Wednesday, December 21, 2016

ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओव्या ५९४ ते ६१५ (अनासक्ती ,समचित्त अन्यन भक्ती , एकांत )




असक्तिरनभिष्वंगः पुत्रदारगृहादिषु।
नित्यं च समचित्तत्वमिष्टानिष्टोपपत्तिषु ॥ ९॥

ओव्या ५९४ ते ६१५ (अनासक्ती ,समचित्त अन्यन भक्ती , एकांत )

तरि जो या देहावरी, उदासु ऐसिया परी,
उखिता जैसा बिढारीं, बैसला आहे ॥ ५९४ ॥

उखिता=प्रवासी   बिढारीं,=मुक्काम (घर)  

कां झाडाची साउली, वाटे जातां मीनली,
घरावरी तेतुली, आस्था नाहीं ॥ ५९५ ॥

साउली सरिसीच असे, परी असे हें नेणिजे जैसें,
स्त्रियेचें तैसें, लोलुप्य नाहीं ॥ ५९६ ॥

आणि प्रजा जे जाली, तियें वस्ती कीर आलीं,
कां गोरुवें बैसलीं, रुखातळीं ॥ ५९७ ॥

प्रजा =मुले (ती आपल्याकडे वस्तीला आली)   
गोरुवें=गुरे

जो संपत्तीमाजी असतां, ऐसा गमे पंडुसुता,
जैसा कां वाटे जातां, साक्षी ठेविला ॥ ५९८ ॥

किंबहुना पुंसा, पांजरियामाजीं जैसा,
वेदाज्ञेसी तैसा, बिहूनि असे ॥ ५९९ ॥

पांजरि=पिंजरा

एऱ्हवीं दारागृहपुत्रीं, नाहीं जया मैत्री,
तो जाण पां धात्री, ज्ञानासि गा ॥ ६०० ॥

धात्री=अधिष्ठान जमीन मुक्काम  


महासिंधू जैसे, ग्रीष्मवर्षीं सरिसे,
इष्टानिष्ट तैसें, जयाच्या ठायीं ॥ ६०१ ॥

कां तिन्ही काळ होतां, त्रिधा नव्हे सविता,
तैसा सुखदुःखीं चित्ता, भेदु नाहीं ॥ ६०२ ॥

जेथ नभाचेनि पाडें, समत्वा उणें न पडे,
तेथ ज्ञान रोकडें, वोळख तूं ॥ ६०३ ॥


मयि चानन्ययोगेन भक्तिरव्यभिचारिणी।
विविक्तदेशसेवित्वमरतिर्जनसंसदि ॥ १०॥


आणि मीवांचूनि कांहीं, आणिक गोमटें नाहीं,
ऐसा निश्चयोचि तिहीं, जयाचा केला ॥ ६०४ ॥

शरीर वाचा मानस, पियालीं कृतनिश्चयाचा कोश,
एक मीवांचूनि वास, न पाहती आन ॥ ६०५ ॥

पियालीं =प्राशन केले  कोश=शपथ

किंबहुना निकट निज, जयाचें जाहलें मज,
तेणें आपणयां आम्हां सेज, एकी केली ॥ ६०६ ॥

रिगतां वल्लभापुढें, नाहीं आंगीं जीवीं सांकडें,
तिये कांतेचेनि पाडें, एकसरला जो ॥ ६०७ ॥

मिळोनि मिळतचि असे, समुद्रीं गंगाजळ जैसें,
मी होऊनि मज तैसें, सर्वस्वें भजती ॥ ६०८ ॥

सूर्याच्या होण्यां होईजे, कां सूर्यासवेंचि जाइजे,
हें विकलेपण साजे, प्रभेसि जेवीं ॥ ६०९ ॥

पैं पाणियाचिये भूमिके, पाणी तळपे कौतुकें,
ते लहरी म्हणती लौकिकें, एऱ्हवीं तें पाणी ॥ ६१० ॥

जो अनन्यु यापरी, मी जाहलाहि मातें वरी,
तोचि तो मूर्तधारी, ज्ञान पैं गा ॥ ६११ ॥

आणि तीर्थें धौतें तटें, तपोवनें चोखटें,
आवडती कपाटें, वसवूं जया ॥ ६१२ ॥

धौतें=तळे कपाटें=गुहा

शैलकक्षांचीं कुहरें, जळाशय परिसरें,
अधिष्ठी जो आदरें, नगरा न ये ॥ ६१३ ॥

शैलकक्षांचीं=पर्वतराजी   कुहरें=दऱ्या

बहु एकांतावरी प्रीति, जया जनपदाची खंती,
जाण मनुष्याकारें मूर्ती, ज्ञानाची तो ॥ ६१४ ॥

आणिकहि पुढती, चिन्हें गा सुमती,
ज्ञानाचिये निरुती-, लागीं सांगों ॥ ६१५ ॥

by डॉ. विक्रांत तिकोणे
***********************************************

ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओवी ५३६ ते ५९३ दोष दर्शन



ज्ञानेश्वरी / अध्याय तेरावा / संत ज्ञानेश्वर
ओवी  ५३६ ते ५९३ दोष दर्शन

आणि जन्ममृत्युजरादुःखें, व्याधिवार्धक्यकलुषें,
तियें आंगा न येतां देखे, दुरूनि जो ॥ ५३६ ॥

साधकु विवसिया, कां उपसर्गु योगिया,
पावे उणेयापुरेया, वोथंबा जेवीं ॥ ५३७ ॥

विवसिया=हडळ डाकिन  उपसर्गु=उपद्रव विघ्न
वोथंबा=गवंड्याचा ओळंबा उणेयापुरेया=उणे ते पूर्ण करून घेई

वैर जन्मांतरींचें, सर्पा मनौनि न वचे,
तेवीं अतीता जन्माचें, उणें जो वाहे ॥ ५३८ ॥

अतीता=मागील गेलेले

डोळां हरळ न विरे, घाईं कोत न जिरे,
तैसें काळींचें न विसरे, जन्मदुःख ॥ ५३९ ॥

कोत=शस्त्र ,भाला

म्हणे पूयगर्ते रिगाला, अहा मूत्ररंध्रें निघाला,
कटा रे मियां चाटिला, कुचस्वेदु ॥ ५४० ॥

कटा रे= हाय रे अरेरे

ऐस{}सिया परी, जन्माचा कांटाळा धरी,
म्हणे आतां तें मी न करीं, जेणें ऐसें होय ॥ ५४१ ॥

हारी उमचावया, जुंवारी जैसा ये डाया,
कीं वैरा बापाचेया, पुत्र जचे ॥ ५४२ ॥

उमचावया=भरून काढायला डाया=डावा जचे=जाचे


मारिलियाचेनि रागें, पाठीचा जेवीं सूड मागें,
तेणें आक्षेपें लागे, जन्मापाठीं ॥ ५४३ ॥

परी जन्मती ते लाज, न सांडी जयाचें निज,
संभाविता निस्तेज, न जिरे जेवीं ॥ ५४४ ॥

निस्तेज=अपमान

आणि मृत्यु पुढां आहे, तोचि कल्पांतीं कां पाहे,
परी आजीचि होये, सावधु जो ॥ ५४५ ॥

माजीं अथांव म्हणता, थडियेचि पंडुसुता,
पोहणारा आइता, कासे जेवीं ॥ ५४६ ॥

अथांव=अथांग पात्र  आइता=तयारी

कां न पवतां रणाचा ठावो, सांभाळिजे जैसा आवो,
वोडण सुइजे घावो, न लागतांचि ॥ ५४७ ॥

आवो, =धैर्य वोडण=ढाल (चिलखत)  सुइजे=पांघरणे.घेणे  

पाहेचा पेणा वाटवधा, तंव आजीचि होईजे सावधा,
जीवु न वचतां औषधा, धांविजे जेवीं ॥ ५४८ ॥

पाहेचा =पुढचा उद्याचा   पेणा =मुक्काम

येऱ्हवीं ऐसें घडे, जो जळतां घरीं सांपडे,
तो मग न पवाडे, कुहा खणों ॥ ५४९ ॥

पवाडे=पराक्रम कुहा=विहीर

चोंढिये पाथरु गेला, तैसेनि जो बुडाला,
तो बोंबेहिसकट निमाला, कोण सांगे ॥ ५५० ॥

चोंढिये=खळगा खड्डा    पाथरु=दगड

म्हणौनि समर्थेंसीं वैर, जया पडिलें हाडखाइर,
तो जैसा आठही पाहर, परजून असे ॥ ५५१ ॥

हाडखाइर=हाडवैर

नातरी केळवली नोवरी, का संन्यासी जियापरी,
तैसा न मरतां जो करी, मृत्युसूचना ॥ ५५२ ॥

केळवली=लग्न ठरलेली (माहेरी असलेली सज्ज)  
का संन्यासी=जसा संन्यासी अगोदरच तयार  

पैं गा जो ययापरी, जन्मेंचि जन्म निवारी,
मरणें मृत्यु मारी, आपण उरे ॥ ५५३ ॥

तया घरीं ज्ञानाचें, सांकडें नाहीं साचें,
जया जन्ममृत्युचें, निमालें शल्य ॥ ५५४ ॥

आणि तयाचिपरी जरा, न टेंकतां शरीरा,
तारुण्याचिया भरा-, माजीं देखे ॥ ५५५ ॥

म्हणे आजिच्या अवसरीं, पुष्टि जे शरीरीं,
ते पाहे होईल काचरी, वाळली जैसी ॥ ५५६ ॥


निदैव्याचे व्यवसाय, तैसे ठाकती हातपाय,
अमंत्र्या राजाची परी आहे, बळा यया ॥ ५५७ ॥

फुलांचिया भोगा-, लागीं प्रेम टांगा,
तें करेयाचा गुडघा, तैसें होईल ॥ ५५८

 टांगा =नाक   करेयाचा=उंट

वोढाळाच्या खुरीं, आखरुआतें बुरी,
ते दशा माझ्या शिरीं, पावेल गा ॥ ५५९ ॥

आखरुआतें =गोठ्यातील   बुरी,=घाण

पद्मदळेंसी इसाळे, भांडताति हे डोळे,
ते होती पडवळें, पिकलीं जैसीं ॥ ५६० ॥
इसाळे=इर्षा

भंवईचीं पडळें, वोमथती सिनसाळे,
उरु कुहिजैल जळें, आंसुवाचेनि ॥ ५६१ ॥

पडळें,=पडदे  वोमथती=ओघळती  सिनसाळे,=झाडाची साल
उरु=छाती कुहिजैल=कुजेल

जैसें बाभुळीचें खोड, गिरबडूनि जाती सरड,
तैसें पिचडीं तोंड, सरकटिजैल ॥ ५६२ ॥

पिचडीं=थुंकी(नाला )  सरकटिजैल=चिकट होईल

रांधवणी चुलीपुढें, पऱ्हे उन्मादती खातवडे,
तैसींचि यें नाकाडें, बिडबिडती ॥ ५६३

पऱ्हे=सांडपाणी खड्यात
उन्मादती= फेसयेणे खातवडे,=दुर्गंधीयुक्त

तांबुलें वोंठ राऊं, हांसतां दांत दाऊं,
सनागर मिरऊं, बोल जेणें ॥ ५६४ ॥

तयाचि पाहे या तोंडा, येईल जळंबटाचा लोंढा,
इया उमळती दाढा, दातांसहित ॥ ५६५

जळंबटाचा= कफ लाळ  

कुळवाडी रिणें दाटली, कां वांकडिया ढोरें बैसलीं,
तैसी नुठी कांहीं केली, जीभचि हे ॥ ५६६ ॥

वांकडिया=पावसाची झड

कुसळें कोरडीं, वारेनि जाती बरडीं,
तैसा आपदा तोंडीं, दाढियेसी ॥ ५६७ ॥

बरडीं=माळरान

आषाढींचेनि जळें, जैसीं झिरपती शैलाचीं मौळें,
तैसें खांडीहूनि लाळे, पडती पूर ॥ ५६८ ॥

शैलाचीं मौळें, =पर्वत शिखर  खांडीहूनि=दाताच्या  फटी

वाचेसि अपवाडु, कानीं अनुघडु,
पिंड गरुवा माकडु, होईल हा ॥ ५६९ ॥

अपवाडु =असमर्थ  अनुघडु=दडा गरुवा=मोठा

तृणाचें बुझवणें, आंदोळे वारेनगुणें,
तैसें येईल कांपणें, सर्वांगासी ॥ ५७० ॥

पायां पडती वेंगडी, हात वळती मुरकुंडी,
बरवपणा बागडी, नाचविजैल ॥ ५७१ ॥

बागडी=सोंग 

मळमूत्रद्वारें, होऊनि ठाती खोंकरें,
नवसियें होती इतरें, माझियां निधनीं ॥ ५७२ ॥

खोंकरें=फुटकी

देखोनि थुंकील जगु, मरणाचा पडैल पांगु,
सोइरियां उबगु, येईल माझा ॥ ५७३ ॥

स्त्रियां म्हणती विवसी, बाळें जाती मूर्छी,
किंबहुना चिळसी, पात्र होईन ॥ ५७४ ॥

उभळीचा उजगरा, सेजारियां साइलिया घरा,
शिणवील म्हणती म्हातारा, बहुतांतें हा ॥ ५७५ ॥

 उभळीचा=उबळ खोकला  उजगरा=जागरण
साइलिया= निजलेल्या

ऐसी वार्धक्याची सूचणी, आपणिया तरुणपणीं,
देखे मग मनीं, विटे जो गा ॥ ५७६ ॥

म्हणे पाहे हें येईल, आणि आतांचें भोगितां जाईल,
मग काय उरेल, हितालागीं ? ॥ ५७७ ॥

म्हणौनि नाइकणें पावे, तंव आईकोनि घाली आघवें,
पंगु न होता जावें, तेथ जाय ॥ ५७८ ॥

नाइकणें पावे=बहिरे होणे जावें, तेथ जा=जायचे तिकडे जा

दृष्टी जंव आहे, तंव पाहावें तेतुलें पाहे,
मूकत्वा आधीं वाचा वाहे, सुभाषितें ॥ ५७९ ॥

हात होती खुळे, हें पुढील मोटकें कळे,
आणि करूनि घाली सकळें, दानादिकें ॥ ५८० ॥

ऐसी दशा येईल पुढें, तैं मन होईल वेडें,
तंव चिंतूनि ठेवी चोखडें, आत्मज्ञान ॥ ५८१ ॥

जैं चोर पाहे झोंबती, तंव आजीचि रुसिजे संपत्ती,
का झांकाझांकी वाती, न वचतां कीजे ॥ ५८२ ॥

रुसिजे=लपवी

तैसें वार्धक्य यावें, मग जें वायां जावें,
तें आतांचि आघवें, सवतें करीं ॥ ५८३ ॥

सवतें=वेगळे

आतां मोडूनि ठेलीं दुर्गें, कां वळित धरिलें खगें,
तेथ उपेक्षूनि जो निघे, तो नागवला कीं ? ॥ ५८४ ॥

मोडूनि ठेलीं दुर्गें, =पडलेले किल्ले
वळित =मागे वळून येणे पक्षी (अशी घनदाट झाडी)
नागवला कीं ?=तो लुटला जाईल का

तैसें वृद्धाप्य होये, आलेपण तें वायां जाये,
जे तो शतवृद्ध आहे, नेणों कैंचा ॥ ५८५ ॥

शतवृद्ध=बुद्धिमान ज्ञानी

झाडिलींचि कोळें झाडी, तया न फळे जेवीं बोंडीं,
जाहला अग्नि तरी राखोंडी, जाळील काई ? ॥ ५८६ ॥

कोळें=तीळ काढलेले झाड   

म्हणौनि वार्धक्याचेनि आठवें, वार्धक्या जो नागवे,
तयाच्या ठायीं जाणावें, ज्ञान आहे ॥ ५८७ ॥

तैसेंचि नाना रोग, पडिघाती ना जंव पुढां आंग,
तंव आरोग्याचे उपेग, करूनि घाली ॥ ५८८ ॥

पडिघाती=प्राप्त होणे

सापाच्या तोंडी, पडली जे उंडी,
ते लाऊनि सांडी, प्रबुद्धु जैसा ॥ ५८९ ॥

लाऊनि=जाणून  सांडी=सोडणे

तैसा वियोगें जेणें दुःखे, विपत्ति शोक पोखे,
तें स्नेह सांडूनि सुखें, उदासु होय ॥ ५९० ॥

आणि जेणें जेणें कडे, दोष सूतील तोंडें,
तयां कर्मरंध्री गुंडे, नियमाचे दाटी ॥ ५९१ ॥

गुंडे,=गोळा, धोंडे  

ऐस{}सिया आइती, जयाची परी असती,
तोचि ज्ञानसंपत्ती-, गोसावी गा ॥ ५९२ ॥

आइती=वर्तन तयारी

आतां आणीकही एक, लक्षण अलौकिक,
सांगेन आइक, धनंजया ॥ ५९३ ॥


by डॉ. विक्रांत तिकोणे