ज्ञानेश्वरी / अध्याय अकरावा / विश्वरूप दर्शन / संत ज्ञानेश्वर
ओव्या ३०७ ते ३७४
त्वमक्षरं परमं वेदितव्यं त्वमस्य विश्वस्य परं निधानम्।
त्वमव्ययः शाश्वतधर्मगोप्ता सनातनस्त्वं पुरुषो मतो मे ॥ १८॥
देवा तूं अक्षर, औटाविये मात्रेसि पर,
श्रुती जयाचें घर, गिंवसीत आहाती ॥ ३०७ ॥
औटाविये=साडेतीन मात्रा
जें आकाराचें आयतन, जें विश्वनिक्षेपैकनिधान,
तें अव्यय तूं गहन, अविनाश जी ॥ ३०८ ॥
आयतन=घर
विश्वनिक्षेपैकनिधान=विश्व जिथे साठवले जाते ते स्थान
तूं धर्माचा वोलावा, अनादिसिद्ध तूं नित्य नवा,
जाणें मी सदतिसावा, पुरुष विशेष तूं ॥ ३०९ ॥
अनादिमध्यान्तमनन्तवीर्यं अनन्तबाहुं शशिसूर्यनेत्रम्।
पश्यामि त्वां दीप्तहुताशवक्त्रं स्वतेजसा विश्वमिदं तपन्तम् ॥ १९॥
तूं आदिमध्यांतरहितु, स्वसामर्थ्यें तूं अनंतु,
विश्वबाहु अपरिमितु, विश्वचरण तूं ॥ ३१० ॥
चंडांशु=सूर्य
जी एवंविधा तूंतें, मी देखतसें हें निरुतें,
पेटलें प्रळयाग्नीचें उजितें, तैसें वक्त्र हें तुझें ॥ ३१२ ॥
उजितें=प्रकाशमान
वणिवेनि पेटले पर्वत, कवळूनि ज्वाळांचे उभड उठत,
तैसी चाटीत दाढा दांत, जीभ लोळे ॥ ३१३ ॥
उभड=लोट
इये वदनींचिया उबा, आणि जी सर्वांगकांतीचिया प्रभा,
विश्व तातलें अति क्षोभा, जात आहे ॥ ३१४ ॥
तातलें=पीडित झाले
द्यावापृथिव्योरिदमन्तरं हि व्याप्तं त्वयैकेन दिशश्च सर्वाः।
दृष्ट्वाऽद्भुतं रूपमुग्रं तवेदं लोकत्रयं प्रव्यथितं महात्मन् ॥ २०॥
कां जे द्यौर्लोक आणि पाताळ, पृथिवी आणि अंतराळ,
अथवा दशदिशा समाकुळ, दिशाचक्र ॥ ३१५ ॥
द्यौर्लोक=स्वर्ग समाकुळ=सर्व दिशाचक्र=क्षितिजे
हें आघवेंचि तुंवा एकें, भरलें देखत आहे कौतुकें,
परि गगनाहीसकट भयानकें, आप्लविजे जेवीं ॥ ३१६ ॥
आप्लविजे=बुडवणे
नातरी अद्भुतरसाचिया कल्लोळीं, जाहली चवदाही भुवनांसि कडियाळीं,
तैसें आश्चर्यचि मग मी आकळीं, काय एक ? ॥ ३१७ ॥
कडियाळीं=वेष्टण
नावरे व्याप्ती हे असाधारण, न साहवे रूपाचें उग्रपण,
सुख दूरी गेलें परि प्राण, विपायें धरीजे ॥ ३१८ ॥
देवा ऐसें देखोनि तूंतें, नेणों कैसें आलें भयाचें भरितें,
आतां दुःखकल्लोळीं झळंबतें, तिन्हीं भुवनें ॥ ३१९ ॥
आतां दुःखकल्लोळीं झळंबतें, तिन्हीं भुवनें ॥ ३१९ ॥
झळंबतें=आदळे ,बुडणे
एऱ्हवीं तुज महात्मयाचें देखणें, तरि भयदुःखासि कां मेळवणें ?,
परि हें सुख नव्हेचि जेणें गुणें, तें जाणवत आहे मज ॥ ३२० ॥
जंव तुझें रूप नोहे दिठें, तंव जगासि संसारिक गोमटें,
आतां देखिलासि तरी विषयविटें, उपनला त्रासु ॥ ३२१ ॥
विषयविटें=विषयाचा विट
तेवींचि तुज देखिलियासाठीं, काय सहसा तुज देवों येईल मिठी,
आणि नेदीं तरी शोकसंकटीं, राहों केवीं ? ॥ ३२२ ॥
म्हणौनि मागां सरों तंव संसारु, आडवीत येतसे अनिवारु,
आणि पुढां तूं तंव अनावरु, न येसि घेवों ॥ ३२३ ॥
ऐसा माझारलिया सांकडां, बापुड्या त्रैलोक्याचा होतसे हुरडा,
हा ध्वनि जी फुडा, चोजवला मज ॥ ३२४ ॥
माझारलिया =मध्ये सांकडां = संकट हुरडा=चुरा
जैसा आरंबळला आगीं, तो समुद्रा ये निवावयालागीं,
तंव कल्लोळपाणियाचिया तरंगीं, आगळा बिहे ॥ ३२५ ॥
आरंबळला=पोळला
तैसें या जगासि जाहलें, तूंतें देखोनि तळमळित ठेलें,
यामाजीं पैल भले, ज्ञानशूरांचे मेळावे ॥ ३२६ ॥
अमी हि त्वां सुरसंघा विशन्ति केचिद्भीताः प्राञ्जलयो गृणन्ति।
स्वस्तीत्युक्त्वा महर्षिसिद्धसङ्घाः स्तुवन्ति त्वां सुतिभिः पुष्कलाभिः ॥ २१॥
हे तुझेनि आंगिकें तेजें, जाळूनि सर्व कर्मांचीं बीजें,
मिळत तुज आंतु सहजें, सद्भावेसीं ॥ ३२७ ॥
आणिक एक सावियाचि भयभीरु, सर्वस्वें धरूनि तुझी मोहरु,
तुज प्रार्थिताति करु, जोडोनियां ॥ ३२८ ॥
देवा अविद्यार्णवीं पडिलों, जी विषयवागुरें आंतुडलों,
स्वर्गसंसाराचिया सांकडलों, दोहीं भागीं ॥ ३२९ ॥
सांकडलों=संकटी पडलो
ऐसें आमुचें सोडवणें, तुजवांचोनि कीजेल कवणें ?,
तुज शरण गा सर्वप्राणें, म्हणत देवा ॥ ३३० ॥
आणि महर्षी अथवा सिद्ध, कां विद्याधरसमूह विविध,
हे बोलत तुज स्वस्तिवाद, करिती स्तवन ॥ ३३१ ॥
स्वस्तिवाद=शुभं भवतु
रुद्रादित्या वसवो ये च साध्या विश्वेऽश्विनौ मरुतश्चोश्मपाश्च।
गन्धर्वयक्षासुरसिद्धसङ्घा वीक्षन्ते त्वां विस्मिताश्चैव सर्वे ॥ २२॥
हे रुद्रादित्यांचे मेळावे, वसु हन साध्य आघवे,
अश्विनौ देव विश्वेदेव विभवें, वायुही हे जी ॥ ३३२ ॥
विभवें=ऐश्वर्य,संपत्ती
अवधारा पितर हन गंधर्व, पैल यक्षरक्षोगण सर्व,
जी महेंद्रमुख्य देव, कां सिद्धादिक ॥ ३३३ ॥
हे आघवेचि आपुलालिया लोकीं, सोत्कंठित अवलोकीं,
हे महामूर्ती दैविकी, पाहात आहाती ॥ ३३४ ॥
मग पाहात पाहात प्रतिक्षणीं, विस्मित होऊनि अंतःकरणीं,
करित निजमुकटीं वोवाळणी, प्रभुजी तुज ॥ ३३५ ॥
ते जय जय घोष कलरवें, स्वर्ग गाजविताती आघवे,
ठेवित ललाटावरी बरवे, करसंपुट ॥ ३३६ ॥
कलरवें=मोठा आवाज
तिये विनयद्रुमाचिये आरवीं, सुरवाडली सात्त्विकांची माधवी,
म्हणौनि करसंपुटपल्लवीं, तूं होतासि फळ ॥ ३३७ ॥
आरवीं=उद्यान करसंपुट =जोडलेल्या हातात पल्लवीं=पालवी
रूपं महत्ते बहुवक्त्रनेत्रं महाबाहो बहुबाहूरुपादम्।
बहूदरं बहुदंष्ट्राकरालं दृष्ट्वा लोकाः प्रव्यथितास्तथाऽहम् ॥ २३॥
जी लोचनां भाग्य उदेलें, मना सुखाचें सुयाणें पाहलें,
जे अगाध तुझें देखिलें, विश्वरूप इहीं ॥ ३३८ ॥
सुयाणें=सुकाळ
हें लोकत्रयव्यापक रूपडें, पाहतां देवांही वचक पडे,
याचें सन्मुखपण जोडें, भलतयाकडुनी ॥ ३३९ ॥
सन्मुखपण=सामोरपण
ऐसें एकचि परी विचित्रें, आणि भयानकें वक्त्रें,
बहुलोचन हे सशस्त्रें, अनंतभुजा ॥ ३४० ॥
अनंत चारु बाहु चरण, बहूदर आणि नानावर्ण,
कैसें प्रतिवदनीं मातलेपण, आवेशाचें ॥ ३४१ ॥
चारु=सुंदर
हो कां महाकल्पाचिया अंतीं, तवकलेनि यमें जेउततेउतीं,
प्रळयाग्नीचीं उजितीं, आंबुखिलीं जैसीं ॥ ३४२ ॥
तवकलेनि=कोपित जेउततेउतीं,=जिकडे तिकडे
उजिती=भडका ज्वाला आंबुखिलीं=व्यापणे
नातरी संहारत्रिपुरारीचीं यंत्रें, कीं प्रळयभैरवाचीं क्षेत्रें,
नाना युगांतशक्तीचीं पात्रें, भूतखिचा वोढविलीं ॥ ३४३ ॥
त्रिपुरारी=शंकर रुद्र क्षेत्रें,=ठिकाण पात्रें =ताट
भूतखिचा=भूतांचा भक्षण करण्या
तैसीं जियेतियेकडे, तुझीं वक्त्रें जीं प्रचंडें,
न समाती दरीमाजीं सिंव्हाडे, तैसे दशन दिसती रागीट ॥ ३४४ ॥
सिंव्हाडे=सिंह
जैसें काळरात्रीचेनि अंधारें, उल्हासत निघतीं संहारखेंचरें,
तैसिया वदनीं प्रळयरुधिरें, काटलिया दाढा ॥ ३४५ ॥
संहारखेंचरें=नाश करणारे वायुगामी भुते इत्यादी
काटलिया=माखल्या
हें असो काळें अवंतिलें रण, कां सर्व संहारें मातलें मरण,
तैसें अतिभिंगुळवाणेंपण, वदनीं तुझिये ॥ ३४६ ॥
अतिभिंगुळवाणेंपण=अति भयानक
हे बापुडी लोकसृष्टी, मोटकीये विपाइली दिठी,
आणि दुःखकालिंदीचिया तटीं, झाड होऊनि ठेली ॥ ३४७ ॥
मोटकीये=थोडी विपाइली दिठी=नजर टाकता
तुज महामृत्यूचिया सागरीं, आतां हे त्रैलोक्य जीविताची तरी,
शोकदुर्वातलहरी, आंदोळत असे ॥ ३४८ ॥
एथ कोपोनि जरी वैकुंठें, ऐसें हन म्हणिपैल अवचटें,
जें तुज लोकांचें काई वाटे ?, तूं ध्यानसुख हें भोगीं ॥ ३४९ ॥
वैकुंठें,=कृष्ण अवचटें=कदाचित
तरी जी लोकांचें कीर साधारण, वायां आड सूतसे वोडण,
केवीं सहसा म्हणे प्राण, माझेचि कांपती ॥ ३५० ॥
वोडण= पडदा
ज्या मज संहाररुद्र वासिपे, ज्या मजभेणें मृत्यु लपे,
तो मी एथें अहाळबाहळीं कांपें, ऐसें तुवां केलें ॥ ३५१ ॥
वासिपे=भितो अहाळबाहळीं=भीतीने थरथर
परि नवल बापा हे महामारी, इया नाम विश्वरूप जरी,
हे भ्यासुरपणें हारी, भयासि आणी ॥ ३५२ ॥
हारी=हरवतो
नभःस्पृशं दीप्तमनेकवर्णं व्यात्ताननं दीप्तविशालनेत्रम्।
दृष्ट्वा हि त्वां प्रव्यथितान्तरात्मा धृतिं न विन्दामि शमं च विष्णो ॥ २४॥
ठेलीं महाकाळेंसि हटेंतटें, तैसी किती{ए}कें मुखें रागिटें,
इहीं वाढोनियां धाकुटें, आकाश केलें ॥ ३५३ ॥
हटेंतटें=हल्ला
गगनाचेंनि वाडपणें नाकळे, त्रिभुवनींचियाही वारिया न वेंटाळे,
ययाचेनि वाफा आगी जळे, कैसें धडाडीत असे ॥ ३५४ ॥
तेवींचि एकसारिखें एक नोहे, एथ वर्णावर्णाचा भेदु आहे,
हो कां जें प्रळयीं सावावो लाहे, वन्ह्ं ययाचा ॥ ३५५ ॥
सावावो=मदत
जयाचिये आंगींची दीप्ती येवढी, जे त्रैलोक्य कीजे राखोंडी,
कीं तयाही तोंडें आणि तोंडीं, दांत दाढा ॥ ३५६ ॥
कैसा वारया धनुर्वात चढला, समुद्र कीं महापुरीं पडिला,
विषाग्नि मारा प्रवर्तला, वडवानळासी ॥ ३५७ ॥
हळाहळ आगी पियालें, नवल मरण मारा प्रवर्तलें,
तैसें संहारतेजा या जाहलें, वदन देखा ॥ ३५८ ॥
परी कोणें मानें विशाळ, जैसें तुटलिया अंतराळ,
आकाशासि कव्हळ, पडोनि ठेलें ॥ ३५९ ॥
कव्हळ=छिद्र खिंडार
नातरी काखे सूनि वसुंधरी, जैं हिरण्याक्षु रिगाला विवरीं,
तैं उघडले हाटकेश्वरीं, जेवीं पाताळकुहर ॥ ३६० ॥
हाटकेश्वरीं=सप्त पाताळाखालील शिवशंकराचे स्थान
पाताळकुहर=पाताळ गुहा
तैसा वक्त्रांचा विकाशु, माजीं जिव्हांचा आगळाचि आवेशु,
विश्व न पुरे म्हणौनि घांसु, न भरीचि कोंडें ॥ ३६१ ॥
आणि पाताळव्याळांचिया फूत्कारीं, गरळज्वाळा लागती अंबरीं,
तैसी पसरलिये वदनदरी-, माजीं हे जिव्हा ॥ ३६२ ॥
काढूनि प्रळयविजूंचीं जुंबाडें, जैसें पन्नासिलें गगनाचे हुडे,
तैसे आवाळुवांवरी आंकडे, धगधगीत दाढांचे ॥ ३६३ ॥
जुंबाडें=समूह पन्नासिलें=तयारी करणे हुडे=तट
आवाळुवांवरी=ओठावर
आणि ललाटपटाचिये खोळे, कैसें भयातें भेडविताती डोळे,
हो कां जे महामृत्यूचे उमाळे, कडवसां राहिले ॥ ३६४ ॥
खोळे =आवरण (येथे खोबणी) उमाळे=लोट भेडविताती=भिती दावणे
कडवसां=कडेला लागून आधाराने (भुवयात)
ऐसें वाऊनि भयाचें भोज, एथ काय निपजवूं पाहातोसि काज,
तें नेणों परी मज, मरणभय आलें ॥ ३६५ ॥
भोज=सोंग
देवा विश्वरूप पहावयाचे डोहळे, केले तिये पावलों प्रतिफळें,
बापा देखिलासि आतां डोळे, निवावे तैसे निवाले ॥ ३६६ ॥
अहो देहो पार्थिव कीर जाये, ययाची काकुळती कवणा आहे,
परि आतां चैतन्य माझें विपायें, वांचे कीं न वांचे ॥ ३६७ ॥
एऱ्हवीं भयास्तव आंग कांपे, नावेक आगळें तरी मन तापे,
अथवा बुद्धिही वासिपे, अभिमानु विसरिजे ॥ ३६८ ॥
वासिपे=भिणे
परी येतुलियाही वेगळा, जो केवळ आनंदैककळा,
तया अंतरात्मयाही निश्चळा, शियारी आली ॥ ३६९ ॥
शियारी=शहारे
बाप साक्षात्काराचा वेधु, कैसा देशधडी केला बोधु,
हा गुरुशिष्यसंबंधु, विपायें नांदे ॥ ३७० ॥
वेधु=प्रभाव
देवा तुझ्या ये दर्शनीं, जें वैकल्य उपजलें आहे अंतःकरणीं,
तें सावरावयालागीं गंवसणी, धैर्याची करितसें ॥ ३७१ ॥
वैकल्य=व्याकुळता
तंव माझेनि नामें धैर्य हारपलें, कीं तयाहीवरी विश्वरूपदर्शन जाहलें,
हें असो परि मज भलें आतुडविलें, उपदेशा इया ॥ ३७२ ॥
आतुडविलें=अडकवणे
जीव विसंवावयाचिया चाडा, सैंघ धांवाधांवी करितसे बापुडा,
परि सोयही कवणेंकडां, न लभे एथ ॥ ३७३ ॥
सैंघ =पुष्कळ कवणेंकडां=कुणाकडे
ऐसें विश्वरूपाचिया महामारी, जीवित्व गेलें आहें चराचरीं,
जी न बोलें तरि काय करीं, कैसेनि राहें ? ॥ ३७४ ॥
by
विक्रांत प्रभाकर तिकोणे
ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ
सुंदर !
ReplyDelete