ज्ञानेश्वरी / अध्याय
तेरावा / संत ज्ञानेश्वर
ओवी ४६१ ते ५१२ (शुचित्व स्थैर्य आत्मनिग्रह )
परिसा परिसा श्रीकृष्णु, जो भूतभारसहिष्णु,
तो बोलतसे विष्णु, पार्थु ऐके ॥ ४६१ ॥
म्हणे शुचित्व गा ऐसें, जयापाशीं दिसे,
आंग मन जैसें, कापुराचें ॥ ४६२ ॥
कां रत्नाचें दळवाडें, तैसें सबाह्य चोखडें,
आंत बाहेरि एकें पाडें, सूर्यु जैसा ॥ ४६३ ॥
बाहेरीं कर्में क्षाळला, भितरीं ज्ञानें उजळला,
इहीं दोहीं परीं आला, पाखाळा एका ॥ ४६४ ॥
पाखाळा=शुद्धी
मृत्तिका आणि जळें, बाह्य येणें मेळें,
निर्मळु होय बोलें, वेदाचेनी ॥ ४६५ ॥
भलतेथ बुद्धीबळी, रजआरिसा उजळी,
सौंदणी फेडी थिगळी, वस्त्रांचिया ॥ ४६६ ॥
सौंदणी =परीटाचे कपडे धुण्याचे भांडे
थिगळी=डाग
किंबहुना इयापरी, बाह्य चोख अवधारीं,
आणि ज्ञानदीपु अंतरीं, म्हणौनि शुद्ध ॥ ४६७ ॥
एऱ्हवीं तरी पंडुसुता, आंत शुद्ध नसतां,
बाहेरि कर्म तो तत्त्वतां, विटंबु गा ॥ ४६८ ॥
मृत जैसा शृंगारिला, गाढव तीर्थीं न्हाणिला,
कडुदुधिया माखिला, गुळें जैसा ॥ ४६९ ॥
वोस गृहीं तोरण बांधिलें, कां उपवासी अन्नें लिंपिलें,
कुंकुमसेंदुर केलें, कांतहीनेनें ॥ ४७० ॥
लिंपिलें,=वाढले
कळस ढिमाचे पोकळ, जळो वरील तें झळाळ,
काय करूं चित्रींव फळ, आंतु शेण ॥ ४७१ ॥
ढिमाचे=मुलामा बेगड चित्रींव=खोटे (चितारलेले)
तैसें कर्म वरिचिलेंकडां, न सरे थोर मोलें कुडा,
नव्हे मदिरेचा घडा, पवित्र गंगे ॥ ४७२ ॥
न सरे =सर न येणे थोर मोलें=मोठी किंमत असून
कुडा,= कचरा
म्हणौनि अंतरीं ज्ञान व्हावें, मग बाह्य लाभेल स्वभावें,
वरी ज्ञान कर्में संभवे, ऐसें कें जोडे ? ॥ ४७३ ॥
कें जोडे =कसे शक्य
यालागी बाह्य विभागु, कर्में धुतला चांगु,
आणि ज्ञानें फिटला वंगु, अंतरींचा ॥ ४७४ ॥
वंगु=मळ डाग व्यंग
तेथ अंतर बाह्य गेले, निर्मळत्व एक जाहलें,
किंबहुना उरलें, शुचित्वचि ॥ ४७५ ॥
म्हणौनि सद्भाव जीवगत, बाहेरी दिसती फांकत,
जे स्फटिकगृहींचे डोलत, दीप जैसे ॥ ४७६ ॥
विकल्प जेणें उपजे, नाथिली विकृति निपजे,
अप्रवृत्तीचीं बीजें, अंकुर घेती ॥ ४७७ ॥
तें आइके देखे अथवा भेटे, परी मनीं कांहींचि नुमटे,
मेघरंगें न कांटे, व्योम जैसें ॥ ४७८ ॥
कांटे=मळणे, रंग लागणे
एऱ्हवीं इंद्रियांचेनि मेळें, विषयांवरी तरी लोळे,
परी विकाराचेनि विटाळें, लिंपिजेना ॥ ४७९ ॥
भेटलिया वाटेवरी, चोखी आणि माहारी,
तेथ नातळें तियापरी, राहाटों जाणें ॥ ४८० ॥
नातळें=पाहणे थांबणे
कां पतिपुत्रांतें आलिंगी, एकचि ते तरुणांगी,
तेथ पुत्रभावाच्या आंगीं, न रिगे कामु ॥ ४८१ ॥
तैसें हृदय चोख, संकल्पविकल्पीं सनोळख,
कृत्याकृत्य विशेख, फुडें जाणें ॥ ४८२ ॥
फुडें=चांगले नीट
पाणियें हिरा न भिजे, आधणीं हरळु न शिजे,
तैसी विकल्पजातें न लिंपिजे, मनोवृत्ती ॥ ४८३ ॥
तया नांव शुचिपण, पार्था गा संपूर्ण,
हें देखसी तेथ जाण, ज्ञान असे ॥ ४८४ ॥
आणि स्थिरता साचें, घर रिगाली जयाचें,
तो पुरुष ज्ञानाचें, आयुष्य गा ॥ ४८५ ॥
देह तरी वरिचिलीकडे, आपुलिया परी हिंडे,
परी बैसका न मोडे, मानसींची ॥ ४८६ ॥
वत्सावरूनि धेनूचें, स्नेह राना न वचे,
नव्हती भोग सतियेचे, प्रेमभोग ॥ ४८७ ॥
कां लोभिया दूर जाये, परी जीव ठेविलाचि ठाये,
तैसा देहो चाळितां नव्हे, चळु चित्ता ॥ ४८८ ॥
जातया अभ्रासवें, जैसें आकाश न धांवे,
भ्रमणचक्रीं न भंवे, ध्रुव जैसा ॥ ४८९ ॥
भ्रमणचक्रीं=नक्षत्र भ्रमण
पांथिकाचिया येरझारा, सवें पंथु न वचे धनुर्धरा,
कां नाहीं जेवीं तरुवरा, येणें जाणें ॥ ४९० ॥
तैसा चळणवळणात्मकीं, असोनि ये पांचभौतिकीं,
भूतोर्मी एकी, चळिजेना ॥ ४९१ ॥
भूतोर्मी=मनुष्याचे विकार
वाहुटळीचेनि बळें, पृथ्वी जैसी न ढळे,
तैसा उपद्रव उमाळें, न लोटे जो ॥ ४९२ ॥
दैन्यदुःखीं न तपे, भवशोकीं न कंपे,
देहमृत्यु न वासिपे, पातलेनी ॥ ४९३ ॥
वासिपे=घाबरणे
आर्ति आशा पडिभरें, वय व्याधी गजरें,
उजू असतां पाठिमोरें, नव्हे चित्त ॥ ४९४ ॥
पडिभरें=भराने आवेशे
निंदा निस्तेज दंडी, कामलोभा वरपडी,
परी रोमा नव्हे वांकुडी, मानसाची ॥ ४९५ ॥
दंडी=त्रासणे वरपडी=प्रप्त होणे
आकाश हें वोसरो, पृथ्वी वरि विरो,
परि नेणे मोहरों, चित्तवृत्ती ॥ ४९६ ॥
मोहरों=मोहरणे (इथे
बदलणे)
हाती हाला फुलीं, पासवणा जेवीं न घाली,
तैसा न लोटे दुर्वाक्यशेलीं, शेलिला सांता ॥ ४९७ ॥
हाती=हत्ती हाला=मारणे
पासवणा=माघार शेलिला=वाईट बोलांनी बोलणे
क्षीरार्णवाचिया कल्लोळीं, कंपु नाहीं मंदराचळीं,
कां आकाश न जळे जाळीं, वणवियाच्या ॥ ४९८ ॥
तैशा आल्या गेल्या ऊर्मी, नव्हे गजबज मनोधर्मीं,
किंबहुना धैर्य क्षमी, कल्पांतींही ॥ ४९९ ॥
परी स्थैर्य ऐसी भाष, बोलिजे जे सविशेष,
ते हे दशा गा देख, देखणया ॥ ५०० ॥
हें स्थैर्य निधडें, जेथ आंगें जीवें जोडे,
तें ज्ञानाचें उघडें, निधान साचें ॥ ५०१ ॥
आणि इसाळु जैसा घरा, कां दंदिया हतियेरा, ||
न विसंबे भांडारा, बद्धकु जैसा ॥ ५०२ ॥
इसाळु =स्त्री आसक्त दंदिया=योद्धा
बद्धकु=लोभी
कां एकलौतिया बाळका-, वरि पडौनि ठाके अंबिका,
मधुविषीं मधुमक्षिका, लोभिणी जैसी ॥ ५०३ ॥
अर्जुना जो यापरी, अंतःकरण जतन करी,
नेदी उभें ठाकों द्वारीं, इंद्रियांच्या ॥ ५०४ ॥
म्हणे काम बागुल ऐकेल, हे आशा सियारी देखैल,
तरि जीवा टेंकैल, म्हणौनि बिहे ॥ ५०५ ॥
सियारी=हडळ
बाहेरी धीट जैसी, दाटुगा पति कळासी,
करी टेहणी तैसी, प्रवृत्तीसीं ॥ ५०६ ॥
कळासी =कोंडणे टेहणी=टेहळणी पहारा
सचेतनीं वाणेपणें (सतीचेनी वाणिपणे), देहासकट आटणें,
संयमावरीं करणें, बुझूनि घाली ॥ ५०७ ॥
वाणेपणें=कमीपणे
मनाच्या महाद्वारीं, प्रत्याहाराचिया ठाणांतरीं,
जो यम दम शरीरीं, जागवी उभे ॥ ५०८ ॥
ठाणांतरीं=पहाऱ्याची जागा
आधारीं नाभीं कंठीं, बंधत्रयाचीं घरटीं,
चंद्रसूर्य संपुटीं, सुये चित्त ॥ ५०९ ॥
संपुटीं=मिलन होते तिथे
(सुषुम्ना )
समाधीचे शेजेपासीं, बांधोनि घाली ध्यानासी,
चित्त चैतन्य समरसीं, आंतु रते ॥ ५१० ॥
अगा अंतःकरणनिग्रहो जो, तो हा हें जाणिजो,
हा आथी तेथ विजयो, ज्ञानाचा पैं ॥ ५११ ॥
जयाची आज्ञा आपण, शिरीं वाहे अंतःकरण,
मनुष्याकारें जाण, ज्ञानचि तो ॥ ५१२ ॥
https://dnyaneshwariabhyas.blogspot.in
सुंदर !
ReplyDelete