Tuesday, November 22, 2016

ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा, ओवी २१७ ते ३3८ (अहिंसा)



ज्ञानेश्वरी / अध्याय तेरावा / संत ज्ञानेश्वर
ओवी २१७ ते ३३८ (अहिंसा)

पैं गा अदंभपण, म्हणितलें तें हें जाण,
आतां आईक खूण, अहिंसेची ॥ २१७ ॥

तरी अहिंसा बहुतीं परीं, बोलिली असे अवधारीं,
आपुलालिया मतांतरीं, निरूपिली ॥ २१८ ॥

परी ते ऐसी देखा, जैशा खांडूनियां शाखा,
मग तयाचिया बुडुखा, कूंप कीजे ॥ २१९ ॥
बुडुखा=बुंधा

कां बाहु तोडोनि पचविजे, मग भूकेची पीडा राखिजे,
नाना देऊळ मोडोनि कीजे, पौळी देवा ॥ २२० ॥
पौळी=कोट ,भिंत

तैसी हिंसाचि करूनि अहिंसा, निफजविजे हा ऐसा,
पैं पूर्वमीमांसा, निर्णो केला ॥ २२१ ॥

जे अवृष्टीचेनि उपद्रवें, गादलें विश्व आघवें,
म्हणौनि पर्जन्येष्टी करावे, नाना याग ॥ २२२ ॥

गादलें=त्रासले पीडित झाले

तंव तिये इष्टीचिया बुडीं, पशुहिंसा रोकडी,
मग अहिंसेची थडी, कैंची दिसे ? ॥ २२३ ॥

इष्टी=इष्ट,योग्य, मनासारखे

पेरिजे नुसधी हिंसा, तेथ उगवैल काय अहिंसा ?,
परी नवल बापा धिंवसा, या याज्ञिकांचा ॥ २२४ ॥

धिंवसा=इच्छा ,धाडस

आणि आयुर्वेदु आघवा, तो याच मोहोरा पांडवा,
जे जीवाकारणें करावा, जीवघातु ॥ २२५ ॥

नाना रोगें आहाळलीं, लोळतीं भूतें देखिलीं,
ते हिंसा निवारावया केली, चिकित्सा कां ॥ २२६ ॥

आहाळलीं=पोळली कष्टी झाली

तंव ते चिकित्से पहिलें, एकाचे कंद खणविले,
एका उपडविलें, समूळीं सपत्रीं ॥ २२७ ॥

एकें आड मोडविली, अजंगमाची खाल काढविली,
एकें गर्भिणी उकडविली, पुटामाजीं ॥ २२८ ॥

आड=अर्धे तोडली  अजंगमाची=वृक्ष गर्भिणी=कळ्या

अजातशत्रु तरुवरां, सर्वांगीं देवविल्या शिरा,
ऐसे जीव घेऊनि धनुर्धरा, कोरडे केले ॥ २२९ ॥

आणि जंगमाही हात, लाऊनि काढिलें पित्त,
मग राखिले शिणत, आणिक जीव ॥ २३० ॥

जंगम=जीवीत प्राणी

अहो वसतीं धवळारें, मोडूनि केलीं देव्हारें,
नागवूनि वेव्हारें, गवांदी घातली ॥ २३१ ॥

धवळारें=घरे गवांदी=गाव जेवण

मस्तक पांघुरविलें, तंव तळवटीं उघडें पडलें,
घर मोडोनि केले, मांडव पुढें ॥ २३२ ॥

नाना पांघुरणें, जाळूनि जैसें तापणें,
जालें आंगधुणें, कुंजराचें ॥ २३३ ॥

कुंजराचें=हत्ती

नातरी बैल विकूनि गोठा, पुंसा लावोनि बांधिजे गांठा,
इया करणी कीं चेष्टा ?, काइ हसों ॥ २३४ ॥

पुंसा=पोपट गांठा=पिंजरा

एकीं धर्माचिया वाहणी, गाळूं आदरिलें पाणी,
तंव गाळितया आहाळणीं, जीव मेले ॥ २३५॥

आदरिलें=सुरु करणे आहाळणीं,=पीडेने

एक न पचवितीचि कण, इये हिंसेचे भेण,
तेथ कदर्थले प्राण, तेचि हिंसा ॥ २३६ ॥

पचवितीचि=शिजवते कदर्थले=कासावीस

एवं हिंसाचि अहिंसा, कर्मकांडीं हा ऐसा,
सिद्धांतु सुमनसा, वोळखें तूं ॥ २३७ ॥

पहिलें अहिंसेचें नांव, आम्हीं केलें जंव,
तंव स्फूर्ति बांधली हांव, इये मती ॥ २३८ ॥

तरि कैसेनि इयेतें गाळावें, म्हणौनि पडिलें बोलावें,
तेवींचि तुवांही जाणावें, ऐसा भावो ॥ २३९ ॥

बहुतकरूनि किरीटी, हाचि विषो इये गोठी,
एऱ्हवी कां आडवाटीं, धाविजैल गा ? ॥ २४० ॥

आणि स्वमताचिया निर्धारा-, लागोनियां धनुर्धरा,
प्राप्तां मतांतरां, निर्वेचु कीजे ॥ २४१ ॥

ऐसी हे अवधारीं, निरूपिती परी,
आतां ययावरी, मुख्य जें गा ॥ २४२ ॥

तें स्वमत बोलिजैल, अहिंसे रूप किजैल,
जेणें उठलिया आंतुल, ज्ञान दिसे ॥ २४३ ॥
परिइ तें अधिष्ठिलेनि आंगें, जाणिजे आचरतेनि बगें,
जैसी कसवटी सांगे, वानियातें ॥ २४४ ॥

बगें=रिती ,पद्धत .कसवटी =सोनाराचा दगड 
वानियातें=कस

तैसें ज्ञानामनाचिये भेटी, सरिसेंचि अहिंसेचें बिंब उठी,
तेंचि ऐसें किरीटी, परिस आतां ॥ २४४ ॥

तरी तरंगु नोलांडितु, लहरी पायें न फोडितु,
सांचलु न मोडितु, पाणियाचा ॥ २४६ ॥

वेगें आणि लेसा, दिठी घालूनि आंविसा,
जळीं बकु जैसा, पाउल सुये ॥ २४७ ॥

लेसा=जपून आंविसा=आमिष

कां कमळावरी भ्रमर, पाय ठेविती हळुवार,
कुचुंबैल केसर, इया शंका ॥ २४८ ॥

कुचुंबैल=चुरगळेल

तैसे परमाणु पां गुंतले, जाणूनि जीव सानुले,
कारुण्यामाजीं पाउलें, लपवूनि चाले ॥ २४९ ॥

ते वाट कृपेची करितु, ते दिशाचि स्नेह भरितु,
जीवातळीं आंथरितु, आपुला जीवु ॥ २५० ॥

ऐसिया जतना, चालणें जया अर्जुना,
हें अनिर्वाच्य परिमाणा, पुरिजेना ॥ २५१ ॥
परिमाणा=मोजमाप

पैं मोहाचेनि सांगडें, लासी पिलीं धरी तोंडें,
तेथ दांतांचे आगरडे, लागती जैसे ॥ २५२ ॥

सांगडें=सवे आगरडे=टोक

कां स्नेहाळु माये, तान्हयाची वास पाहे,
तिये दिठी आहे, हळुवार जें ॥ २५३ ॥

वास=वाट बाजू  

नाना कमळदळें, डोलविजती ढाळें,
तो जेणें पाडें बुबुळें, वारा घेपे ॥ २५४ ॥

ढाळें=हळूहळू

तैसेनि मार्दवें पाय, भूमीवरी न्यसीतु जाय,
लागती तेथ होय, जीवां सुख ॥ २५५ ॥

न्यसीतु=रोवणे ठेवणे

ऐसिया लघिमा चालतां, कृमि कीटक पंडुसुता,
देखे तरी माघौता, हळूचि निघे ॥ २५६ ॥

म्हणे पावो धडफडील, तरी स्वामीची निद्रा मोडैल,
रचलेपणा पडैल, झोती हन ॥ २५७ ॥

इया काकुळती, वाहणी घे माघौती,
कोणेही व्यक्ती, न वचे वरी ॥ २५८ ॥
वाहणी=मार्ग

जीवाचेनि नांवें, तृणातेंही नोलांडवे,
मग न लेखितां जावें, हे कें गोठी ?॥ २५९ ॥

 लेखितां=लक्ष देणे

मुंगिये मेरु नोलांडवे, मशका सिंधु न तरवे,
तैसा भेटलियां न करवे, अतिक्रमु ॥ २६० ॥

ऐसी जयाची चाली, कृपाफळी फळा आली,
देखसी जियाली, दया वाचे ॥ २६१ ॥

वाचे=वाचेने

स्वयें श्वसणेंचि सुकुमार, मुख मोहाचें माहेर,
माधुर्या जाहले अंकुर, दशन तैसे ॥ २६२ ॥

पुढां स्नेह पाझरे, माघां चालती अक्षरें,
शब्द पाठीं अवतरे, कृपा आधीं ॥ २६३ ॥

तंव बोलणेंचि नाहीं, बोलों म्हणे जरी कांहीं,
तरी बोल कोणाही, खुपेल कां ॥ २६४ ॥

बोलतां अधिकुही निघे, तरी कोण्हाही वर्मीं न लगे,
आणि कोण्हासि न रिघे, शंका मनीं ॥ २६५ ॥

मांडिली गोठी हन मोडैल, वासिपैल कोणी उडैल,
आइकोनिचि वोवांडिल, कोण्ही जरी ॥ २६६ ॥

वासिपैल=दचकून घाबरून वोवांडिल,=उपेक्षा करणे ओलांडणे

तरी दुवाळी कोणा नोहावी, भुंवई कवणाची नुचलावी,
ऐसा भावो जीवीं, म्हणौनि उगा ॥ २६७ ॥

दुवाळी=त्रास पिडा उपेक्षा

मग प्रार्थिला विपायें, जरी लोभें बोलों जाये,
तरी परिसतया होये, मायबापु ॥ २६८ ॥

कां नादब्रह्मचि मुसे आलें, कीं गंगापय असललें,
पतिव्रते आलें, वार्धक्य जैसे ॥ २६९ ॥
मुसेआले =आकार आले असललें,=संथ झाले

तैसें साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ,
शब्द जैसे कल्लोळ, अमृताचे ॥ २७० ॥

 मितले=मोजून मापून लहान

विरोधु वादुबळु, प्राणितापढाळु,
उपहासु छळु, वर्मस्पर्शु ॥ २७१ ॥

विरोधु= अडवणूक वादु=लांबण बळु,= प्राणास भिडणे
प्राणितापढाळु =अघळपघळ उपहासु उपहास छळु, =कपटपूर्ण  वर्मस्पर्शु = मर्मभेद

आटु वेगु विंदाणु, आशा शंका प्रतारणु,
हे संन्यासिले अवगुणु, जया वाचा ॥ २७२ ॥

 आटु =हट्टी घमेंडी  वेगु= जोर विंदाणु= कारस्थानी
आशा= आशाळभुत शंका = भितीजनक प्रतारणु,= फसवणूक


आणि तयाचि परी किरीटी, थाउ जयाचिये दिठी,
सांडिलिया भ्रुकुटी, मोकळिया ॥ २७३ ॥

थाउ=ठाव, स्थिती

कां जे भूतीं वस्तु आहे, तियें रुपों शके विपायें,
म्हणौनि वासु न पाहे, बहुतकरूनी ॥ २७४ ॥

ऐसाही कोणे एके वेळे, भीतरले कृपेचेनि बळें,
उघडोनियां डोळे, दृष्टी घाली ॥ २७५ ॥

तरी चंद्रबिंबौनि धारा, निघतां नव्हती गोचरा,
परि एकसरें चकोरां, निघती दोंदें ॥ २७६ ॥

गोचरा=दिसणे

तैसें प्राणियांसि होये, जरी तो कहींवासु पाहे,
तया अवलोकनाची सोये, कूर्मींही नेणे ॥ २७७ ॥

किंबहुना ऐसी, दिठी जयाची भूतांसी,
करही देखसी, तैसेचि ते ॥ २७८ ॥

तरी होऊनियां कृतार्थ, राहिले सिद्धांचे मनोरथ,
तैसे जयाचे हात, निर्व्यापार ॥ २७९ ॥

अक्षमें आणि संन्यासिलें, कीं निरिंधन आणि विझालें,
मुकेनि घेतलें, मौन जैसें ॥ २८० ॥

अक्षमें=असमर्थ निरिंधन=इंधनावाचून

तयापरी कांहीं, जयां करां करणें नाहीं,
जे अकर्तयाच्या ठायीं, बैसों येती ॥ २८१ ॥

आसुडैल वारा, नख लागेल अंबरा,
इया बुद्धी करां, चळों नेदी ॥ २८२ ॥

तेथ आंगावरिलीं उडवावीं, कां डोळां रिगतें झाडावीं,
पशुपक्ष्यां दावावीं, त्रासमुद्रा ॥ २८३ ॥

इया केउतिया गोठी, नावडे दंडु काठी,
मग शस्त्राचें किरीटी, बोलणें कें ? ॥ २८४ ॥

लीलाकमळें खेळणें, कांपुष्पमाळा झेलणें,
न करी म्हणे गोफणें, ऐसें होईल ॥ २८५ ॥

हालवतील रोमावळी, यालागीं आंग न कुरवाळी,
नखांची गुंडाळी, बोटांवरी ॥ २८६ ॥

तंव करणेयाचाचि अभावो, परी ऐसाही पडे प्रस्तावो,
तरी हातां हाचि सरावो, जे जोडिजती ॥ २८७ ॥

प्रस्तावो=वेळ प्रसंग

कां नाभिकारा उचलिजे, हातु पडिलियां देइजे,
नातरी आर्तातें स्पर्शिजे, अळुमाळु ॥ २८८ ॥

नाभिकारा=अभय देणे अळुमाळु=किंचित हलके

हेंही उपरोधें करणें, तरी आर्तभय हरणें,
नेणती चंद्रकिरणें, जिव्हाळा तो ॥ २८९ ॥
उपरोधें=बळेच

पावोनि तो स्पर्शु, मलयानिळु खरपुसु,
तेणें मानें पशु, कुरवाळणें ॥ २९० ॥

खरपुसु=सुंदर सुगंधी ?

जे सदा रिते मोकळे, जैशी चंदनांगें निसळें,
न फळतांही निर्फळें, होतीचिना ॥ २९१ ॥

निसळें=शुद्ध (पाभे सितळे)

आतां असो हें वाग्जाळ, जाणें तें करतळ,
सज्जनांचे शीळ, स्वभाव जैसे ॥ २९२ ॥

आतां मन तयाचें, सांगों म्हणों जरी साचें,
तरी सांगितले कोणाचे, विलास हे ? ॥ २९३ ॥

काइ शाखा नव्हे तरु ?, जळेंवीण असे सागरु ?,
तेज आणि तेजाकारु, आन काई ? ॥ २९४ ॥

अवयव आणि शरीर, हे वेगळाले कीर ?,
कीं रसु आणि नीर, सिनानीं आथी ? ॥ २९५ ॥

म्हणौनि हे जे सर्व, सांगितले बाह्य भाव,
ते मनचि गा सावयव, ऐसें जाणें ॥ २९६ ॥

जें बीज भुईं खोंविलें, तेंचि वरी रुख जाहलें,
तैसें इंद्रियाद्वारीं फांकलें, अंतरचि कीं ॥ २९७ ॥

पैं मानसींचि जरी, अहिंसेची अवसरी,
तरी कैंची बाहेरी, वोसंडेल ? ॥ २९८ ॥

आवडे ते वृत्ती किरीटी, आधीं मनौनीचि उठी,
मग ते वाचे दिठी, करांसि ये ॥ २९९ ॥

आवडे ते=कुठली ही

वांचूनि मनींचि नाहीं, तें वाचेसि उमटेल काई ?,
बींवीण भुईं, अंकुर असे ? ॥ ३०० ॥

म्हणौनि मनपण जैं मोडे, तैं इंद्रिय आधींचि उबडें,
सूत्रधारेंवीण साइखडें, वावो जैसें ॥ ३०१ ॥

उबडें,=पालथे होणे नष्ट होती

उगमींचि वाळूनि जाये, तें वोघीं कैचें वाहे,
जीवु गेलिया आहे, चेष्टा देहीं ? ॥ ३०२ ॥

तैसें मन हें पांडवा, मूळ या इंद्रियभावा,
हेंचि राहटे आघवां, द्वारीं इहीं ॥ ३०३ ॥

परी जिये वेळीं जैसें, जें होऊनि आंतु असे,
बाहेरी ये तैसें, व्यापाररूपें ॥ ३०४ ॥

यालागी साचोकारें, मनीं अहिंसा थांवे थोरें,
पिकली द्रुती आदरें, बोभात निघे ॥ ३०५ ॥

 थांवे=बळावे द्रुती=सुगंधी बोभात=आवाज करत गर्जत

म्हणौनि इंद्रियें तेचि संपदा, वेचितां हीं उदावादा,
अहिंसेचा धंदा, करितें आहाती ॥ ३०६ ॥

उदावादा=प्रकट करणे (भांडवल)

समुद्रीं दाटे भरितें, तैं समुद्रचि भरी तरियांते,
तैसें स्वसंपत्ती चित्तें, इंद्रियां केलें ॥ ३०७ ॥

तरियांते=खाडी

हें बहु असो पंडितु, धरुनि बाळकाचा हातु,
वोळी लिही व्यक्तु, आपणचि ॥ ३०८ ॥

तैसें दयाळुत्व आपुलें, मनें हातापायां आणिलें,
मग तेथ उपजविलें, अहिंसेतें ॥ ३०९ ॥

याकारणें किरीटी, इंद्रियांचिया गोठी,
मनाचिये राहाटी, रूप केलें ॥ ३१० ॥

ऐसा मनें देहें वाचा, सर्व संन्यासु दंडाचा,
जाहला ठायीं जयाचा, देखशील ॥ ३११ ॥

तो जाण वेल्हाळ, ज्ञानाचें वेळाउळ,
हें असो निखळ, ज्ञानचि तो ॥ ३१२ ॥

वेल्हाळ=सुंदर वेळाउळ=मंदिर

जे अहिंसा कानें ऐकिजे, ग्रंथाधारें निरूपिजे,
ते पाहावी हें उपजे, तैं तोचि पाहावा ॥ ३१३ ॥

ऐसें म्हणितलें देवें, तें बोलें एकें सांगावें,
परी फांकला हें उपसाहावें, तुम्हीं मज ॥ ३१४ ॥

फांकला=विस्तार

म्हणाल हिरवें चारीं गुरूं, विसरे मागील मोहर धरूं,
कां वारेलगें पांखिरूं, गगनीं भरे ॥ ३१५ ॥

मोहर=मार्ग

तैसिया प्रेमाचिया स्फूर्ती, फावलिया रसवृत्तीं,
वाहविला मती, आकळेना ॥ ३१६ ॥

तरि तैसें नोहे अवधारा, कारण असें विस्तारा,
एऱ्हवीं पद तरी अक्षरां, तिहींचेंचि ॥ ३१७ ॥

अहिंसा म्हणतां थोडी, परिइ ते तैंचि होय उघडी,
जैं लोटिजती कोडी, मतांचिया ॥ ३१८ ॥

लोटिजती=बाजूस सारून कोडी,=कोटी खूप

एऱ्हवीं प्राप्तें मतांतरें, थातंबूनि आंगभरें,
बोलिजैल ते न सरे, तुम्हांपाशीं ॥ ३१९ ॥

थातंबूनि=थोपवून आंगभरें,=अंगीच्या जोराने

रत्नपारखियांच्या गांवीं, जाईल गंडकी तरी सोडावी,
काश्मीरीं न करावी, मिडगण जेवीं ॥ ३२० ॥

गंडकी=कसवटीचा दगड काश्मीरीं=स्फटिकाला (केशरला)  
मिडगण=पुटे देणे स्तुती करणे

काइसा वासु कापुरा, मंद जेथ अवधारा,
पिठाचा विकरा, तिये सातें ? ॥ ३२१ ॥

सातें =लगेच होतो

म्हणौनि इये सभे, बोलकेपणाचेनि क्षोभें,
लाग सरुउं न लभे, बोला प्रभु ॥ ३२२ ॥

लाग सरु=जवळीक करणे  न लभे,=मिळत नाही
संयुक्तीत संबंध लागेल असा

सामान्या आणि विशेषा, सकळै कीजेल देखा,
तरी कानाचेया मुखा-, कडे न्याल ना तुम्ही ॥ ३२३ ॥

कालवाकालव करता

शंकेचेनि गदळें, जैं शुद्ध प्रमेय मैळे,
तैं मागुतिया पाउलीं पळे, अवधान येतें ॥ ३२४ ॥

गदळें=घाण कचरा

कां करूनि बाबुळियेची बुंथी, जळें जियें ठाती,
तयांची वास पाहाती, हंसु काई ? ॥ ३२५ ॥

कां अभ्रापैलीकडे, जैं येत चांदिणें कोडें,
तैं चकोरें चांचुवडें, उचलितीना ॥ ३२६ ॥

तैसें तुम्ही वास न पाहाल, ग्रंथु नेघा वरी कोपाल,
जरी निर्विवाद नव्हैल, निरूपण ॥ ३२७ ॥

न बुझावितां मतें, न फिटे आक्षेपाचें लागतें,
तें व्याख्यान जी तुमतें, जोडूनि नेदी ॥ ३२८ ॥

लागतें=संबंध

आणि माझें तंव आघवें, ग्रथन येणेचि भावें,
जे तुम्हीं संतीं होआवें, सन्मुख सदां ॥ ३२९ ॥

एऱ्हवीं तरी साचोकारें, तुम्ही गीतार्थाचे सोइरे,
जाणोनि गीता एकसरें, धरिली मियां ॥ ३३० ॥

जें आपुलें सर्वस्व द्याल, मग इयेतें सोडवूनि न्याल,
म्हणौनि ग्रंथु नव्हे वोल, साचचि हे ॥ ३३१ ॥

वोल=तारण (ओलीस ठेवणे )

कां सर्वस्वाचा लोभु धरा, वोलीचा अव्हेरु करा,
तरी गीते मज अवधारा, एकचि गती ॥ ३३२ ॥

किंबहुना मज, तुमचिया कृपा काज,
तियेलागीं व्याज, ग्रंथाचें केलें ॥ ३३३ ॥

तरिइ तुम्हां रसिकांजोगें, व्याख्यान शोधावें लागे,
म्हणौनि जी मतांगें, बोलों गेलों ॥ ३३४ ॥

तंव कथेसि पसरु जाहला, श्लोकार्थु दूरी गेला,
कीजो क्षमा यया बोला, अपत्या मज ॥ ३३५ ॥

आणि घांसाआंतिल हरळु, फेडितां लागे वेळु,
ते दूषण नव्हें खडळु, सांडावा कीं ॥ ३३६ ॥

कां संवचोरा चुकवितां, दिवस लागलिया माता,
कोपावें कीं जीविता, जिताणें कीजे ? ॥ ३३७ ॥

जिताणें=दृष्ट काढणे

परी यावरील हें नव्हे, तुम्हीं उपसाहिलें तेंचि बरवें,
आतां अवधारिजो देवें, बोलिलें ऐसें ॥ ३३८ ॥
======================================