Monday, October 31, 2016

ज्ञानेश्वरी / अध्याय तेरावा / संत ज्ञानेश्वर ओवी ७२ ते १८४






ज्ञानेश्वरी / अध्याय तेरावा / संत ज्ञानेश्वर
ओवी ७२ ते  १८४ 



महाभूतान्यहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च।
इन्द्रियाणि दशैकं च पञ्च चेन्द्रियगोचराः ॥ ५॥

इच्छा द्वेषः सुखं दुःखं संघातश्चेतना धृतिः।
एतत्क्षेत्रं समासेन सविकारमुदाहृतम् ॥ ६॥


तरि महाभूतपंचकु, आणि अहंकारु एकु,
बुद्धि अव्यक्त दशकु, इंद्रियांचा ॥ ७२ ॥


मन आणीकही एकु, विषयांचा दशकु,
सुख दुःख द्वेषु, संघात इच्छा ॥ ७३ ॥

विषयांचा दशकु=शब्द स्पर्श रस गंध रूप

आणि चेतना धृती, एवं क्षेत्रव्यक्ती,
सांगितली तुजप्रती, आघवीची ॥ ७४ ॥

धृती=धैर्य

आतां महाभूतें कवणें, कवण विषयो कैसीं करणे,
हें वेगळालेपणें, एकैक सांगों ॥ ७५ ॥

तरी पृथ्वी आप तेज, वायु व्योम इयें तुज,
सांगितलीं बुझ, महाभूतें पांचें ॥ ७६ ॥

बुझ,=जाण

आणि जागतिये दशे, स्वप्न लपालें असे,
नातरी अंवसे, चंद्र गूढु ॥ ७७ ॥

नाना अप्रौढबाळकीं, तारुण्य राहे थोकीं,
कां न फुलतां कळिकीं, आमोदु जैसा ॥ ७८ ॥

थोकीं,=गुप्त ,

किंबहुना काष्ठीं, वन्हि जेवीं किरीटी,
तेवीं प्रकृतिचिया पोटीं, गोप्यु जो असे ॥ ७९ ॥

जैसा ज्वरु धातुगतु, अपथ्याचें मिष पहातु,
मग जालिया आंतु, बाहेरी व्यापी ॥ ८० ॥

तैसी पांचांही गांठीं पडे, जैं देहाकारु उघडे,
तैं नाचवी चहूंकडे, तो अहंकारु गा ॥ ८१ ॥

नवल अहंकाराची गोठी, विशेषें न लगे अज्ञानापाठीं,
सज्ञानाचे झोंबे कंठीं, नाना संकटीं नाचवी ॥ ८२ ॥

आतां बुद्धि जे म्हणिजे, ते ऐशियां चिन्हीं जाणिजे,
बोलिलें यदुराजें, तें आइकें सांगों ॥ ८३ ॥

तरी कंदर्पाचेनि बळें, इंद्रियवृत्तीचेनि मेळें,
विभांडूनि येती पाळे, विषयांचे ॥ ८४ ॥

कंदर्पा= काम    विभांडूनि=जिंकून  पाळे,=समुदाय

तो सुखदुःखांचा नागोवा, जेथ उगाणों लागे जीवा,
तेथ दोहींसी बरवा, पाडु जे धरी ॥ ८५ ॥

नागोवा=लूट  उगाणों=मोजणे  बरवा =योग्य पाडु=तुलना

हें सुख हें दुःख, हें पुण्य हें दोष,
कां हें मैळ हें चोख, ऐसें जे निवडी ॥ ८६ ॥

जिथे अधमोत्तम सुझे, जिये सानें थोर बुझे,
जिया दिठी पारखिजे, विषो जीवें ॥ ८७ ॥

सुझे=समजने बुझे,=कळणे

जे तेजतत्त्वांची आदी, जे सत्त्वगुणाची वृद्धी,
जे आत्मया जीवाची संधी, वसवीत असे जे ॥ ८८ ॥

अर्जुना ते गा जाण, बुद्धि तूं संपूर्ण,
आतां आइकें वोळखण, अव्यक्ताची ॥ ८९ ॥

पैं सांख्यांचिया सिद्धांतीं, प्रकृती जे महामती,
तेचि एथें प्रस्तुतीं, अव्यक्त गा ॥ ९० ॥

आणि सांख्ययोगमतें, प्रकृती परिसविली तूंतें,
ऐसी दोहीं परीं जेथें, विवंचिली ॥ ९१ ॥

तेथ दुजी जे जीवदशा, तिये नांव वीरेशा,
येथ अव्यक्त ऐसा, पर्यावो हा ॥ ९२ ॥

तऱ्ही पाहालया रजनी, तारा लोपती गगनीं,
कां हारपें अस्तमानीं, भूतक्रिया ॥ ९३ ॥

नातरी देहो गेलिया पाठीं, देहादिक किरीटी,
उपाधि लपे पोटीं, कृतकर्माच्या ॥ ९४ ॥

उपाधि=देह संसार कृतकर्माच्या=संचित

कां बीजमुद्रेआंतु, थोके तरु समस्तु,
कां वस्त्रपणे तंतु-, दशे राहे ॥ ९५ ॥

थोके=लपे गुप्तपणे राहे

तैसे सांडोनियां स्थूळधर्म, महाभूतें भूतग्राम,
लया जाती सूक्ष्म, होऊनि जेथे ॥ ९६ ॥

अर्जुना तया नांवें, अव्यक्त हें जाणावें,
आतां आइकें आघवें, इंद्रियभेद ॥ ९७ ॥

तरी श्रवण नयन, त्वचा घ्राण रसन,
इयें जाणें ज्ञान-, करणें पांचें ॥ ९८ ॥

इये तत्त्वमेळापंकीं, सुखदुःखांची उखिविखी,
बुद्धि करिते मुखीं, पांचें इहीं ॥ ९९ ॥

तत्त्वमेळापंकीं =शरीर  उखिविखी=चर्चा वाटाघाट

मग वाचा आणि कर, चरण आणि अधोद्वार,
पायु हे प्रकार, पांच आणिक ॥ १०० ॥

कर्मेंद्रियें म्हणिपती, तीं इयें जाणिजती,
आइकें कैवल्यपती, सांगतसे ॥ १०१ ॥

पैं प्राणाची अंतौरी, क्रियाशक्ति जे शरीरीं,
तियेचि रिगिनिगी द्वारीं, पांचे इहीं ॥ १०२ ॥

अंतौरी= स्त्री पत्नी रिगिनिगी=ये जा

एवं दाहाही करणें, सांगितलीं देवो म्हणे,
परिस आतां फुडेपणें, मन तें ऐसें ॥ १०३ ॥

फुडेपणें=स्पष्टपणे

जें इंद्रियां आणि बुद्धि, माझारिलिये संधीं,
रजोगुणाच्या खांदीं, तरळत असे ॥ १०४ ॥

नीळिमा अंबरीं, कां मृगतृष्णालहरी,
तैसें वायांचि फरारी, वावो जाहलें ॥ १०५ ॥

फरारी=भासमान होणे वावो=व्यर्थ

आणि शुक्रशोणिताचा सांधा, मिळतां पांचांचा बांधा,
वायुतत्त्व दशधा, एकचि जाहलें ॥ १०६ ॥

शुक्रशोणिताचा=स्त्री पुरुष बीज बांधा=आकार
दशधा=दाही

मग तिहीं दाहे भागीं, देहधर्माच्या खैवंगीं,
अधिष्ठिलें आंगीं, आपुलाल्या ॥ १०७ ॥

खैवंगीं,=बळे बळकट

तेथ चांचल्य निखळ, एकलें ठेलें निढाळ,
म्हणौनि रजाचें बळ, धरिलें तेणें ॥ १०८ ॥
निढाळ,=केवळ

तें बुद्धीसि बाहेरी, अहंकाराच्या उरावरी,
ऐसां ठायीं माझारीं, बळियावलें ॥ १०९ ॥

माझारीं=मध्ये

वायां मन हें नांव, एऱ्हवीं कल्पनाचि सावेव,
जयाचेनि संगें जीव-, दशा वस्तु ॥ ११० ॥

जें प्रवृत्तीसि मूळ, कामा जयाचे बळ,
जें अखंड सूये छळ, अहंकारासी ॥ १११ ॥

सूये=निर्माण करणे

जें इच्छेतें वाढवी, आशेतें चढवी,
जें पाठी पुरवी, भयासि गा ॥ ११२ ॥

द्वैत जेथें उठी, अविद्या जेणें लाठी,
जें इंद्रियांतें लोटी, विषयांमजी ॥ ११३ ॥

लाठी,=बळी

संकल्पें सृष्टी घडी, सवेंचि विकल्पूनि मोडी,
मनोरथांच्या उतरंडी, उतरी रची ॥ ११४ ॥

जें भुलीचें कुहर, वायुतत्त्वाचें अंतर,
बुद्धीचें द्वार, झाकविलें जेणें ॥ ११५ ॥

कुहर=दरी 

तें गा किरीटी मन, या बोला नाहीं आन,
आतां विषयाभिधान, भेदू आइकें ॥ ११६ ॥
अभिधान =नाव

तरी स्पर्शु आणि शब्दु, रूप रसु गंधु,
हा विषयो पंचविधु, ज्ञानेंद्रियांचा ॥ ११७ ॥

इहीं पांचैं द्वारीं, ज्ञानासि धांव बाहेरी,
जैसा कां हिरवे चारीं, भांबावे पशु ॥ ११८ ॥

मग स्वर वर्ण विसर्गु, अथवा स्वीकार त्यागु,
संक्रमण उत्सर्गु, विण्मूत्राचा ॥ ११९ ॥

विसर्गु=उच्चार विण्मूत्राचा=मलोत्सर्जन

हे कर्मेंद्रियांचे पांच, विषय गा साच,
जे बांधोनियां माच, क्रिया धांवे ॥ १२० ॥

माच,=मांडव

ऐसे हे दाही, विषय गा इये देहीं,
आतां इच्छा तेही, सांगिजैल ॥ १२१ ॥

तरि भूतलें आठवे, कां बोलें कान झांकवे,
ऐसियावरि चेतवे, जे गा वृत्ती ॥ १२२ ॥

भूतलें=मागील झांकवे,=लक्ष देणे

इंद्रियाविषयांचिये भेटी-, सरसीच जे गा उठी,
कामाची बाहुटी, धरूनियां ॥ १२३ ॥

बाहुटी,=हात

जियेचेनि उठिलेपणें, मना सैंघ धावणें,
न रिगावें तेथ करणें, तोंडें सुती ॥ १२४ ॥

सैंघ=सतत, खूप  तोंडें सुती=तोंडे खुपसतात

जिये वृत्तीचिया आवडी, बुद्धी होय वेडी,
विषयां जिया गोडी, ते गा इच्छा ॥ १२५ ॥

आणी इच्छिलिया सांगडें, इंद्रियां आमिष न जोडे,
तेथ जोडे ऐसा जो डावो पडे, तोचि द्वेषु ॥ १२६ ॥

सांगडें=सारखे   जोडे,=मिळे डावो पडे=घडणे

आतां यावरी सुख, तें एवंविध देख,
जेणें एकेंचि अशेख, विसरे जीवु ॥ १२७ ॥

अशेख,=बाकीचे

मना वाचे काये, जें आपुली आण वाये,
देहस्मृतीची त्राये, मोडित जें ये ॥ १२८ ॥

 त्राये=बळ

जयाचेनि जालेपणें, पांगुळा होईजे प्राणें,
सात्त्विकासी दुणें, वरीही लाभु ॥ १२९ ॥

कां आघवियाचि इंद्रियवृत्ती, हृदयाचिया एकांतीं,
थापटूनि सुषुप्ती, आणी जें गा ॥ १३० ॥

सुषुप्ती,=निद्रा

किंबहुना सोये, जीव आत्मयाची लाहे,
तेथ जें होये, तया नाम सुख ॥ १३१ ॥

सोये=भेट

आणि ऐसी हे अवस्था, न जोडतां पार्था,
जें जीजे तेंचि सर्वथा, दुःख जाणे ॥ १३२ ॥

जीजे=जगणे

तें मनोरथसंगें नव्हे, एऱ्हवीं सिद्धी गेलेंचि आहे,
हे दोनीचि उपाये, सुखदुःखासी ॥ १३३ ॥

ते सुख मनोरथा सवे प्राप्त होत नाही
एरव्ही मनाने मनोरथ सोडले की ते सिद्धच आहे

आतां असंगा साक्षिभूता, देहीं चैतन्याची जे सत्ता,
तिये नाम पंडुसुता, चेतना येथें ॥ १३४ ॥

जे नखौनि केशवरी, उभी जागे शरीरीं,
जे तिहीं अवस्थांतरी, पालटेना ॥ १३५ ॥

मनबुद्ध्यादि आघवीं, जियेचेनि टवटवीं,
प्रकृतिवनमाधवीं, सदांचि जे ॥ १३६ ॥

माधवीं=वसंत

जडाजडीं अंशीं, राहाटे जे सरिसी,
ते चेतना गा तुजसी, लटिकें नाहीं ॥ १३७ ॥

पैं रावो परिवारु नेणे, आज्ञाचि परचक्र जिणे,
कां चंद्राचेनि पूर्णपणें, सिंधू भरती ॥ १३८ ॥

परिवारु=सैन्यदळ,लवाजमा

नाना भ्रामकाचें सन्निधान, लोहो करी सचेतन,
कां सूर्यसंगु जन, चेष्टवी गा ॥ १३९ ॥

भ्रामका=लोहचुंबक चेष्टवी=कामकाज करणे (हलवणे)

अगा मुख मेळेंविण, पिलियाचें पोषण,
करी निरीक्षण, कूर्मी जेवीं ॥ १४० ॥

निरीक्षण=फक्त पाहून

पार्था तियापरी, आत्मसंगती इये शरीरीं,
सजीवत्वाचा करी, उपेगु जडा ॥ ४१ ॥

मग तियेतें चेतना, म्हणिपे पैं अर्जुना,
आतां धृतिविवंचना, भेदु आइक ॥ १४२ ॥

तरी भूतां परस्परें, उघड जाति स्वभाववैरें,
नव्हे पृथ्वीतें नीरें, न नाशिजे ? ॥ १४३ ॥

नीरातें आटी तेज, तेजा वायूसि झुंज,
आणि गगन तंव सहज, वायू भक्षी ॥ १४४ ॥

तेवींचि कोणेही वेळे, आपण कायिसयाही न मिळे,
आंतु रिगोनि वेगळें, आकाश हें ॥ १४५ ॥

ऐसीं पांचही भूतें, न साहती एकमेकांतें,
कीं तियेंही ऐक्यातें, देहासी येती ॥ १४६ ॥

द्वंद्वाची उखिविखी, सोडूनि वसती एकीं,
एकेकातें पोखी, निजगुणें गा ॥ १४७ ॥

उखिविखी=चर्चा पोखी=पोसणे

ऐसें न मिळे तयां साजणें, चळे धैर्यें जेणें,
तयां नांव म्हणें, धृती मी गा ॥ १४८ ॥

साजणें=सख्य चळे=घडणे

आणि जीवेंसी पांडवा, या छत्तिसांचा मेळावा,
तो हा एथ जाणावा, संघातु पैं गा ॥ १४९ ॥

एवं छत्तीसही भेद, सांगितले तुज विशद,
यया येतुलियातें प्रसिद्ध, क्षेत्र म्हणिजे ॥ १५० ॥

रथांगांचा मेळावा, जेवीं रथु म्हणिजे पांडवा,
कां अधोर्ध्व अवेवां, नांव देहो ॥ १५१ ॥

करीतुरंगसमाजें, सेना नाम निफजे,
कां वाक्यें म्हणिपती पुंजे, अक्षरांचे ॥ १५२ ॥

 तुरंग =घोडा  पुंजे,=घोळका

कां जळधरांचा मेळा, वाच्य होय आभाळा,
नाना लोकां सकळां, नाम जग ॥ १५३ ॥

कां स्नेहसूत्रवन्ही, मेळु एकिचि स्थानीं,
धरिजे तो जनीं, दीपु होय ॥ १५४ ॥

तैसीं छत्तीसही इयें तत्त्वें, मिळती जेणें एकत्वें,
तेणें समूह परत्वें, क्षेत्र म्हणिपे ॥ १५५ ॥

आणि वाहतेनि भौतिकें, पाप पुण्य येथें पिके,
म्हणौनि आम्ही कौतुकें, क्षेत्र म्हणों ॥ १५६ ॥

भौतिकें=जगती

आणि एकाचेनि मतें, देह म्हणती ययातें,
परी असो हें अनंतें, नामें यया ॥ १५७ ॥

पैं परतत्त्वाआरौतें, स्थावराआंतौतें,
जें कांहीं होतें जातें, क्षेत्रचि हें ॥ १५८ ॥

आरौतें=अलीकडे आंतौतें=आत

परि सुर नर उरगीं, घडत आहे योनिविभागीं,
तें गुणकर्मसंगीं, पडिलें सातें ॥ १५९ ॥

उरगीं,=साप पडिलें सातें= पडतात

हेचि गुणविवंचना, पुढां म्हणिपैल अर्जुना,
प्रस्तुत आतां तुज ज्ञाना, रूप दावूं ॥ १६० ॥

क्षेत्र तंव सविस्तर, सांगितलें सविकार,
म्हणौनि आतां उदार, ज्ञान आइकें ॥ १६१ ॥

जया ज्ञानालागीं, गगन गिळिताती योगी,
स्वर्गाची आडवंगी, उमरडोनि ॥ १६२ ॥

आडवंगी,=अडथळा  उमरडोनि=ओलांडून

न करिती सिद्धीची चाड, न धरिती ऋद्धीची भीड,
योगा{}सें दुवाड, हेळसिती ॥ १६३ ॥

दुवाड =कठीण  हेळसिती=तुच्छ मानतात

तपोदुर्गें वोलांडित, क्रतुकोटि वोवांडित,
उलथूनि सांडित, कर्मवल्ली ॥ १६४ ॥
 
क्रतुकोटि=कोटी यज्ञ  वोवांडित, =ओवाळून टाकतात

नाना भजनमार्गी, धांवत उघडिया आंगीं,
एक रिगताति सुरंगीं, सुषुम्नेचिये ॥ १६५ ॥

सुरंगीं=बोगदा

ऐसी जिये ज्ञानीं, मुनीश्वरांची उतान्ही,
वेदतरूच्या पानोवानीं, हिंडताती ॥ १६६ ॥

उतान्ही=तीव्र इच्छा

देईल गुरुसेवा, इया बुद्धि पांडवा,
जन्मशतांचा सांडोवा, टाकित जे ॥ १६७ ॥

जया ज्ञानाची रिगवणी, अविद्ये उणें आणी,
जीवा आत्मया बुझावणी, मांडूनि दे ॥ १६८ ॥

रिगवणी,=प्रवेश बुझावणी=एकरूपता

जें इंद्रियांचीं द्वारें आडी, प्रवृत्तीचे पाय मोडी,
जें दैन्यचि फेडी, मानसाचें ॥ १६९ ॥

द्वैताचा दुकाळु पाहे, साम्याचें सुयाणें होये,
जया ज्ञानाची सोये, ऐसें करी ॥ १७० ॥

दुकाळु=दुष्काळ सुयाणें=सुकाळ सोये,=प्राप्ती

मदाचा ठावोचि पुसी, जें महामोहातें ग्रासी,
नेदी आपपरु ऐसी, भाष उरों ॥ १७१ ॥

जें संसारातें उन्मूळी, संकल्पपंकु पाखाळी,
अनावरातें वेंटाळी, ज्ञेयातें जें ॥ १७२ ॥

पाखाळी=धुवून टाकणे

जयाचेनि जालेपणें, पांगुळा होईजे प्राणें,
जयाचेनि विंदाणें, जग हें चेष्टें ॥ १७३ ॥

विंदाणें=कुशलता

जयाचेनि उजाळें, उघडती बुद्धीचे डोळे,
जीवु दोंदावरी लोळे, आनंदाचिया ॥ १७४ ॥

दोंदावरी=राशी (पोट)

ऐसें जें ज्ञान, पवित्रैकनिधान,
जेथ विटाळलें मन, चोख कीजे ॥ १७५ ॥

आत्मया जीवबुद्धी, जे लागली होती क्षयव्याधी,
ते जयाचिये सन्निधी, निरुजा कीजे ॥ १७६ ॥

निरुजा =बरे केले

तें अनिरूप्य कीं निरूपिजे, ऐकतां बुद्धी आणिजे,
वांचूनि डोळां देखिजे, ऐसें नाहीं ॥ १७७ ॥

मग तेचि इये शरीरीं, जैं आपुला प्रभावो करी,
तैं इंद्रियांचिया व्यापारीं, डोळांहि दिसे ॥ १७८ ॥

पैं वसंताचें रिगवणें, झाडांचेनि साजेपणें,
जाणिजे तेवीं करणें, सांगती ज्ञान ॥ १७९ ॥
 
अगा वृक्षासि पाताळीं, जळ सांपडे मुळीं,
तें शाखांचिये बाहाळीं, बाहेर दिसे ॥ १८० ॥

बाहाळीं,=विस्तार

कां भूमीचें मार्दव, सांगे कोंभाची लवलव,
नाना आचारगौरव, सुकुलीनाचें ॥ १८१ ॥

अथवा संभ्रमाचिया आयती, स्नेहो जैसा ये व्यक्ति,
कां दर्शनाचिये प्रशस्तीं, पुण्यपुरुष ॥ १८२ ॥

संभ्रमाचिया आयती=आदर आतिथ्याची तयारी

नातरी केळीं कापूर जाहला, जेवीं परिमळें जाणों आला,
कां भिंगारीं दीपु ठेविला, बाहेरी फांके ॥ १८३ ॥

 भिंगारीं=काचदान(कंदील)
 
तैसें हृदयींचेनि ज्ञानें, जियें देहीं उमटती चिन्हें,
तियें सांगों आतां अवधानें, चागें आइक ॥ १८४ ॥

http://dnyaneshwariabhyas.blogspot.in/