ज्ञानेश्वरी / अध्याय
तेरावा / संत ज्ञानेश्वर
ओवी १८५ ते २१६ (अमानित्व आणि अदंभ)
अमानित्वमदम्भित्वमहिंसा क्षान्तिरार्जवम्।
आचार्योपासनं शौचं स्थैर्यमात्मविनिग्रहः ॥ ७॥
तरी कवणेही विषयींचें, साम्य होणें न रुचे,
संभावितपणाचें, वोझे जया ॥ १८५ ॥
साम्य=एकरूपता
संभावितपणा =प्रतिष्ठा ,मोठेपण
आथिलेचि गुण वानितां, मान्यपणें मानितां,
योग्यतेचें येतां, रूप आंगा ॥ १८६ ॥
तैं गजबजों लागे कैसा, व्याधें रुंधला मृगु जैसा,
कां बाहीं तरतां वळसा, दाटला जेवीं ॥ १८७ ॥
रुंधला=रोधला
वळसा=भोवरा
पार्था तेणें पाडें, सन्मानें जो सांकडे,
गरिमेतें आंगाकडे, येवोंचि नेदी ॥ १८८ ॥
सांकडे=संकट गरिमेतें=मोठेपणा
पूज्यता डोळां न देखावी, स्वकीर्ती कानीं नायकावी,
हा अमुका ऐसी नोहावी, सेचि लोकां ॥ १८९ ॥
सेचि=आठवण
तेथ सत्काराची कें गोठी, कें आदरा देईल भेटी,
मरणेंसीं साटी, नमस्कारितां ॥ १९० ॥
साटी,=सारखे
वाचस्पतीचेनि पाडें, सर्वज्ञता तरी जोडे,
परी वेडिवेमाजीं दडे, महमे भेणें ॥ १९१ ॥
चातुर्य लपवी, महत्त्व हारवी,
पिसेपण मिरवी, आवडोनि ॥ १९२ ॥
पिसेपण =वेड
लौकिकाचा उद्वेगु, शास्त्रांवरी उबगु,
उगेपणीं चांगु, आथी भरु ॥ १९३ ॥
चांगु =चांगला आथी=असे
जगें अवज्ञाचि करावी, संबंधीं सोयचि न धरावी,
ऐसी ऐसी जीवीं, चाड बहु ॥ १९४ ॥
तळौटेपण बाणे, आंगीं हिणावो खेवणें,
तें तेंचि करणें, बहुतकरुनी ॥ १९५ ॥
तळौटेपण=नम्रता खेवणें=जडावाचे काम, कोंदण
हा जीतु ना नोहे, लोक कल्पी येणें भावें,
तैसें जिणें होआवें, ऐसी आशा ॥ १९६ ॥
हा जिवंत आहे ना
पै चालतु कां नोहे, कीं वारेनि जातु आहे,
जना ऐसा भ्रमु जाये, तैसें होईजे ॥ १९७ ॥
माझें असतेपण लोपो, नामरूप हारपो,
मज झणें वासिपो, भूतजात ॥ १९८ ॥
वासिपो=भिणे
ऐसीं जयाचीं नवसियें, जो नित्य एकांता जातु जाये,
नामेंचि जो जिये, विजनाचेनि ॥ १९९ ॥
विजन=वन
वायू आणि तया पडे, गगनेंसीं बोलों आवडे,
जीवें प्राणें झाडें, पढियंतीं जया ॥ २०० ॥
तया पडे=पटणे जमणे
किंबहुना ऐसीं, चिन्हें जया देखसी,
जाण तया ज्ञानेंसीं, शेज जाहली ॥ २०१ ॥
पैं अमानित्व पुरुषीं, तें जाणावें इहीं मिषीं,
आतां अदंभाचिया वोळखीसी, सौरसु देवों ॥ २०२ ॥
दंभ =खोटेपण ढोंगीपण
सौरसु=अभिप्राय
तरी अदंभित्व ऐसें, लोभियाचें मन जैसें,
जीवु जावो परी नुमसे, ठेविला ठावो ॥ २०३ ॥
नुमसे=न सांगणे
तयापरी किरीटी, पडिलाही प्राणसंकटीं,
तरी सुकृत न प्रकटी, आंगें बोलें ॥ २०४ ॥
सुकृत=पुण्य आंगें बोलें= स्वत:हून
खडाणें आला पान्हा, पळवी जेवीं अर्जुना,
कां लपवी पण्यांगना, वडिलपण ॥ २०५ ॥
खडाणें=पान्हा चोरणारी
गाय
पण्यांगना=वेश्या
आढ्यु आतुडे आडवीं, मग आढ्यता जेवीं हारवी,
नातरी कुळवधू लपवी, अवेवांतें ॥ २०६ ॥
आढ्यु=श्रीमंत आडवीं=जंगलात
नाना कृषीवळु आपुलें, पांघुरवी पेरिलें,
तैसें झांकी निपजलें, दानपुण्य ॥ २०७ ॥
वरिवरी देहो न पूजी, लोकांतें न रंजी,
स्वधर्मु वाग्ध्वजीं, बांधों नेणे ॥ २०८ ॥
वाग्ध्वजीं=वाणीरूपी ध्वजाने
मिरवत नाही
परोपकारु न बोले, न मिरवी अभ्यासिलें,
न शके विकूं जोडलें, स्फीतीसाठीं ॥ २०९ ॥
स्फीती=कीर्ती
शरीर भोगाकडे, पाहतां कृपणु आवडे,
एऱ्हवीं धर्मविषयीं थोडें, बहु न म्हणे ॥ २१० ॥
घरीं दिसे सांकड, देहींची आयती रोड,
परी दानीं जया होड, सुरतरूसीं ॥ २११ ॥
सांकड कठीण काळ संकट रोड,=हाडकुळा
होड=पैजा सुरतरूसीं=कल्पवृक्ष
किंबहुना स्वधर्मीं थोरु, अवसरीं उदारु,
आत्मचर्चे चतुरु, एऱ्हवी वेडा ॥ २१२ ॥
केळीचें दळवाडें, हळू पोकळ आवडे,
परी फळोनियां गाढें, रसाळ जैसें ॥ २१३ ॥
कां मेघांचें आंग झील, दिसे वारेनि जैसें जाईल,
परी वर्षती नवल, घनवट तें ॥ २१४ ॥
झील=हलके झिरझिरीत
तैसा जो पूर्णपणीं, पाहतां धाती आयणी,
एऱ्हवीं तरी वाणी, तोचि ठावो ॥ २१५ ॥
आयणी=चातुर्य बुद्धी
वाणी=कमतरता कंजूष
हें असो या चिन्हांचा, नटनाचु ठायीं जयाच्या,
जाण ज्ञान तयाच्या, हातां चढें ॥ २१६ ॥
नटनाचु=आधिक्य
================================
सुंदर !
ReplyDelete