ज्ञानेश्वरी / अध्याय अकरावा / विश्वरूप दर्शन / संत ज्ञानेश्वर
ओव्या ५३७ ते ५९९
सखेति मत्वा प्रसभं यदुक्तं हे कृष्ण हे यादव हे सखेति।
अजानता महिमानं तवेदं मया प्रमादात्प्रणयेन वापि ॥ ४१॥
परि ऐसिया तूतें स्वामी, कहींच नेणों जी आम्ही,
म्हणौनि सोयरे संबंधधर्मीं, राहाटलों तुजसीं ॥ ५३७ ॥
अहा थोर वाउर जाहलें, अमृतें संमार्जन म्यां केलें,
वारिकें घेऊनि दिधलें, कामधेनूतें ॥ ५३८ ॥
वाउर=वेडेपणा चूक वारिकें=घोडा
परिसाचा खडवाचि जोडला, कीं फोडोनि आम्ही गाडोरा घातला,
कल्पतरू तोडोनि केला, कूंप शेता ॥ ५३९ ॥
खडवाचि =खडक गाडोरा=इमारतीच्या
पायाचा भर
चिंतामणीची खाणी लागली, तेणें करें वोढाळें वोल्हांडिली,
तैसी तुझी जवळिक धाडिली, सांगातीपणें ॥ ५४० ॥
वोढाळें=ओढाळ गुरे वोल्हांडिली=हाकलायला
हें आजिचेंचि पाहें पां रोकडें, कवण झुंज हें केवढें,
एथ परब्रह्म तूं उघडें, सारथी केलासी ॥ ५४१ ॥
यया कौरवांचिया घरा, शिष्टाई धाडिलासि दातारा,
ऐसा वणिजेसाठीं जागेश्वरा, विकलासि आम्हीं ॥ ५४२ ॥
वणिजेसाठीं=सामान्य व्यवहार
तूं योगियांचें समाधिसुख, कैसा जाणेचिना मी मूर्ख,
उपरोधु जी सन्मुख, तुजसीं करूं ॥ ५४३ ॥
उपरोधु=चेष्टा सन्मुख=समोर
यच्चावहासार्थमसत्कृतोऽसि विहारशय्यासनभोजनेषु।
एकोऽथवाप्यच्युत तत्समक्षं तत्क्षामये त्वामहमप्रमेयम् ॥ ४२॥
तूं या विश्वाची अनादि आदी, बैससी जिये सभासदीं,
तेथें सोयरीकीचिया संबंधीं, रळीं बोलों ॥ ५४४ ॥
रळीं=थट्टा विनोद
विपायें राउळा येवों, तरि तुझेनि अंगें मानु पावों,
न मानिसी तरी जावों, रुसोनि सलगी ॥ ५४५ ॥
अंगें मानु=सन्मान मिळत असे
पायां लागोनि बुझावणी, तुझ्या ठायीं शारङ्गपाणी,
पाहिजे ऐशी करणी, बहु केली आम्हीं ॥ ५४६ ॥
बुझावणी=समजूत
सजणपणाचिया वाटा, तुजपुढें बैसें उफराटा,
हा पाडु काय वैकुंठा ?, परि चुकलों आम्हीं ॥ ५४७ ॥
सजणपणाचिया=सवंगडी म्हणून
देवेंसि कोलकाठी धरूं, आखाडा झोंबीलोंबी करूं,
सारी खेळतां आविष्करूं, निकरेंही भांडों ॥ ५४८ ॥
कोलकाठी=दांडपट्टा सारी=सारीपाट
आविष्करूं=धिक्कार करणे
चांग तें उराउरीं मागों, देवासि कीं बुद्धि सांगों,
तेवींचि म्हणों काय लागों, तुझें आम्ही ॥ ५४९ ॥
बुद्धि सांगों=उपदेश करणे
ऐसा अपराधु हा आहे, जो त्रिभुवनीं न समाये,
जी नेणतांचि कीं पाये, शिवतिले तुझे ॥ ५५० ॥
पाये=पायाने
देवो बोनयाच्या अवसरीं, लोभें कीर आठवण करी,
परी माझा निसुग गर्व अवधारीं, जे फुगूनचि बैसें ॥ ५५१ ॥
देवो बोनयाच्या अवसरीं, लोभें कीर आठवण करी,
परी माझा निसुग गर्व अवधारीं, जे फुगूनचि बैसें ॥ ५५१ ॥
बोनयाच्या=जेवण निसुग=निर्लज्ज
देवाचिया भोगायतनीं, खेळतां आशंकेना मनीं,
जी रिगोनियां शयनीं, सरिसा पहुडें ॥ ५५२ ॥
भोगायतनीं=अंत:पुरात
'कृष्ण म्हणौनि हाकारिजे, यादवपणें तूंतें लेखिजे,
आपली आण घालिजे, जातां तुज ॥ ५५३ ॥
मज एकासनीं बैसणें, कां तुझा बोलु न मानणें,
हें वोतटीचेनि दाटपणें, बहुत घडलें ॥ ५५४ ॥
वोतटीचेनि दाटपण=दाट परीचयामुळे
म्हणौनि काय काय आतां, निवेदिजेल अनंता,
मी राशि आहें समस्तां, अपराधांचि ॥ ५५५ ॥
यालागीं पुढां अथवा पाठीं, जियें राहटलों बहुवें वोखटीं,
तियें मायेचिया परी पोटीं, सामावीं प्रभो ॥ ५५६ ॥
वोखटीं=अनुचित
जी कोण्ही एके वेळे, सरिता घेऊन येती खडुळें,
तियें सामाविजेति सिंधुजळें, आन उपायो नाहीं ॥ ५५७ ॥
खडुळें=गढूळ पाणी
तैसी प्रीती कां प्रमादें, देवेंसीं मज विरुद्धें,
बोलविलीं तियें मुकुंदें, उपसाहावीं जी ॥ ५५८ ॥
उपसाहावीं=क्षमा करावे
आणि देवाचेनि क्षमत्वें क्षमा, आधारु जाली आहे या भूतग्रामा,
म्हणौनि जी पुरुषोत्तमा, विनवूं तें थोडें ॥ ५५९ ॥
तरी आतां अप्रमेया, मज शरणागता आपुलिया,
क्षमा कीजो जी यया, अपराधांसि ॥ ५६० ॥
पितासि लोकस्य चराचरस्य त्वमस्य पूज्यश्च गुरुर्गरीयान्।
न त्वत्समोऽस्त्यभ्यधिकः कुतोऽन्यो लोकत्रयेऽप्यप्रतिमप्रभावः ॥ ४३॥
जी जाणितलें मियां साचें, महिमान आतां देवाचें,
जे देवो होय चराचराचें, जन्मस्थान ॥ ५६१ ॥
हरिहरादि समस्तां, देवा तूं परम देवता,
वेदांतेंही पढविता, आदिगुरु तूं ॥ ५६२ ॥
गंभीर तूं श्रीरामा, नाना भूतैकसमा,
सकळगुणीं अप्रतिमा, अद्वितीया ॥ ५६३ ॥
तुजसी नाहीं सरिसें, हें प्रतिपादनचि कायसें ?,
तुवां जालेनि आकाशें, सामाविलें जग ॥ ५६४ ॥
तया तुझेनि पाडें दुजें, ऐसें बोलतांचि लाजिजे,
तेथ अधिकाची कीजे, गोठी केवीं ॥ ५६५ ॥
म्हणौनि त्रिभुवनीं तूं एकु, तुजसरिखा ना अधिकु,
तुझा महिमा अलौकिकु, नेणिजे वानूं ॥ ५६६ ॥
तस्मात् प्रणम्य प्रणिधाय कायं प्रसादये त्वामहमीशमीड्यम्।
पितेव पुत्रस्य सखेव सख्युः प्रियः प्रियायाऱसि देव सोढुम् ॥ ४४॥
ऐसें अर्जुनें म्हणितलें, मग पुढती दंडवत घातलें,
तेथें सात्त्विकाचें आलें, भरतें तया ॥ ५६७ ॥
मग म्हणतसे प्रसीद प्रसीद, वाचा होतसे सद्गद,
काढी जी अपराध-, समुद्रौनि मातें ॥ ५६८ ॥
तुज विश्वसुहृदातें कहीं, सोयरेपणें न मनूंचि पाहीं,
तुज विईश्वेश्वराचिया ठायीं, ऐश्वर्य केलें ॥ ५६९ ॥
तुज विईश्वेश्वराचिया ठायीं, ऐश्वर्य केलें ॥ ५६९ ॥
ऐश्वर्य केलें=मोठेपण दाविले
तूं वर्णनीय परी लोभें, मातें वर्णिसी पां सभे,
तरि मियां वल्गिजे क्षोभें, अधिकाधिक ॥ ५७० ॥
आतां ऐसिया अपराधां, मर्यादा नाहीं मुकुंदा,
म्हणौनि रक्ष रक्ष प्रमादा, पासोनियां ॥ ५७१ ॥
म्हणौनि रक्ष रक्ष प्रमादा, पासोनियां ॥ ५७१ ॥
जी हेंचि विनवावयालागीं, कैंची योग्यता माझिया आंगीं,
परी अपत्य जैसें सलगी, बापेंसीं बोले ॥ ५७२ ॥
पुत्राचे अपराध, जरी जाहले अगाध,
तरी पिता साहे निर्द्वंद्व, तैसें साहिजो जी ॥ ५७३ ॥
सख्याचें उद्धत, सखा साहे निवांत,
तैसें तुवां समस्त, साहिजो जी ॥ ५७४ ॥
प्रियाचिया ठायीं सन्मान, प्रिय न पाहें सर्वथा जाण,
तेवीं उच्छिष्ट काढिलें आपण, ते क्षमा कीजो जी ॥ ५७५ ॥
नातरी प्राणाचें सोयरें भेटे, मग जीवें भूतलीं जियें संकटें,
तियें निवेदितां न वाटे, संकोचु कांहीं ॥ ५७६ ॥
कां उखितें आंगें जीवें, आपणपें दिधलें जिया मनोभावें,
तिया कांतु मिनलिया न राहवें, हृदय जेवीं ॥ ५७७ ॥
तिया कांतु मिनलिया न राहवें, हृदय जेवीं ॥ ५७७ ॥
उखितें=संपूर्ण सर्वस्व
तयापरी जी मियां, हें विनविलें तुमतें गोसाविया,
आणि कांहीं एक म्हणावया, कारण असे ॥ ५७८ ॥
अदृष्टपूर्वं हृषितोऽस्मि दृष्ट्वा भयेन च प्रव्यथितं मनो मे।
तदेव मे दर्शय देव रूपं प्रसीद देवेश जगन्निवास ॥ ४५॥
तरी देवेंसीं सलगी केली, जे विश्वरूपाची आळी घेतली,
ते मायबापें पुरविली, स्नेहाळाचेनि ॥ ५७९ ॥
आळी=हट्ट ,छंद
सुरतरूंची झाडें, आंगणीं लावावीं कोडें,
देयावें कामधेनुचें पाडें, खेळावया ॥ ५८० ॥
मियां नक्षत्रीं डाव पाडावा, चंद्र चेंडुवालागीं आणावा,
हा छंदु सिद्धी नेला आघवा, माउलिये तुवां ॥ ५८१ ॥
जिया अमृतलेशालागीं सायास, तयाचा पाऊस केला चारी मास,
पृथ्वी वाहून चासेचास, चिंतामणी पेरिले ॥ ५८२ ॥
वाहून =नांगरून चासेचास =ओळीने वाफ्यात
ऐसा कृतकृत्य केला स्वामी, बहुवे लळा पाळिला तुम्हीं,
दाविलें जें हर ब्रह्मीं, नायकिजे कानीं ॥ ५८३ ॥
मा देखावयाची केउती गोठी, जयाची उपनिषदां नाहीं भेटी,
ते जिव्हारींची गांठी, मजलागीं सोडिली ॥ ५८४ ॥
जी कल्पादीलागोनि, आजिची घडी धरुनी,
माझीं जेतुलीं होवुनी, गेलीं जन्में ॥ ५८५ ॥
तयां आघवियांचि आंतु, घरडोळी घेऊनि असें पाहतु,
परि ही देखिली ऐकिली मातु, आतुडेचिना ॥ ५८६ ॥
घरडोळी=डोळ्यांनी धांडोळा घेवून आतुडेचिना=सापडेना
बुद्धीचें जाणणें, कहीं न वचेचि याचेनि आंगणें,
हे सादही अंतःकरणें, करवेचिना ॥ ५८७ ॥
सादही=कल्पना
तेथा डोळ्यां देखी होआवी, ही गोठीचि कायसया करावी,
किंबहुना पूर्वीं, दृष्ट ना श्रुत ॥ ५८८ ॥
तें हें विश्वरूप आपुलें, तुम्हीं मज डोळां दाविलें,
तरी माझें मन झालें, हृष्ट देवा ॥ ५८९ ॥
हृष्ट=हर्ष
परि आतां ऐसी चाड जीवीं, जे तुजसीं गोठी करावी,
जवळीक हे भोगावी, आलिंगावासी ॥ ५९० ॥
ते याचि रूपीं करूं म्हणिजे, तरि कोणे एके मुखेंसी चावळिजे,
आणि कवणा खेंव देईजे, तुज लेख नाहीं ॥ ५९१ ॥
चावळिजे=बोलावे खेंव =मिठी लेख=मर्यादा
म्हणौनि वारियासवें धावणें, न ठके गगना खेंव देणें,
जळकेली खेळणें, समुद्रीं केउतें ? ॥ ५९२ ॥
जळकेली-जलक्रीडा
यालागीं जी देवा, एथिंचें भय उपजतसे जीवा,
म्हणौनि येतुला लळा पाळावा, जे पुरे हें आतां ॥ ५९३ ॥
पैं चराचर विनोदें पाहिजे, मग तेणें सुखें घरीं राहिजे,
तैसें चतुर्भुज रूप तुझें, तो विसांवा आम्हां ॥ ५९४ ॥
आम्हीं योगजात अभ्यासावें, तेणें याचि अनुभवा यावें,
शास्त्रांतें आलोडावें, परि सिद्धांतु तो हाचि ॥ ५९५ ॥
आलोडावें=अभ्यासावे (चिंतन मनन)
आम्हीं यजनें किजती सकळें, परि तियें फळावीं येणेंचि फळें,
तीर्थें होतु सकळें, याचिलागीं ॥ ५९६ ॥
आणीकही कांहीं जें जें, दान पुण्य आम्हीं कीजे,
तया फळीं फळ तुझें, चतुर्भुज रूप ॥ ५९७ ॥
ऐसी तेथिंची जीवा आवडी, म्हणौनि तेंचि देखावया लवडसवडी,
वर्तत असे ते सांकडी, फेडीजे वेगीं ॥ ५९८ ॥
लवडसवडी=उत्कंठा सांकडी=संकट
अगा जीवींचें जाणतेया, सकळ विश्ववसवितेया,
प्रसन्न होईं पूजितया, देवांचिया देवा ॥ ५९९ ॥
by
विक्रांत प्रभाकर तिकोणे
ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ
सुंदर !
ReplyDelete