ती     सिनानें=वेगवेगळे


कां आकाशीं गंधर्वनगर, भूतळीं पिपीलिका बांधे घर,
नाना मेरुवरी सपूर, परमाणु बैसले ॥ २४३ ॥
 

गंधर्वनगर,=मेघ माला
 
विश्व आघवेंचि तयापरी, तया देवचक्रवर्तीचिया शरीरीं,
अर्जुन तिये अवसरीं, देखता जाहला ॥ २४४ ॥





by विक्रांत प्रभाकर तिकोणे



ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ