ज्ञानेश्वरी / अध्याय
तेरावा / संत ज्ञानेश्वर
ओवी ५३६ ते ५९३ दोष दर्शन
आणि जन्ममृत्युजरादुःखें,
व्याधिवार्धक्यकलुषें,
तियें आंगा न येतां देखे,
दुरूनि जो ॥ ५३६ ॥
साधकु विवसिया, कां उपसर्गु योगिया,
पावे उणेयापुरेया, वोथंबा जेवीं ॥ ५३७ ॥
विवसिया=हडळ डाकिन उपसर्गु=उपद्रव विघ्न
वोथंबा=गवंड्याचा ओळंबा उणेयापुरेया=उणे ते पूर्ण करून घेई
वैर जन्मांतरींचें, सर्पा मनौनि न वचे,
तेवीं अतीता जन्माचें, उणें जो वाहे ॥ ५३८ ॥
अतीता=मागील गेलेले
डोळां हरळ न विरे, घाईं कोत न जिरे,
तैसें काळींचें न विसरे,
जन्मदुःख ॥ ५३९ ॥
कोत=शस्त्र ,भाला
म्हणे पूयगर्ते रिगाला, अहा मूत्ररंध्रें
निघाला,
कटा रे मियां चाटिला, कुचस्वेदु ॥ ५४० ॥
कटा रे= हाय रे अरेरे
ऐस{ऐ}सिया परी, जन्माचा कांटाळा धरी,
म्हणे आतां तें मी न करीं,
जेणें ऐसें होय ॥ ५४१ ॥
हारी उमचावया, जुंवारी जैसा ये डाया,
कीं वैरा बापाचेया, पुत्र जचे ॥ ५४२ ॥
उमचावया=भरून काढायला डाया=डावा जचे=जाचे
मारिलियाचेनि रागें, पाठीचा जेवीं सूड मागें,
तेणें आक्षेपें लागे, जन्मापाठीं ॥ ५४३ ॥
परी जन्मती ते लाज, न सांडी जयाचें निज,
संभाविता निस्तेज, न जिरे जेवीं ॥ ५४४ ॥
निस्तेज=अपमान
आणि मृत्यु पुढां आहे, तोचि कल्पांतीं कां
पाहे,
परी आजीचि होये, सावधु जो ॥ ५४५ ॥
माजीं अथांव म्हणता, थडियेचि पंडुसुता,
पोहणारा आइता, कासे जेवीं ॥ ५४६ ॥
अथांव=अथांग पात्र आइता=तयारी
कां न पवतां रणाचा ठावो,
सांभाळिजे जैसा आवो,
वोडण सुइजे घावो, न लागतांचि ॥ ५४७ ॥
आवो, =धैर्य वोडण=ढाल (चिलखत) सुइजे=पांघरणे.घेणे
पाहेचा पेणा वाटवधा, तंव आजीचि होईजे सावधा,
जीवु न वचतां औषधा, धांविजे जेवीं ॥ ५४८ ॥
पाहेचा =पुढचा उद्याचा पेणा =मुक्काम
येऱ्हवीं ऐसें घडे, जो जळतां घरीं सांपडे,
तो मग न पवाडे, कुहा खणों ॥ ५४९ ॥
पवाडे=पराक्रम कुहा=विहीर
चोंढिये पाथरु गेला, तैसेनि जो बुडाला,
तो बोंबेहिसकट निमाला, कोण सांगे ॥ ५५० ॥
चोंढिये=खळगा खड्डा पाथरु=दगड
म्हणौनि समर्थेंसीं वैर,
जया पडिलें हाडखाइर,
तो जैसा आठही पाहर, परजून असे ॥ ५५१ ॥
हाडखाइर=हाडवैर
नातरी केळवली नोवरी, का संन्यासी जियापरी,
तैसा न मरतां जो करी, मृत्युसूचना ॥ ५५२ ॥
केळवली=लग्न ठरलेली (माहेरी
असलेली सज्ज)
का संन्यासी=जसा संन्यासी
अगोदरच तयार
पैं गा जो ययापरी, जन्मेंचि जन्म निवारी,
मरणें मृत्यु मारी, आपण उरे ॥ ५५३ ॥
तया घरीं ज्ञानाचें, सांकडें नाहीं साचें,
जया जन्ममृत्युचें, निमालें शल्य ॥ ५५४ ॥
आणि तयाचिपरी जरा, न टेंकतां शरीरा,
तारुण्याचिया भरा-, माजीं देखे ॥ ५५५ ॥
म्हणे आजिच्या अवसरीं, पुष्टि जे शरीरीं,
ते पाहे होईल काचरी, वाळली जैसी ॥ ५५६ ॥
निदैव्याचे व्यवसाय, तैसे ठाकती हातपाय,
अमंत्र्या राजाची परी आहे,
बळा यया ॥ ५५७ ॥
फुलांचिया भोगा-, लागीं प्रेम टांगा,
तें करेयाचा गुडघा, तैसें होईल ॥ ५५८ ॥
टांगा =नाक करेयाचा=उंट
वोढाळाच्या खुरीं, आखरुआतें बुरी,
ते दशा माझ्या शिरीं, पावेल गा ॥ ५५९ ॥
आखरुआतें =गोठ्यातील बुरी,=घाण
पद्मदळेंसी इसाळे, भांडताति हे डोळे,
ते होती पडवळें, पिकलीं जैसीं ॥ ५६० ॥
इसाळे=इर्षा
भंवईचीं पडळें, वोमथती सिनसाळे,
उरु कुहिजैल जळें, आंसुवाचेनि ॥ ५६१ ॥
पडळें,=पडदे वोमथती=ओघळती सिनसाळे,=झाडाची साल
उरु=छाती कुहिजैल=कुजेल
जैसें बाभुळीचें खोड, गिरबडूनि जाती सरड,
तैसें पिचडीं तोंड, सरकटिजैल ॥ ५६२ ॥
पिचडीं=थुंकी(नाला ) सरकटिजैल=चिकट होईल
रांधवणी चुलीपुढें, पऱ्हे उन्मादती खातवडे,
तैसींचि यें नाकाडें, बिडबिडती ॥ ५६३ ॥
पऱ्हे=सांडपाणी खड्यात
उन्मादती= फेसयेणे खातवडे,=दुर्गंधीयुक्त
तांबुलें वोंठ राऊं, हांसतां दांत दाऊं,
सनागर मिरऊं, बोल जेणें ॥ ५६४ ॥
तयाचि पाहे या तोंडा, येईल जळंबटाचा लोंढा,
इया उमळती दाढा, दातांसहित ॥ ५६५ ॥
जळंबटाचा= कफ लाळ
कुळवाडी रिणें दाटली, कां वांकडिया ढोरें
बैसलीं,
तैसी नुठी कांहीं केली, जीभचि हे ॥ ५६६ ॥
वांकडिया=पावसाची झड
कुसळें कोरडीं, वारेनि जाती बरडीं,
तैसा आपदा तोंडीं, दाढियेसी ॥ ५६७ ॥
बरडीं=माळरान
आषाढींचेनि जळें, जैसीं झिरपती शैलाचीं
मौळें,
तैसें खांडीहूनि लाळे, पडती पूर ॥ ५६८ ॥
शैलाचीं मौळें, =पर्वत शिखर खांडीहूनि=दाताच्या फटी
वाचेसि अपवाडु, कानीं अनुघडु,
पिंड गरुवा माकडु, होईल हा ॥ ५६९ ॥
अपवाडु =असमर्थ अनुघडु=दडा गरुवा=मोठा
तृणाचें बुझवणें, आंदोळे वारेनगुणें,
तैसें येईल कांपणें, सर्वांगासी ॥ ५७० ॥
पायां पडती वेंगडी, हात वळती मुरकुंडी,
बरवपणा बागडी, नाचविजैल ॥ ५७१ ॥
बागडी=सोंग
मळमूत्रद्वारें, होऊनि ठाती खोंकरें,
नवसियें होती इतरें, माझियां निधनीं ॥ ५७२ ॥
खोंकरें=फुटकी
देखोनि थुंकील जगु, मरणाचा पडैल पांगु,
सोइरियां उबगु, येईल माझा ॥ ५७३ ॥
स्त्रियां म्हणती विवसी,
बाळें जाती मूर्छी,
किंबहुना चिळसी, पात्र होईन ॥ ५७४ ॥
उभळीचा उजगरा, सेजारियां साइलिया घरा,
शिणवील म्हणती म्हातारा,
बहुतांतें हा ॥ ५७५ ॥
उभळीचा=उबळ खोकला उजगरा=जागरण
साइलिया= निजलेल्या
ऐसी वार्धक्याची सूचणी, आपणिया तरुणपणीं,
देखे मग मनीं, विटे जो गा ॥ ५७६ ॥
म्हणे पाहे हें येईल, आणि आतांचें भोगितां
जाईल,
मग काय उरेल, हितालागीं ? ॥ ५७७ ॥
म्हणौनि नाइकणें पावे, तंव आईकोनि घाली आघवें,
पंगु न होता जावें, तेथ जाय ॥ ५७८
॥
नाइकणें पावे=बहिरे होणे जावें,
तेथ जा=जायचे तिकडे जा
दृष्टी जंव आहे, तंव पाहावें तेतुलें
पाहे,
मूकत्वा आधीं वाचा वाहे,
सुभाषितें ॥ ५७९ ॥
हात होती खुळे, हें पुढील मोटकें कळे,
आणि करूनि घाली सकळें, दानादिकें ॥ ५८० ॥
ऐसी दशा येईल पुढें, तैं मन होईल वेडें,
तंव चिंतूनि ठेवी चोखडें,
आत्मज्ञान ॥ ५८१ ॥
जैं चोर पाहे झोंबती, तंव आजीचि रुसिजे
संपत्ती,
का झांकाझांकी वाती, न वचतां कीजे ॥ ५८२ ॥
रुसिजे=लपवी
तैसें वार्धक्य यावें, मग जें वायां जावें,
तें आतांचि आघवें, सवतें करीं ॥ ५८३ ॥
सवतें=वेगळे
आतां मोडूनि ठेलीं दुर्गें,
कां वळित धरिलें खगें,
तेथ उपेक्षूनि जो निघे, तो नागवला कीं ? ॥ ५८४ ॥
मोडूनि ठेलीं दुर्गें, =पडलेले
किल्ले
वळित =मागे वळून येणे पक्षी
(अशी घनदाट झाडी)
नागवला कीं ?=तो
लुटला जाईल का
तैसें वृद्धाप्य होये, आलेपण तें वायां जाये,
जे तो शतवृद्ध आहे, नेणों कैंचा ॥ ५८५ ॥
शतवृद्ध=बुद्धिमान ज्ञानी
झाडिलींचि कोळें झाडी, तया न फळे जेवीं बोंडीं,
जाहला अग्नि तरी राखोंडी,
जाळील काई ? ॥ ५८६ ॥
कोळें=तीळ काढलेले झाड
म्हणौनि वार्धक्याचेनि आठवें,
वार्धक्या जो नागवे,
तयाच्या ठायीं जाणावें, ज्ञान आहे ॥ ५८७ ॥
तैसेंचि नाना रोग, पडिघाती ना जंव पुढां
आंग,
तंव आरोग्याचे उपेग, करूनि घाली ॥ ५८८ ॥
पडिघाती=प्राप्त होणे
सापाच्या तोंडी, पडली जे उंडी,
ते लाऊनि सांडी, प्रबुद्धु जैसा ॥ ५८९ ॥
लाऊनि=जाणून सांडी=सोडणे
तैसा वियोगें जेणें दुःखे,
विपत्ति शोक पोखे,
तें स्नेह सांडूनि सुखें,
उदासु होय ॥ ५९० ॥
आणि जेणें जेणें कडे, दोष सूतील तोंडें,
तयां कर्मरंध्री गुंडे, नियमाचे दाटी ॥ ५९१ ॥
गुंडे,=गोळा,
धोंडे
ऐस{ऐ}सिया आइती, जयाची परी असती,
तोचि ज्ञानसंपत्ती-, गोसावी गा ॥ ५९२ ॥
आइती=वर्तन तयारी
आतां आणीकही एक, लक्षण अलौकिक,
सांगेन आइक, धनंजया ॥ ५९३ ॥
by डॉ. विक्रांत तिकोणे