Friday, July 22, 2016

ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा, ओव्या ३७५ ते ४२६



 

 

ज्ञानेश्वरी / अध्याय अकरावा / विश्वरूप दर्शन / संत ज्ञानेश्वर

ओव्या ३७५ ते ४२६


दंष्ट्राकरालानि च ते मुखानि दृष्ट्वैव कालानलसन्निभानि।
दिशो न जाने न लभे च शर्म प्रसीद देवेश जगन्निवास ॥ २५॥


पैं अखंड डोळ्यांपुढें, फुटलें जैसें महाभयाचें भांडें,
तैशीं तुझीं मुखें वितंडें, पसरलीं देखें ॥ ३७५ ॥

असो दांत दाढांची दाटी, न झांकवे मा दों दों वोठीं,
सैंघ प्रळयशस्त्रांचिया दाट कांटी, लागलिया जैशा ॥ ३७६ ॥
 
कांटी=कुंपण

जैसें तक्षका विष भरलें, हो कां जे काळरात्रीं भूत संचरलें,
कीं आग्नेयास्त्र परजिलें, वज्राग्नि जैसें ॥ ३७७ ॥

तैशीं तुझीं वक्त्रें प्रचंडें, वरि आवेश हा बाहेरी वोसंडे,
आले मरणरसाचे लोंढे, आम्हांवरी ॥ ३७८ ॥

संहारसमयींचा चंडानिळु, आणि महाकल्पांत प्रळयानळु,
या दोहीं जैं होय मेळु, तैं काय एक न जळे ? ॥ ३७९ ॥

तैसीं संहारकें तुझीं मुखें, देखोनि धीरु कां आम्हां पारुखे ?,
आतां भुललों मी दिशा न देखें, आपणपें नेणें ॥ ३८० ॥

मोटकें विश्वरूप डोळां देखिलें, आणि सुखाचें अवर्षण पडिलें,
आतां जापाणीं जापाणीं आपुलें, अस्ताव्यस्त हें ॥ ३८१ ॥
 
जापाणीं=आवरा

ऐसें करिसी म्हणौनि जरी जाणें, तरी हे गोष्टी सांगावीं कां मी म्हणें,
आतां एक वेळ वांचवी जी प्राणें, या स्वरूपप्रळयापासोनि ॥ ३८२ ॥

जरी तूं गोसावी आमुचा अनंता, तरी सुईं वोडण माझिया जीविता,
सांटवीं पसारा हा मागुता, महामारीचा ॥ ३८३ ॥
 
वोडण=कवच ,ढाल   सांटवीं=जमाकर

आइकें सकळ देवांचिया परदेवते, तुवां चैतन्यें गा विश्व वसतें,
तें विसरलासी हें उपरतें, संहारूं आदरिलें ॥ ३८४ ॥

म्हणौनि वेगीं प्रसन्न होईं देवराया, संहरीं संहरीं आपुली माया,
काढीं मातें महाभया-, पासोनियां ॥ ३८५ ॥

हा ठायवरी पुढतपुढतीं, तूंतें म्हणिजे बहुवा काकुळती,
ऐसा मी विश्वमूर्ती, भेडका जाहलों ॥ ३८६ ॥

जैं अमरावतीये आला धाडा, तैं म्यां एकलेनि केला उवेडा,
जो मी काळाचियाही तोंडा, वासिपु न धरीं ॥ ३८७ ॥
 
धाडा=धाड ,हल्ला उवेडा=पराजय वासिपु=भीती

परी तया आंतुल नव्हे हें देवा, एथ मृत्यूसही करूनि चढावा,
तुवां आमुचाचि घोटू भरावा, या सकळ विश्वेंसीं ॥ ३८८ ॥

कैसा नव्हता प्रळयाचा वेळु, गोखा तूंचि मिनलासि काळु,
बापुडा हा त्रिभुवनगोळु, अल्पायु जाहला ॥ ३८९ ॥
 
गोखा=मध्ये

अहा भाग्या विपरीता, विघ्न उठिलें शांत करितां,
कटाकटा विश्व गेलें आतां, तूं लागलासि ग्रासूं ॥ ३९० ॥

हें नव्हे मा रोकडें, सैंघ पसरूनियां तोंडें,
कवळितासि चहूंकडे, सैन्यें इयें ॥ ३९१ ॥

सैंघ =अनेक   रोकडें=स्पष्ट

अमी च त्वां धृतराष्ट्रस्य पुत्राः सर्वे सहैवावनिपालसङ्घैः।
भीष्मो द्रोणः सूतपुत्रस्तथाऽसौ सहास्मदीयैरपि योधमुख्यैः ॥ २६॥


नोहेति  हे कौरवकुळींचे वीर, आंधळिया धृतराष्ट्राचे कुमर,
हे गेले गेले सहपरिवार, तुझिया वदनीं ॥ ३९२ ॥

आणि जे जे यांचेनि सावायें, आले देशोदेशींचे राये,
तयांचें सांगावया जावों न लाहे, ऐसें सरकटित आहासी ॥ ३९३ ॥
 
न लाहे=न राहणे

मदमुखाचिया संघटा, घेत आहासि घटघटां,
आरणीं हन थाटा, देतासि मिठी ॥ ३९४ ॥
 
संघटा,=समूह आरणीं=रणी थाटा=समुदाय

जंत्रावरिचील मार, पदातींचे मोगर,
मुखाआंत भार, हारपताति मा ॥ ३९५ ॥
 
जंत्रावरिचील मार =तोफा वरील शिपाई  पदातींचे मोगर=पायदळ

कृतांताचिया जावळी, जें एकचि विश्वातें गिळी,
तियें कोटीवरी सगळीं, गिळितासि शस्त्रें ॥ ३९६ ॥
 
जावळी=जवळ सोबती

चतुरंगा परिवारा, संजोडियां रहंवरां,
दांत न लाविसी मा परमेश्वरा, कसा तुष्टलासि बरवा ॥ ३९७ ॥
 
रहंवरां-=रथ

हां गा भीष्मा ऐसा कवणु, सत्यशौर्यनिपुणु,
तोही आणि ब्राह्मण द्रोणु, ग्रासिलासि कटकटा ॥ ३९८ ॥
 
कटकटा=हायहाय

अहा सहस्रकराचा कुमरु, एथ गेला गेला कर्णवीरु,
आणि आमुचिया आघवयांचा केरु, फेडिला देखें ॥ ३९९ ॥
 
केरु=कस्पट

कटकटा धातया, कैसें जाहलें अनुग्रहा यया,
मियां प्रार्थूनि जगा बापुडिया, आणिलें मरण ॥ ४०० ॥

 कटकटा =अरेरे   धातया,=ब्रह्मदेवा

मागां थोडिया बहुवा उपपत्ती, येणें सांगितलिया विभूती,
तैसा नसेचि मा पुढती, बैसलों पुसों ॥ ४०१ ॥

म्हणौनि भोग्य तें त्रिशुद्धी न चुके, आणि बुद्धिही होणारासारिखी ठाके,
माझ्या कपाळीं पिटावें लोकें, तें लोटेल कांह्यां ॥ ४०२ ॥
 
कांह्यां=कसे

पूर्वीं अमृतही हातां आलें, परी देव नसतीचि उगले,
मग काळकूट उठविलें, शेवटीं जैसें ॥ ४०३ ॥
 
उगले=शांत राहणे

परी तें एकबगीं थोडें, केलिया प्रतिकारा माजिवडें,
आणि तिये अवसरीचें तें सांकडें, निस्तरविलें शंभू ॥ ४०४ ॥
 
एकबगीं=एकवेळ   माजिवडें,=मधले

आतां हा जळतां वारा कें वेंटाळे ?, कोणा हे विषा भरलें गगन गिळे ?,
महाकाळेंसि कें खेळें ?, आंगवत असे ॥ ४०५ ॥
 
आंगवत=अंगी लागणे

ऐसा अर्जुन दुःखें शिणतु, शोचित असे जिवाआंतु,
परी न देखें तो प्रस्तुतु, अभिप्राय देवाचा ॥ ४०६ ॥

जे मी मारिता हे कौरव मरते, ऐसेनि वेंटाळिला होता मोहें बहुतें,
तो फेडावयालागीं अनंतें, हें दाखविलें निज ॥ ४०७ ॥

अरे कोण्ही कोणातें न मारी, एथ मीचि हो सर्व संहारीं,
हें विश्वरूपव्याजें हरी, प्रकटित असे ॥ ४०८ ॥

परी वायांचि व्याकुलता, ते न चोजवेचि पंडुसुता,
मग अहा कंपु नव्हता, वाढवित असे ॥ ४०९ ॥

चोजवेचि=कळणे

वक्त्राणि ते त्वरमाणा विशन्ति दंष्ट्राकरालानि भयानकानि।
केचिद्विलग्ना दशनान्तरेषु संदृश्यन्ते चूर्णितैरुत्तमाङ्गैः ॥ २७॥


तेथ म्हणे पाहा हो एके वेळे, सासि कवचेंसि दोन्ही दळें,
वदनीं गेलीं आभाळें, गगनीं कां जैसीं ॥ ४१० ॥
सासि=तलवार

कां महाकल्पाचिया शेवटीं, जैं कृतांतु कोपला होय सृष्टी,
तैं एकविसांही स्वर्गां मिठी, पाताळासकट दे ॥ ४११ ॥

नातरी उदासीनें दैवें, संचकाचीं वैभवें,
जेथींचीं तेथ स्वभावें, विलया जाती ॥ ४१२ ॥

तैसीं सासिन्नलीं सैन्यें एकवटें, इये मुखीं जाहलीं प्रविष्टें,
परी एकही तोंडौनि न सुटे, कैसें कर्म देखा ॥ ४१३ ॥

अशोकाचे अंगवसे, चघळिले कऱ्हेनि जैसे,
लोक वक्त्रामाजीं तैसे, वायां गेले ॥ ४१४ ॥
 
अंगवसे=साल कऱ्हे=उंट

परि सिसाळें मुकुटेंसीं, पडिली दाढांचे सांडसीं,
पीठ होत कैसीं, दिसत आहाती ॥ ४१५ ॥

तियें रत्नें दांतांचिये सवडीं, कूट लागलें जिभेच्या बुडीं,
कांहीं कांहीं आगरडीं, द्रंष्ट्रांचीं माखलीं ॥ ४१६ ॥  

सवडीं=फट आगरडीं,=अग्रभाग पुढे

हो कां जे विश्वरूपें काळें, ग्रासिलीं लोकांचीं शरीरें बळें,
परि जीवित्व देहींचीं सिसाळें, अवश्य कीं राखिलीं ॥ ४१७ ॥
 
सिसाळें=डोकी

तैसीं शरीरामाजीं चोखडीं, इयें उत्तमांगें होतीं फुडीं,
म्हणौनि महाकाळाचियाही तोंडीं, परि उरलीं शेखीं ॥ ४१८ ॥

मग म्हणे हें काई, जन्मलयां आन मोहरचि नाहीं,
जग आपैसेंचि वदनडोहीं, संचारताहे ॥ ४१९ ॥
 
मोहरचि=दिशा मार्ग

यया आपेंआप आघविया सृष्टी, लागलिया आहाति वदनाच्या वाटीं,
आणि हा जेथिंचिया तेथ मिठी, देतसे उगला ॥ ४२० ॥
 
ब्रह्मादिक समस्त, उंचा मुखामाजीं धांवत,
येर सामान्य हे भरत, ऐलीच वदनीं ॥ ४२१ ॥

आणीकही भूतजात, तें उपजलेचि ठायीं ग्रासित,
परि याचिया मुखा निभ्रांत, न सुटेचि कांहीं ॥ ४२२ ॥


यथा नदीनाम् बहवोऽम्बुवेगाः समुद्रमेवाभिमुखा द्रवन्ति।
तथा तवामी नरलोकवीरा विशन्ति वक्त्राण्यभिविज्वलन्ति ॥ २८॥


जैसे महानदीचे वोघ, वहिले ठाकिती समुद्राचें आंग,
तैसें आघवाचिकडूनि जग, प्रवेशत मुखीं ॥ ४२३ ॥

आयुष्यपंथें प्राणिगणी, करोनि अहोरात्रांची मोवणी,
वेगें वक्त्रामिळणीं, साधिजत आहाती ॥ ४२४ ॥

मोवणी=पायऱ्या मोजणी

यथा प्रदीप्तं ज्वलनं पतङ्गा विशन्ति नाशाय समृद्धवेगाः।
तथैव नाशाय विशन्ति लोका स्तवापि वक्त्राणि समृद्धवेगाः ॥ २९॥


जळतया गिरीच्या गवखा-, माजीं घापती पतंगाचिया झाका,
तैसे समग्र लोक देखा, इये वदनीं पडती ॥ ४२५ ॥
 
झाका=उड्या     गवखा=पृष्ठ भाग

परि जेतुलें येथ प्रवेशलें, तें तातलिया लोहें पाणीचि पां गिळिलें,
वहवटींहि पुसिलें, नामरूप तयांचें ॥ ४२६ ॥

तातलिया=तापल्या


by विक्रांत प्रभाकर तिकोणे

1 comment: