ज्ञानेश्वरी / अध्याय अकरावा / विश्वरूप दर्शन / संत ज्ञानेश्वर
ओव्या १
ते ४३
॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥
॥ अथ श्रीमद्भगवद्गीता ॥
। अथ एकादशोऽध्यायः - अध्याय अकरावा,।
। विश्वरूपदर्शनयोगः।
आतां यावरी एकादशीं, कथा आहे दोहीं रसीं,
येथ पार्था विश्वरूपेंसीं, होईल भेटी ॥ १ ॥
जेथ शांताचिया घरा, अद्भुत आला आहे पाहुणेरा,
आणि येरांही रसां पांतिकरां, जाहला मानु ॥ २ ॥
॥ अथ श्रीमद्भगवद्गीता ॥
। अथ एकादशोऽध्यायः - अध्याय अकरावा,।
। विश्वरूपदर्शनयोगः।
आतां यावरी एकादशीं, कथा आहे दोहीं रसीं,
येथ पार्था विश्वरूपेंसीं, होईल भेटी ॥ १ ॥
जेथ शांताचिया घरा, अद्भुत आला आहे पाहुणेरा,
आणि येरांही रसां पांतिकरां, जाहला मानु ॥ २ ॥
येरांही रसां = इतर रसांना पांतिकरां= पंगतीला
अहो वधुवरांचिये मिळणीं, जैशी वराडियां लुगडीं लेणीं,
तैसे देशियेच्या सुखासनीं, मिरविले रस ॥ ३ ॥
देशियेच्या=मराठीच्या
परी शांताद्भुत बरवे, जे डोळियांच्या अंजुळीं घ्यावें,
जैसे हरिहर प्रेमभावें, आले खेंवा ॥ ४ ॥
ना तरी अंवसेच्या दिवशीं, भेटलीं बिंबें दोनी जैशीं,
तेवीं एकवळा रसीं, केला एथ ॥ ५ ॥
मीनले गंगेयमुनेचे ओघ, तैसें रसां जाहलें प्रयाग,
म्हणौनि सुस्नात होत जग, आघवें एथ ॥ ६ ॥
माजीं गीता सरस्वती गुप्त, आणि दोनी रस ते ओघ मूर्त,
यालागीं त्रिवेणी हे उचित, फावली बापा ॥ ७ ॥
एथ श्रवणाचेनि द्वारें, तीर्थीं रिघतां सोपारें,
ज्ञानदेवो म्हणे दातारें, माझेनि केलें ॥ ८ ॥
सोपारें=सहज सोपे दातारें=निवृतीनाथ
तीरें संस्कृताचीं गहनें, तोडोनि मऱ्हाठियां शब्दसोपानें,
रचिली धर्मनिधानें, श्रीनिवृत्तिदेवें ॥ ९ ॥
गहनें=जंगल ,(कळायला कठीण) शब्दसोपानें=शब्दांचा जिना, पायऱ्या घाट
म्हणौनि भलतेणें एथ सद्भावें नाहावें, प्रयागमाधव विश्वरूप पहावें,
येतुलेनि संसारासि द्यावें, तिळोदक ॥ १० ॥
तिळोदक=पाणी सोडणे
हें असो ऐसें सावयव, एथ सासिन्नले आथी रसभाव,
तेथ श्रवणसुखाची राणीव, जोडली जगा ॥ ११ ॥
राणीव=वैभव
जेथ शांताद्भुत रोकडे, आणि येरां रसां पडप जोडे,
हें अल्पचि परी उघडें, कैवल्य एथ ॥ १२ ॥
रोकडे=स्पष्ट मुख्य पडप=प्रतिष्ठा
तो हा अकरावा अध्यायो, जो देवाचा आपणपें विसंवता ठावो,
परी अर्जुन सदैवांचा रावो, जो एथही पातला ॥ १३ ॥
विसंवता=विश्रांती
एथ अर्जुनचि काय म्हणों पातला, आजि आवडतयाही सुकाळु जाहला,
जे गीतार्थु हा आला, मऱ्हाठिये ॥ १४ ॥
आवडतयाही=ज कुणी हा अध्याय वाचेन त्याला
याचिलागीं माझें, विनविलें आइकिजे,
तरी अवधान दीजे, सज्जनीं तुम्ही ॥ १५ ॥
तेवींचि तुम्हां संतांचिये सभे, ऐसी सलगी कीर करूं न लभे,
परी मानावें जी तुम्ही लोभें, अपत्या मज ॥ १६ ॥
अहो पुंसा आपणचि पढविजे, मग पढे तरी माथा तुकिजे,
कां करविलेनि चोजें न रिझे, बाळका माय ॥ १७ ॥
पुंसा=पोपट माथा तुकिजे=मान डोलावी
तेवीं मी जें जें बोलें, तें प्रभु तुमचेंचि शिकविलें,
म्हणौनि अवधारिजो आपुलें, आपण देवा ॥ १८ ॥
हें सारस्वताचें गोड, तुम्हींचि लाविलें जी झाड,
तरी आतां अवधानामृतें वाड, सिंपोनि कीजे ॥ १९ ॥
वाड=मोठे
मग हें रसभाव फुलीं फुलेल, नानार्थ फळभारें फळा येईल,
तुमचेनि धर्में होईल, सुरवाडु जगा ॥ २० ॥
सुरवाडु=सुख
या बोला संत रिझले, म्हणती तोषलों गा भलें केलें,
आतां सांगैं जें बोलिलें, अर्जुनें तेथ ॥ २१ ॥
तंव निवृत्तिदास म्हणे, जी कृष्णार्जुनांचें बोलणें,
मी प्राकृत काय सांगों जाणें, परी सांगवा तुम्ही ॥ २२ ॥
अहो रानींचिया पालेखाइरा, नेवाणें करविले लंकेश्वरा,
एकला अर्जुन परी अक्षौहिणी अकरा, न जिणेचि काई ? ॥ २३ ॥
पालेखाइरा=माकड
नेवाणें=नष्ट जिणेचि=जिंकणे
म्हणौनि समर्थ जें जें करी, तें न हो न ये चराचरीं,
तुम्ही संत तयापरी, बोलवा मातें ॥ २४ ॥
न हो न ये = असो नसो पण ये
आतां बोलिजतसें आइका, हा गीताभाव निका,
जो वैकुंठनायका-, मुखौनि निघाला ॥ २५ ॥
बाप बाप ग्रंथ गीता, जो वेदीं प्रतिपाद्य देवता,
तो श्रीकृष्ण वक्ता, जिये ग्रंथीं ॥ २६ ॥
तेथिंचे गौरव कैसें वानावें, जें श्रीशंभूचिये मती नागवे,
तें आतां नमस्कारिजे जीवेंभावें, हेंचि भलें ॥ २७ ॥
नागवे,=सापडणे आकलन होणे
मग आइका तो किरीटी, घालूनि विश्वरूपीं दिठी,
पहिली कैसी गोठी, करिता जाहला ॥ २८ ॥
हें सर्वही सर्वेश्वरु, ऐसा प्रतीतिगत जो पतिकरु,
तो बाहेरी होआवा गोचरु, लोचनांसी ॥ २९ ॥
पतिकरु,=अनुभव
हे जिवाआंतुली चाड, परी देवासि सांगतां सांकड,
कां जें विश्वरूप गूढ, कैसेनि पुसावें ? ॥ ३० ॥
सांकड=संकट
म्हणे मागां कवणीं कहीं, जें पढियंतेनें पुसिलें नाहीं,
ते सहसा कैसें काई, सांगा म्हणों ? ॥ ३१ ॥
मी जरी सलगीचा चांगु, तरी काय आइसीहूनी अंतरंगु,
परी तेही हा प्रसंगु, बिहाली पुसों ॥ ३२ ॥
माझी आवडे तैसी सेवा जाहली, तरी काय होईल गरुडाचिया येतुली ?,
परी तोही हें बोली, करीचिना ॥ ३३ ॥
मी काय सनकादिकांहूनि जवळां, परी तयांही नागवेचि हा चाळा,
मी आवडेन काय प्रेमळां, गोकुळींचिया ऐसा ? ॥ ३४ ॥
तयांतेंही लेकुरपणें झकविलें, एकाचे गर्भवासही साहिले,
परी विश्वरूप हें राहविलें, न दावीच कवणा ॥ ३५ ॥
हा ठायवरी गुज, याचिये अंतरीचें हें निज,
केवीं उराउरी मज, पुसों ये पां ? ॥ ३६ ॥
उराउरी=लगेचच तडकाफडकी
आणि न पुसेंचि जरी म्हणे, तरी विश्वरूप देखिलियाविणें,
सुख नोहेचि परी जिणें, तेंही विपायें ॥ ३७ ॥
विपायें=व्यर्थ
म्हणौनि आतां पुसों अळुमाळसें, मग करूं देवा आवडे तैसें,
येणें प्रवर्तला साध्वसें, पार्थु बोलों ॥ ३८ ॥
अळुमाळसें=हळूच साध्वसें=भीतभीत
परी तेंचि ऐसेनि भावें, जें एका दों उत्तरांसवें,
दावी विश्वरूप आघवें, झाडा देउनी ॥ ३९ ॥
झाडा देउनी=उघड करून
अहो वांसरूं देखिलियाचिसाठीं, धेनु खडबडोनि मोहें उठी,
मग स्तनामुखाचिये भेटी, काय पान्हा धरे ? ॥ ४० ॥
पाहा पां तया पांडवाचेनि नांवें, जो कृष्ण रानींही प्रतिपाळूं धावे,
तयांतें अर्जुनें जंव पुसावें, तंव साहील काई ? ॥ ४१ ॥
तो सहजेंचि स्नेहाचें अवतरण, आणि येरु स्नेहा घातलें आहे माजवण,
ऐसिये मिळवणी वेगळेपण, उरे हेंचि बहु ॥ ४२ ॥
माजवण=उन्मादक पदार्थ
म्हणौनि अर्जुनाचिया बोलासरिसा, देव विश्वरूप होईल आपैसा,
तोचि पहिला प्रसंगु ऐसा, ऐकिजे तरी ॥ ४३ ॥
http://dnyaneshwariabhyas.blogspot.in/
ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ

सुंदर !
ReplyDelete