ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओवी ३३९ ते ४६०
(क्षमा ,आर्जव ,गुरूभक्ती)
म्हणे उन्मेखसुलोचना, सावध होईं अर्जुना,
करूं तुज ज्ञाना, वोळखी आतां ॥ ३३९ ॥
उन्मेख= ज्ञान दृष्टी (उघडणे डोळे ,बुद्धी, प्रगटपणा
)
तरी ज्ञान गा तें एथें, वोळख तूं निरुतें,
आक्रोशेंवीण जेथें, क्षमा असे ॥ ३४० ॥
अगाध सरोवरीं, कमळिणी जियापरी,
कां सदैवाचिया घरीं, संपत्ति जैसी ॥ ३४१ ॥
पार्था तेणें पाडें, क्षमा जयातें वाढे,
तेही लक्षे तें फुडें, लक्षण सांगों ॥ ३४२ ॥
तरी पढियंते लेणें, आंगीं भावें जेणें,
धरिजे तेवीं साहणें, सर्वचि जया ॥ ३४३ ॥
त्रिविध मुख्य आघवे, उपद्रवांचे मेळावे,
वरी पडिलिया नव्हे, वांकुडा जो ॥ ३४४ ॥
अपेक्षित पावे, तें जेणें तोषें मानवें,
अनपेक्षिताही करवे, तोचि मानु ॥ ३४५ ॥
जो मानापमानातें साहे, सुखदुःख जेथ सामाये,
निंदास्तुती नोहे, दुखंडु जो ॥ ३४६ ॥
दुखंडु=दोन भागी, द्विधा
उन्हाळेनि जो न तपे, हिमवंती न कांपे,
कायसेनिही न वासिपे, पातलेया ॥ ३४७ ॥
वासिपे=घाबरणे
स्वशिखरांचा भारु, नेणें जैसा मेरु,
कीं धरा यज्ञसूकरु, वोझें न म्हणे ॥ ३४८ ॥
यज्ञसूकरु=वराह अवतार
नाना चराचरीं भूतीं, दाटणी नव्हे क्षिती,
तैसा नाना द्वंद्वीं प्राप्तीं, घामेजेना ॥ ३४९ ॥
घामेजेना=कष्टणे
घेऊनी जळाचे लोट, आलिया नदीनदांचे संघाट,
करी वाड पोट, समुद्र जेवीं ॥ ३५० ॥
तैसें जयाचिया ठायीं, न साहणें काहींचि नाहीं,
आणि साहतु असे ऐसेंही, स्मरण नुरे ॥ ३५१ ॥
आंगा जें पातलें, तें करूनि घाली आपुलें,
येथ साहतेनि नवलें, घेपिजेना ॥ ३५२ ॥
हे अनाक्रोश क्षमा, जयापाशीं प्रियोत्तमा,
जाण तेणें महिमा, ज्ञानासि गा ॥ ३५३ ॥
तो पुरुषु पांडवा, ज्ञानाचा वोलावा,
आतां परिस आर्जवा, रूप करूं ॥ ३५४ ॥
तरी आर्जव तें ऐसें, प्राणाचें सौजन्य जैसें,
आवडे तयाही दोषें, एकचि गा ॥ ३५५ ॥
प्राणाचें= प्राणवायू, तत्व आवडे दोषे =कौतुक करणारा व नवे ठेवणारा
कां तोंड पाहूनि प्रकाशु, न करी जेवीं चंडांशु,
जगा एकचि अवकाशु, आकाश जैसें ॥ ३५६ ॥
तैसें जयाचें मन, माणुसाप्रति आन आन,
नव्हे आणि वर्तन, ऐसें पैं तें ॥ ३५७ ॥
जे जगेंचि सनोळख, जगेंसीं जुनाट सोयरिक,
आपपर हें भाख, जाणणें नाहीं ॥ ३५८ ॥
भाख=भाषा वचन
भलतेणेंसीं मेळु, पाणिया ऐसा ढाळु,
कवणेविखीं आडळु, नेघे चित्त ॥ ३५९ ॥
ढाळु=वागणे
वारियाची धांव, तैसे सरळ भाव,
शंका आणि हांव, नाहीं जया ॥ ३६० ॥
मायेपुढें बाळका, रिगतां न पडे शंका,
तैसें मन देतां लोकां, नालोची जो ॥ ३६१ ॥
नालोची=अडखळणे मागे पुढे
पाहणे
फांकलिया इंदीवरा, परिवारु नाहीं धनुर्धरा,
तैसा कोनकोंपरा, नेणेचि जो ॥ ३६२ ॥
चोखाळपण रत्नाचें, रत्नावरी किरणाचें,
तैसें पुढां मन जयाचें, करणें पाठीं ॥ ३६३ ॥
आलोचूं जो नेणे, अनुभवचि जोगावणें,
धरी मोकळी अंतःकरणें, नव्हेचि जया ॥ ३६४ ॥
आलोचूं=संकल्प ,विचार जोगावणें=(अनुभव)तृप्त
धरी मोकळी=धारणे सोडणे मन
दिठी नोहे मिणधी, बोलणें नाहीं संदिग्धी,
कवणेंसीं हीनबुद्धी, राहाटीजे ना ॥ ३६५ ॥
मिणधी=कपटी
दाही इंद्रियें प्रांजळें, नि:प्रपंचें निर्मळें,
पांचही पालव मोकळे, आठही पाहर ॥ ३६६ ॥
पालव=प्राण
अमृताची धार, तैसें उजूं अंतर,
किंबहुना जो माहेर, या चिन्हांचें ॥ ३६७ ॥
तो पुरुष सुभटा, आर्जवाचा आंगवटा,
जाण तेथेंचि घरटा, ज्ञानें केला ॥ ३६८ ॥
आतां ययावरी, गुरुभक्तीची परी,
सांगों गा अवधारीं, चतुरनाथा ॥ ३६९ ॥
आघवियाचि दैवां, जन्मभूमि हे सेवा,
जे ब्रह्म करी जीवा, शोच्यातेंहि ॥ ३७० ॥
शोच्यातेंहि= शोक ग्रस्त
हें आचार्योपास्ती, प्रकटिजैल तुजप्रती,
बैसों दे एकपांती, अवधानाची ॥ ३७१ ॥
तरी सकळ जळसमृद्धी, घेऊनि गंगा निघाली उदधी,
कीं श्रुति हे महापदीं, पैठी जाहाली ॥ ३७२ ॥
नाना वेंटाळूनि जीवितें, गुणागुण उखितें,
प्राणनाथा उचितें, दिधलें प्रिया ॥ ३७३ ॥
उखितें=सर्व जसेच्यातसे
तैसें सबाह्य आपुलें, जेणें गुरुकुळीं वोपिलें,
आपणपें केलें, भक्तीचें घर ॥ ३७४ ॥
गुरुगृह जये देशीं, तो देशुचि वसे मानसीं,
विरहिणी कां जैसी, वल्लभातें ॥ ३७५ ॥
तियेकडोनि येतसे वारा, देखोनि धांवे सामोरा,
आड पडे म्हणे घरा, बीजें कीजो ॥ ३७६ ॥
बीजें=मुक्काम
साचा प्रेमाचिया भुली, तया दिशेसीचि आवडे बोली,
जीवु थानपती करूनि घाली, गुरुगृहीं जो ॥ ३७७ ॥
थानपती=स्थानपती
परी गुरुआज्ञा धरिलें, देह गांवीं असे एकलें,
वांसरुवा लाविलें, दावें जैसें ॥ ३७८ ॥
म्हणे कैं हें बिरडें फिटेल, कैं तो स्वामी भेटेल,
युगाहूनि वडील, निमिष मानी ॥ ३७९ ॥
बिरडें=बंधन
ऐसेया गुरुग्रामींचें आलें, कां स्वयें गुरूंनींचि धाडिलें,
तरी गतायुष्या जोडलें, आयुष्य जैसें ॥ ३८० ॥
कां सुकतया अंकुरा-, वरी पडलिया पीयूषधारा,
नाना अल्पोदकींचा सागरा, आला मासा ॥ ३८१ ॥
नातरी रंकें निधान देखिलें, कां आंधळिया डोळे उघडले,
भणंगाचिया आंगा आलें, इंद्रपद ॥ ३८२ ॥
तैसें गुरुकुळाचेनि नांवें, महासुखें अति थोरावे,
जें कोडेंही पोटाळवें, आकाश कां ॥ ३८३ ॥
पोटाळवें=कवटाळावे
पैं गुरुकुळीं ऐसी, आवडी जया देखसी,
जाण ज्ञान तयापासीं, पाइकी करी ॥ ३८४ ॥
आणि अभ्यंतरीलियेकडे, प्रेमाचेनि पवाडे,
श्रीगुरूंचें रूपडें, उपासी ध्यानीं ॥ ३८५ ॥
अभ्यंतरी=अनंतकरण
हृदयशुद्धीचिया आवारीं, आराध्यु तो निश्चल ध्रुव करी,
मग सर्व भावेंसी परिवारीं, आपण होय ॥ ३८६ ॥
कां चैतन्यांचिये पोवळी-, माजीं आनंदाचिया राउळीं,
श्रीगुरुलिंगा ढाळी, ध्यानामृत ॥ ३८७ ॥
पोवळी-,चौथरा
उदयिजतां बोधार्का, बुद्धीची डाळ सात्त्विका,
भरोनियां त्र्यंबका, लाखोली वाहे ॥ ३८८ ॥
बोधार्का=बोधरुपी सूर्य डाळ=टोपली
काळशुद्धी त्रिकाळीं, जीवदशा धूप जाळीं।
ज्ञानदीपें वोंवाळी, निरंतर ॥ ३८९ ॥
सामरस्याची रससोय, अखंड अर्पितु जाय,
आपण भराडा होय, गुरु तो लिंग ॥ ३९० ॥
भराडा=गुरव
नातरी जीवाचिये सेजे, गुरु कांतु करूनि भुंजे,
ऐसीं प्रेमाचेनि भोजें, बुद्धी वाहे ॥ ३९१ ॥
कोणे एके अवसरीं, अनुरागु भरे अंतरीं,
कीं तया नाम करी, क्षीराब्धी ॥ ३९२ ॥
तेथ ध्येयध्यान बहु सुख, तेंचि शेषतुका निर्दोख,
वरी जलशयन देख, भावी गुरु ॥ ३९३ ॥
शेषतुका=शेष शयना सारखी
मग वोळगती पाय, ते लक्ष्मी आपण होय,
गरुड होऊनि उभा राहे, आपणचि ॥ ३९४ ॥
नाभीं आपणचि जन्मे, ऐसें गुरुमूर्तिप्रेमें,
अनुभवी मनोधर्में, ध्यानसुख ॥ ३९५ ॥
एकाधिये वेळें, गुरु माय करी भावबळें,
मग स्तन्यसुखें लोळे, अंकावरी ॥ ३९६ ॥
नातरी गा किरीटी, चैतन्यतरुतळवटीं,
गुरु धेनु आपण पाठीं, वत्स होय ॥ ३९७ ॥
गुरुकृपास्नेहसलिलीं, आपण होय मासोळी,
कोणे एके वेळीं, हेंचि भावीं ॥ ३९८ ॥
गुरुकृपामृताचे वडप, आपण सेवावृत्तीचें होय रोप,
ऐसेसे संकल्प, विये मन ॥ ३९९ ॥
वडप=मेघ
चक्षुपक्षेवीण, पिलूं होय आपण,
कैसें पैं अपारपण, आवडीचें ॥ ४०० ॥
गुरूतें पक्षिणी करी, चारा घे चांचूवरी,
गुरु तारू धरी, आपण कांस ॥ ४०१ ॥
कांस=आश्रयित
ऐसें प्रेमाचेनि थावें, ध्यानचि ध्यानातें प्रसवे,
पूर्णसिंधु हेलावे, फुटती जैसे ॥ ४०२ ॥
किंबहुना यापरी, श्रीगुरुमूर्ती अंतरीं,
भोगी आतां अवधारीं, बाह्यसेवा ॥ ४०३ ॥
तरी जिवीं ऐसे आवांके, म्हणे दास्य करीन निकें,
जैसें गुरु कौतुकें, माग म्हणती ॥ ४०४ ॥
तैसिया साचा उपास्ती, गोसावी प्रसन्न होती,
तेथ मी विनंती, ऐसी करीन ॥ ४०५ ॥
म्हणेन तुमचा देवा, परिवारु जो आघवा,
तेतुलें रूपें होआवा, मीचि एकु ॥ ४०६ ॥
आणि उपकरतीं आपुलीं, उपकरणें आथि जेतुलीं,
माझीं रूपें तेतुलीं, होआवीं स्वामी ॥ ४०७ ॥
उपकरतीं,उपकरणे =पूजा
साहित्य
ऐसा मागेन वरु, तेथ हो म्हणती श्रीगुरु,
मग तो परिवारु, मीचि होईन ॥ ४०८ ॥
उपकरणजात सकळिक, तें मीचि होईन एकैक,
तेव्हां उपास्तीचें कवतिक, देखिजैल ॥ ४०९ ॥
गुरु बहुतांची माये, परी एकलौती होऊनि ठाये,
तैसें करूनि आण वायें, कृपे तिये ॥ ४१० ॥
तया अनुरागा वेधु लावीं, एकपत्नीव्रत घेववीं,
क्षेत्रसंन्यासु करवीं, लोभाकरवीं ॥ ४११ ॥
चतुर्दिक्षु वारा, न लाहे निघों बाहिरा,
तैसा गुरुकृपें , मीचि होईन ॥ ४१२ ॥
पांजिरा=पिंजरा
आपुलिया गुणांचीं लेणीं, करीन गुरुसेवे स्वामिणी,
हें असो होईन गंवसणी, मीचि भक्तीसी ॥ ४१३ ॥
गुरुस्नेहाचिये वृष्टी, मी पृथ्वी होईन तळवटीं,
ऐसिया मनोरथांचिया सृष्टी, अनंता रची ॥ ४१४ ॥
म्हणे श्रीगुरूंचें भुवन, आपण मी होईन,
आणि दास होऊनि करीन, दास्य तेथिंचें ॥ ४१५ ॥
निर्गमागमीं दातारें, जे वोलांडिजती उंबरे,
ते मी होईन आणि द्वारें, द्वारपाळु ॥ ४१६ ॥
निर्गमागमीं=जाता येता
पाउवा मी होईन, तियां मीचि लेववीन,
छत्र मी आणि करीन, बारीपण ॥ ४१७ ॥
पाउवा=खडावा बारी=छत्रधरणारा
मी तळ उपरु जाणविता, चंवरु धरु हातु देता,
स्वामीपुढें खोलता, होईन मी ॥ ४१८ ॥
तळउपरू =खड्डा
उंचवटा जाणविता= दाखवणारा चोपदार
खोलता=वाटाड्या
मीचि होईन सागळा, करूं सुईन गुरुळां,
सांडिती तो नेपाळा, पडिघा मीचि ॥ ४१९ ॥
गुरुळां=चूळीचे पाणी नेपाळा=चूळ पडिघा=चुळीचे तस्त
हडप मी वोळगेन, मीचि उगाळु घेईन,
उळिग मी करीन, आंघोळीचें ॥ ४२० ॥
हडप=पानदान उगाळु=थुंका उळिग=सेवाकर्म
होईन गुरूंचें आसन, अलंकार परिधान,
चंदनादि होईन, उपचार ते ॥ ४२१ ॥
मीचि होईन सुआरु, वोगरीन उपहारु,
आपणपें श्रीगुरु, वोंवाळीन ॥ ४२२ ॥
सुआरु=स्वयपाकी उपहारु=वाढपी
जे वेळीं देवो आरोगिती, तेव्हां पांतीकरु मीचि पांतीं,
मीचि होईन पुढती, देईन विडा ॥ ४२३ ॥
ताट मी काढीन, सेज मी झाडीन,
चरणसंवाहन, मीचि करीन ॥ ४२४ ॥
सिंहासन होईन आपण, वरी श्रीगुरु करिती आरोहण,
होईन पुरेपण, वोळगेचें ॥ ४२५ ॥
श्रीगुरूंचें मन, जया देईल अवधान,
तें मी पुढां होईन, चमत्कारु ॥ ४२६ ॥
तया श्रवणाचे आंगणीं, होईन शब्दांचिया आक्षौहिणी,
स्पर्श होईन घसणी, आंगाचिया ॥ ४२७ ॥
श्रीगुरूंचे डोळे, अवलोकनें स्नेहाळें,
पाहाती तियें सकळें, होईन रूपें ॥ ४२८ ॥
तिये रसने जो जो रुचेल, तो तो रसु म्यां होईजैल,
गंधरूपें कीजेल, घ्राणसेवा ॥ ४२९ ॥
एवं बाह्यमनोगत, श्रीगुरुसेवा समस्त,
वेंटाळीन वस्तुजात, होऊनियां ॥ ४३० ॥
जंव देह हें असेल, तंव वोळगी ऐसी कीजेल,
मग देहांतीं नवल, बुद्धि आहे ॥ ४३१ ॥
इये शरीरींची माती, मेळवीन तिये क्षिती,
जेथ श्रीचरण उभे ठाती, श्रीगुरूंचे ॥ ४३२ ॥
माझा स्वामी कवतिकें, स्पर्शीजति जियें उदकें,
तेथ लया नेईन निकें, आपीं आप ॥ ४३३ ॥
श्रीगुरु वोंवाळिजती, कां भुवनीं जे उजळिजती,
तयां दीपांचिया दीप्तीं, ठेवीन तेज ॥ ४३४ ॥
चवरी हन विंजणा, तेथ लयो करीन प्राणा,
मग आंगाचा वोळंगणा, होईन मी ॥ ४३५ ॥
जिये जिये अवकाशीं, श्रीगुरु असती परिवारेंसीं,
आकाश लया आकाशीं, नेईन तिये ॥ ४३६ ॥
परी जीतु मेला न संडीं, निमेषु लोकां न धाडीं,
ऐसेनि गणावया कोडी, कल्पांचिया ॥ ४३७ ॥
लोकां=इतरांना
येतुलेंवरी धिंवसा, जयाचिया मानसा,
आणि करूनियांहि तैसा, अपारु जो ॥ ४३८ ॥
रात्र दिवस नेणे, थोडें बहु न म्हणें,
म्हणियाचेनि दाटपणें, साजा होय ॥ ४३९ ॥
तो व्यापारु येणें नांवें, गगनाहूनि थोरावे,
एकला करी आघवें, एकेचि काळीं ॥ ४४० ॥
हृदयवृत्ती पुढां, आंगचि घे दवडा,
काज करी होडा, मानसेंशीं ॥ ४४१ ॥
दवडा=धावणे
एकादियां वेळा, श्रीगुरुचिया खेळा,
लोण करी सकळा, जीविताचें ॥ ४४२ ॥
जो गुरुदास्यें कृशु, जो गुरुप्रेमें सपोषु,
गुरुआज्ञे निवासु, आपणचि जो ॥ ४४३ ॥
जो गुरु कुळें सुकुलीनु, जो गुरुबंधुसौजन्यें सुजनु,
जो गुरुसेवाव्यसनें सव्यसनु, निरंतर ॥ ४४४ ॥
गुरुसंप्रदायधर्म, तेचि जयाचे वर्णाश्रम,
गुरुपरिचर्या नित्यकर्म, जयाचें गा ॥ ४४५ ॥
गुरु क्षेत्र गुरु देवता, गुरु माय गुरु पिता,
जो गुरुसेवेपरौता, मार्ग नेणें ॥ ४४६ ॥
श्रीगुरूचे द्वार, तें जयाचें सर्वस्व सार,
गुरुसेवकां सहोदर, प्रेमें भजे ॥ ४४७ ॥
जयाचें वक्त्र, वाहे गुरुनामाचे मंत्र,
गुरुवाक्यावांचूनि शास्त्र, हातीं न शिवे ॥ ४४८ ॥
शिवतलें गुरुचरणीं, भलतैसें हो पाणी,
तया सकळ तीर्थें आणी, त्रैलोक्यींचीं ॥ ४४९ ॥
श्रीगुरूचें उशिटें, लाहे जैं अवचटें,
तैं तेणें लाभें विटे, समाधीसी ॥ ४५० ॥
कैवल्यसुखासाठीं, परमाणु घे किरीटी,
उधळती पायांपाठीं, चालतां जे ॥ ४५१ ॥
हें असो सांगावें किती, नाहीं पारु गुरुभक्ती,
परी गा उत्क्रांतमती, कारण हें ॥ ४५२ ॥
उत्क्रांतमती=सांगायचे
बुद्धीची स्फूर्ती
जया इये भक्तीची चाड, जया इये विषयींचें कोड,
जो हे सेवेवांचून गोड, न मनी कांहीं ॥ ४५३ ॥
तो तत्त्वज्ञाचा ठावो, ज्ञाना तेणेंचि आवो,
हें असो तो देवो, ज्ञान भक्तु ॥ ४५४ ॥
हें जाण पां साचोकारें, तेथ ज्ञान उघडेनि द्वारें,
नांदत असे जगा पुरे, इया रीती ॥ ४५५ ॥
जिये गुरुसेवेविखीं, माझा जीव अभिलाखी,
म्हणौनि सोयचुकी, बोली केली ॥ ४५६ ॥
सोयचुकी=मार्ग सोडून (गीतार्थाचा
)
एऱ्हवीं असतां हातीं खुळा, भजनावधानीं आंधळा,
परिचर्येलागीं पांगुळा-, पासूनि मंदु ॥ ४५७ ॥
खुळा=थोटा (अपंग)
गुरुवर्णनीं मुका, आळशी पोशिजे फुका,
परी मनीं आथि निका, सानुरागु ॥ ४५८ ॥
सानुरागु=प्रेम
तेणेंचि पैं कारणें, हें स्थूळ पोसणें,
पडलें मज म्हणे, ज्ञानदेवो ॥ ४५९ ॥
परि तो बोलु उपसाहावा, आणि वोळगे अवसरु देयावा,
आतां म्हणेन जी बरवा, ग्रंथार्थुचि ॥ ४६० ॥
सुंदर !
ReplyDelete