ज्ञानेश्वरी / अध्याय
नववा राजविद्याराजगुह्ययोग संत ज्ञानेश्वर
ओव्या २३९
ते
२९५
ज्ञानयज्ञेन चाप्यन्ये यजन्तो मामुपासते।
एकत्वेन पृथक्त्वेन बहुदा विश्वतोमुखम् ॥ १५ ॥
तरी ज्ञानयज्ञु तो एवंरुपु, तेथ आदिसंकल्पु हा यूपु।
महाभूतें मंडपु, भेदु तो पशु ॥ २३९ ॥
यूपु= यज्ञ खांब
मग पांचांचे जे विशेष गुण, अथवा इंद्रियें आणि प्राण।
हेचि यज्ञोपचारभरण, अज्ञान धृत ॥ २४० ॥
भरण=सामग्री गुण=शब्द स्पर्शादी
तेथ मनबुद्धीचिया कुंडा-, आंतु ज्ञानाग्नि धडफुडा।
साम्य तेचि सुहाडा, वेदि जाणें ॥ २४१ ॥
धडफुडा=प्रज्वलित सुहाडा=मित्रा
सविवेकमतिपाटव, तेचि मंत्रविद्यागौरव।
शांति स्त्रुकस्त्रुव, जीव यज्वा।। २४२ ॥
पाटव=कौशल्य स्त्रुकस्त्रुव=यज्ञ पात्रे
यज्वा=यज्ञ करणारा
तो प्रतीतीचेनि पात्रें, विवेकमहामंत्रें।
ज्ञानाग्निहोत्रें, भेदु नाशी ॥ २४३ ॥
तेथ अज्ञान सरोनि जाये, आणि यजिता यजन हें ठाये।
आत्मसमरसीं न्हाये, अवभृथीं जेव्हां ॥ २४४ ॥
अवभृथीं=यज्ञ साम्प्तीचे स्नान
तेव्हां भूतें विषय करणें , हें वेगळालें काहीं न म्हणे।
आघवें एकचि ऐसें जाणे, आत्मबुद्धी ॥ २४५ ॥
करणें=इंद्रिय गण
जैसा चेइला तो अर्जुना, म्हणे स्वप्नींची हें विचित्र सेना।
मीचि जाहालों होतों ना, निद्रावशें ॥ २४६ ॥
आतां सेना ते सेना नव्हे, हें मीच एक आघवें।
ऐसें एकत्वें मानवे, विश्व तया ॥ २४७ ॥
मग तो जीवु हे भाष सरे, आब्रह्म परमात्मबोधें भरे।
ऐसे भजती ज्ञानाध्वरें, एकत्वें येणें ॥ २४८ ॥
ज्ञानाध्वरें=ज्ञान यज्ञाने
अथवा अनादि हें अनेक, जे आनासारिखें एका एक।
आणि नामरुपादिक , तेंही विषम ॥ २४९ ॥
म्हणोनि विश्व भिन्न, परि न भेदे तयांचें ज्ञान।
जैसे अवयव तरी आन आन, परि एकेचि देहींचे ॥ २५० ॥
कां शाखा सानिया थोरा, परि आहाति एकाचिये तरुवरा।
बहु रश्मि परि दिनकरा, एकाचे जेवीं ॥ २५१ ॥
तेविं नानाविधा व्यक्ती, आनानें नामें आनानी वृत्ती।
ऐसें जाणती भेदलां भूतीं, अभेदा मातें ॥ २५२ ॥
येणें वेगळालेपणें पांडवा, करिती ज्ञानयज्ञु बरवा।
जे न भेंदतीं जाणिवा, जाणते म्हणउनि ॥ २५३ ॥
ना तरी जेधवां जिये ठायीं, देखती कां जें जें कांहीं।
तें मीवांचूनि नाहीं, ऐसाचि बोधु ॥ २५४ ॥
पाहें पां बुडबुडा जेउता जाये, तेउतें जळचि एक तया आहे।
मग विरे अथवा राहे , तऱ्ही जळाचिमाजि ॥ २५५ ॥
कां पवनें परमाणु उचलले, ते पृथ्वीपणावेगळे नाहीं गेले।
आणि माघौतें जरी पडले, तरी पृथ्वीचिवरी ॥ २५६ ॥
तैसें भलतेथ भलतेणें भावें, भलतेंही न हो अथवा होआवें।
परि तें मी ऐसें आघवें, होऊनि ठेलें ॥ २५७ ॥
अगा हे जेव्हडी माझी व्याप्ति, तेव्हडीचि तयांचि प्रतीति।
ऐसे बहुधाकारीं वर्तती, बहुचि होउनि ॥ २५८ ॥
हें भानुबिंब आवडेतया, सन्मुख जैसें धनंजया।
तैसें ते विश्वा या, समोर सदा ॥ २५९ ॥
आवडेतया=वाटते(पाहतो) तया
अगा तयांचिया ज्ञाना, पाठी पोट नाहीं अर्जुना।
वायु जैसा गगना, सर्वांगी असे ॥ २६० ॥
तैसा मी जेतुला आघवा, तेंचि तुक तयांचिया सद्भावा।
तरी न करितां पांडवा, भजन जहालें ॥ २६१ ॥
तुक=मोजमाप
एऱ्हवीं तरी सकळ मीचि आहें, तरी कवणीं कें उपासिला नोहें।
एथ एकें जाणणेवीण ठाये, अप्राप्तासी ॥ २६२ ॥
जाणणेवीण= ज्ञान नसल्यामुळे ठाये=होय
परि तें असो येणें उचितें, ज्ञानयज्ञें यजितसांते।
उपासिती मातें, ते सांगितले ॥ २६३ ॥
सांते=असती
अखंड सकळ हें सकळां मुखीं, सहज अर्पत असे मज एकीं।
कीं नेणणेयासाठीं मूर्खीं, न पविजेचि मातें ॥ २६४ ॥
अहं क्रतुरहं यज्ञ: स्वधाहमहमौषधम्।
मन्त्रोऽहमहमेवाज्यमहमग्निरहं हुतम् ॥ १६ ॥
तोचि जाणिवेचा उदयो जरी होये, तरी मुदल वेदु मीचि आहें।
आणि तो विधानातें जया विये, तो क्रतुही मीचि ॥ २६५ ॥
जाणिवेचा उदयो =ज्ञानाचा उदय विधानातें=यज्ञ क्रीयेचे नियम
क्रतुही=यज्ञकर्म
मग तया कर्मापासूनि बरवा, जो सांगोपांगु आघवा।
यज्ञु प्रगटे पांडवा, तोही मी गा ॥ २६६ ॥
स्वाहा मी स्वधा, सोमादि औषधी विविधा।
आज्य मी समिधा, मंत्रु मी हवि ॥ २६७ ॥
स्वाहा=देवांना द्यायचे आहुतीचे अन्न
स्वधा=पितरांना द्यायचे अन्न पिंड
आज्य=तूप
हवि=हवन द्रव्य
होता मी हवन कीजे, तेथ अग्नि तो स्वरुप माझें।
आणि हुतक वस्तू जें जें, तेही मीचि ॥ २६८ ॥
होता=यज्ञ करणारा हुतक=हवन द्रव्य
पिताहमस्य जगतो माता धाता पितामह:।
वेद्यं पवित्रमोंकार ऋक्साम यजुरेव च ॥ १७ ॥
पैं जयाचेनि अंगेसंगें, इये प्रकृतीस्तव अष्टांगे।
जन्म पाविजत असे जगें, तो पिता मी गा ॥ २६९ ॥
अर्धनारीनटेश्वरीं, जो पुरुष तोचि नारी।
तेविं मी चराचरीं, माताही होय ॥ २७० ॥
आणि जाहालें जग जेथ राहे, जेंणे जित वाढत आहे।
तें मीचि वाचूनि नोहे, आन निरुतें ॥ २७१ ॥
इयें प्रकृतिपुरुषें दोन्ही, उपजलीं जयाचिया अमनमनीं।
तो पितामह त्रिभुवनीं, विश्वाचा मी ॥ २७२ ॥
अमनमनीं=मनरहित स्थिती
आणि आघवेयां जाणणेयांचिया वाटा, जया गांवा येती गा सुभटा।
जे वेदांचियां चोहटां, वेद्य जें म्हणिजे ॥ २७३ ॥
चोहटां=चौक
जेथ नाना मतां बुझावणी जाहाली, एकमेकां शास्त्रांची अनोळखी फिटली ।
चुकलीं ज्ञानें जेथ मिळों आलीं, जे पवित्र म्हणिजे ॥ २७४ ॥
बुझावणी=समजूत एकमत
पै ब्रह्मबीजा जाहला अंकुरु, घोषध्वनीनादाकारु।
तयांचें गा भुवन जो ॐकारु, तोही मी गा ॥ २७५ ॥
घोष ध्वनी नाद आकारु
जया ॐकाराचिये कुशी, अक्षरें होती अउमकारेंसीं।
जियें उपजत वेदेंसीं, उठलीं तिन्हीं ॥ २७६ ॥
म्हणोनि ऋग्यजुःसामु, हे तिन्ही म्हणे मी आत्मारामु।
एंव मीचि कुलक्रमु, शब्दब्रह्माचा ॥ २७७ ॥
कुलक्रमु=परंपरा शब्दब्रह्माचा=वेदा
गतिर्भर्ता प्रभु: साक्षी निवास: शरणं सुहृत्।
प्रभव: प्रलय: स्थानं निधानं बीजमव्ययम् ॥ १८ ॥
हें चराचर आघवें, जिये प्रकृती आंत साठवे।
ते शिणली जेथ विसवे, ते परमगती मी ॥ २७८ ॥
आणि जयाचेनि प्रकृति जिये, जेणें अधिष्ठिली विश्व विये।
जो येऊनि प्रकृती इये, गुणातें भोगी ॥ २७९ ॥
तो विश्वश्रियेचा भर्ता, मीचि गा पंडुसुता।
मी गोसावी समस्ता, त्रैलोक्याचा ॥ २८० ॥
आकाशें सर्वत्र वसावें, वायूनें नावभरी उगें नसावें।
पावकें दहावें, वर्षावें जळें ॥ २८१ ॥
नावभरी=क्षणभर
पर्वतीं बैसका न संडावी, समुद्रीं रेखा नोलांडावी।
पृथ्वीया भूतें वाहावीं, हे आज्ञा माझी ॥ २८२ ॥
म्या बोलविल्या वेदु बोले, म्यां चालविल्या सूर्यु चाले।
म्यां हालविल्या प्राणु हाले, जो जगातें चाळिता ॥ २८३ ॥
चाळिता=चालवता
मियांचि नियमिलासांता, काळु ग्रासितसे भूतां।
इयें म्हणियागतें पंडुसुता, सकळें जयाचीं ॥ २८४ ॥
म्हणियागतें=नोकर आज्ञांकित
ऐसा जो समर्थु, तो मी जगाचा नाथु।
आणि गगनाऐसा साक्षिभूतु, तोहि मीचि ॥ २८५ ॥
इहीं नामरुपीं आघवा, जो भरला असे पांडवा।
आणि नामरुपांहि वोल्हावा, आपणचि जो ॥ २८६ ॥
वोल्हावा=आधार
जैसे जळाचे कल्लोळ, आणि कल्लोळ आथी जळ।
ऐसेनि वसवितसे सकळ, तो निवासु मी ॥ २८७ ॥
जो मज होय अनन्य शरण, त्याचें निवारीं मी जन्म मरण।
यालागीं शरणागता शरण्य, मीचि एकु ॥ २८८ ॥
मीचि एक अनेकपणें, वेगळालेनि प्रकृतीगुणें।
जीत जगाचेनि प्राणें, वर्तत असे ॥ २८९ ॥
जीत= जगणे ,जिवंत
जैसा समुद्र थिल्लर न म्हणतां, भलतेथ बिंबे सविता।
तैसा ब्रह्मादि सर्वां भूता, सुहृद तो मी ॥ २९० ॥
थिल्लर=डबके सुहृद=परममित्र
मीचि गा पांडवा, या त्रिभुवनासी वोलावा।
सृष्टिक्षयप्रभावा, मूळ तें मी ॥ २९१ ॥
वोलावा=आधार
बीज शाखांतें प्रसवे, मग तें रुखपण बीजीं सामावे।
तैसे संकल्पें होय आघवें, पाठीं संकल्पीं मिळे ॥ २९२ ॥
ऐसें जगाचें बीज जो संकल्पु, अव्यक्त वासनारुपु।
तया कल्पांतीं जेथ निक्षेपु, होय तें मी ॥ २९३ ॥
निक्षेपु=लय होणे
इयें नामरुपें लोटती, वर्णव्यक्ती आटती।
जातींचे भेद फिटती, जैं आकारु नाहीं ॥ २९४ ॥
तैं संकल्पु वासनासंस्कार, माघौतें रचावया आकार।
जेथ राहोनि असती अमर, तें निधान मी ॥ २९५ ॥
http://dnyaneshwariabhyas.blogspot.in/
सुंदर!
ReplyDelete