ओव्या १ ते ६७
॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥
॥ अथ श्रीमद्भगवद्गीता ॥
। अथ षोडशोशोऽध्यायः - अध्याय सोळावा |।
। दैवासुरसंपत्तिविभागयोगः।
मावळवीत विश्वाभासु | नवल उदयला चंडांशु |
अद्वयाब्जिनीविकाशु | वंदूं आतां ॥ १ ॥
॥ अथ श्रीमद्भगवद्गीता ॥
। अथ षोडशोशोऽध्यायः - अध्याय सोळावा |।
। दैवासुरसंपत्तिविभागयोगः।
मावळवीत विश्वाभासु | नवल उदयला चंडांशु |
अद्वयाब्जिनीविकाशु | वंदूं आतां ॥ १ ॥
अद्वयाब्जिनीविकाशु=अद्वैत स्थिती हेच कमळ विकास करणारा
चंडांशु=सूर्य
जो अविद्याराती रुसोनियां | गिळी ज्ञानाज्ञानचांदणिया |
जो सुदिनु करी ज्ञानियां | स्वबोधाचा ॥ २ ॥
जेणें विवळतिये सवळे | लाहोनि आत्मज्ञानाचे डोळे |
सांडिती देहाहंतेचीं अविसाळें | जीवपक्षी ॥ ३ ॥
विवळतिये=उगवतीच्या सवळे=प्रात:काळ
अविसाळें=घरटे
लिंगदेहकमळाचा | पोटीं वेंचु तया चिद्भ्रमराचा |
बंदिमोक्षु जयाचा | उदैला होय ॥ ४ ॥
वेंचु=मरण
शब्दाचिया आसकडीं | भेद नदीच्या दोहीं थडीं |
आरडाते विरहवेडीं | बुद्धिबोधु ॥ ५ ॥
आसकडीं=अडचण(अडचणीची जागा)
तया चक्रवाकांचें मिथुन | सामरस्याचें समाधान |
भोगवी जो चिद्गगन | भुवनदिवा ॥ ६ ॥
जेणें पाहालिये पाहांटे | भेदाची चोरवेळ फिटे |
रिघती आत्मानुभववाटे | पांथिक योगी ॥ ७ ॥
जयाचेनि विवेककिरणसंगें | उन्मेखसूर्यकांतु फुणगे |
दीपले जाळिती दांगें | संसाराचीं ॥ ८ ॥
फुणगे=ठिणगी स्फुल्लिंगे दीपले =पेटले दांगें =अरण्य
जयाचा रश्मिपुंजु निबरु | होता स्वरूप उखरीं स्थिरु |
ये महासिद्धीचा पूरु | मृगजळ तें ॥ ९ ॥
निबरु=प्रखर उखरीं=वाळवंट बरड जमीन
जो प्रत्यग्बोधाचिया माथया | सोऽहंतेचा मध्यान्हीं आलिया |
लपे आत्मभ्रांतिछाया | आपणपां तळीं ॥ १० ॥
प्रत्यग्बोधाचिया=आत्मज्ञानाचा माथया=माथ्यावर
ते वेळीं विश्वस्वप्नासहितें | कोण अन्यथामती निद्रेतें |
सांभाळी नुरेचि जेथें | मायाराती ॥ ११ ॥
अन्यथामती=विपरीत ज्ञान
म्हणौनि अद्वयबोधपाटणीं | तेथ महानंदाची दाटणी |
मग सुखानुभूतीचीं घेणीं देणीं | मंदावो लागती ॥ १२ ॥
अद्वयबोधपाटणीं=अद्वैत शहरी
किंबहुना ऐसैसें | मुक्तकैवल्य सुदिवसें |
सदा लाहिजे कां प्रकाशें | जयाचेनि ॥ १३ ॥
जो निजधामव्योमींचा रावो | उदैलाचि उदैजतखेंवो |
फेडी पूर्वादि दिशांसि ठावो | उदोअस्तूचा ॥ १४ ॥
न दिसणें दिसणेंनसीं मावळवी | दोहीं झांकिलें ते सैंघ पालवी |
काय बहु बोलों ते आघवी | उखाचि आनी ॥ १५ ॥
सैंघ=सर्व उखाचि=उषा
तो अहोरात्रांचा पैलकडु | कोणें देखावा ज्ञानमार्तंडु |
जो प्रकाश्येंवीण सुरवाडु | प्रकाशाचा ॥ १६ ॥
पैलकडु =पलि कडचा
सुरवाडु =सुख
आनंद
तया चित्सूर्या श्रीनिवृत्ती | आतां नमों म्हणों पुढतपुढती |
जे बाधका येइजतसे स्तुती | बोलाचिया ॥ १७ ॥
देवाचें महिमान पाहोनियां | स्तुति तरी येइजे चांगावया |
जरी स्तव्यबुद्धीसीं लया | जाईजे कां ॥ १८ ॥
चांगावया=उत्तम
स्तव्यबुद्धीसीं=स्तवन करणारा (बुद्धी)
स्तव्य स्तवन= स्तव्य
विषय ही त्रिपुटी जाता
जो सर्वनेणिवां जाणिजे | मौनाचिया मिठीया वानिजे |
कांहींच न होनि आणिजे | आपणपयां जो ॥ १९ ॥
वानिजे= वर्णन स्तुती करणे होनि=करून
तया तुझिया उद्देशासाठीं | पश्यंती मध्यमा पोटीं |
सूनि परेसींही पाठीं | वैखरी विरे ॥ २० ॥
सूनि=घालूनी
तया तूतें मी सेवकपणें | लेववीं बोलकेया स्तोत्राचें लेणें |
हें उपसाहावेंही म्हणतां उणें | अद्वयानंदा ॥ २१ ॥
अद्वयानंदा=(निवृत्ती नाथ ) उपसाहावेंही=सहन करावे
परी रंकें अमृताचा सागरु | देखिलिया पडे उचिताचा विसरु |
मग करूं धांवे पाहुणेरु | शाकांचा तया ॥ २२ ॥
शाकांचा=भाजीपाला
तेथ शाकुही कीर बहुत म्हणावा | तयाचा हर्षवेगुचि तो घ्यावा |
उजळोनि दिव्यतेजा हातिवा | ते भक्तीचि पाहावी ॥ २३ ॥
हातिवा =दीप
बाळा उचित जाणणें होये | तरी बाळपणचि कें आहे ? |
परी साचचि येरी माये | म्हणौनि तोषे ॥ २४ ॥
हां गा गांवरसें भरलें | पाणी पाठीं पाय देत आलें |
तें गंगा काय म्हणितलें | परतें सर ? ॥ २५ ॥
जी भृगूचा कैसा अपकारु | कीं तो मानूनि प्रियोपचारु |
तोषेचिना शारङ्गधरु | गुरुत्वासीं ? ॥ २६ ॥
कीं आंधारें खतेलें अंबर | झालेया दिवसनाथासमोर |
तेणें तयातें पऱ्हा सर | म्हणितलें काई ? ॥ २७ ॥
खतेलें =मलीन होणे
तेवीं भेदबुद्धीचिये तुळे | घालूनि सूर्यश्लेषाचें कांटाळे |
तुकिलासि तें येकी वेळे | उपसाहिजो जी ॥ २८ ॥
सूर्यश्लेषाचें=सूर्याच्या उपमेने कांटाळे =तोलणे
जिहीं ध्यानाचा डोळां पाहिलासी | वेदादि वाचां वानिलासी |
जें उपसाहिलें तयासी | तें आम्हांही करीं ॥ २९ ॥
उपसाहिलें=सहन केले
परी मी आजि तुझ्या गुणीं | लांचावलों अपराधु न गणीं |
भलतें करीं परी अर्धधणीं | नुठी कदा ॥ ३० ॥
लांचावलों =लुब्ध झालो अर्धधणीं =अर्धतृप्त
मियां गीता येणें नांवें | तुझें पसायामृत सुहावें |
वानूं लाधलों तें दुणेन थावें | दैवलों दैवें ॥ ३१ ॥
सुहावें=घेणे सेवणे दुणेन थावें=दुप्पट बळाने
दैवलों= भाग्य लाभलो
माझिया सत्यवादाचें तप | वाचा केलें बहुत कल्प |
तया फळाचें हें महाद्वीप | पातली प्रभु ॥ ३२ ॥
महाद्वीप =बेट
पुण्यें पोशिलीं असाधरणें | तियें तुझें गुण वानणें |
देऊनि मज उत्तीर्णें | जालीं आजी ॥ ३३ ॥
जी जीवित्वाच्या आडवीं | आतुडलों होतों मरणगांवीं |
ते अवदसाची आघवी | फेडिली आजी ॥ ३४ ॥
आडवीं=अरण्य आतुडलों=सापडलो अवदसाची=दुर्दशा
जे गीता येणें नांवें नावाणिगी | जे अविद्या जिणोनि दाटुगी |
ते कीर्ती तुझी आम्हांजोगी | वानावया जाली ॥ ३५ ॥
नावाणिगी =प्रसिद्ध दाटुगी=प्रबळ
पैं निर्धना घरीं वानिवसें | महालक्ष्मी येऊनि बैसे |
तयातें निर्धन ऐसें | म्हणों ये काई ? ॥ ३६ ॥
वानिवसें =दैव वशात
कां अंधकाराचिया ठाया | दैवें सुर्यु आलिया |
तो अंधारुचि जगा यया | प्रकाशु नोहे ? ॥ ३७ ॥
जया देवाची पाहतां थोरी | विश्व परमाणुही दशा न धरी |
तो भावाचिये सरोभरी | नव्हेचि काई ? ॥ ३८ ॥
दशा न धरी =तुलना बरोबरी सरोभरी= भरात
नव्हेचि=न होये ची
तैसा मी गीता वाखाणी | हे खपुष्पाची तुरंबणी |
परी समर्थें तुवां शिरयाणी | फेडिली ते ॥ ३९ ॥
शिरयाणी =आवडी इच्छा
म्हणौनि तुझेनि प्रसादें | मी गीतापद्यें अगाधें |
निरूपीन जी विशदें | ज्ञानदेवो म्हणे ॥ ४० ॥
तरी अध्यायीं पंधरावा | श्रीकृष्णें तया पांडवा |
शास्त्रसिद्धांतु आघवा | उगाणिला ॥ ४१ ॥
उगाणिला=स्पष्ट केला
जे वृक्षरूपक परीभाषा | केलें उपाधि रूप अशेषा |
सद्वैद्यें जैसें दोषा | अंगलीना ॥ ४२ ॥
अशेषा =स्पष्ट(जाणतो) अंगलीना=अंगातील गुप्त
आणि कूटस्थु जो अक्षरु | दाविला पुरुषप्रकारु |
तेणें उपहिताही आकारु | चैतन्या केला ॥ ४३ ॥
उपहिताही =उपाधी युक्त
पाठीं उत्तम पुरुष | शब्दाचें करूनि मिष |
दाविलें चोख | आत्मतत्त्व ॥ ४४ ॥
आत्मविषयीं आंतुवट | साधन जें आंगदट |
ज्ञान हेंही स्पष्ट | चावळला ॥ ४५ ॥
आंतुवट =आतले
आंगदट =बळकट
म्हणौनि इये अध्यायीं | निरूप्य नुरेचि कांहीं |
आतां गुरुशिष्यां दोहीं | स्नेहो लाहणा ॥ ४६ ॥
लाहणा =लाभणार
एवं इयेविषयीं कीर | जाणते बुझावले अपार |
परी मुमुक्षु इतर | साकांक्ष जाले ॥ ४७ ॥
बुझावले =तृप्त
साकांक्ष=आकांक्षा धरणारा उत्सुक
त्या मज पुरुषोत्तमा | ज्ञानें भेटे जो सुवर्मा |
तो सर्वज्ञु तोचि सीमा | भक्तीचीही ॥ ४८ ॥
ऐसें हें त्रैलोक्यनायकें | बोलिलें अध्यायांत श्लोकें |
तेथें ज्ञानचि बहुतेकें | वानिलें तोषें ॥ ४९ ॥
बहुतेकें=वारंवार
भरूनि प्रपंचाचा घोंटु | कीजे देखतांचि देखतया द्रष्टु |
आनंदसाम्राज्यीं पाटु | बांधिजे जीवा ॥ ५० ॥
येवढेया लाठेपणाचा उपावो | आनु नाहींचि म्हणे देवो |
हा सम्यक्ज्ञानाचा रावो | उपायांमाजीं ॥ ५१ ॥
लाठेपणाचा=उदंड मोठा
ऐसे आत्मजिज्ञासु जे होते | तिहीं तोषलेनि चित्तें |
आदरें तया ज्ञानातें | वोंवाळिलें जीवें ॥ ५२ ॥
आतां आवडी जेथ पडे | तयाचि अवसरीं पुढें पुढें |
रिगों लागें हें घडे | प्रेम ऐसें ॥ ५३ ॥
म्हणौनि जिज्ञासूंच्या पैकीं | ज्ञानी प्रतीती होय ना जंव निकी |
तंव योग क्षेमु ज्ञानविखीं | स्फुरेलचि कीं ॥ ५४ ॥
योग क्षेमु=कृती आचार(उपजीविका)
म्हणौनि तेंचि सम्यक् ज्ञान | कैसेनि होय स्वाधीन |
जालिया वृद्धियत्न | घडेल केवीं ॥ ५५ ॥
वृद्धियत्न=वाढ (अखंडता)
कां उपजोंचि जें न लाहे | जें उपजलेंही अव्हांटा सूये |
तें ज्ञानीं विरुद्ध काय आहे | हें जाणावें कीं ॥ ५६ ॥
लाहे=भेटणे (ज्ञान) अव्हांटा सूये =आडवाटेला घालते
मग जाणतयां जें विरू | तयाचीं वाट वाहती करूं |
ज्ञाना हित तेंचि विचारूं | सर्वभावें ॥ ५७ ॥
विरू=विरुद्ध
ऐसा ज्ञानजिज्ञासु तुम्हीं समस्तीं | भावो जो धरिला असे चित्तीं |
तो पुरवावया लक्ष्मीपती | बोलिजेल ॥ ५८ ॥
ज्ञानासि सुजन्म जोडे | आपली विश्रांतिही वरी वाढे |
ते संपत्तीचे पवाडे | सांगिजेल दैवी ॥ ५९ ॥
पवाडे=कीर्ती
आणि ज्ञानाचेनि कामाकारें | जे रागद्वेषांसि दे थारे |
तिये आसुरियेहि घोरे | करील रूप ॥ ६० ॥
कामाकारें =अंकित करून (नष्ट करून
)
सहज इष्टानिष्ट करणी | दोघीचि इया कवतुकिणी |
हे नवमाध्यायीं उभारणी | केली होती ॥ ६१ ॥
तेथ साउमा घेयावया उवावो | तंव वोडवला आन प्रस्तावो |
तरी तयां प्रसंगें, आतां देवो | निरूपीत असे ॥ ६२ ॥
साउमा घेयावया
उवावो =पुढे प्रत्यक्ष विस्तार
प्रस्तावो=विषय बोलणे
तया निरूपणाचेनि नांवें | अध्याय पद सोळावें |
लावणी पाहतां जाणावें | मागिलावरी ॥ ६३ ॥ \
अध्याय पद सोळावें =१६ वा अध्याय
लावणी =जोडणी संदर्भ
परी हें असो आतां प्रस्तुतीं | ज्ञानाच्या हिताहितीं |
समर्था संपत्ती | इयाचि दोन्ही ॥ ६४ ॥
जे मुमुक्षुमार्गींची बोळावी | जे मोहरात्रीची धर्मदिवी |
ते आधीं तंव दैवी | संपत्ती ऐका ॥ ६५ ॥
बोळावी=पोहचवणे
जेथ एक एकातें पोखी | ऐसे बहुत पदार्थ येकीं |
संपादिजती ते लोकीं | संपत्ति म्हणिजे ॥ ६६ ॥
एका मुळे एक वाढते,
पोषण करते
ते दैवी सुखसंभवी | तेथ दैवगुणें येकोपजीवीं |
जाली म्हणौनि दैवी | संपत्ति हे ॥ ६७ ॥
जाली म्हणौनि दैवी | संपत्ति हे ॥ ६७ ॥
सुखसंभवी=सुखाचा उद्भव येकोपजीवीं=एकाच आश्रयी
by dr. vikrant tikone
***************************************************
छान !
ReplyDelete