Tuesday, August 9, 2016

ज्ञानेश्वरी अध्याय १२ वा,ओव्या ८३ ते १६३




ज्ञानेश्वरी / अध्याय बारावा / संत ज्ञानेश्वर

ओव्या ८३ ते १६३
तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात्।
भवामि न चिरात्पार्थ मय्यावेशितचेतसाम् ॥ ७॥


किंबहुना धनुर्धरा, जो मातेचिया ये उदरा,
तो मातेचा सोयरा, केतुला पां ॥ ८३ ॥
सोयरा=प्रिय आवडता  केतुला पां =किती असतो

तेवीं मी तयां, जैसे असती तैसियां,
कळिकाळ नोकोनियां, घेतला पट्टा ॥ ८४ ॥

नोकोनियां,=भांडुन त्रास देवून   पट्टा= भार 

एऱ्हवीं तरी माझियां भक्तां, आणि संसाराची चिंता,
काय समर्थाची कांता, कोरान्न मागे ॥ ८५ ॥  

कोरान्न=कोरडी भिक्षा              

तैसे ते माझें, कलत्र हें जाणिजे,
कायिसेनिही न लजें, तयांचेनि मी ॥ ८६ ॥

कलत्र=कुटुंब, प्रेमपात्र

जन्ममृत्यूचिया लाटीं, झळंबती इया सृष्टी,
तें देखोनियां पोटीं, ऐसें जाहलें ॥ ८७ ॥

झळंबती=बुडतात

भवसिंधूचेनि माजें, कवणासि धाकु नुपजे,
तेथ जरी कीं माझे, बिहिती हन ॥ ८८ ॥

म्हणौनि गा पांडवा, मूर्तीचा मेळावा,
करूनि त्यांचिया गांवा, धांवतु आलों ॥ ८९ ॥

नामाचिया सहस्रवरी, नावा इया अवधारीं,
सजूनियां संसारीं, तारू जाहलों ॥ ९० ॥

तारू=नावाडी

सडे जे देखिले, ते ध्यानकासे लाविले,
परीग्रहीं घातले, तरियावरी ॥ ९१ ॥

परीग्रहीं=संसारी तरियावरी=होडीवर

प्रेमाची पेटी, बांधली एकाचिया पोटीं,
मग आणिले तटीं, सायुज्याचिया ॥ ९२ ॥

परी भक्तांचेनि नांवें, चतुष्पदादि आघवे,
वैकुंठींचिये राणिवे, योग्य केले ॥ ९३ ॥

म्हणौनि गा भक्तां, नाहीं एकही चिंता,
तयांतें समुद्धर्ता, आथि मी सदा ॥ ९४ ॥

समुद्धर्ता=पूर्ण उद्धार करणारा

आणि जेव्हांचि कां भक्तीं, दीधली आपुली चित्तवृत्ती,
तेव्हांचि मज सूति, त्यांचिये नाटीं ॥ ९५ ॥

सूति=लावतो घालतो   नाटीं=नादी

याकारणें गा भक्तराया, हा मंत्र तुवां धनंजया,
शिकिजे जै यया, मार्गा भजिजे ॥ ९६ ॥


मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय।
निवसिष्यसि मय्येव अत उर्ध्वं न संशयः ॥ ८॥


अगा मानस हें एक, माझ्या स्वरूपीं वृत्तिक,
करूनि घालीं निष्टंक, बुद्धि निश्चयेंसीं ॥ ९७ ॥

वृत्तिक=वतनदार

इयें दोनीं सरिसीं, मजमाजीं प्रेमेसीं,
रिगालीं तरी पावसी, मातें तूं गा ॥ ९८ ॥

जे मन बुद्धि इहीं, घर केलें माझ्यां ठायीं,
तरी सांगें मग काइ, मी तू ऐसें उरे ? ॥ ९९ ॥

म्हणौनि दीप पालवे, सवेंचि तेज मालवे,
कां रविबिंबासवें, प्रकाशु जाय ॥ १०० ॥

उचललेया प्राणासरिसीं, इंद्रियेंही निगती जैसीं,
तैसा मनोबुद्धिपाशीं, अहंकारु ये ॥ १०१ ॥

म्हणौनि माझिया स्वरूपीं, मनबुद्धि इयें निक्षेपीं,
येतुलेनि सर्वव्यापी, मीचि होसी ॥ १०२ ॥

यया बोला कांहीं, अनारिसें नाहीं,
आपली आण पाहीं, वाहतु असें गा ॥ १०३ ॥

अनारिसें=वेगळे

अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम्।
अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनन्जय ॥ ९॥


अथवा हें चित्त, मनबुद्धिसहित,
माझ्यां हातीं अचुंबित, न शकसी देवों ॥ १०४ ॥

तरी गा ऐसें करीं, यया आठां पाहारांमाझारीं,
मोटकें निमिषभरी, देतु जाय ॥ १०५ ॥

मोटकें=नेमके   निमिषभरी= क्षणभर

मग जें जें कां निमिख, देखेल माझें सुख,
तेतुलें अरोचक, विषयीं घेईल ॥ १०६ ॥

अरोचक=अरुची

जैसा शरत्कालु रिगे, आणि सरिता वोहटूं लागे,
तैसें चित्त काढेल वेगें, प्रपंचौनि ॥ १०७ ॥

मग पुनवेहूनि जैसें, शशिबिंब दिसेंदिसें,
हारपत अंवसे, नाहींचि होय ॥ १०८ ॥

तैसें भोगाआंतूनि निगतां, चित्त मजमाजीं रिगतां,
हळूहळू पंडुसुता, मीचि होईल ॥ १०९ ॥

अगा अभ्यासयोगु म्हणिजे, तो हा एकु जाणिजे,
येणें कांहीं न निपजे, ऐसें नाहीं ॥ ११० ॥

पैं अभ्यासाचेनि बळें, एकां गति अंतराळे,
व्याघ्र सर्प प्रांजळे, केले एकीं ॥ १११ ॥

विष कीं आहारीं पडे, समुद्रीं पायवाट जोडे,
एकीं वाग्ब्रह्म थोकडें, अभ्यासें केलें ॥ ११२ ॥

म्हणौनि अभ्यासासी कांहीं, सर्वथा दुष्कर नाहीं,
यालागी माझ्या ठायीं, अभ्यासें मीळ ॥ ११३ ॥


अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्मपरमो भव।
मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि ॥ १०॥


कां अभ्यासाही लागीं, कसु नाहीं तुझिया अंगीं,
तरी आहासी जया भागीं, तैसाचि आस ॥ ११४ ॥

इंद्रियें न कोंडीं, भोगातें न तोडीं,
अभिमानु न संडीं, स्वजातीचा ॥ ११५ ॥

कुळधर्मु चाळीं, विधिनिषेध पाळीं,
मग सुखें तुज सरळी, दिधली आहे ॥ ११६ ॥

सरळी=मोकळीक

परी मनें वाचा देहें, जैसा जो व्यापारु होये,
तो मी करीतु आहें, ऐसें न म्हणें ॥ ११७ ॥

करणें कां न करणें, हें आघवें तोचि जाणे,
विश्व चळतसे जेणें, परमात्मेनि ॥ ११८ ॥

उणयापुरेयाचें कांहीं, उरों नेदी आपुलिया ठायीं,
स्वजाती करूनि घेईं, जीवित्व हें ॥ ११९ ॥

 स्वजाती=सार्थक

माळियें जेउतें नेलें, तेउतें निवांतचि गेलें,
तया पाणिया ऐसें केलें, होआवें गा ॥ १२० ॥

म्हणौनि प्रवृत्ति आणि निवृत्ती, इयें वोझीं नेघे मती,
अखंड चित्तवृत्ती, माझ्या ठायीं ॥ १२१ ॥

एऱ्हवीं तरी सुभटा, उजू कां अव्हाटां,
रथु काई खटपटा, करितु असे ? ॥ १२२ ॥

उजू कां अव्हाटां,=सरळ का आडवाट

आणि जें जें कर्म निपजे, तें थोडें बहु न म्हणिजे,
निवांतचि अर्पिजे, माझ्यां ठायीं ॥ १२३ ॥

ऐसिया मद्भावना, तनुत्यागीं अर्जुना,
तूं सायुज्य सदना, माझिया येसी ॥ १२४ ॥


अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः।
सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान् ॥ ११॥


ना तरी हेंही तूज, नेदवे कर्म मज,
तरी तूं गा बुझ, पंडुकुमरा ॥ १२५ ॥
बुझ=समज

बुद्धीचिये पाठीं पोटीं, कर्माआदि कां शेवटीं,
मातें बांधणें किरीटी, दुवाड जरी ॥ १२६ ॥

दुवाड=कठीण

तरी हेंही असो, सांडीं माझा अतिसो,
परि संयतिसीं वसो, बुद्धि तुझी ॥ १२७ ॥

अतिसो=आग्रह संयतिसीं=संयमी

आणि जेणें जेणें वेळें, घडती कर्में सकळें,
तयांचीं तियें फळें, त्यजितु जाय ॥ १२८ ॥

वृक्ष कां वेली, लोटती फळें आलीं,
तैसीं सांडीं निपजलीं, कर्में सिद्धें ॥ १२९ ॥

परि मातें मनीं धरावें, कां मजौद्देशें करावें,
हें कांहीं नको आघवें, जाऊं दे शून्यीं ॥ १३० ॥

खडकीं जैसें वर्षलें, कां आगीमाजीं पेरिलें,
कर्म मानी देखिलें, स्वप्न जैसें ॥ १३१ ॥

अगा आत्मजेच्या विषीं, जीवु जैसा निरभिलाषी,
तैसा कर्मीं अशेषीं, निष्कामु होईं ॥ १३२ ॥

आत्मजेच्या=मुलगी

वन्हीची ज्वाळा जैसी, वायां जाय आकाशीं,
क्रिया जिरों दे तैसी, शून्यामाजी ॥ १३३ ॥

अर्जुना हा फलत्यागु, आवडे कीर असलगु,
परी योगामाजीं योगु, धुरेचा हा ॥ १३४ ॥

आवडे=वाटतो कीर=खरोखर  असलगु=सोपा ,
धुरेचा=अग्रणी मुख्य

येणें फलत्यागें सांडे, तें तें कर्म न विरूढे,
एकचि वेळे वेळुझाडें, वांझें जैसीं ॥ १३५ ॥

वेळूची झाडे एकदाच वितात मग वांझ

तैसें येणेंचि शरीरें, शरीरा येणें सरे,
किंबहुना येरझारे, चिरा पडे ॥ १३६ ॥

चिरा पडे=अंत होतो

पैं अभ्यासाचिया पाउटीं, ठाकिजे ज्ञान किरीटी,
ज्ञानें येइजे भेटी, ध्यानाचिये ॥ १३७ ॥

मग ध्यानासि खेंव, देती आघवेचि भाव,
तेव्हां कर्मजात सर्व, दूरी ठाके ॥ १३८ ॥

खेंव=मिठी

कर्म जेथ दुरावे, तेथ फलत्यागु संभवे,
त्यागास्तव आंगवे, शांति सगळी ॥ १३९ ॥

आंगवे=मिळते

म्हणौनि यावया शांति, हाचि अनुक्रमु सुभद्रापती,
म्हणौनि अभ्यासुचि प्रस्तुतीं, करणें एथ ॥ १४० ॥


श्रेयो हि ज्ञानमभ्यासाज्ञानाद् ध्यानं विशिष्यते।
ध्यानात् कर्मफलत्यागस्त्यागाच्छान्तिनिरन्तरम् ॥ १२॥


अभ्यासाहूनि गहन, पार्था मग ज्ञान,
ज्ञानापासोनि ध्यान, विशेषिजे ॥ १४१ ॥

मग कर्मफलत्यागु, तो ध्यानापासोनि चांगु,
त्यागाहूनि भोगु, शांतिसुखाचा ॥ १४२ ॥

ऐसिया या वाटा, इहींचि पेणा सुभटा,
शांतीचा माजिवटा, ठाकिला जेणें ॥ १४३ ॥

पेणा=मुक्काम   माजिवटा=मधले ठिकाण

अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च।
निर्ममो निरहङ्कारः समदुःखसुखः क्षमी ॥ १३॥


जो सर्व भूतांच्या ठायीं, द्वेषांतें नेणेंचि कहीं,
आपपरु नाहीं, चैतन्या जैसा ॥ १४४ ॥

 

उत्तमातें धरिजे, अधमातें अव्हेरिजे,
हें काहींचि नेणिजे, वसुधा जेवीं ॥ १४५ ॥

कां रायाचें देह चाळूं, रंकातें परौतें गाळूं,
हें न म्ह्णेचि कृपाळू, प्राणु पैं गा ॥ १४६ ॥

गाईची तृषा हरूं, कां व्याघ्रा विष होऊनि मारूं,
ऐसें नेणेंचि गा करूं, तोय जैसें ॥ १४७ ॥

तैसी आघवियांचि भूतमात्रीं, एकपणें जया मैत्री,
कृपेशीं धात्री, आपणचि जो ॥ १४८ ॥

धात्री=जन्मदात्री

आणि मी हे भाष नेणें, माझें काहींचि न म्हणे,
सुख दुःख जाणणें, नाहीं जया ॥ १४९ ॥

तेवींचि क्षमेलागीं, पृथ्वीसि पवाडु आंगीं,
संतोषा उत्संगीं, दिधलें घर ॥ १५० ॥

पवाडु=सामर्थ्य उत्संगीं=मांडीवर



सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः।
मय्यर्पितमनोबुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः ॥ १४॥


वार्षियेवीण सागरू, जैसा जळें नित्य निर्भरु,
तैसा निरुपचारु, संतोषी जो ॥ १५१ ॥

निर्भरु=भरलेला   निरुपचारु,=बाह्य कारणाशिवाय

वाहूनि आपुली आण, धरी जो अंतःकरण,
निश्चया साचपण, जयाचेनि ॥ १५२ ॥

जीवु परमात्मा दोन्ही, बैसऊनि ऐक्यासनीं,
जयाचिया हृदयभुवनीं, विराजती ॥ १५३ ॥

ऐसा योगसमृद्धि, होऊनि जो निरवधि,
अर्पी मनोबुद्धी, माझ्या ठायीं ॥ १५४ ॥

आंतु बाहेरि योगु, निर्वाळलेयाहि चांगु,
तरी माझा अनुरागु, सप्रेम जया ॥ १५५ ॥

अनुरागु=प्रीती

अर्जुना गा तो भक्तु, तोचि योगी तोचि मुक्तु,
तो वल्लभा मी कांतु, ऐसा पढिये ॥ १५६ ॥

पढिये=आवडतो

हें ना तो आवडे, मज जीवाचेनि पाडें,
हेंही एथ थोकडें, रूप करणें ॥ १५७ ॥

तरी पढियंतयाची काहाणी, हे भुलीची भारणी,
इयें तंव न बोलणीं, परी बोलवी श्रद्धा ॥ १५८ ॥

भारणी,=भारावणे  (जणू भुरळ मंत्राने )

म्हणौनि गा आम्हां, वेगां आली उपमा,
एऱ्हवीं काय प्रेमा, अनुवादु असे ? ॥ १५९ ॥

आतां असो हें किरीटी, पैं प्रियाचिया गोष्टी,
दुणा थांव उठी, आवडी गा ॥ १६० ॥

थांव=जोर

तयाही वरी विपायें, प्रेमळु संवादिया होये,
तिये गोडीसी आहे, कांटाळें मग ? ॥ १६१ ॥

विपायें=जर कदाचित

म्हणौनि गा पंडुसुता, तूंचि प्रियु आणि तूंचि श्रोता,
वरी प्रियाची वार्ता, प्रसंगें आली ॥ १६२ ॥

तरी आतां बोलों, भलें या सुखा मीनलों,
ऐसें म्हणतखेंवीं डोलों, लागला देवो ॥ १६३ ॥

मीनलों=मिळालो म्हणतखेंवीं=म्हणता क्षणी




मग म्हणे जाण, तया भक्तांचे लक्षण,
जया मी अंतःकरण, बैसों घालीं ॥ १६४ ॥

http://dnyaneshwariabhyas.blogspot.in/

1 comment: