Sunday, June 5, 2016

ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा ओव्या ४४ ते ८८




ज्ञानेश्वरी / अध्याय अकरावा / विश्वरूप दर्शन / संत ज्ञानेश्वर

ओव्या ४४ ते ८८ 


अर्जुन उवाच।
मदनुग्रहाय परमं गुह्यमध्यात्मसंज्ञितम्।
यत्वयोक्तं वचस्तेन मोहोऽयं विगतो मम ॥ १॥


मग पार्थु देवातें म्हणे, जी तुम्ही मजकारणें,
वाच्य केलें जें न बोलणें, कृपानिधे ॥ ४४ ॥

जैं महाभूतें ब्रह्मीं आटती, जीव महदादींचे ठाव फिटती,
तैं जें देव होऊनि ठाकती, तें विसवणें शेषींचें ॥ ४५ ॥
विसवणें=विश्रांती  महदादींचे=सांख्य तत्वज्ञानात उल्लेखलेले 

होतें हृदयाचिये परिवरीं, रोंविलें कृपणाचिये परी,
शब्दब्रह्मासही चोरी, जयाची केली ॥ ४६ ॥

शब्दब्रह्मा-=वेद

तें तुम्हीं आजि आपुलें, मजपुढां हियें फोडिलें,
जया अध्यात्मा वोवाळिलें, ऐश्वर्य हरें ॥ ४७ ॥
हरें=शंकराने

ते वस्तु मज स्वामी, एकिहेळां दिधली तुम्ही,
हें बोलों तरी आम्ही, तुज पावोनि कैंचे ॥ ४८ ॥
एकिहेळां=एकाएकी

परी साचचि महामोहाचिये पुरीं, बुडालेया देखोनि सीसवरी,
तुवां आपणपें घालोनि श्रीहरी, मग काढिलें मातें ॥ ४९ ॥

एक तूंवांचूनि कांहीं, विश्वीं दुजियाची भाष नाहीं,
कीं आमुचें कर्म पाहीं, जे आम्हीं आथी म्हणों ॥ ५० ॥
आथी=आहोत

मी जगीं एक अर्जुनु, ऐसा देहीं वाहे अभिमानु,
आणि कौरवांतें इयां स्वजनु, आपुलें म्हणें ॥ ५१ ॥

याहीवरी यांतें मी मारीन, म्हणें तेणें पापें कें रिगेन,
ऐसें देखत होतों दुःस्वप्न, तों चेवविला प्रभु ॥ ५२ ॥
चेवविला=जागे केले

देवा गंधर्वनगरीची वस्ती, सोडूनि निघालों लक्ष्मीपती,
होतों उदकाचिया आर्ती, रोहिणी पीत ॥ ५३ ॥
गंधर्वनगरीची = भासमान शहर    रोहिणी=मृगजळ

जी किरडूं तरी कापडाचें, परी लहरी येत होतिया साचें,
ऐसें वायां मरतया जीवाचें, श्रेय तुवां घेतलें ॥ ५४ ॥
किरडूं=साप    साचें= खऱ्या

आपुलें प्रतिबिंब नेणता, सिंह कुहां घालील देखोनि आतां,
ऐसा धरिजे तेवीं अनंता, राखिलें मातें ॥ ५५ ॥
कुहां=विहीर

एऱ्हवीं माझा तरी येतुलेवरी, एथ निश्चय होता अवधारीं,
जें आतांचि सातांही सागरीं, एकत्र मिळिजे ॥ ५६ ॥

हें जगचि आघवें बुडावें, वरी आकाशहि तुटोनि पडावें,
परी झुंजणें न घडावें, गोत्रजेशीं मज ॥ ५७ ॥

ऐसिया अहंकाराचिये वाढी, मियां आग्रहजळीं दिधली होती बुडी,
चांगचि तूं जवळां एऱ्हवीं काढी, कवणु मातें ॥ ५८ ॥

नाथिलें आपण पां एक मानिलें, आणि नव्हतया नाम गोत्र ठेविलें,
थोर पिसें होतें लागलें, परि राखिलें तुम्ही ॥ ५९ ॥
नाथिलें-नसून

मागां जळत काढिलें जोहरीं, तैं तें देहासीच भय अवधारीं,
आतां हे जोहरवाहर दुसरी, चैतन्यासकट ॥ ६० ॥
जोहरीं=आग   जोहरवाहर=संकट पिडा

दुराग्रह हिरण्याक्षें, माझी बुद्धि वसुंधरा सूदली काखे,
मग माहार्णव गवाक्षें, रिघोनि ठेला ॥ ६१ ॥
सूदली=सरकावून ठेवून गवाक्षें=भुयार खिडकी

तेथ तुझेनि गोसावीपणें, एकवेळ बुद्धीचिया ठाया येणें,
हें दुसरें वराह होणें, पडिलें तुज ॥ ६२ ॥

ऐसें अपार तुझें केलें, एकी वाचा काय मी बोलें,
परी पांचही पालव मोकलिले, मजप्रती ॥ ६३ ॥
पालव=प्राण पदर मोकलिले=स्वाधीन केले

तें कांहीं न वचेचि वायां, भलें यश फावलें देवराया,
जे साद्यंत माया, निरसिली माझी ॥ ६४ ॥
न वचेचि = न गेले  साद्यंत=पूर्ण

आजीं आनंदसरोवरींचीं कमळें, तैसे हे तुझे डोळे,
आपुलिया प्रसादाचीं राउळें, जयालागीं करिती ॥ ६५ ॥
राउळें=घर (वर्षाव )

हां हो तयाही आणि मोहाची भेटी, हे कायसी पाबळी गोठी ?,
केउती मृगजळाची वृष्टी, वडवानळेंसीं ? ॥ ६६ ॥
पाबळी=दुबळी हीन

आणि मी तंव दातारा, ये कृपेचिये रिघोनि गाभारां,
घेत आहें चारा, ब्रह्मरसाचा ॥ ६७ ॥

तेणें माझा जी मोह जाये, एथ विस्मो कांहीं आहे ?,
तरी उद्धरलों कीं तुझे पाये, शिवतले आहाती ॥ ६८ ॥


भवाप्ययौ हि भूतानां श्रुतौ विस्तरशो मया।
त्वत्तः कमलपत्राक्ष माहात्म्यमपि चाव्ययम् ॥ २॥


पैं कमलायतडोळसा, सूर्यकोटितेजसा,
मियां तुजपासोनि महेशा, परिसिलें आजीं ॥ ६९ ॥

इयें भूतें जयापरी होती, अथवा लया हन जैसेनि जाती,
ते मजपुढां प्रकृती, विवंचिली देवें ॥ ७० ॥

आणि प्रकृती कीर उगाणा दिधला, वरि पुरुषाचाही ठावो दाविला,
जयाचा महिमा पांघरोनि जाहला, धडौता वेदु ॥ ७१ ॥
उगाणा=मोजमाप    धडौता=वस्त्र पांघरले,सुवेष

जी शब्दराशी वाढे जिये, कां धर्मा{}शिया रत्नांतें विये,
ते एथिंचे प्रभेचे पाये, वोळगे म्हणौनि ॥ ७२
प्रभेचे = तेजाचे  वोळगे=सेवा करणे

ऐसें अगाध माहात्म्य, जें सकळमार्गैकगम्य,
जें स्वात्मानुभवरम्य, तें इयापरी दाविलें ॥ ७३ ॥

जैसा केरु फिटलिया आभाळीं, दिठी रिगे सूर्यमंडळीं,
कां हातें सारूनि बाबुळीं, जळ देखिजे ॥ ७४ ॥
केरु =ढग  बाबुळीं=शेवाळ

नातरी उकलतया सापाचे वेढे, जैसें चंदना खेंव देणें घडे,
अथवा विवसी पळे मग चढे, निधान हातां ॥ ७५ ॥
विवसी=भूत हडळ    निधान=गुप्त धन

तैसी प्रकृती हे आड होती, ते देवेंचि सारोनि परौती,
मग परतत्त्व माझिये मती, शेजार केलें ॥ ७६ ॥

म्हणौनि इयेविषयींचा मज देवा, भरंवसा कीर जाहला जीवा,
परी आणीक एक हेवा, उपनला असे ॥ ७७ ॥

तो भिडां जरी म्हणों राहों, तरी आना कवणा पुसों जावों,
काय तुजवांचोनि ठावो, जाणत आहों आम्ही ? ॥ ७८ ॥

जळचरु जळाचा आभारु धरी, बाळक स्तनपानीं उपरोधु करी,
तरी तया जिणया श्रीहरी, आन उपायो असे ? ७९
आभारु= संकोच   

म्हणौनि भीड सांकडी न धरवे, जीवा आवडे तेंही तुजपुढां बोलावें,
तंव राहें म्हणितलें देवें, चाड सांगैं ॥ ८० ॥

सांकडी=कठीण

एवमेतद्यथाऽऽत्थ त्वमात्मानं परमेश्वर।
द्रष्टुमिच्छामि ते रूपमैश्वरं पुरुषोत्तम ॥ ३॥


मग बोलिला तो किरीटी, म्हणे तुम्हीं केली जे गोठी,
तिया प्रतीतीची दिठी, निवाली माझी ॥ ८१ ॥
प्रतीतीची=अनुभती

आतां जयाचेनि संकल्पें, हे लोकपरंपरा होय हारपे,
जया ठायातें आपणपें, मी ऐसें म्हणसी ॥ ८२ ॥

तें मुद्दल रूप तुझें, जेथूनि इयें द्विभुजें हन चतुर्भुजें,
सुरकार्याचेनि व्याजें, घेवों घेवों येसी ॥ ८३ ॥

पैं जळशयनाचिया अवगणिया, कां मत्स्य कूर्म इया मिरवणिया,
खेळु सरलिया तूं गुणिया, सांठविसी जेथ ॥ ८४ ॥
जळशयनाचिया=जळात निजलेला (विष्णू)
अवगणिया=अगोदर पासून

उपनिषदें जें गाती, योगिये हृदयीं रिगोनि पाहाती,
जयातें सनकादिक आहाती, पोटाळुनियां ॥ ८५ ॥

ऐसें अगाध जें तुझें, विश्वरूप कानीं ऐकिजे,
तें देखावया चित्त माझें, उतावीळ देवा ॥ ८६ ॥

देवें फेडूनियां सांकड, लोभें पुसिली जरी चाड,
तरी हेंचि एकीं वाड, आर्तीं जी मज ॥ ८७ ॥
सांकड=भय

तुझें विश्वरूपपण आघवें, माझिये दिठीसि गोचर होआवें,
ऐसी थोर आस जीवें, बांधोनि आहें ॥ ८८ ॥



http://dnyaneshwariabhyas.blogspot.in/

by विक्रांत प्रभाकर तिकोणे
ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ

1 comment: