ज्ञानेश्वरी अध्याय पहिला । ओवी ६ ते १० भावार्थ सहित
पदबंध नागर । तेंचि रंगाथिले अंबर ।जेथ साहित्य वाणें सपूर ।उजाळाचें ॥ ६ ॥
उत्तम प्रकारची शब्दरचना हेच त्या गणपतीच्या अंगावरील रंगवलेले वस्त्र आहे आणि त्या शब्दरचनेतील अलंकार हे त्या वस्त्राचे चमकदार तलम तंतु आहेत. ॥१-६॥
देखा काव्य नाटका । जे निर्धारितां सकौतुका ।त्याचि रुणझुणती क्षुद्रघंटिका । अर्थध्वनि ॥ ७ ॥
पहा, कौतुकाने काव्य- नाटकांविषयी विचार केला असता ती काव्य-नाटके त्या गणपतीच्या पायातील लहान घागर्या असून त्या अर्थरूप आवाजाने रुणझुणत असतात. ॥१-७॥
नाना प्रमेयांची परी । निपुणपणें पाहतां कुसरी ।दिसती उचित पदें माझारीं । रत्नें भलीं ॥ ८ ॥
कारण त्यात प्रतिपादलेली अनेक प्रकारची तत्वे व त्यातील कुशलता यांचा बारकाईने विचार केला असता यामधेही निवडक वेच्यांची काही विशेष रत्ने आढळतात. ॥१-८॥
तेथ व्यासादिकांच्या मतीं । तेचि मेखळा मिरवती ।चोखाळपणें झळकती । पल्लवसडका ॥ ९ ॥
येथे व्यासादिकांच्या बुद्धी हाच कोणी त्या गणपतीच्या कमरेला बांधलेला शेला शोभत आहे व त्याच्या पदराच्या दशा निर्दोषपणे झळकत आहेत. ॥१-९॥
देखा षड्दर्शनें म्हणिपती । तेची भुजांची आकृति ।म्हणौनि विसंवादे धरिती । आयुधें हातीं ॥ १० ॥
पहा, सहा शास्त्रे म्हणून जी म्हणतात तेच गणपतीचे सहा हात आहेत आणि म्हणून भिन्न भिन्न मते हीच त्याच्या हातातील शस्त्रे आहेत. ॥१-१०॥

No comments:
Post a Comment