Sunday, June 12, 2016

ज्ञानेश्वरी / अध्याय अकरावा ओव्या ८९ ते १४०



 

ज्ञानेश्वरी / अध्याय अकरावा / विश्वरूप दर्शन / संत ज्ञानेश्वर

ओव्या ८९ ते १४०

मन्यसे यदि तच्छक्यं मया द्रष्टुमिति प्रभो।
योगेश्वर ततो मे त्वं दर्शयाऽत्मानमव्ययम् ॥ ४॥


परी आणीक एक एथ शारङ्गी, तुज विश्वरूपातें देखावयालागीं,
पैं योग्यता माझिया आंगीं, असे कीं नाहीं ॥ ८९ ॥

हें आपलें आपण मी नेणें, तें कां नेणसी जरी देव म्हणे,
तरी सरोगु काय जाणे, निदान रोगाचें ? ॥ ९० ॥
 
सरोगु=रोगी

आणि जी आर्तीचेनि पडिभरें, आर्तु आपुली ठाकी पैं विसरे,
जैसा तान्हेला म्हणे न पुरे, समुद्र मज ॥ ९१ ॥
 
पडिभरें=वेगाने, जोर     ठाकी = स्थिती

ऐशा सचाडपणाचिये भुली, न सांभाळवे समस्या आपुली,
यालागीं योग्यता जेवीं माउली, बालकाची जाणे ॥ ९२ ॥
 
सचाडपणा=तीव्र इच्छा  

तयापरी श्रीजनार्दना, विचारिजो माझी संभावना,
मग विश्वरूपदर्शना, उपक्रम कीजे ॥ ९३ ॥  

संभावना=शक्यता ,अधिकार

तरी ऐसी ते कृपा करा, एऱ्हवीं नव्हे हें म्हणा अवधारा,
वायां पंचमालापें बधिरा, सुख केउतें देणें ? ॥ ९४ ॥

एऱ्हवीं येकले बापियाचे तृषे, मेघ जगापुरतें काय न वर्षे ?,
परी जहालीही वृष्टि उपखे, जऱ्ही खडकीं होय ॥ ९५ ॥
 
बापियाचे=चातक   उपखे=व्यर्थ

चकोरा चंद्रामृत फावलें, येरा आण वाहूनि काय वारिलें ?,
परी डोळ्यांवीण पाहलें, वायां जाय ॥ ९६ ॥
 
वारिलें =मिळाले (कारण त्यांना ते वेचायचे ज्ञान नाही )
पाहलें= पाहून (प्रकाश)

म्हणौनि विश्वरूप तूं सहसा, दाविसी कीर हा भरवंसा,
कां जे कडाडां आणि गहिंसा-, माजी नीत्य नवा तूं कीं ॥ ९७ ॥
कडाडां=जाणते  गहिंसा= अजाण  ,मूर्ख    

तुझें औदार्य जाणों स्वतंत्र, देतां न म्हणसी पात्रापात्र,
पैं कैवल्या ऐसें पवित्र, जें वैरियांही दिधलें ॥ ९८ ॥

मोक्षु दुराराध्यु कीर होय, परी तोही आराधी तुझे पाय,
म्हणौनि धाडिसी तेथ जाय, पाइकु जैसा ॥ ९९ ॥
 
दुराराध्यु=दुर्लभ

तुवां सनकादिकांचेनि मानें, सायुज्यीं सौरसु दिधला पूतने,
जे विषाचेनि स्तनपानें, मारूं आली ॥ १०० ॥

सौरसु=सुगंध
 
हां गा राजसूय यागाचिया सभासदीं, देखतां त्रिभुवनाची मांदी,
कैसा शतधा दुर्वाक्य शब्दीं, निस्तेजिलासी ॥ १०१ ॥
 
निस्तेजिलासी=अपमान केला

ऐशिया अपराधिया शिशुपाळा, आपणपें ठावो दिधला गोपाळा,
आणि उत्तानचरणाचिया बाळा, काय ध्रुवपदीं चाड ? ॥ १०२ ॥

तो वना आला याचिलागीं, जे बैसावें पितयाचिया उत्संगीं,
कीं तो चंद्रसूर्यादिकांपरिस जगीं, श्लाघ्यु केला ॥ १०३ ॥
 
उत्संगीं=मांडीवर   श्लाघ्यु=स्तुत्य

ऐसा वनवासिया सकळां, देतां एकचि तूं धसाळा,
पुत्रा आळवितां अजामिळा, आपणपें देसी ॥ १०४ ॥
 
वनवासिया= दु:खी   धसाळा,=कैवल्य  

जेणें उरीं हाणितलासि पांपरा, तयाचा चरणु वाहासी दातारा,
अझुनी वैरियांचिया कलेवरा, विसंबसीना ॥ १०५ ॥
 
पांपरा=लाथ  कलेवरा=प्रेता (शंखासुर राक्षस)   विसंबसीना=सोडणे

ऐसा अपकारियां तुझा उपकारु, तूं अपात्रींही परी उदारु,
दान म्हणौनि दारवंठेकरु, जाहलासी बळीचा ॥ १०६ ॥
 
दारवंठेकरु=दारवान

तूंतें आराधी ना आयकें, होती पुंसा बोलावित कौतुकें,
तिये वैकुंठीं तुवां गणिके, सुरवाडु केला ॥ १०७ ॥
 
पुंसा=पोपट    सुरवाडु=सुखी

ऐसीं पाहूनि वायाणीं मिषें, आपणपें देवों लागसी वानिवसें,
तो तूं कां अनारिसें, मजलागीं करिसी ॥ १०८ ॥
 
वायाणीं=व्यर्थ वेगळी  वानिवसें=अकस्मात  अनारिसें=वेगळे

हां गा दुभतयाचेनि पवाडें, जे जगाचें फेडी सांकडें,
तिये कामधेनूचे पाडे, काय भुकेले ठाती ? ॥ १०९ ॥

म्हणौनि मियां जें विनविलें कांहीं, तें देव न दाखविती हें कीर नाहीं,
परी देखावयालागीं देईं, पात्रता मज ॥ ११० ॥

तुझें विश्वरूप आकळे, ऐसे जरी जाणसी माझे डोळे,
तरी आर्तीचे डोहळे, पुरवीं देवा ॥ १११ ॥

ऐसी ठायेंठावो विनंती, जंव करूं सरला सुभद्रापती,
तंव तया षड्गुणचक्रवर्ती, साहवेचिना ॥ ११२ ॥

तो कृपापीयूषसजळु, आणि येरु जवळां आला वर्षाकाळु,
नाना कृष्ण कोकिळु, अर्जुन वसंतु ॥ ११३ ॥

नातरी चंद्रबिंब वाटोळें, देखोनि क्षीरसागर उचंबळे,
तैसा दुणेंही वरी प्रेमबळें, उल्लसितु जाहला ॥ ११४ ॥

मग तिये प्रसन्नतेचेनि आटोपें, गाजोनि म्हणितलें सकृपें,
पार्था देख देख अमुपें, स्वरूपें माझीं ॥ ११५ ॥
 
आटोपें=आवेशे भराने  गाजोनि=मोठमोठ्याने

एक विश्वरूप देखावें, ऐसा मनोरथु केला पांडवें,
कीं विश्वरूपमय आघवें, करूनि घातलें ॥ ११६ ॥
 
बाप उदार देवो अपरिमितु, याचक स्वेच्छा सदोदितु,
असे सहस्रवरी देतु, सर्वस्व आपुलें ॥ ११७ ॥

अहो शेषाचेहि डोळे चोरिले, वेद जयालागीं झकविले,
लक्ष्मीयेही राहविलें, जिव्हार जें ॥ ११८ ॥

तें आतां प्रकटुनी अनेकधा, करीत विश्वरूपदर्शनाचा धांदा,
बाप भाग्या अगाधा, पार्थाचिया ॥ ११९ ॥
 
धांदा=व्यवहार

जो जागता स्वप्नावस्थे जाये, तो जेवीं स्वप्नींचें आघवें होये,
तेवीं अनंत ब्रह्मकटाह आहे, आपणचि जाहला ॥ १२० ॥
 
ब्रह्मकटाह=ब्रह्मांड स्वरुप

ते सहसा मुद्रा सोडिली, आणि स्थूळदृष्टीची जवनिका फेडिली,
किंबहुना उघडिली, योगऋद्धी ॥ १२१ ॥
 
जवनिका=पडदा योगऋद्धी=योग वैभव

परी हा हें देखेल कीं नाहीं, ऐसी सेचि न करी कांहीं,
एकसरां म्हणतसे पाहीं, स्नेहातुर ॥ १२२ ॥

सेचि=विचार चिंता

श्रीभगवानुवाच।
पश्य मे पार्थ रूपाणि शतशोऽथ सहस्रशः।
नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च ॥ ५॥


अर्जुना तुवां एक दावा म्हणितलें, आणि तेंचि दावूं तरी काय दाविलें,
आतां देखें आघवें भरिलें, माझ्याचि रूपीं ॥ १२३ ॥

एकें कृशें एकें स्थूळें, एकें ऱ्हस्वें एकें विशाळें,
पृथुतरें सरळें, अप्रांतें एकें ॥ १२४ ॥
 
पृथुतरें=जाड  अप्रांतें=अपार

एकें अनावरें प्रांजळें, सव्यापारें एकें निश्चळें,
उदासीनें स्नेहाळें, तीव्रें एकें ॥ १२५ ॥

एके घूर्णितें सावधें, असलगें एकें अगाधें,
एकें उदारें अतिबद्धें, क्रुद्धें एकें ॥ १२६ ॥
 
घूर्णितें=निजले असलगें=सोपे  अगाधें, = अवघड
अतिबद्धें,=कृपण

एकें शांतें सन्मदें, स्तब्धें एकें सानंदें,
गर्जितें निःशब्दें, सौम्यें एकें ॥ १२७ ॥

एकें साभिलाषें विरक्तें, उन्निद्रितें एकें निद्रितें,
परितुष्टें एकें आर्तें, प्रसन्नें एकें ॥ १२८ ॥
 
उन्निद्रितें=जागे

एकें अशस्त्रें सशस्त्रें, एकें रौद्रें अतिमित्रें,
भयानकें एकें पवित्रें, लयस्थें एकें ॥ १२९ ॥
 
अतिमित्रें=मैत्रीकर लयस्थें=लीन तदाकार

एकें जनलीलाविलासें, एकें पालनशीलें लालसें,
एकें संहारकें सावेशें, साक्षिभूतें एकें ॥ १३० ॥

एवं नानाविधें परी बहुवसें, आणि दिव्यतेजप्रकाशें,
तेवींचि एक{}का ऐसें, वर्णेंही नव्हे ॥ १३१ ॥

एकें तातलें साडेपंधरें, तैसीं कपिलवर्णें अपारें,
एकें सर्वांगीं जैसें सेंदुरें, डवरलें नभ ॥ १३२ ॥

एकें सावियाचि चुळुकीं, जैसें ब्रह्मकटाह खचिलें माणिकीं,
एकें अरुणोदयासारिखीं, कुंकुमवर्णें ॥ १३३ ॥
 
सावियाचि =साहजिक    चुळुकीं=चमकदार तेजाने  

एकें शुद्धस्फटिकसोज्वळें, एकें इंद्रनीळसुनीळें,
एकें अंजनवर्णें सकाळें, रक्तवर्णें एकें ॥ १३४ ॥

एकें लसत्कांचनसम पिंवळीं, एकें नवजलदश्यामळीं,
एकें चांपेगौरीं केवळीं, हरितें एकें ॥ १३५ ॥
 
लसत्कांचन= चमकदार सोने

एकें तप्तताम्रतांबडीं, एकें श्वेतचंद्र चोखडीं,
ऐसीं नानावर्णें रूपडीं, देखें माझीं ॥ १३६ ॥

हे जैसे कां आनान वर्ण, तैसें आकृतींही अनारिसेपण,
लाजा कंदर्प रिघाला शरण, तैसीं सुंदरें एकें ॥ १३७ ॥
 
कंदर्प=मदन

एकें अतिलावण्यसाकारें, एकें स्निग्धवपु मनोहरें,
शृंगारश्रियेचीं भांडारें, उघडिली जैसीं ॥ १३८ ॥
 
स्निग्धवपु=तुळतुळीत श्रिये=वैभव

एकें पीनावयवमांसाळें, एकें शुष्कें अति विक्राळें,
एकें दीर्घकंठें विताळें, विकटें एकें ॥ १३९ ॥
 
विताळें=मोठ्या ताळूची

एवं नानाविधाकृती, इयां पाहतां पारु नाहीं सुभद्रापती,
ययांच्या एकेकीं अंगप्रांतीं, देख पां जग ॥ १४० ॥


http://dnyaneshwariabhyas.blogspot.in/

विक्रांत तिकोणे
ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ 
ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ

1 comment: