Saturday, July 23, 2016

ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा, ओव्या ४२७ ते ४८१



 

ज्ञानेश्वरी / अध्याय अकरावा / विश्वरूप दर्शन / संत ज्ञानेश्वर 

ओव्या ४२७ ते ४८१



लेलिह्यसे ग्रसमानः समन्ताल्लोकान्समग्रान्वदनैर्ज्वद्भिः।
तेजोभिरापूर्य जगत्समग्रं भासस्तवोग्राः प्रतपन्ति विष्णो ॥ ३०॥


आणि येतुलाही आरोगण, करितां भुके नाहीं उणेपण,
कैसें दीपन असाधारण, उदयलें यया ॥ ४२७ ॥
 
आरोगण =भक्षण   दीपन=ज्वलन (जठराग्नी)

जैसा रोगिया ज्वराहूनि उठिला, का भणगा दुकाळु पाहला,
तैसा जिभांचा लळलळाटु देखिला, आवाळुवें चाटितां ॥ ४२८ ॥
 
भणगा=भणंग  दुकाळु=दुष्काळ   लळलळाटु=वळवळ  
आवाळुवें=ओठकडा

तैसें आहाराचे नांवें कांहीं, तोंडापासूनि उरलेंचि नाहीं,
कैसी समसमीत नवाई, भुकेलेपणाची ॥ ४२९ ॥
 
समसमीत=प्रखर

काय सागराचा घोंटु भरावा ?, कीं पर्वताचा घांसु करावा ?,
ब्रह्मकटाहो घालावा, आघवाचि दाढे ॥ ४३० ॥

दिशा सगळियाचि गिळाविया, चांदिणिया चाटूनि घ्याविया,
ऐसें वर्तत आहे साविया, लोलुप्य बा तुझें ॥ ४३१ ॥
 
साविया=सहज स्वाभाविक

जैसा भोगीं कामु वाढे, कां इंधनें आगीसि हाकाक चढे,
तैसी खातखातांचि तोंडें, खाखांतें ठेलीं ॥ ४३२ ॥
 
हाकाक=भडका  खाखांतें=भूक

कैसें एकचि केवढें पसरलें, त्रिभुवन जिव्हाग्रीं आहे टेकलें,
जैसें कां कवीठ घातलें, वडवानळीं ॥ ४३३ ॥

ऐसीं अपार वदनें, आतां येतुलीं कैंचीं त्रिभुवनें,
कां आहारु न मिळतां येणें मानें, वाढविलीं सैंघ ॥ ४३४ ॥
 
येतुलीं कैंचीं =एवढी कुठाय 

अगा हा लोकु बापुडा, जाहला वदनज्वाळां वरपडा,
जैसी वणवेयाचिया वेढां, सांपडती मृगें ॥ ४३५ ॥
 
वरपडा=प्राप्त

आतां तैसें यां विश्वा जाहालें, देव नव्हे हें कर्म आलें,
कां जग चळचळां पांगिलें, काळजाळें ॥ ४३६ ॥
 
कर्म=कर्मगती

आतां इये अंगप्रभेचिये वागुरे, कोणीकडूनि निगिजैल चराचरें,
हीं वक्त्रें नोहेती जोहारें, वोडवलीं जगा ॥ ४३७ ॥
 
वागुरे=जाळे   जोहारें=चिता (लाक्ष्यागृह )
 
आगी आपुलेनि दाहकपणें, कैसेनि पोळिजे तें नेणे,
परी जया लागे तया प्राणें, सुटिकाची नाहीं ॥ ४३८ ॥

नातरी माझेनि तिखटपणें, कैसें निवटे हें शस्त्र कायि जाणें,
कां आपुलियां मारा नेणें, विष जैसें ॥ ४३९ ॥
 
निवटे= नष्ट करणे  घात करणे

तैसी तुज कांहीं, आपुलिया उग्रपणाची सेचि नाहीं,
परी ऐलीकडिले मुखीं खाई, हो सरली जगाची ॥ ४४० ॥
 
सेचि=भान   हो सरली=काळजी

अगा आत्मा तूं एकु, सकळ विश्वव्यापकु,
तरी कां आम्हां अंतकु, तैसा वोडवलासी ? ॥ ४४१ ॥

तरी मियां सांडिली जीवित्वाची चाड, आणि तुवांही न धरावी भीड,
मनीं आहे तें उघड, बोल पां सुखें ॥ ४४२ ॥

किती वाढविसी या उग्ररूपा, आंगींचें भगवंतपण आठवीं बापा,
नाहीं तरी कृपा, मजपुरती पाही ॥ ४४३ ॥


आख्याहि मे को भवानुग्ररूपो नमोऽस्तु ते देववर प्रसीद।
विज्ञातुमिच्छामिभवन्तमाद्यं न हि प्रजानामि तव प्रवृत्तिम् ॥ ३१॥


तरी एक वेळ वेदवेद्या, जी त्रिभुवनैक आद्या,
विनवणी विश्ववंद्या, आइकें माझी ॥ ४४४ ॥

ऐसें बोलोनि वीरें, चरण नमस्कारिलें शिरें,
मग म्हणें तरी सर्वेश्वरें, अवधारिजो ॥ ४४५ ॥

मियां होआवया समाधान, जी पुसिलें विश्वरूपध्यान,
आणि एकेंचि काळें त्रिभुवन, गिळितुचि उठिलासी ॥ ४४६ ॥

तरी तूं कोण कां येतुलीं, इयें भ्यासुरें मुखें कां मेळविलीं,
आघवियाचि करीं परिजिलीं, शस्त्रें कांह्या ॥ ४४७ ॥

जी जंव तंव रागीटपणें, वाढोनि गगना आणितोसि उणें,
कां डोळे करूनि भिंगुळवाणे, भेडसावीत आहासी ॥ ४४८ ॥
 
भिंगुळवाणे,=भितीदायक (वटारून )

एथ कृतांतेंसि देवा, कासया किजतसे हेवा,
हा आपुला तुवां सांगावा, अभिप्राय मज ॥ ४४९ ॥

या बोला म्हणे अनंतु, मी कोण हें आहासी पुसतु,
आणि कायिसयालागीं असे वाढतु, उग्रतेसी ॥ ४५० ॥

श्रीभगवानुवाच।
कालोऽस्मि लोकक्षयकृत्प्रवृद्धो लोकान् समाहर्तुमिह प्रवृत्तः ॥
ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे येऽवस्थिताः प्रत्यनीकेषु योधाः ॥ ३२॥

तरी मी काळु गा हें फुडें, लोक संहारावयालागीं वाढें,
सैंघ पसरिलीं आहातीं तोंडें, आतां ग्रासीन हें आघवें ॥ ४५१ ॥
 
सैंघ=अनेक

एथ अर्जुन म्हणे कटकटा, उबगिलों मागिल्या संकटा,
म्हणौनि आळविला तंव वोखटा, उवाइला हा ॥ ४५२ ॥
 
कटकटा=अरेरे  वोखटा,=वाईट(रित्या)    उवाइला= विस्तारला (प्रसन्न झाला)

तेवींचि कठिण बोलें आसतुटी, अर्जुन होईल हिंपुटी,
म्हणौनि सवेंचि म्हणे किरीटी, परि आन एक असे ॥ ४५३ ॥
 
आसतुटी=आशा तुटणे, वाईट वाटणे हिंपुटी,=दु:खी

तरी आतांचिये संहारवाहरे, तुम्हीं पांडव असा बाहिरे,
तेथ जातजातां धनुर्धरें, सांवरिले प्राण ॥ ४५४ ॥
 
संहारवाहरे= संहार रुपी संकट

होता मरणमहामारीं गेला, तो मागुता सावधु जाहला,
मग लागला बोला, चित्त देऊं ॥ ४५५ ॥

ऐसें म्हणिजत आहे देवें, अर्जुना तुम्ही माझें हें जाणावें,
येर जाण मी आघवें, सरलों ग्रासूं ॥ ४५६ ॥

वज्रानळीं प्रचंडीं, जैसी घापे लोणियाची उंडी,
तैसें जग हें माझिया तोंडीं, तुवां देखिलें जें ॥ ४५७ ॥

तरी तयामाझारीं कांहीं, भरंवसेनि उणें नाहीं,
इये वायांचि सैन्यें पाहीं, बरवतें आहाती ॥ ४५८ ॥
 
बरवतें= मिरवणे    

ऐसा चतुरंगाचिया संपदा, करित महाकाळेंसीं स्पर्धा,
वांटिवेचिया मदा, वघळले जे ॥ ४५९ ॥
वांटिवेचिया=पुरुषार्था वघळले-=वल्गना करती

हे जे मिळोनियां मेळे, कुंथती वीरवृत्तीचेनि बळें,
यमावरी गजदळें, वाखाणिजताती ॥ ४६० ॥
 
मृत्यूदेव यमा पेक्षा गजदळ वाखाणती

म्हणती सृष्टीवरी सृष्टी करूं, आण वाहूनि मृत्यूतें मारूं,
आणि जगाचा भरूं, घोंटु यया ॥ ४६१ ॥

पृथ्वी सगळीचि गिळूं, आकाश वरिच्यावरी जाळूं,
कां बाणवरी खिळूं, वारयातें ॥ ४६२ ॥

बोल हतियेराहूनि तिखट, दिसती अग्निपरिस दासट,
मारकपणें काळकूट, महुर म्हणत ॥ ४६३ ॥
 
दासट,=दाहक महुर=गोड

तरी हे गंधर्वनगरींचे उमाळे, जाण पोकळीचे पेंडवळें,
अगा चित्रीव फळें, वीर हे देखें ॥ ४६४ ॥
 
उमाळे=उसळ्या पेंडवळें,=भेडोळे

हां गा मृगजळाचा पूर आला, दळ नव्हे कापडाचा साप केला,
इया शृंगारूनियां खाला, मांडिलिया पैं ॥ ४६५ ॥

खाला=कातडी

तस्मात्त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून्भुंक्ष्व राज्यं समृद्धम्।
मयैवैते निहताः पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाचिन् ॥ ३३॥


येर चेष्टवितें जें बळ, तें मागांचि मियां ग्रासिलें सकळ,
आतां कोल्हारिचे वेताळ, तैसे निर्जीव हे आहाती ॥ ४६६ ॥
 
कोल्हारिचे=कुंभाराचे मातीचे

हालविती दोरी तुटली, तरी तियें खांबावरील बाहुलीं,
भलतेणें लोटिलीं, उलथोनि पडती ॥ ४६७ ॥

तैसा सैन्याचा यया बगा, मोडतां वेळू न लगेल पैं गा,
म्हणौनि उठीं उठीं वेगां, शाहाणा होईं ॥ ४६८ ॥
 
बगा,=देखावा

तुवां गोग्रहणाचेनि अवसरें, घातलें मोहनास्त्र एकसरें,
मग विराटाचेनि महाभेडें उत्तरें, आसडूनि नागाविलें ॥ ४६९ ॥
 
महाभेडें=महा भित्रा आसडूनि=वस्त्रहरण करून

आतां हें त्याहूनि निपटारें जहालें, निवटीं आयितें रण पडिलें,
घेईं यश रिपु जिंतिले, एकलेनि अर्जुनें ॥ ४७० ॥
 
निपटारें=निस्तेज   निवटीं=नष्ट कर

आणि कोरडें यशचि नोहे, समग्र राज्यही आलें आहे,
तूं निमित्तमात्रचि होयें, सव्यसाची ॥ ४७१ ॥


द्रोणं च भीष्मं च जयद्रथं च कर्णां तथान्यानपि योधवीरान्।
मया हतांस्त्वं जहि मा व्यथिष्ठा युध्यस्व जेतासि रणे सपत्‌नान् ॥ ३४॥


द्रोणाचा पाडु न करीं, भीष्माचें भय न धरीं,
कैसेनि कर्णावरी, परजूं हें न म्हण ॥ ४७२ ॥
 
पाडु=पर्वा

कोण उपायो जयद्रथा कीजे, हें न चिंतूं चित्त तुझें,
आणिकही आथि जे जे, नावाणिगे वीर ॥ ४७३ ॥
 
नावाणिगे=नावाजले

तेही एक एक आघवें, चित्रींचे सिंहाडे मानावे,
जैसे वोलेनि हातें घ्यावें, पुसोनियां ॥ ४७४ ॥

यावरी पांडवा, काइसा युद्धाचा मेळावा ?,
हा आभासु गा आघवा, येर ग्रासिलें मियां ॥ ४७५ ॥

जेव्हां तुवां देखिले, हे माझिया वदनीं पडिले,
तेव्हांचि यांचें आयुष्य सरलें, आतां रितीं सोपें ॥ ४७६ ॥
 
सोपें=सोपटागत रिते

म्हणौनि वहिला उठीं, मियां मारिले तूं निवटीं,
न रिगे शोकसंकटीं, नाथिलिया ॥ ४७७ ॥
 
वहिला=लवकर  निवटीं=मार

आपणचि आडखिळा कीजे, तो कौतुकें जैसा विंधोनि पाडिजे,
तैसें देखें गा तुझें, निमित्त आहे ॥ ४७८ ॥
 
आडखिळा=निशाण खुण विंधोनि=बाण मारून

बापा विरुद्ध जें जाहलें, तें उपजतांचि वाघें नेलें,
आतां राज्येंशीं संचलें, यश तूं भोगीं ॥ ४७९ ॥

सावियाचि उतत होते दायाद, आणि बळिये जगीं दुर्मद,
ते वधिले विशद, सायासु न लागतां ॥ ४८० ॥

 उतत =उतणे उन्मत   दायाद= (वडिलोपार्जित संपत्तीने) भाऊबंद

ऐसिया इया गोष्टी, विश्वाच्या वाक्पटीं,
लिहूनि घाली किरीटी, जगामाजीं ॥ ४८१ ॥

ही कीर्ती मिळव (विश्वरूपी पटावर नाव लिहून)


by विक्रांत प्रभाकर तिकोणे

ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ