ज्ञानेश्वरी / अध्याय
तेरावा / संत ज्ञानेश्वर
५१३ ते ५३५ वैराग्य अनहंकार
इंद्रियार्थेषु वैराग्यमनहंकार एव च।
जन्ममृत्युजराव्याधिदुःखदोषानुदर्शनम् ॥ ८॥
आणि विषयांविखीं, वैराग्याची निकी,
पुरवणी मानसीं कीं, जिती आथी ॥ ५१३ ॥
निकी=चांगली पुरवणी=प्रवाह,सातत्य जिती=जागृत जिवंत
वमिलेया अन्ना, लाळ न घोंटी जेवीं रसना,
कां आंग न सूये आलिंगना, प्रेताचिया ॥ ५१४ ॥
विष खाणें नागवे, जळत घरीं न रिगवे,
व्याघ्रविवरां न वचवे, वस्ती जेवीं ॥ ५१५ ॥
धडाडीत लोहरसीं, उडी न घालवे जैसी,
न करवे उशी, अजगराची ॥ ५१६ ॥
अर्जुना तेणें पाडें, जयासी विषयवार्ता नावडे,
नेदी इंद्रियांचेनि तोंडें, कांहींच जावों ॥ ५१७ ॥
जयाचे मनीं आलस्य, देही अतिकार्श्य,
शमदमीं सौरस्य, जयासि गा ॥ ५१८ ॥
अतिकार्श्य= कृशता (निरिच्छा)
सौरस्य=आवड गोडी
तपोव्रतांचा मेळावा, जयाच्या ठायीं पांडवा,
युगांत जया गांवा-, आंतु येतां ॥ ५१९ ॥
तपोव्रतांचा मेळावा=(तो तप व्रते करतो म्हणून जसे की )
बहु योगाभ्यासीं हांव, विजनाकडे धांव,
न साहे जो नांव, संघाताचें ॥ ५२० ॥
संघाताचें=समुदाय वस्ती
नाराचांचीं आंथुरणें, पूयपंकीं लोळणें,
तैसें लेखी भोगणें, ऐहिकींचें ॥ ५२१ ॥
नाराचांचीं=बाणांच्या टोकावर
आणि स्वर्गातें मानसें, ऐकोनि मानी ऐसें,
कुहिलें पिशित जैसें, श्वानाचें कां ॥ ५२२ ॥
कुहिलें पिशित=कुजलेले मांस
तें हें विषयवैराग्य, जें आत्मलाभाचें सभाग्य,
येणें ब्रह्मानंदा योग्य, जीव होती ॥ ५२३ ॥
ऐसा उभयभोगीं त्रासु, देखसी जेथ बहुवसु,
तेथ जाण रहिवासु, ज्ञानाचा तूं ॥ ५२४ ॥
आणि सचाडाचिये परी, इष्टापूर्तें करी,
परी केलेंपण शरीरीं, वसों नेदी ॥ ५२५ ॥
सचाडा=फलपेक्षा
असणारा इष्टापूर्तें=इच्छा पुर्ती
वर्णाश्रमपोषकें, कर्में नित्यनैमित्तिकें,
तयामाजीं कांहीं न ठके, आचरतां ॥ ५२६ ॥
परि हें मियां केलें, कीं हें माझेनि सिद्धी गेलें,
ऐसें नाहीं ठेविलें, वासनेमाजीं ॥ ५२७ ॥
जैसें अवचितपणें, वायूसि सर्वत्र विचरणें,
कां निरभिमान उदैजणें, सूर्याचें जैसें ॥ ५२८ ॥
कां श्रुति स्वभावता बोले, गंगा काजेंविण चाले,
तैसें अवष्टंभहीन भलें, वर्तणें जयाचें ॥ ५२९ ॥
अवष्टंभ हीन =अहंकार गर्व हीन
ऋतुकाळीं तरी फळती, परी फळलों हें नेणती,
तयां वृक्षांचिये ऐसी वृत्ती, कर्मीं सदा ॥ ५३० ॥
एवं मनीं कर्मीं बोलीं, जेथ अहंकारा उखी जाहली,
एकावळीची काढिली, दोरी जैसी ॥ ५३१ ॥
उखी=लोप नाश एकावळीची=माळा
संबंधेंवीण जैसीं, अभ्रें असती आकाशीं,
देहीं कर्में तैसीं, जयासि गा ॥ ५३२ ॥
मद्यपाआंगींचें वस्त्र, लेपाहातींचें शस्त्र,
बैलावरी शास्त्र, बांधलें आहे ॥ ५३३ ॥
लेपाहातींचें= चित्र
तया पाडें देहीं, जया मी आहे हे सेचि नाहीं,
निरहंकारता पाहीं, तया नांव ॥ ५३४ ॥
हें संपूर्ण जेथें दिसे, तेथेंचि ज्ञान असे,
इयेविषीं अनारिसें, बोलों नये ॥ ५३५ ॥
by डॉ.
विक्रांत तिकोणे
****************************************
सुंदर.
ReplyDelete