Monday, August 8, 2016

ज्ञानेश्वरी अध्याय १२ वा ओव्या १ ते ८२



 

 

 

ज्ञानेश्वरी / अध्याय बारावा / संत ज्ञानेश्वर

भक्तियोग ओव्या १ ते ८२

॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥
॥ अथ श्रीमद्भगवद्गीता ॥
। अथ द्वादशोऽध्यायः - अध्याय बारावा,
। भक्तियोगः।

जय जय वो शुद्धे, उदारे प्रसिद्धे,
अनवरत आनंदे, वर्षतिये ॥ १ ॥

अनवरत=सतत

विषयव्याळें मिठी, दिधलिया नुठी ताठी,
ते तुझिये गुरुकृपादृष्टी, निर्विष होय ॥ २ ॥

व्याळें=साप नुठी=न उठणे  ताठी,=निश्चेष्ट अवस्था

तरी कवणातें तापु पोळी, कैसेनि वो शोकु जाळी,
जरी प्रसादरसकल्लोळीं, पुरें येसि तूं ॥ ३ ॥

योगसुखाचे सोहळे, सेवकां तुझेनि स्नेहाळे,
सोऽहंसिद्धीचे लळे, पाळिसी तूं ॥ ४ ॥

सोऽहंसिद्धीचे=मी तोच ब्रह्म आहे ही अवस्था
लळे,=लाड ,कौतुक

आधारशक्तीचिया अंकीं, वाढविसी कौतुकीं,
हृदयाकाशपल्लकीं, परीये देसी निजे ॥ ५ ॥

आधारशक्ती=मूलाधार चक्र  अंकीं=मांडीवर
हृदयाकाशपल्लकीं=हृदय आकाशाच्या पाळण्यात
परीये=झोके

प्रत्यक्ज्योतीची वोवाळणी, करिसी मनपवनाचीं खेळणीं,
आत्मसुखाची बाळलेणीं, लेवविसी ॥ ६ ॥

प्रत्यक्ज्योतीची=निजात्मज्योती


सतरावियेचें स्तन्य देसी, अनुहताचा हल्लरू गासी,
समाधिबोधें निजविसी, बुझाऊनि ॥ ७ ॥

सतरावियेचें=सतरावी जीवन कला,ब्रह्मस्थानातील सरोवरातील अमृत
हल्लरू=अंगाई

म्हणौनि साधकां तूं माउली, पिके सारस्वत तुझिया पाउलीं,
या कारणें मी साउली, न संडीं तुझी ॥ ८ ॥

सारस्वत=सर्व विद्या ज्ञान

अहो सद्गुरुचिये कृपादृष्टी, तुझें कारुण्य जयातें अधिष्ठी,
तो सकलविद्यांचिये सृष्टीं, धात्रा होय ॥ ९ ॥

अधिष्ठी=अधिष्टान मुक्काम   
धात्रा=ब्रह्मदेव

म्हणौनि अंबे श्रीमंते, निजजनकल्पलते,
आज्ञापीं मातें, ग्रंथनिरूपणीं ॥ १० ॥

कल्पलते=इच्छा पूर्ण करणारी वेल

नवरसीं भरवीं सागरु, करवीं उचित रत्‌नांचे आगरु,
भावार्थाचे गिरिवरु, निफजवीं माये ॥ ११ ॥

गिरिवरु=पर्वत

साहित्यसोनियाचिया खाणी, उघडवीं देशियेचिया क्षोणीं,
विवेकवल्लीची लावणी, हों देई सैंघ ॥ १२ ॥

देशियेचिया=मराठी भाषा  क्षोणीं,=जमीनीत

संवादफळनिधानें, प्रमेयाचीं उद्यानें,
लावीं म्हणे गहनें, निरंतर ॥ १३ ॥

निधानें=गुप्त धन

पाखांडाचे दरकुटे, मोडीं वाग्वाद अव्हांटे,
कुतर्कांचीं दुष्टें, सावजें फेडीं ॥ १४ ॥

पाखांडाचे =नास्तिकांच्या दरकुटे=दऱ्या
वाग्वाद अव्हांटे,=वादविवादाच्या आडवाटा
सावजें=श्वापदे

श्रीकृष्णगुणीं मातें, सर्वत्र करीं वो सरतें,
राणिवे बैसवी श्रोते, श्रवणाचिये ॥ १५ ॥

सरतें,=समर्थ राणिवे=राज्यावर

ये मराठीयेचिया नगरीं, ब्रह्मविद्येचा सुकाळु करी,
घेणें देणें सुखचिवरी, हो देई या जगा ॥ १६ ॥

तूं आपुलेनि स्नेहपल्लवें, मातें पांघुरविशील सदैवें,
तरी आतांचि हें आघवें, निर्मीन माये ॥ १७ ॥

पल्लवें=पदरी

इये विनवणीयेसाठीं, अवलोकिलें गुरु कृपादृष्टी,
म्हणे गीतार्थेंसी उठी, न बोलें बहु ॥ १८ ॥

तेथ जी जी महाप्रसादु, म्हणौनि साविया जाहला आनन्दु,
आतां निरोपीन प्रबंधु, अवधान दीजे ॥ १९ ॥
साविया=सहज स्वाभाविकपणे


अर्जुन उवाच।
एवं सतत युक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते,
ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः ॥ १॥


तरी सकलवीराधिराजु, जो सोमवंशीं विजयध्वजु,
तो बोलता जाहला आत्मजु, पंडुनृपाचा ॥ २० ॥

कृष्णातें म्हणे अवधारिलें, आपण विश्वरूप मज दाविलें,
तें नवल म्हणौनि बिहालें, चित्त माझें ॥ २१ ॥

आणि इये कृष्णमूर्तीची सवे, यालागीं सोय धरिली जीवें,
तंव नको म्हणोनि देवें, वारिलें मातें ॥ २२ ॥

वारिलें=बजावले

तरी व्यक्त आणि अव्यक्त, हें तूंचि एक निभ्रांत,
भक्ती पाविजे व्यक्त, अव्यक्त योगें ॥ २३ ॥

या दोनी जी वाटा, तूंतें पावावया वैकुंठा,
व्यक्ताव्यक्त दारवंठां, रिगिजे येथ ॥ २४ ॥

पैं जे वानी श्यातुका, तेचि वेगळिये वाला येका,
म्हणौनि एकदेशिया व्यापका, सरिसा पाडू ॥ २५ ॥

वानी =कस   श्यातुका=१०० तोळे सोने
वाला=वालभर (दोन गुंजा) सोने

अमृताचिया सागरीं, जे लाभे सामर्थ्याची थोरी,
तेचि दे अमृतलहरी, चुळीं घेतलेया ॥ २६ ॥

हे कीर माझ्या चित्तीं, प्रतीति आथि जी निरुती,
परि पुसणें योगपती, तें याचिलागीं ॥ २७ ॥

जें देवा तुम्हीं नावेक, अंगिकारिलें व्यापक,
तें साच कीं कवतिक, हें जाणावया ॥ २८ ॥

नावेक=क्षणभर

तरी तुजलागीं कर्म, तूंचि जयांचें परम,
भक्तीसी मनोधर्म, विकोनि घातला ॥ २९ ॥

इत्यादि सर्वीं परीं, जे भक्त तूंतें श्रीहरी,
बांधोनियां जिव्हारीं, उपासिती ॥ ३० ॥

जिव्हारीं=हृदयी

आणि जें प्रणवापैलीकडे, वैखरीयेसी जें कानडें,
कायिसयाहि सांगडें, नव्हेचि जें वस्तु ॥ ३१ ॥

कानडें-अवघड  सांगडें=सारखे

तें अक्षर जी अव्यक्त, निर्देश देशरहित,
सोऽहंभावें उपासित, ज्ञानिये जे ॥ ३२ ॥

तयां आणि जी भक्तां, येरयेरांमाजी अनंता,
कवणें योगु तत्त्वतां, जाणितला सांगा ॥ ३३ ॥

इया किरीटीचिया बोला, तो जगद्बंधु संतोषला,
म्हणे हो प्रश्नु भला, जाणसी करूं ॥ ३४ ॥


श्री भगवानुवाच।
मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते।
श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः ॥ २॥


तरी अस्तुगिरीचियां उपकंठीं, रिगालिया रविबिंबापाठीं,
रश्मी जैसे किरीटी, संचरती ॥ ३५ ॥
उपकंठीं=जवळील भाग

कां वर्षाकाळीं सरिता, जैसी चढों लागें पांडुसुता,
तैसी नीच नवी भजतां, श्रद्धा दिसे ॥ ३६ ॥

परी ठाकिलियाहि सागरु, जैसा मागीलही यावा अनिवारु,
तिये गंगेचिये ऐसा पडिभरु, प्रेमभावा ॥ ३७ ॥

पडिभरु=अधिक वाढता (जोर)

तैसें सर्वेंद्रियांसहित, मजमाजीं सूनि चित्त,
जे रात्रिदिवस न म्हणत, उपासिती ॥ ३८ ॥

सूनि=घालून

इयापरी जे भक्त, आपणपें मज देत,
तेचि मी योगयुक्त, परम मानीं ॥ ३९ ॥


ये त्वक्षर्मनिर्देश्यमव्यक्तं पर्युपासते।
सर्वत्रगमचिन्त्यं च कूटस्थमचलं ध्रुवं ॥ ३॥


आणि येर तेही पांडवा, जे आरूढोनि सोऽहंभावा,
झोंबती निरवयवा, अक्षरासी ॥ ४० ॥

मनाची नखी न लगे, जेथ बुद्धीची दृष्टी न रिगे,
ते इंद्रियां कीर जोगें, कायि होईल ? ॥ ४१ ॥

मनाची नखी=नख न लगे (मनाचा प्रवेश न होणे )

परी ध्यानाही कुवाडें, म्हणौनि एके ठायीं न संपडे,
व्यक्तीसि माजिवडें, कवणेही नोहे ॥ ४२ ॥

कुवाडें,=कोडे गूढ  व्यक्तीसि=व्यक्तआकारा   माजिवडें=मध्ये

जया सर्वत्र सर्वपणें, सर्वांही काळीं असणें,
जें पावूनि चिंतवणें, हिंपुटी जाहलें ॥ ४३ ॥

चिंतवणें=चिंतन  हिंपुटी=दु:खी खिन्न

जें होय ना नोहे, जें नाहीं ना आहे,
ऐसें म्हणौनि उपाये, उपजतीचि ना ॥ ४४ ॥

जें चळे ना ढळे, सरे ना मैळे,
तें आपुलेनीचि बळें, आंगविलें जिहीं ॥ ४५ ॥

आंगविलें=प्राप्त केले

सन्नियम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः।
ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः ॥ ४॥


पैं वैराग्यमहापावकें, जाळूनि विषयांचीं कटकें,
अधपलीं तवकें, इंद्रियें धरिलीं ॥ ४६ ॥

पावकें=अग्नीत कटकें=सैन्य अधपलीं=होरपळली
तवकें=धैर्याने नेटाने

मग संयमाची धाटी, सूनि मुरडिलीं उफराटीं,
इंद्रियें कोंडिलीं कपाटीं, हृदयाचिया ॥ ४७ ॥

धाटी=पाशा , सूनि=मध्ये

अपानींचिया कवाडा, लावोनि आसनमुद्रा सुहाडा,
मूळबंधाचा हुडा, पन्नासिला ॥ ४८ ॥


सुहाडा=मित्रा  हुडा =बुरुज
पन्नासिला =सुशोभित केला तयार केला

आशेचे लाग तोडिले, अधैर्याचे कडे झाडिले,
निद्रेचें शोधिलें, काळवखें ॥ ४९ ॥

वज्राग्नीचिया ज्वाळीं, करूनि सप्तधातूंची होळी,
व्याधींच्या सिसाळीं, पूजिलीं यंत्रें ॥ ५० ॥


सिसाळीं=शिरे यंत्रें=तोफा


मग कुंडलिनियेचा टेंभा, आधारीं केला उभा,
तया वरे =शिखर

वरी मकारांत सोपान, ते सांडोनिया गहन,
काखे सूनियां गगन, भरले ब्रह्मीं ॥ ५६ ॥

मकारांत =मध्य अर्धमात्रा   सोपान=जिना पायऱ्या  

सूनियां=घेवून  गगन,=महदाकाश


ऐसे जे समबुद्धी, गिळावया सोऽहंसिद्धी,
आंगविताती निरवधी, योगदुर्गें ॥ ५७ ॥

आंगविताती=प्राप्त करतात  निरवधी,=अफाट

आपुलिया साटोवाटी, शून्य घेती उठाउठीं,
तेही मातेंचि किरीटी, पावती गा ॥ ५८ ॥

साटोवाटी=मोबदला उठाउठीं=त्वरीत

वांचूनि योगचेनि बळें, अधिक कांहीं मिळे,
ऐसें नाहीं आगळें, कष्टचि तया ॥ ५९ ॥



क्लेशोऽधिकतरस्तेषामव्यक्तासक्तचेतसाम्।
अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते ॥ ५॥


जिहीं सकळ भूतांचिया हितीं, निरालंबीं अव्यक्तीं,
पसरलिया आसक्ती, भक्तीवीण ॥ ६० ॥

निरालंबीं=आधार नसलेले अव्यक्त

तयां महेन्द्रादि पदें, करिताति वाटवधें,
आणि ऋद्धिसिद्धींचीं द्वंद्वें, पाडोनि ठाती ॥ ६१ ॥

वाटवधें=वाटेत वध   ठाती=अडवतात

कामक्रोधांचे विलग, उठावती अनेग,
आणि शून्येंसीं आंग, झुंजवावें कीं ॥ ६२ ॥

विलग=आवेग (उपद्रव) अनेग=अनेक अनावर

ताहानें ताहानचि पियावी, भुकेलिया भूकचि खावी,
अहोरात्र वावीं, मवावा वारा ॥ ६३ ॥

वावीं=हातांची वावभर  मवावा=मोजावा

उनी दिहाचें पहुडणें, निरोधाचें वेल्हावणें,
झाडासि साजणें, चाळावें गा ॥ ६४ ॥

उनी दिहाचें=दिवसा उन्हात पहुडणें= निजणे
वेल्हावणें,=विहार करणे चाळावें= बोलावे

शीत वेढावें, उष्ण पांघुरावें,
वृष्टीचिया असावें, घरांआंतु ॥ ६५ ॥

किंबहुना पांडवा, हा अग्निप्रवेशु नीच नवा,
भातारेंवीण करावा, तो हा योगु ॥ ६६ ॥

भातारेंवीण=पतीविन

एथ स्वामीचें काज, ना बापिकें व्याज,
परी मरणेंसीं झुंज, नीच नवें ॥ ६७ ॥

बापिकें=वडिल कुळास्तव

ऐसें मृत्यूहूनि तीख, कां घोंटे कढत विख,
डोंगर गिळितां मुख, न फाटे काई ? ॥ ६८ ॥

म्हणौनि योगाचियां वाटा, जे निगाले गा सुभटा,
तयां दुःखाचाचि शेलवांटा, भागा आला ॥ ६९ ॥

शेलवांटा=शेलका भाग

पाहें पां लोहाचे चणे, जैं बोचरिया पडती खाणें,
तैं पोट भरणें कीं प्राणें, शुद्धी म्हणों ॥ ७० ॥

बोचरिया=तोंडचे बोळके झालेला
प्राणें शुद्धी=प्राण उत्तीर्ण

म्हणौनि समुद्र बाहीं, तरणे आथि केंही,
कां गगनामाजीं पाईं, खोलिजतु असें ? ॥ ७१ ॥

पाईं=पायी खोलिजतु=चालणे

वळघलिया रणाची थाटी, आंगीं न लागतां कांठी,
सूर्याची पाउटी, कां होय गा ॥ ७२ ॥

वळघलिया=शिरता थाटी=गर्दीत कांठी=शस्त्र
सूर्याची पाउटी,=सुर्यमार्गाची (प्राप्ती होत नाही)

यालागीं पांगुळा हेवा, नव्हे वायूसि पांडवा,
तेवीं देहवंता जीवां, अव्यक्तीं गति ॥ ७३ ॥
 
पांगुळा हेवा=पांगळ्यास वायुचा हेवा

ऐसाही जरी धिंवसा, बांधोनियां आकाशा,
झोंबती तरी क्लेशा, पात्र होती ॥ ७४ ॥

धिंवसा=इच्छा

म्हणौनि येर ते पार्था, नेणतीचि हे व्यथा,
जे कां भक्तिपंथा, वोटंगले ॥ ७५ ॥


ये तु सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्पराः।
अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते ॥ ६॥


कर्मेंद्रियें सुखें, करिती कर्में अशेखें,
जियें कां वर्णविशेखें, भागा आलीं ॥ ७६ ॥

विधीतें पाळित, निषेधातें गाळित,
मज देऊनि जाळित, कर्मफळें ॥ ७७ ॥

ययापरी पाहीं, अर्जुना माझें ठाईं,
संन्यासूनि नाहीं, करिती कर्में ॥ ७८ ॥

आणीकही जे जे सर्व, कायिक वाचिक मानसिक भाव,
तयां मीवांचूनि धांव, आनौती नाहीं ॥ ७९ ॥

ऐसे जे मत्पर, उपासिती निरंतर,
ध्यानमिषें घर, माझें झालें ॥ ८० ॥

जयांचिये आवडी, केली मजशीं कुळवाडी,
भोग मोक्ष बापुडीं, त्यजिलीं कुळें ॥ ८१ ॥

कुळवाडी=देवघेव

ऐसे अनन्ययोगें, विकले जीवें मनें आंगें,
तयांचे कायि एक सांगें, जें सर्व मी करीं ॥ ८२ ॥

http://dnyaneshwariabhyas.blogspot.in/
by विक्रांत
================================= =================

1 comment: