ज्ञानेश्वरी / अध्याय
तेरावा / संत ज्ञानेश्वर
ओव्या ६१६ ते ६५२ एकात्म बुद्धी आणि ज्ञान
अध्यात्मज्ञाननित्यत्वं तत्त्वज्ञानार्थदर्शनम्।
एतद्ज्ञानमिति प्रोक्तमज्ञानं यदतोन्यथा ॥ ११॥
तरी परमात्मा ऐसें, जें एक वस्तु असे,
तें जया दिसें, ज्ञानास्तव ॥ ६१६ ॥
तें एकवांचूनि आनें, जियें भवस्वर्गादि ज्ञानें,
तें अज्ञान ऐसा मनें, निश्चयो केला ॥ ६१७ ॥
भव=ऐहिक
स्वर्गा जाणें हें सांडी, भवविषयीं कान झाडी,
दे अध्यात्मज्ञानीं बुडी, सद्भावाची ॥ ६१८ ॥
भंगलिये वाटे, शोधूनिया अव्हांटे,
निघिजे जेवीं नीटें, राजपंथें ॥ ६१९ ॥
तैसें ज्ञानजातां करी, आघवेंचि एकीकडे सारी,
मग मन बुद्धि मोहरी, अध्यात्मज्ञानीं ॥ ६२० ॥
म्हणे एक हेंचि आथी, येर जाणणें ते भ्रांती,
ऐसी निकुरेंसी मती, मेरु होय ॥ ६२१ ॥
निकुरेंसी=निर्धार निश्चय
एवं निश्चयो जयाचा, द्वारीं आध्यात्मज्ञानाचा,
ध्रुव देवो गगनींचा, तैसा राहिला ॥ ६२२ ॥
तयाच्या ठायीं ज्ञान, या बोला नाहीं आन,
जे ज्ञानीं बैसलें मन, तेव्हांचि तें तो मी ॥ ६२३ ॥
तरी बैसलेपणें जें होये, बैसतांचि बोलें न होये,
तरी ज्ञाना तया आहे, सरिसा पाडु ॥ ६२४ ॥
आणि तत्त्वज्ञान निर्मळ, फळे जें एक फळ,
तें ज्ञेयही वरी सरळ, दिठी जया ॥ ६२५ ॥
एऱ्हवीं बोधा आलेनि ज्ञानें, जरी ज्ञेय न दिसेचि मनें,
तरी ज्ञानलाभुही न मने, जाहला सांता ॥ ६२६ ॥
आंधळेनि हातीं दिवा, घेऊनि काय करावा ?,
तैसा ज्ञाननिश्चयो आघवा, वायांचि जाय ॥ ६२७ ॥
जरि ज्ञानाचेनि प्रकाशें, परतत्त्वीं दिठी न पैसे,
ते स्फूर्तीचि असे, अंध होऊनी ॥ ६२८ ॥
पैसे,=पसरणे विस्ताराने पाहणे
म्हणौनि ज्ञान जेतुलें दावीं, तेतुली वस्तुचि आघवी,
तें देखे ऐशी व्हावी, बुद्धि चोख ॥ ६२९ ॥
यालागीं ज्ञानें निर्दोखें, दाविलें ज्ञेय देखे,
तैसेनि उन्मेखें, आथिला जो ॥ ६३० ॥
उन्मेखें=बुद्धी
जेवढी ज्ञानाची वृद्धी, तेवढीच जयाची बुद्धी,
तो ज्ञान हे शब्दीं, करणें न लगे ॥ ६३१ ॥
पैं ज्ञानाचिये प्रभेसवें, जयाची मती ज्ञेयीं पावे,
तो हातधरणिया शिवे, परतत्त्वातें ॥ ६३२ ॥
हातधरणिया=हात धरून स्पर्श
करणे
तोचि ज्ञान हें बोलतां, विस्मो कवण पंडुसुता ?,
काय सवितयातें सविता, म्हणावें असें ? ॥ ६३३ ॥
तंव श्रोतें म्हणती असो, न सांगें तयाचा अतिसो,
ग्रंथोक्ती तेथ आडसो, घालितोसी कां ? ॥ ६३४ ॥
आडसो=अडसर
तुझा हाचि आम्हां थोरु, वक्तृत्वाचा पाहुणेरु,
जे ज्ञानविषो फारु, निरोपिला ॥ ६३५ ॥
रसु होआवा अतिमात्रु, हा घेतासि कविमंत्रु,
तरी अवंतूनि शत्रु, करितोसि कां गा ? ॥ ६३६ ॥
अतिमात्रु,=जास्त प्रमाणात
ठायीं बैसतिये वेळे, जे रससोय घेऊनि पळे,
तियेचा येरु वोडव मिळे, कोणा अर्था ? ॥ ६३७ ॥
रससोय =जेवण अन्न
तियेचा =त्यावेळेचा वोडव= आदर सत्कार
आघवाचि विषयीं भादी, परी सांजवणीं टेंकों नेदी,
ते खुरतोडी नुसधी, पोषी कवण ? ॥ ६३८ ॥
भादी=चांगली टेंकों=स्पर्शून (दुध काढायला) खुरतोडी=गाय
तैसी ज्ञानीं मती न फांके, येर जल्पती नेणों केतुकें,
परि तें असो निकें, केलें तुवां ॥ ६३९ ॥
जया ज्ञानलेशोद्देशें, कीजती योगादि सायासें,
तें धणीचें आथी तुझिया ऐसें, निरूपण ॥ ६४० ॥
धणीचें=तृप्ती आथी=समाधान असणे
अमृताची सातवांकुडी, लागो कां अनुघडी,
सुखाच्या दिवसकोडी, गणिजतु कां ॥ ६४१ ॥
सातवांकुडी=सतत ७ दिवस अनुघडी=वर्षाव
दिवसकोडी=कोट्यावधी दिवस
पूर्णचंद्रेंसीं राती, युग एक असोनि पहाती,
तरी काय पाहात आहाती, चकोर ते ? ॥ ६४२ ॥
तैसें ज्ञानाचें बोलणें, आणि येणें रसाळपणें,
आतां पुरे कोण म्हणे ?, आकर्णितां ॥ ६४३ ॥
आणि सभाग्यु पाहुणा ये, सुभगाचि वाढती होये,
तैं सरों नेणें रससोये, ऐसें आथी ॥ ६४४ ॥
सभाग्यु =भाग्यशाली सुभगाचि= भाग्यवंती
तैसा जाहला प्रसंगु, जे ज्ञानीं आम्हांसि लागु,
आणि तुजही अनुरागु, आथि तेथ ॥ ६४५ ॥
लागु=आवड अनुरागु=प्रेम
म्हणौनि यया वाखाणा-, पासीं से आली चौगुणा,
ना म्हणों नयेसि देखणा ?, होसी ज्ञानी ॥ ६४६ ॥
से आली चौगुणा,=चौपट
स्फूर्ती इच्छा
देखणा =डोळस
तरी आतां ययावरी, प्रज्ञेच्या माजघरीं,
पदें साच करीं, निरूपणीं ॥ ६४७ ॥
या संतवाक्यासरिसें, म्हणितलें निवृत्तिदासें,
माझेंही जी ऐसें, मनोगत ॥ ६४८ ॥
यावरी आतां तुम्हीं, आज्ञापिला स्वामी,
तरी वायां वागू मी, वाढों नेदी ॥ ६४९ ॥
एवं इयें अवधारा, ज्ञानलक्षणें अठरा,
श्रीकृष्णें धनुर्धरा, निरूपिली ॥ ६५० ॥
मग म्हणें या नांवें, ज्ञान एथ जाणावें,
हे स्वमत आणि आघवें, ज्ञानियेही म्हणती ॥ ६५१ ॥
हे स्वमत आणि आघवें, ज्ञानियेही म्हणती ॥ ६५१ ॥
करतळावरी वाटोळा, डोलतु देखिजे आंवळा,
तैसें ज्ञान आम्हीं डोळां, दाविलें तुज ॥ ६५२ ॥
by डॉ.
विक्रांत तिकोणे
------------------------**************************
सुंदर !
ReplyDelete