Saturday, May 28, 2016

ज्ञानेश्वरी अध्याय १० वा ओव्या १४९ ते२०५





ज्ञानेश्वरी / अध्याय दहावा / विभूती योग /संत ज्ञानेश्वर

  अर्जुन उवाच, परं ब्रह्म परं धाम पवित्रं परमं भवान्।
  
पुरुषं शाश्वतं दिव्यमादिदेवमजं विभुम् ॥ १२॥

तरी होसी गा तूं परब्रह्म, जें या महाभूतां विसंवतें धाम।
पवित्र तूं परम, जगन्नाथा ॥ १४९ ॥

विसंवतें=विश्रांती

तूं परम दैवत तिहीं देवां, तूं पुरुष जी पंचविसावा।
दिव्य तूं प्रकृतिभावा-, पैलीकडील ॥ १५० ॥

पंचविसावा=सांख्य तत्वज्ञाना नुसार २५ वे तत्व परमेश्वर

अनादिसिद्ध तूं स्वामी, जो नाकळिजसी जन्मधर्मीं।
तो तूं हें आम्ही, जाणितलें आतां ॥ १५१ ॥

जन्मधर्मीं= जन्मास येणारा

तूं या कालयंत्रासि सूत्री, तूं जीवकळेची अधिष्ठात्री।
तूं ब्रह्मकटाहधात्री, हें कळलें फुडें ॥ १५२ ॥

ब्रह्मकटाह= ब्रह्म रूप कढई

  
आहुस्त्वामृषयः सर्वे देवर्षिनारदस्तथा।
  
असितो देवलो व्यासः स्वयं चैव ब्रवीषि मे ॥ १३॥

पैं आणिकही एक परी, इये प्रतीतीची येतसे थोरी।
जे मागें ऐसेंचि ऋषीश्वरीं, सांगितलें तूंतें ॥ १५३ ॥

तूंतें=तुझ्याबद्दल

परि तया सांगितलियाचें साचपण, हें आतां माझें देखतसे अंतःकरण,
 जे कृपा केली आपण, म्हणोनि देवा ॥ १५४ ॥

एऱ्हवीं नारदु अखंड जवळां ये, तोही ऐसेंचि वचनीं गाये।
परि अर्थ न बुजोनि ठाये, गीतसुखचि ऐकों ॥ १५५ ॥

बुजोनि=कळून
जी आंधळेयांचां गांवीं, आपणपें प्रगटलें रवी।
तरी तिहीं वोतपलीचि घ्यावी, वांचूनि प्रकाशु कैंचा ? ॥ १५६ ॥

वोतपलीचि=उष्णता

येरवीं देवर्षि अध्यात्म गातां, आहाच रागांगेंसीं जे मधुरता।
तेचि फावे येर चित्ता, नलगेचि कांहीं ॥ १५७ ॥

आहाच=वरवर
पैं असिता देवलाचेनिहि मुखें, मी एवंविधा तूंतें आइकें।
परी तैं बुद्धि विषयविखें, घारिली होती ॥ १५८ ॥

असिता देवलाचेनिहि= या नावाचे ऋषी

विषयविषाचा पडिपाडू, गोड परमार्थु लागे कडू।
कडू विषय तो गोडू, जीवासी जाहला ॥ १५९ ॥

पडिपाडू=जोर

आणि हें आणिकांचें काय सांगावें, राउळा आपणचि येऊनि व्यासदेवें,
तुझें स्वरूप आघवें, सर्वदा सांगिजे ॥ १६० ॥

राउळा=घरी

परि तो अंधारीं चिंतामणि देखिला, जेवीं नव्हे या बुद्धी उपेक्षिला,
पाठीं दिनोदयीं वोळखिला, होय म्हणौनि ॥ १६१ ॥

तैसीं व्यासादिकांचीं बोलणीं, तिया मजपाशीं चिद्रत्नांचिया खाणी,
परि उपेक्षिल्या जात होतीया तरणी, तुजवीण कृष्णा ॥ १६२ ॥

तरणी=सूर्य

  
सर्वमेतदृतं मन्ये यन्मां वदसि केशव।
  
न हि ते भगवन् व्यक्तिं विदुर्देवा न दानवाः ॥ १४॥

ते आतां वाक्यसूर्यकर तुझे फांकले, आणि ऋषीं मार्ग होते जे कथिले।
तयां आघवियांचेंचि फिटलें, अनोळखपण ॥ १६३ ॥

जी ज्ञानाचें बीज तयांचे बोल, माजीं हृदयभूमिके पडिले सखोल,
 वरि इये कृपेची जाहाली वोल, म्हणोनि संवादफळेंशीं उठलें ॥ १६४ ॥

अहो नारदादिकां संतां, त्यांचिया उक्तिरूप सरिता।
मी महोदधीं जालां अनंता, संवादसुखाचा ॥ १६५ ॥

प्रभु आघवेनि येणें जन्में, जियें पुण्यें केलीं मियां उत्तमें।
तयांचीं न ठकतीचि अंगीं कामें, सद्गुरु तुवां ॥ १६६ ॥

ठकतीचि=पूर्णत्व न येती

एऱ्हवीं वडिलवडिलांचेनि मुखें, मी सदां तूंतें कानीं आइकें।
परि कृपा न कीजेचि तुवां एकें, तंव नेणवेचि कांहीं ॥ १६७ ॥

म्हणोनि भाग्य जैं सानुकूळ, जालिया केले उद्यम सदां सफळ।
तैसें श्रुताधीत सकळ, गुरुकृपा साच ॥ १६८ ॥

श्रुताधीत=श्रुतींनी वर्णन केलेले

जी बनकरु झाडें सिंपी जीवेंसाटीं, पाडूनि जन्में काढी आटी।
परि फळेंसी तैंचि भेटी, जैं वसंतु पावे ॥ १६९ ॥

बनकरु =माळी   जीवेंसाटीं=जीवापाड
अहो विषमा जैं वोहट पडे, तैं मधुर तें मधुर आवडे।
पैं रसायनें तैं गोडें, जैं आरोग्य देहीं ॥ १७० ॥

विषमा =विषमज्वर  वोहट=उतार

कां इंद्रियें वाचा प्राण, यां जालियांचे तैंचि सार्थकपण।
जैं चैतन्य येऊनि आपण, संचरे माजीं ॥ १७१ ॥

तैसें शब्दजात आलोडिलें, अथवा योगादिक जें अभ्यासिलें।
तें तैंचि म्हणों ये आपुलें, जैं सानुकूल गुरु ॥ १७२ ॥

आलोडिलें=अवलोकन केले, अध्ययन

ऐसिये जालिये प्रतीतीचेनि माजें, अर्जुन निश्चयाचि नाचतुसें भोजें,
तेवींचि म्हणे देवा तुझें, वाक्य मज मानलें ॥ १७३ ॥

तरि साचचि हें कैवल्यपती, मज त्रिशुद्धी आली प्रतीती।
जे तूं देवदानवांचिये मती-, जोगा नव्हसी ॥ १७४ ॥

त्रिशुद्धी=त्रिवार

तुझें वाक्य व्यक्ती न येतां देवा, जो आपुलिया जाणे जाणिवा।
तो कहींचि नोहे हें सद्भावा, भरंवसेनि आलें ॥ १७५ ॥

व्यक्ती=तू सांगितल्या शिवाय (उपदेश )
जाणे जाणिवा=स्वबुद्धीने जाणले असे म्हणतो

  
स्वयमेवात्मनात्मानं वेत्थ त्वं पुरुषोत्तम।
  
भूतभावन भूतेश देवदेव जगत्पते ॥ १५॥

एथ आपुलें वाडपण जैसें, आपणचि जाणिजे आकाशें।
कां मी येतुली घनवट ऐसें, पृथ्वीचि जाणे ॥ १७६ ॥

वाडपण=मोठेपण  घनवट=स्थिर

तैसा आपुलिये सर्वशक्ती, तुज तूंचि जाणूं लक्ष्मीपती।
येर वेदादिक मती, मिरवती वायां ॥ १७७ ॥

हां गा मनातें मागां सांडावें, पवनातें वावीं मवावें।
आदिशून्य उतरोनि जावें, केउतें बाहीं ॥ १७८ ॥

वावीं=हातात मोजणे (मिठीत)      बाहीं=बाहूंनी

तैसें हें तुझें जाणणें आहे, म्हणोनि कोणाही ठाकतें नोहे।
आतां तुझें ज्ञान होये, तुजचिजोगें ॥ १७९ ॥

जी आपणपयातें तूंचि जाणसी, आणिकातें सांगावयाही तूं समर्थ होसी।
तरी आतां एक वेळ घाम पुसीं, आर्तीचिये निडळींचा ॥ १८० ॥

आर्तीचिये =उत्कटता  निडळींचा=कपाळीचा

हें आइकिलें कीं भूतभावना, त्रिभुवनगजपंचानना,
सकळदेवदेवतार्चना, जगन्नायका ॥ १८१ ॥

जरी थोरी तुझी पाहात आहों, तरी पासीं उभे ठाकावयाही योग्य नोहों।
या शोच्यता जरी विनवूं बिहों, तरी आन उपायो नाहीं ॥ १८२ ॥

शोच्यता=शोचनीय स्थिती

भरले समुद्रसरिता चहूंकडे, परि ते बापियासि कोरडे।
कां जैं मेघौनि थेंबुटा पडे, तैं पाणी कीं तया ॥ १८३ ॥

बापियासि=चातक

तैसे गुरु जी सर्वत्र आथी, परि कृष्णा आम्हां तूंचि गती।
हें असो मजप्रती, विभूती सांगें ॥ १८४ ॥

  
वक्तुमर्हस्यशेषेण दिव्या ह्यात्मविभूतयः।
  
याभिर्विभूतिर्लोकानिमांस्त्वं व्याप्य तिष्ठसि ॥ १६॥

जी तुझिया विभूती आघविया, परि व्यापिती शक्ति दिव्या जिया,
तिया आपुलिया दावाविया, आपण मज ॥ १८५ ॥

जिहीं विभूतीं ययां समस्तां, लोकांतें व्यापूनि आहाती अनंता।
तिया प्रधाना नामांकिता, प्रगटा करीं ॥ १८६ ॥

  
कथं विद्यामहं योगिंस्त्वां सदा परिचिन्तयन्।
  
केषु केषु च भावेषु चिन्त्योऽसि भगवन्मया ॥ १७॥

जी कैसें मियां तूंतें जाणावें, काय जाणोनि सदा चिंतावें।
जरी तूंचि म्हणों आघवें, तरि चिंतनचि न घडे ॥ १८७ ॥

म्हणोनि मागां भाव जैसे, आपुले सांगितले तुवां उद्देशें।
आतां विस्तारोनि तैसे, एक वेळ बोलें ॥ १८८ ॥

उद्देशें=थोडक्यात

जयां जयां भावाचां ठायीं, तूंतें चिंतितां मज सायासु नाहीं।
तो विवळ करूनि देईं, योगु आपुला ॥ १८९ ॥

सायासु =कष्ट   विवळ= स्पष्ट

  
विस्तरेणात्मनो योगं विभूतिं च जनार्दन।
  
भूयः कथय तृप्तिर्हि श्रृण्वतो नास्ति मेऽमृतम् ॥ १८॥

आणि पुसलिया जिया विभूती, त्याही बोलाविया भूतपती।
येथ म्हणसी जरी पुढती, काय सांगों १९०

पुढती=परत, पुन्हा

तरी हा भाव मना, झणें जाय हो जनार्दना।
पैं प्राकृताही अमृतपाना, ना न म्हणवे जी ॥ १९१ ॥

प्राकृताही=सामान्य

जे काळकूटाचें सहोदर, जें मृत्यूभेणें प्याले अमर।
तरि दिहाचे पुरंदर, चौदा जाती ॥ १९२

पुरंदर=इंद्र
काळकूटाचें सहोदर=अमृत मंथनातून निघाले म्हणून  भाऊ
दिहाचे=ब्रह्म देवाचा एक दिवस

ऐसा कवण एक क्षीराब्धीचा रसु, जया वायांचि अमृतपणाचा आभासु,
तयाचाही मीठांशु, जे पुरे म्हणों नेदी ॥ १९३ ॥

वायांचि=व्यर्थ आभासु =भास
मीठांशु=लहान भाग (मिठागत)

तया पाबळेयाही येतुलेवरी, गोडियेचि आथि थोरी।
मग हें तंव अवधारीं, परमामृत साचें ॥ १९४ ॥

पाबळे= कमी प्रतीचे, हलके

जें मंदराचळु न ढाळितां, क्षीरसागरु न डहुळितां।
अनादि स्वभावता, आइतें आहे ॥ १९५ ॥

ढाळितां =उपटून आणता (मंथा)
डहुळितां = घुसळने, मंथन करता

जें द्रव ना नव्हे बद्ध, जेथ नेणिजती रस गंध।
जें भलतयांही सिद्ध, आठवलेंचि फावे ॥ १९६ ॥

बद्ध=कठीण स्थूळ भलतयांही=कोणालाही सिद्ध=पाप्त

जयाची गोठीचि ऐकतखेंवो, आघवा संसारु होय वावो।
बळिया नित्यता लागे येवों, आपणपेंया ॥ १९७ ॥

बळिया=सर्वश्रेष्ठ   

जन्ममृत्यूची भाख, हारपोनि जाय निःशेख।
आंत बाहेरी महासुख, वाढोंचि लागे ॥ १९८ ॥

मग दैवगत्या जरी सेविजे, तरी तें आपणचि होऊनि ठाकिजे।
तें तुज देतां चित्त माझें, पुरें म्हणों न शके ॥ १९९ ॥

तवं तुझें नामचि आम्हां आवडे, वरि भेटी होय आणि जवळिक जोडे,
पाठीं गोठी सांगसी सुरवाडें, आनंदाचेनी ॥ २०० ॥

सुरवाडें= सुखाने

आतां हें सुख कायिसयासारिखें, कांहीं निर्वचेना मज परितोखें।
तरि येतुलें जाणें जे येणें मुखें, पुनरुक्तही हो ॥ २०१ ॥

हां गा सूर्य काय शिळा ?, अग्नि म्हणों येत आहे वोंविळा।
कां नित्य वाहातया गंगाजळा, पारसेपण असे ॥ २०२ ॥

वोंविळा =ओवळा पारसेपण= पारोशेपण  

तुंवा स्वमुखें जें बोलिलें, हें आम्हीं नादासि रूप देखिलें।
आजि चंदनतरूचीं फुलें, तुरंबीत आहों मां ॥ २०३ ॥

या पार्थाचिया बोला, सर्वांगें कृष्ण डोलला।
म्हणे भक्तिज्ञानासि जाहला, आगरु हा ॥ २०४ ॥

ऐसा पतिकराचिया तोषा आंतु, प्रेमाचा वेगु उचंबळतु।
सायासें सांवरूनि अनंतु, काय बोले ॥ २०५ ॥

पतिकरा = प्रियकर

http://dnyaneshwariabhyas.blogspot.in/
ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ

=====================   =========================

1 comment:

  1. खरंच या अध्यायाचं चिंतन छान आहे!

    ReplyDelete