Thursday, January 5, 2017

ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओव्या ८०५ ते ८६४ अज्ञान पुढे चालू





ज्ञानेश्वरी / अध्याय तेरावा / संत ज्ञानेश्वर

अज्ञान पुढे चालू ओव्या ८०५ ते ८६४


आणि मातलिया सागरीं, मोकललिया तरी,
लाटांच्या येरझारीं, आंदोळे जेवीं ॥ ८०५ ॥

मातलिया =मजला खवळला मोकललिया=सापडला

तेवीं प्रिय वस्तु पावे, आणि सुखें जो उंचावे,
तैसाचि अप्रियासवें, तळवटु घे ॥ ८०६ ॥

ऐसेनि जयाचे चित्तीं, वैषम्यसाम्याची वोखती,
वाहे तो महामती, अज्ञान गा ॥ ८०७ ॥

वोखती,=चिंता

आणि माझ्या ठायीं भक्ती, फळालागीं जया आर्ती,
धनोद्देशें विरक्ती, नटणें जेवीं ॥ ८०८ ॥

नातरी कांताच्या मानसी, रिगोनि स्वैरिणी जैसी,
राहाटे जारेंसीं, जावयालागीं ॥ ८०९ ॥

रिगोनि =मन राखून रिझवून

तैसा मातें किरीटी, भजती गा पाउटी,
करूनि जो दिठी, विषो सूये ॥ ८१० ॥

पाउटी=पायरी समजून  (पायवाट)

आणि भजिन्नलियासवें, तो विषो जरी न पावे,
तरी सांडी म्हणे आघवें, टवाळ हें ॥ ८११ ॥

टवाळ=व्यर्थ ,उनाडपण

कुणबट कुळवाडी, तैसा आन आन देव मांडी,
आदिलाची परवडी, करी तया ॥ ८१२ ॥

कुणबट= कुणबी कष्ट्णारा   कुळवाडी=शेतकरी मालक (यांचा संबंध)
आदिलाची =अगोदरचा  परवडी,= व्यवहार पटणे (पावणे)

तया गुरुमार्गा टेंकें, जयाचा सुगरवा देखे,
तरी तयाचा मंत्र शिके, येरु नेघे ॥ ८१३ ॥

टेंकें=चिकटणे  सुगरवा=श्रीमंती थाट माट

प्राणिजातेंसीं निष्ठुरु, स्थावरीं बहु भरु,
तेवींचि नाहीं एकसरु, निर्वाहो जया ॥ ८१४ ॥

स्थावरीं =दगड मातीचे देव  भरु=प्राधान्य
एकसरु =एकनिष्ठ निर्वाहो=भक्ती


माझी मूर्ति निफजवी, ते घराचे कोनीं बैसवी,
आपण देवो देवी, यात्रे जाय ॥ ८१५ ॥

नित्य आराधन माझें, काजीं कुळदैवता भजे,
पर्वविशेषें कीजे, पूजा आना ॥ ८१६ ॥

माझें अधिष्ठान घरीं, आणि वोवसे आनाचे करी,
पितृकार्यावसरीं, पितरांचा होय ॥ ८१७ ॥

वोवसे=व्रत

एकादशीच्या दिवशीं, जेतुला पाडु आम्हांसी,
तेतुलाचि नागांसी, पंचमीच्या दिवशीं ॥ ८१८ ॥

चौथ मोटकी पाहे, आणि गणेशाचाचि होये,
चावदसी म्हणे माये, तुझाचि वो दुर्गे ॥ ८१९ ॥

नित्य नैमित्तिकें कर्में सांडी, मग बैसे नवचंडी,
आदित्यवारीं वाढी, बहिरवां पात्रीं ॥ ८२० ॥

बहिरवां=भैरव

पाठीं सोमवार पावे, आणि बेलेंसी लिंगा धांवे,
ऐसा एकलाचि आघवे, जोगावी जो ॥ ८२१ ॥

ऐसा अखंड भजन करी, उगा नोहे क्षणभरी,
अवघेन गांवद्वारीं, अहेव जैसी ॥ ८२२ ॥

अहेव=वेश्या

ऐसेनि जो भक्तु, देखसी सैरा धांवतु,
जाण अज्ञानाचा मूर्तु, अवतार तो ॥ ८२३ ॥

आणि एकांतें चोखटें, तपोवनें तीर्थे तटें,
देखोनि जो गा विटे, तोहि तोचि ॥ ८२४ ॥

जया जनपदीं सुख, गजबजेचें कवतिक,
वानूं आवडे लौकिक, तोहि तोची ॥ ८२५ ॥

आणि आत्मा गोचरु होये, ऐसी जे विद्या आहे,
ते आइकोनि डौर वाहे, विद्वांसु जो ॥ ८२६ ॥

डौर=डौल गर्व दाखवून बडबडणे , विद्वांसु=पांडित्य

उपनिषदांकडे न वचे, योगशास्त्र न रुचे,
अध्यात्मज्ञानीं जयाचें, मनचि नाहीं ॥ ८२७ ॥

आत्मचर्चा एकी आथी, ऐसिये बुद्धीची भिंती,
पाडूनि जयाची मती, वोढाळ जाहली ॥ ८२८ ॥

वोढाळ=स्वैर बुद्धीची भिंती=(विवेकाला दिलेली उपमा  )

कर्मकांड तरी जाणे, मुखोद्गत पुराणें,
ज्योतिषीं तो म्हणे, तैसेंचि होय ॥ ८२९ ॥

शिल्पीं अति निपुण, सूपकर्मींही प्रवीण,
विधि आथर्वण, हातीं आथी ॥ ८३० ॥

सूपकर्मींही=पाकशास्त्र  आथर्वण=जारण मारण

कोकीं नाहीं ठेलें, भारत करी म्हणितलें,
आगम आफाविले, मूर्त होतीं ॥ ८३१ ॥

आगम =शास्त्र आफाविले=उपासले

नीतिजात सुझे, वैद्यकही बुझे,
काव्यनाटकीं दुजें, चतुर नाहीं ॥ ८३२ ॥

स्मृतींची चर्चा, दंशु जाणे गारुडियाचा,
निघंटु प्रज्ञेचा, पाइकी करी ॥ ८३३ ॥

गारुडियाचा =इंद्रजाल  निघंटु=वैदक शब्दकोश

पैं व्याकरणीं चोखडा, तर्कीं अतिगाढा,
परी एक आत्मज्ञानीं फुडा, जात्यंधु जो ॥ ८३४ ॥

फुडा=उघड स्पष्ट खरोखर

तें एकवांचूनि आघवां शास्त्रीं, सिद्धांत निर्माणधात्री,
परी जळों तें मूळनक्षत्रीं, न पाहें गा ॥ ८३५ ॥

निर्माणधात्री,=सिद्धत निर्माण करणारा, ब्रह्मदेव
तें=मूळ नक्षत्रावर जन्मेलेल मुल

मोराआंगीं अशेषें, पिसें असतीं डोळसें,
परी एकली दृष्टि नसे, तैसें तें गा ॥ ८३६ ॥

जरी परमाणू{}वढें, संजीवनीमूळ जोडे,
तरी बहु काय गाडे, भरणें येरें ? ॥ ८३७ ॥

आयुष्येंवीण लक्षणें, सिसेंवीण अळंकरणें,
वोहरेंवीण वाधावणें, तो विटंबु गा ॥ ८३८ ॥

लक्षणें=अंगलक्षणे(प्रेताची)  सिसेंवीण=शिराविन

वोहरेंवीण=वधूवराविना वाधावणें=वरात


तैसें शास्त्रजात जाण, आघवेंचि अप्रमाण,
अध्यात्मज्ञानेंविण, एकलेनी ॥ ८३९ ॥

यालागीं अर्जुना पाहीं, अध्यात्मज्ञानाच्या ठायीं,
जया नित्यबोधु नाहीं, शास्त्रमूढा ॥ ८४० ॥

तया शरीर जें जालें, तें अज्ञानाचें बीं विरुढलें,
तयाचें व्युत्पन्नत्व गेलें, अज्ञानवेलीं ॥ ८४१ ॥

तो जें जें बोले, तें अज्ञानचि फुललें,
तयाचें पुण्य जें फळलें, तें अज्ञान गा ॥ ८४२ ॥

आणि अध्यात्मज्ञान कांहीं, जेणें मानिलेंचि नाहीं,
तो ज्ञानार्थु न देखे काई, हें बोलावें असें ? ॥ ८४३ ॥

ऐलीचि थडी न पवतां, पळे जो माघौता,
तया पैलद्वीपींची वार्ता, काय होय ? ॥ ८४४ ॥

कां दारवंठाचि जयाचें, शीर रोंविलें खांचे,
तो केवीं परिवरींचें, ठेविलें देखे ? ॥ ८४५ ॥

 खांचे,=खड्ड्यात  परिवरींचें-=घरातील ठेविलें=धन ठेवा


तेवीं अध्यात्मज्ञानीं जया, अनोळख धनंजया,
तया ज्ञानार्थु देखावया, विषो काई ? ॥ ८४६ ॥

विषो=विषय

म्हणौनि आतां विशेषें, तो ज्ञानाचें तत्त्व न देखे,
हें सांगावें आंखेंलेखें, न लगे तुज ॥ ८४७ ॥

आंखेंलेखें,=हिशोब करून

जेव्हां सगर्भे वाढिलें, तेव्हांचि पोटींचें धालें,
तैसें मागिलें पदें बोलिलें, तेंचि होय ॥ ८४८ ॥

सगर्भे=गर्भवती
मागिलें पदें=मागील पदातील ज्ञान निरुपण

वांचूनियां वेगळें, रूप करणें हें न मिळे,
जेवीं अवंतिलें आंधळें, तें दुजेनसीं ये ॥ ८४९ ॥

हें न मिळे,= (हे कशाला)   
दुजेनसीं=दुसऱ्यास घेवून

एवं इये उपरतीं, अज्ञानचिन्हें मागुतीं,
अमानित्वादि प्रभृती, वाखाणिलीं ॥ ८५० ॥

जे ज्ञानपदें अठरा, केलियां येरी मोहरां,
अज्ञान या आकारा, सहजें येती ॥ ८५१ ॥

येरी मोहरां,=उलटी विरुद्ध

मागां श्लोकाचेनि अर्धार्धें, ऐसें सांगितलें श्रीमुकुंदें,
ना उफराटीं इयें ज्ञानपदें, तेंचि अज्ञान ॥ ८५२ ॥

श्लोकाचेनि अर्धार्धें=४ थ्या श्लोकातील उत्तरार्धात


म्हणौनि इया वाहणीं, केली म्यां उपलवणी,
वांचूनि दुधा मेळऊनि पाणी, फार कीजे ? ॥ ८५३ ॥

उपलवणी=स्पष्ट उलगडून
वांचूनि=असे नाही बरे की

तैसें जी न बडबडीं, पदाची कोर न सांडी,
परी मूळध्वनींचिये वाढी, निमित्त जाहलों ॥ ८५४ ॥

कोर=सीमा मर्यादा

तंव श्रोते म्हणती राहें, कें परिहारा ठावो आहे ?,
बिहिसी कां वायें, कविपोषका ? ॥ ८५५ ॥

परिहारा=खुलासा निरसन करणे

तूतें श्रीमुरारी, म्हणितलें आम्ही प्रकट करीं,
जें अभिप्राय गव्हरीं, झांकिले आम्हीं ॥ ८५६ ॥

गव्हरीं=गुप्त गुहेत

तें देवाचें मनोगत, दावित आहासी तूं मूर्त,
हेंही म्हणतां चित्त, दाटैल तुझें ॥ ८५७ ॥

म्हणौनि असो हें न बोलों, परि साविया गा तोषलों,
जे ज्ञानतरिये मेळविलों, श्रवण सुखाचिये ॥ ८५८ ॥

ज्ञानतरिये=ज्ञान नौका

आतां इयावरी, जे तो श्रीहरी,
बोलिला तें करीं, कथन वेगां ॥ ८५९ ॥

इया संतवाक्यासरिसें, म्हणितलें निवृत्तिदासें,
जी अवधारा तरी ऐसें, बोलिलें देवें ॥ ८६० ॥

म्हणती तुवां पांडवा, हा चिन्हसमुच्चयो आघवा,
आयकिला तो जाणावा, अज्ञानभागु ॥ ८६१ ॥

इया अज्ञानविभागा, पाठी देऊनि पैं गा,
ज्ञानविखीं चांगा, दृढा होईजे ॥ ८६२ ॥

पाठी देऊनि=सोडून

मग निर्वाळिलेनि ज्ञानें, ज्ञेय भेटेल मनें,
तें जाणावया अर्जुनें, आस केली ॥ ८६३ ॥

निर्वाळिलेनि=शुद्ध होवून  

तंव सर्वज्ञांचा रावो, म्हणे जाणौनि तयाचा भावो,
परिसें ज्ञेयाचा अभिप्रावो, सांगों आतां ॥ ८६४ ॥



by dr. vikrant tikone 
==============================================

1 comment:

  1. खरंतर हा भाग समजायला अवघड वाटला. मराठी पण अगम्य वाटलं . ठिक आहे पुढच्या वाचनात प्रकाशेल .

    ReplyDelete