ज्ञानेश्वरी / अध्याय अकरावा / विश्वरूप दर्शन / संत ज्ञानेश्वर
ओव्या ६०० ते ६६२
किरीटिनं गदिनं चक्रहस्तमिच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव।
तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो भव विश्वमूर्ते ॥ ४६॥
कैसें नीलोत्पलातें रांवित, आकाशाही रंगु लावित,
तेजाची वोज दावित, इंद्रनीळा ॥ ६०० ॥
किरीटिनं गदिनं चक्रहस्तमिच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव।
तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो भव विश्वमूर्ते ॥ ४६॥
कैसें नीलोत्पलातें रांवित, आकाशाही रंगु लावित,
तेजाची वोज दावित, इंद्रनीळा ॥ ६०० ॥
रांवित=रंगविणे(कृष्णाचा रंग) वोज=तेज
जैसा परिमळ जाहला मरगजा, कां आनंदासि निघालिया भुजा,
ज्याचे जानुवरी मकरध्वजा, जोडली बरव ॥ ६०१ ॥
मरगजा=पाचू मकरध्वजा=मदनदेव (कृष्णाचा
मुलगा )
जानुवरी=मांडीवर (गुडघ्यावर )
मस्तकीं मुकुटातें ठेविलें, कीं मुकुटा मुकुट मस्तक झालें,
शृंगारा लेणें लाधलें, आंगाचेनि जया ॥ ६०२ ॥
इंद्रधनुष्याचिये आडणी, माजीं मेघ गगनरंगणीं,
तैसें आवरिलें शारङ्गपाणी, वैजयंतिया ॥ ६०३ ॥
आडणी=कमानीत गगनरंगणीं=गगनात शोभले आवरिलें=घालून
आतां कवणी ते उदार गदा, असुरां देत कैवल्य पदा,
कैसें चक्र हन गोविंदा, सौम्यतेजें मिरवे ॥ ६०४ ॥
किंबहुना स्वामी, तें देखावया उत्कंठित पां मी,
म्हणौनि आतां तुम्हीं, तैसया होआवें ॥ ६०५ ॥
हे विश्वरूपाचे सोहळे, भोगूनि निवाले जी डोळे,
आतां होताति आंधले, कृष्णमूर्तीलागीं ॥ ६०६ ॥
आंधले= आंधळे (ती मूर्ती न दिसत असल्याने )
तें साकार कृष्णरूपडें, वांचूनि पाहों नावडे,
तें न देखतां थोडें, मानिताती हे ॥ ६०७ ॥
आम्हां भोगमोक्षाचिया ठायीं, श्रीमूर्तीवांचूनि नाहीं,
म्हणौनि तैसाचि साकारु होईं, हें सांवरीं आतां ॥ ६०८ ॥
श्रीभगवानुवाच।
मया प्रसन्नेन तवार्जुनेदं रूपं परं दर्शितमात्मयोगात्।
तेजोमयं विश्वमनन्तमाद्यं यन्मे त्वदन्येन न दृष्टपूर्वम् ॥ ४७॥
या अर्जुनाचिया बोला, विश्वरूपा विस्मयो जाहला,
म्हणे ऐसा नाहीं देखिला, धसाळ कोणी ॥ ६०९ ॥
धसाळ=अविचारी
कोण हे वस्तु पावला आहासी, तया लाभाचा तोषु न घेसी,
मा भेणें काय नेणों बोलसी, हेकाडु ऐसा ॥ ६१० ॥
हेकाडु=हट्टी
आम्हीं सावियाचि जैं प्रसन्न होणें, तैं आंगचिवरी म्हणें देणें,
वांचोनि जीव असे वेंचणें, कवणासि गा ॥ ६११ ॥
तें हें तुझिये चाडे, आजि जिवाचेंचि दळवाडें,
कामऊनियां येवढें, रचिलें ध्यान ॥ ६१२ ॥
कामऊनियां=मेहनतीने कष्टाने
ऐसी काय नेणों तुझिये आवडी, जाहली प्रसन्नता आमुची वेडी,
म्हणौनि गौप्याचीही गुढी, उभविली जगीं ॥ ६१३ ॥
तें हें अपारां अपार, स्वरूप माझें परात्पर,
एथूनि ते अवतार, कृष्णादिक ॥ ६१४ ॥
हें ज्ञानतेजाचें निखिळ, विश्वात्मक केवळ,
अनंत हे अढळ, आद्य सकळां ॥ ६१५ ॥
हें तुजवांचोनि अर्जुना, पूर्वीं श्रुत दृष्ट नाहीं आना,
जे जोगें नव्हे साधना, म्हणौनियां ॥ ६१६ ॥
जोगें=साध्य होण्या जोगे
न वेदयज्ञाध्ययनैर्न दानैर्न च क्रियाभिर्न तपोभिरुग्रैः।
एवं रूपः शक्य अहं नृलोके द्रष्टुं त्वदन्येन कुरुप्रवीर ॥ ४८॥
याची सोय पातले, आणि वेदीं मौनचि घेतलें,
याज्ञिकी माघौते आले, स्वर्गौनियां ॥ ६१७ ॥
सोय पातले=जाणू लागले स्वर्गौनियां =स्वर्गापासून
साधकीं देखिला आयासु, म्हणौनि वाळिला योगाभ्यासु,
आणि अध्ययनें सौरसु, नाहीं एथ ॥ ६१८ ॥
आयासु=त्रास वाळिला=सोडला सौरसु=योग्यता (तत्व कळण्याची)
सीगेचीं सत्कर्मे, धाविन्नलीं संभ्रमें,
तिहीं बहुतेकीं श्रमें, सत्यलोकु ठाकिला ॥ ६१९ ॥
सीगेचीं=टोकाची उत्तम धाविन्नलीं संभ्रमें,=उत्कंठीत होवून धावली
तपीं ऐश्वर्य देखिलें, आणि उग्रपण उभयांचि सांडिलें,
एक तपसाधन जें ठेलें, अपारांतरें ॥ ६२० ॥
उभयांचि=लगेच अपारांतरें=फार दूरवर
तें हें तुवां अनायासें, विश्वरूप देखिलें जैसें,
इये मनुष्यलोकीं तैसें, न फवेचि कवणा ॥ ६२१ ॥
आजि ध्यानसंपत्तीलागीं, तूंचि एकु आथिला जगीं,
हें परम भाग्य आंगीं, विरंचीही नाहीं ॥ ६२२ ॥
मा ते व्यथा मा च विमूढभावो दृष्ट्वा रूपं घोरमीदृङ्ममेदम्।
व्यपेतभीः प्रीतमनाः पुनस्त्वं तदेव मे रूपमिदं प्रपश्य ॥ ४९॥
म्हणौनि विश्वरूपलाभें श्लाघ, एथिचें भय नेघ नेघ,
हें वांचूनि अन्य चांग, न मनीं कांहीं ॥ ६२३ ॥
श्लाघ=आनंद मानणे धन्यता
हां गा समुद्र अमृताचा भरला, आणि अवसांत वरपडा जाहला,
मग कोणीही आथि वोसंडिला, बुडिजैल म्हणौनि ? ॥ ६२४ ॥
वरपडा = प्राप्त वोसंडिला= सोडला त्यागला
नातरी सोनयाचा डोंगरु, येसणा न चले हा थोरु,
ऐसें म्हणौनि अव्हेरु, करणें घडे ? ॥ ६२५ ॥
दैवें चिंतामणी लेईजे, कीं हें ओझें म्हणौनि सांडिजे ?,
कामधेनु दवडिजे, न पोसवे म्हणौनि ? ॥ ६२६ ॥
चंद्रमा आलिया घरा, म्हणिजे निगे करितोसि उबारा,
पडिसायि पाडितोसि दिनकरा, परता सर ॥ ६२७ ॥
पडिसायि पाडितोसि दिनकरा, परता सर ॥ ६२७ ॥
पडिसायि=सावली
तैसें ऐश्वर्य हें महातेज, आजि हातां आलें आहे सहज,
कीं एथ तुज गजबज, होआवी कां ? ॥ ६२८ ॥
परि नेणसीच गांवढिया, काय कोपों आतां धनंजया,
आंग सांडोनि छाया, आलिंगितोसि मा ? ॥ ६२९ ॥
गांवढिया=अडाणी
हें नव्हे जो मी साचें, एथ मन करूनियां काचें,
प्रेम धरिसी अवगणियेचें, चतुर्भुज जें ॥ ६३० ॥
काचें= भित्रे अवगणियेचें=सोंग असलेले
तरि अझुनिवरी पार्था, सांडीं सांडीं हे व्यवस्था,
इयेविषयीं आस्था, करिसी झणें ॥ ६३१ ॥
झणें=नको व्यवस्था=ठरवलेले मत
हें रूप जरी घोर, विकृति आणि थोर,
तरी कृतनिश्चयाचें घर, हेंचि करीं ॥ ६३२ ॥
कृपण चित्तवृत्ति जैसी, रोंवोनि घालीं ठेवयापासीं,
मग नुसधेनि देहेंसीं, आपण असे ॥ ६३३ ॥
नुसधेनि=केवळ
कां अजातपक्षिया जवळा, जीव बैसवूनि अविसाळां,
पक्षिणी अंतराळा-, माजीं जाय ॥ ६३४ ॥
अजातपक्षिया=पंख न लेले अविसाळां=घरट्यात
नाना गाय चरे डोंगरीं, परि चित्त बांधिलें वत्सें घरीं,
प्रेम एथिंचें करीं, स्थानपती ॥ ६३५ ॥
स्थानपती=स्थिर
येरें वरिचिलेनि चित्तें, बाह्य सख्य सुखापुरतें,
भोगिजो कां श्रीमूर्तींतें, चतुर्भुज ॥ ६३६ ॥
परि पुढतपुढती पांडवा, हा एक बोलु न विसरावा,
जे इये रूपींहूनि सद्भावा, नेदावें निघों ॥ ६३७ ॥
हें कहीं नव्हतेंचि देखिलें, म्हणौनि भय जें तुज उपजलें,
तें सांडीं एथ संचलें, असों दे प्रेम ॥ ६३८ ॥
आतां करूं तुजयासारखें, ऐसें म्हणितलें विश्वतोमुखें,
तरि मागील रूप सुखें, न्याहाळीं पां तूं ॥ ६३९ ॥
संजय उवाच।
इत्यर्जुनं वासुदेवस्तथोक्त्वा स्वकं रूपं दर्शयामास भूयः ॥
आश्वासयामास च भीतमेनं भूत्वा पुनः सौम्यवपुर्महात्मा ॥ ५०॥
ऐसें वाक्य बोलतखेंवो, मागुता मनुष्य जाहला देवो,
हें ना परि नवलावो, आवडीचा तिये ॥ ६४० ॥
श्रीकृष्णचि कैवल्य उघडें, वरि सर्वस्व विश्वरूपायेवढें,
हातीं दिधलें कीं नावडे, अर्जुनासि ॥ ६४१ ॥
वस्तु घेऊनि वाळिजे, जैसें रत्नासि दूषण ठेविजे,
नातरी कन्या पाहूनियां म्हणिजे, मना न ये हे ॥ ६४२ ॥
वाळिजे=टाकावी
तया विश्वरूपायेवढी दशा, करितां प्रीतीचा वाढू कैसा,
सेल दीधलीसे उपदेशा, किरीटीसिं देवें ॥ ६४३ ॥
सेल=शेलका मुख्य भाग
मोडोनि भांगाराचा रवा, लेणें घडिलें आपलिया सवा,
मग नावडे जरी जीवा, तरी आटिजे पुढती ॥ ६४४ ॥
रवा =लगड भांगाराचा=सोने
तैसें शिष्याचिये प्रीती जाहलें, कृष्णत्व होतें तें विश्वरूप केलें,
तें मना नयेचि मग आणिलें, कृष्णपण मागुतें ॥ ६४५ ॥
हा ठाववरी शिष्याची निकसी, सहातें गुरु आहाती कवणे देशीं ?,
परि नेणिजे आवडी कैशी, संजयो म्हणे ॥ ६४६ ॥
निकसी=हट्ट त्रास सहातें= साह्णारे
मग विश्वरूप व्यापुनि भोंवतें, जें दिव्य तेज प्रगटलें होतें,
तेंचि सामावलें मागुतें, कृष्णरूपीं तये ॥ ६४७ ॥
जैसें त्वंपद हें आघवें, तत्पदीं सामावे,
अथवा द्रुमाकारु सांठवे, बीजकणिके जेवीं ॥ ६४८ ॥
त्वंपद=जीव तत्पदीं=ते पद स्थान (ईश्वर ब्रह्म)
द्रुमाकारु=वृक्ष आकार
नातरी स्वप्नसंभ्रमु जैसा, गिळी चेइली जीवदशा,
श्रीकृष्णें योगु हा तैसा, संहारिला तो ॥ ६४९ ॥
जैसी प्रभा हारपली बिंबीं, कीं जळदसंपत्ती नभीं,
नाना भरतें सिंधुगर्भीं, रिगालें राया ॥ ६५० ॥
भरतें=भरती
हो कां जे कृष्णाकृतीचिये मोडी, होती विश्वरूपपटाची घडी,
ते अर्जुनाचिये आवडी, उकलूनि दाविली ॥ ६५१ ॥
मोडी=रुपी
तंव परिमाणा रंगु, तेणें देखिलें साविया चांगु,
तेथ ग्राहकीये नव्हेचि लागु, म्हणौनि घडी केली पुढती ॥ ६५२ ॥
लागु=पसंत साविया=सहज
तैसें वाढीचेनि बहुवसपणें, रूपें विश्व जिंतिलें जेणें,
तें सौम्य कोडिसवाणें, साकार जाहलें ॥ ६५३ ॥
जिंतिलें =जिंकले व्यापले कोडिसवाणें=सुंदर
किंबहुना अनंतें, धरिलें धाकुटपण मागुतें,
परि आश्वासिलें पार्थातें, बिहालियासी ॥ ६५४ ॥
जो स्वप्नीं स्वर्गा गेला, तो अवसांत जैसा चेइला,
तैसा विस्मयो जाहला, किरीटीसी ॥ ६५५ ॥
अवसांत=अचानक
नातरी गुरुकृपेसवें, वोसरलेया प्रपंचज्ञान आघवें,
स्फुरे तत्त्व तेवीं पांडवें, श्रीमूर्ति देखिली ॥ ६५६ ॥
तया पांडवा ऐसें चित्तीं, आड विश्वरूपाची जवनिका होती,
ते फिटोनि गेली परौती, हें भलें जाहलें ॥ ६५७ ॥
जवनिका=पडदा
काय काळातें जिणोनि आला, कीं महावातु मागां सांडिला,
आपुलिया बाही उतरला, सातही सिंधु ॥ ६५८ ॥
ऐसा संतोष बहु चित्तें, घेइजत असे पंडुसुतें,
विश्वरूपापाठीं कृष्णातें, देखोनियां ॥ ६५९ ॥
मग सूर्याचिया अस्तमानीं, मागुती तारा उगवती गगनीं,
तैसी देखों लागला अवनीं, लोकांसहित ॥ ६६० ॥
पाहे तंव तेंचि कुरुक्षेत्र, तैसेंचि देखे दोहीं भागीं गोत्र,
वीर वर्षताती शस्त्रास्त्र, संघाटवरी ॥ ६६१ ॥
संघाटवरी=समुदायावर
तया बाणांचिया मांडवाआंतु, तैसाचि रथु देखे निवांतु,
धुरे बैसला लक्ष्मीकांतु, आपण तळीं ॥ ६६२ ॥
by
विक्रांत प्रभाकर तिकोणे
ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ
सुंदर !
ReplyDelete