Monday, January 2, 2017

ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओव्या ६५३ ते ६९२ अज्ञान भाग १





ज्ञानेश्वरी / अध्याय १३ वा  / संत ज्ञानेश्वर

अज्ञान भाग १


आतां धनंजया महामती, अज्ञान ऐसी वदंती,
तेंही सांगों व्यक्ती, लक्षणेंसीं ॥ ६५३ ॥

एऱ्हवीं ज्ञान फुडें जालिया, अज्ञान जाणवे धनंजया,
जें ज्ञान नव्हे तें अपैसया, अज्ञानचि ॥ ६५४ ॥

पाहें पां दिवसु आघवा सरे, मग रात्रीची वारी उरे,
वांचूनि कांहीं तिसरें, नाहीं जेवीं ॥ ६५५ ॥

वारी=फेरी

तैसें ज्ञान जेथ नाहीं, तेंचि अज्ञान पाहीं,
तरी सांगों कांहीं कांहीं, चिन्हें तियें ॥ ६५६ ॥

तरी संभावने जिये, जो मानाची वाट पाहे,
सत्कारें होये, तोषु जया ॥ ६५७ ॥

संभावने=प्रतिष्ठेसाठी

गर्वें पर्वताचीं शिखरें, तैसा महत्त्वावरूनि नुतरे,
तयाचिया ठायीं पुरे, अज्ञान आहे ॥ ६५८ ॥

आणि स्वधर्माची मांगळी, बांधे वाचेच्या पिंपळीं,
उभिला जैसा देउळीं, जाणोनि कुंचा ॥ ६५९ ॥

मांगळी= मुंज दोरी    

स्वधर्माची= स्वधर्म रुपी दोर
वाचेच्या पिंपळीं,= जीभरूपी पिंपळाला बांधणे
कुंचा=झाडू (बहुदा मोरपिसाचा)

घाली विद्येचा पसारा, सूये सुकृताचा डांगोरा,
करी तेतुलें मोहरा, स्फीतीचिया ॥ ६६० ॥

स्फीती=कीर्ती

आंग वरिवरी चर्ची, जनातें अभ्यर्चितां वंची,
तो जाण पां अज्ञानाची, खाणी एथ ॥ ६६१ ॥

आंग=स्वत:ला
अभ्यर्चितां=पुजा पाठाने वंची =फसवणे

आणि वन्ही वनीं विचरे, तेथ जळती जैसीं जंगमें स्थावरें,
तैसें जयाचेनि आचारें, जगा दुःख ॥ ६६२ ॥

कौतुकें जें जें जल्पे, तें साबळाहूनि तीख रुपे,
विषाहूनि संकल्पें, मारकु जो ॥ ६६३ ॥

साबळाहूनि=भाला

तयातें बहु अज्ञान, तोचि अज्ञानाचें निधान,
हिंसेसि आयतन, जयाचें जिणें ॥ ६६४ ॥

आयतन=घर

आणि फुंकें भाता फुगे, रेचिलिया सवेंचि उफगे,
तैसा संयोगवियोगें, चढे वोहटे ॥ ६६५ ॥

उफगे,=विरुद्ध फुगे 

पडली वारयाचिया वळसा, धुळी चढे आकाशा,
हरिखा वळघे तैसा, स्तुतीवेळे ॥ ६६६ ॥

वळघे= बेभान वर चढणे  

निंदा मोटकी आइके, आणि कपाळ धरूनि ठाके,
थेंबें विरे वारोनि शोखे, चिखलु जैसा ॥ ६६७ ॥

तैसा मानापमानीं होये, जो कोण्हीचि उर्मी न साहे,
तयाच्या ठायीं आहे, अज्ञान पुरें ॥ ६६८ ॥

आणि जयाचिया मनीं गांठी, वरिवरी मोकळी वाचा दिठी,
आंगें मिळे, जीवें पाठीं, भलतया दे ॥ ६६९ ॥

शरीराने मित्र मनाने दूर

व्याधाचे चारा घालणें, तैसें प्रांजळ जोगावणें,
चांगाचीं अंतःकरणें, विरु करी ॥ ६७० ॥

जोगावणें=वर्तन

गार शेवाळें गुंडाळली, कां निंबोळी जैसी पिकली,
तैसी जयाची भली, बाह्य क्रिया ॥ ६७१ ॥

अज्ञान तयाचिया ठायीं, ठेविलें असे पाहीं,
याबोला आन नाहीं, सत्य मानीं ॥ ६७२ ॥

आणि गुरुकुळीं लाजे, जो गुरुभक्ती उभजे,
विद्या घेऊनि माजे, गुरूसींचि जो ॥ ६७३ ॥
उभजे,=उबगे ,लाजे

तयाचें नाम घेणें, तें वाचे शूद्रान्न होणें,
परी घडलें लक्षणें, बोलतां इयें ॥ ६७४ ॥

आता गुरुभक्तांचें नांव घेवों, तेणें वाचेसि प्रायश्चित देवों,
गुरुसेवका नांव पावों, सूर्यु जैसा ॥ ६७५ ॥

येतुलेनि पांगु पापाचा, निस्तरेल हे वाचा,
जो गुरुतल्पगाचा, नामीं आला ॥ ६७६ ॥

गुरुतल्पगाचा=गुरुस्त्री गमन करणारा

हा ठायवरी, तया नामाचें भय हरी,
मग म्हणे अवधारीं, आणिकें चिन्हें ॥ ६७७ ॥

तरि आंगें कर्में ढिला, जो मनें विकल्पें भरला,
अडवींचा अवगळला, कुहा जैसा ॥ ६७८ ॥

अडवींचा =जंगल अवगळला= कुहा=विहीर

तया तोंडीं कांटिवडे, आंतु नुसधीं हाडें,
अशुचि तेणें पाडें, सबाह्य जो ॥ ६७९ ॥

जैसें पोटालागीं सुणें, उघडें झांकलें न म्हणे,
तैसें आपलें परावें नेणे, द्रव्यालागीं ॥ ६८० ॥

इया ग्रामसिंहाचिया ठायीं, जैसा मिळणी ठावो अठावो नाहीं,
तैसा स्त्रीविषयीं कांहीं, विचारीना ॥ ६८१ ॥

ग्रामसिंहाचिया= कुत्रे

कर्माचा वेळु चुके, कां नित्य नैमित्तिक ठाके,
तें जया न दुखे, जीवामाजीं ॥ ६८२ ॥

पापी जो निसुगु, पुण्याविषयीं अतिनिलागु,
जयाचिया मनीं वेगु, विकल्पाचा ॥ ६८३ ॥

निसुगु=निर्लज्ज  अतिनिलागु=कंटाळा

तो जाण निखिळा, अज्ञानाचा पुतळा,
जो बांधोनि असे डोळां, वित्ताशेतें ॥ ६८४ ॥

वित्ताशेतें=धन व स्त्री

आणि स्वार्थें अळुमाळें, जो धैर्यापासोनि चळे,
जैसें तृणबीज ढळे, मुंगियेचेनी ॥ ६८५ ॥

पावो सूदलिया सवें, जैसें थिल्लर कालवे,
तैसा भयाचेनि नांवें, गजबजे जो ॥ ६८६ ॥

सूदलिया=शिरता   थिल्लर=डबके

मनोरथांचिया धारसा, वाहणें जयाचिया मानसा,
पूरीं पडिला जैसा, दुधिया पाहीं ॥ ६८७ ॥

दुधिया=भोपळा

वायूचेनि सावायें, धू दिगंतरा जाये,
दुःखवार्ता होये, तसें जया ॥ ६८८ ॥

वाउधणाचिया परी, जो आश्रो कहींचि न धरी,
क्षेत्रीं तीर्थीं पुरीं, थारों नेणे ॥ ६८९ ॥

वाउधणाचिया=वावटळ

कां मातलिया सरडा, पुढती बुडुख पुढती शेंडा,
हिंडणवारा कोरडा, तैसा जया ॥ ६९० ॥

जैसा रोविल्याविणें, रांजणु थारों नेणे,
तैसा पडे तैं राहणें, एऱ्हवीं हिंडे ॥ ६९१ ॥

तयाच्या ठायीं उदंड, अज्ञान असे वितंड,
जो चांचल्यें भावंड, मर्कटाचें ॥ ६९२ ॥



by dr. vikrant tikone 
***************************************************

1 comment: