Wednesday, August 10, 2016

ज्ञानेश्वरी अध्याय १२ वा.ओव्या १६४ ते २४७



 

 

ज्ञानेश्वरी / अध्याय बारावा / संत ज्ञानेश्वर

ओव्या १६४ ते २४७

यस्मान्नोद्विजते लोको लोकान्नोद्विजते च यः।
हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः ॥ १५॥


तरी सिंधूचेनि माजें, जळचरां भय नुपजे,
आणि जळचरीं नुबगिजे, समुद्रु जैसा ॥ १६५ ॥
 
नुबगिजे=न उबगने

तेवीं उन्मत्तें जगें, जयासि खंती न लगे,
आणि जयाचेनि आंगें, न शिणे लोकु ॥ १६६ ॥

किंबहुना पांडवा, शरीर जैसें अवयवां,
तैसा नुबगे जीवां, जीवपणें जो ॥ १६७ ॥

जगचि देह जाहलें, म्हणौनि प्रियाप्रिय गेलें,
हर्षामर्ष ठेले, दुजेनविण ॥ १६८ ॥

हर्षामर्ष=आनंद शोक

ऐसा द्वंद्वनिर्मुक्तु, भयोद्वेगरहितु,
याहीवरी भक्तु, माझ्यां ठायीं ॥ १६९ ॥

तरी तयाचा गा मज मोहो, काय सांगों तो पढियावो,
हें असो जीवें जीवो, माझेनि तो ॥ १७० ॥

जो निजानंदें धाला, परिणामु आयुष्या आला,
पूर्णते जाहला, वल्लभु जो ॥ १७१ ॥

परिणामु=सार्थक

अनपेक्षः शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः।
सर्वारंभपरित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः ॥ १६॥


जयाचिया ठायीं पांडवा, अपेक्षे नाहीं रिगावा,
सुखासि चढावा, जयाचें असणें ॥ १७२ ॥
चढावा=वाढ

मोक्ष देऊनि उदार, काशी होय कीर,
परी वेचावें लागें शरीर, तिये गांवीं ॥ १७३ ॥

हिमवंतु दोष खाये, परी जीविताची हानि होये,
तैसें शुचित्व नोहे, सज्जनाचें ॥ १७४ ॥

शुचित्वें शुचि गांग होये, आणि पापतापही जाये,
परी तेथें आहे, बुडणें एक ॥ १७५ ॥

खोलिये पारु नेणिजे, तरी भक्तीं न बुडिजे,
रोकडाचि लाहिजे, न मरतां मोक्षु ॥ १७६ ॥

संताचेनि अंगलगें, पापातें जिणणें गंगे,
तेणें संतसंगें, शुचित्व कैसें ॥ १७७ ॥

(किती श्रेष्ठ)

म्हणौनि असो जो ऐसा, शुचित्वें तीर्थां कुवासा,
जेणें उल्लंघविलें दिशा, मनोमळ ॥ १७८ ॥

कुवासा=आश्रय

आंतु बाहेरी चोखाळु, सूर्य जैसा निर्मळु,
आणि तत्त्वार्थींचा पायाळु, देखणा जो ॥ १७९ ॥

पायाळु=(तत्त्वाचे) गुप्त धन पाहू शकणारा

व्यापक आणि उदास, जैसें कां आकाश,
तैसें जयाचें मानस, सर्वत्र गा ॥ १८० ॥

संसारव्यथे फिटला, जो नैराश्यें विनटला,
व्याधाहातोनि सुटला, विहंगु जैसा ॥ १८१ ॥

नैराश्यें=निरीच्छता विनटला=शोभला

तैसा सतत जो सुखें, कोणीही टवंच न देखे,
नेणिजे गतायुषें, लज्जा जेवीं ॥ १८२ ॥

टवंच=त्रास गतायुषें=मृत

आणि कर्मारंभालागीं, जया अहंकृती नाही आंगीं,
जैसें निरिंधन आगी, विझोनि जाय ॥ १८३ ॥

निरिंधन=इंधन नसता

तैसा उपशमुचि भागा, जयासि आला पैं गा,
जो मोक्षाचिया आंगा, लिहिला असे ॥ १८४ ॥

उपशम=शांती  लिहिला असे=सनद घेणे

अर्जुना हा ठावोवरी, जो सोऽहंभावो सरोभरीं,
द्वैताच्या पैलतीरीं, निगों सरला ॥ १८५ ॥

ठावोवरी=येथवर मुक्कामापर्यंत   सरोभरीं=परिपूर्ण भरला

कीं भक्तिसुखालागीं, आपणपेंचि दोही भागीं,
वांटूनियां आंगीं, सेवकै बाणी ॥ १८६ ॥

येरा नाम मी ठेवी, मग भजती वोज बरवी,
न भजतया दावी, योगिया जो ॥ १८७ ॥

वोज=रीत

तयाचे आम्हां व्यसन, आमुचें तो निजध्यान,
किंबहुना समाधान, तो मिळे तैं ॥ १८८ ॥

तयालागीं मज रूपा येणें, तयाचेनि मज येथें असणें,
तया लोण कीजे जीवें प्राणें, ऐसा पढिये ॥ १८९ ॥

लोण=वोवाळून टाकणे पढिये=प्रिय

यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति।
शुभाशुभपरित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः ॥ १७॥


जो आत्मलाभासारिखें, गोमटें कांहींचि न देखे,
म्हणौनि भोगविशेखें, हरिखेजेना ॥ १९० ॥

आपणचि विश्व जाहला, तरी भेदभावो सहजचि गेला,
म्हणौनि द्वेषु ठेला, जया पुरुषा ॥ १९१ ॥

ठेला=गेला

पैं आपुलें जें साचें, तें कल्पांतींहीं न वचे,
हें जाणोनि गताचें, न शोची जो ॥ १९२ ॥

आणि जयापरौतें कांहीं नाहीं, तें आपणपेंचि आपुल्या ठायीं,
जाहला यालागीं जो कांहीं, आकांक्षी ना ॥ १९३ ॥

वोखटें कां गोमटें, हें काहींचि तया नुमटे,
रात्रिदिवस न घटे, सूर्यासि जेवीं ॥ १९४ ॥

ऐसा बोधुचि केवळु, जो होवोनि असे निखळु,
त्याहीवरी भजनशीळु, माझ्या ठायीं ॥ १९५ ॥

तरी तया ऐसें दुसरें, आम्हां पढियंतें सोयरें,
नाहीं गा साचोकारें, तुझी आण ॥ १९६ ॥

साचोकारें=खरोखर
 


समः शत्रौ च मित्रे च तथामानापमानयोः।
शीतोष्णसुखदुःखेषु समः सङ्गविवर्जितः ॥ १८॥


पार्था जयाचिया ठायीं, वैषम्याची वार्ता नाहीं,
रिपुमित्रां दोहीं, सरिसा पाडु ॥ १९७ ॥

कां घरींचियां उजियेडु करावा, पारखियां आंधारु पाडावा,
हें नेणेचि गा पांडवा, दीपु जैसा ॥ १९८ ॥

पारखियां=परके

जो खांडावया घावो घाली, कां लावणी जयानें केली,
दोघां एकचि साउली, वृक्षु दे जैसा ॥ १९९ ॥

खांडावया=तोडायला

नातरी इक्षुदंडु, पाळितया गोडु,
गाळितया कडु, नोहेंचि जेवीं ॥ २०० ॥

इक्षुदंडु=ऊस

अरिमित्रीं तैसा, अर्जुना जया भावो ऐसा,
मानापमानीं सरिसा, होतु जाये ॥ २०१ ॥

तिहीं ऋतूं समान, जैसें कां गगन,
तैसा एकचि मान, शीतोष्णीं जया ॥ २०२ ॥

दक्षिण उत्तर मारुता, मेरु जैसा पंडुसुता,
तैसा सुखदुःखप्राप्तां, मध्यस्थु जो ॥ २०३ ॥

माधुर्यें चंद्रिका, सरिसी राया रंका,
तैसा जो सकळिकां, भूतां समु ॥ २०४ ॥

आघवियां जगा एक, सेव्य जैसें उदक,
तैसें जयातें तिन्ही लोक, आकांक्षिती ॥ २०५ ॥

जो सबाह्यसंग, सांडोनिया लाग,
एकाकीं असे आंग, आंगीं सूनी ॥ २०६ ॥

आंगीं सूनी=आपल्यात शिरून रममाण (ब्रह्म स्वरूप)

तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी सन्तुष्टो येन केनचित्।
अनिकेतः स्थिरमतिर्भक्तिमान्मे प्रियो नरः ॥ १९॥


जो निंदेतें नेघे, स्तुति न श्लाघे,
आकाशा न लगे, लेपु जैसा ॥ २०७ ॥



श्लाघे=खुश होणे

तैसें निंदे आणि स्तुति, मानु करूनि एके पांती,
विचरे प्राणवृत्ती, जनीं वनीं ॥ २०८ ॥

पांती=पंगती  विचरे= हिंडे   प्राणवृत्ती=मन बुद्धी पलीकडील अवस्था
 
साच लटिकें दोन्ही, बोलोनि न बोले जाहला मौनी,
जो भोगितां उन्मनी, आरायेना ॥ २०९ ॥
उन्मनी=समाधी अवस्था   आरायेना=विन्मुख होणे परत येणे

जो यथालाभें न तोखे, अलाभें न पारुखे,
पाउसेवीण न सुके, समुद्रु जैसा ॥ २१० ॥

पारुखे=दु:खी होणे

आणि वायूसि एके ठायीं, बिढार जैसें नाहीं,
तैसा न धरीच कहीं, आश्रयो जो ॥ २११ ॥

बिढार=घर

आघवाची आकाशस्थिति, जेवीं वायूसि नित्य वसती,
तेवीं जगचि विश्रांती-, स्थान जया ॥ २१२ ॥

हें विश्वचि माझें घर, ऐसी मती जयाची स्थिर,
किंबहुना चराचर, आपण जाहला ॥ २१३ ॥

मग याहीवरी पार्था, माझ्या भजनीं आस्था,
तरी तयातें मी माथां, मुकुट करीं ॥ २१४ ॥

उत्तमासि मस्तक, खालविजे हें काय कौतुक,
परी मानु करिती तिन्ही लोक, पायवणियां ॥ २१५ ॥

पायवणियां=चरणोदक पायातून निघालेली गंगा

तरी श्रद्धावस्तूसी आदरु, करितां जाणिजे प्रकारु,
जरी होय श्रीगुरु, सदाशिवु ॥ २१६ ॥

परी हे असो आतां, महेशातें वानितां,
आत्मस्तुति होतां, संचारु असे ॥ २१७ ॥
शंकराने गंगा डोईवर धरली म्हणून हे सांगणे =आत्मस्तुती
संचारु असे = गैर असे (फुगुन जाने असे )

ययालागीं हें नोहे, म्हणितलें रमानाहें,
अर्जुना मी वाहें, शिरीं तयातें ॥ २१८ ॥

जे पुरुषार्थसिद्धि चौथी, घेऊनि आपुलिया हातीं,
रिगाला भक्तिपंथीं, जगा देतु ॥ २१९ ॥

कैवल्याचा अधिकारी, मोक्षाची सोडी बांधी करी,
कीं जळाचिये परी, तळवटु घे ॥ २२० ॥

तळवटु=नम्रता

म्हणौनि गा नमस्कारूं, तयातें आम्ही माथां मुगुट करूं,
तयाची टांच धरूं, हृदयीं आम्हीं ॥ २२१ ॥

तयाचिया गुणांचीं लेणीं, लेववूं अपुलिये वाणी,
तयाची कीर्ति श्रवणीं, आम्हीं लेवूं ॥ २२२ ॥

तो पहावा हे डोहळे, म्हणौनि अचक्षूसी मज डोळे,
हातींचेनि लीलाकमळें, पुजूं तयातें ॥ २२३ ॥

दोंवरी दोनी, भुजा आलों घेउनि,
आलिंगावयालागुनी, तयाचें आंग ॥ २२४ ॥

तया संगाचेनि सुरवाडें, मज विदेहा देह धरणें घडे,
किंबहुना आवडे, निरुपमु ॥ २२५ ॥

सुरवाडें=सुखाने

तेणेंसीं आम्हां मैत्र, एथ कायसें विचित्र ?,
परी तयाचें चरित्र, ऐकती जे ॥ २२६ ॥

तेही प्राणापरौते, आवडती हें निरुतें,
जे भक्तचरित्रातें, प्रशंसिती ॥ २२७ ॥

निरुतें=खात्रीने

जो हा अर्जुना साद्यंत, सांगितला प्रस्तुत,
भक्तियोगु समस्त-, योगरूप ॥ २२८ ॥

तया मी प्रीति करी, कां मनीं शिरसा धरीं,
येवढी थोरी, जया स्थितीये ॥ २२९ ॥


ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते।
श्रद्दधाना मत्परमा भक्तास्तेऽतीव प्रियाः ॥ २०॥

इति श्रीमद्भग्वद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे
श्रीकृष्णार्जुनसंवादे भक्तियोगोनाम द्वादशोऽध्यायः ॥ १२ ॥


ते हे गोष्टी रम्य, अमृतधारा धर्म्य,
करिती प्रतीतिगम्य, आइकोनि जे ॥ २३० ॥

प्रतीति=अनुभव

तेसीचि श्रद्धेचेनि आदरें, जयांचे ठायीं विस्तरे,
जीवीं जयां थारे, जे अनुष्ठिती ॥२३१ ॥

थारे=स्थिरावून

परी निरूपली जैसी, तैसीच स्थिति मानसीं,
मग सुक्षेत्रीं जैसी, पेरणी केली ॥ २३२ ॥

परी मातें परम करूनि, इयें अर्थीं प्रेम धरूनि,
हेंचि सर्वस्व मानूनि, घेती जे पैं ॥ २३३ ॥

पार्था गा जगीं, तेचि भक्त तेचि योगी,
उत्कंठा तयांलागीं, अखंड मज ॥ २३४ ॥

तें तीर्थ तें क्षेत्र, जगीं तेंचि पवित्र,
भक्ति कथेसि मैत्र, जयां पुरुषां ॥ २३५ ॥

आम्हीं तयांचें करूं ध्यान, ते आमुचें देवतार्चन,
ते वांचूनि आन, गोमटें नाहीं ॥ २३६ ॥

तयांचें आम्हां व्यसन, ते आमुचें निधिनिधान,
किंबहुना समाधान, ते मिळती तैं ॥ २३७ ॥

पैं प्रेमळाची वार्ता, जे अनुवादती पंडुसुता,
ते मानूं परमदेवता, आपुली आम्ही ॥ २३८ ॥

ऐसे निजजनानंदें, तेणें जगदादिकंदें,
बोलिलें मुकुंदें, संजयो म्हणे ॥ २३९ ॥

राया जो निर्मळु, निष्कलंक लोककृपाळु,
शरणागतां प्रतिपाळु, शरण्यु जो ॥ २४० ॥
पैं सुरसहायशीळु, लोकलालनलीळु,
प्रणतप्रतिपाळु, हा खेळु जयाचा ॥ २४१ ॥

जो धर्मकीर्तिधवलु, आगाध दातृत्वें सरळु,
अतुळबळें प्रबळु, बळिबंधनु ॥ २४२ ॥

बळिबंधनु=बलीचा द्वारपाल(प्रेम बंधनामुळे)
 
जो भक्तजनवत्सळु, प्रेमळजन प्रांजळु,
सत्यसेतु सकळु, कलानिधी ॥ २४३ ॥

सत्यसेतु=सत्य मार्गाने वागणाऱ्याचा तारक

तो श्रीकृष्ण वैकुंठींचा, चक्रवर्ती निजांचा,
सांगे येरु दैवाचा, आइकतु असे ॥ २४४ ॥

आतां ययावरी, निरूपिती परी,
संजयो म्हणे अवधारीं, धृतराष्ट्रातें ॥ २४५ ॥

तेचि रसाळ कथा, मऱ्हाठिया प्रतिपथा,
आणिजेल आतां, आवधारिजो ॥ २४६ ॥

ज्ञानदेव म्हणे तुम्ही, संत वोळगावेति आम्ही,
हें पढविलों जी स्वामी, निवृत्तिदेवीं ॥ २४७ ॥

वोळगावेति=सेवा करावी  पढविलों=शिकवले

इति श्रीज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां द्वादशोऽध्यायः ॥

http://dnyaneshwariabhyas.blogspot.in/