Monday, May 9, 2016

ज्ञानेश्वरी अध्याय १० वा ओव्या १ ते ४९



 

ज्ञानेश्वरी /अध्याय दहावा/विभूती योग/ संत ज्ञानेश्वर ओव्या १ ते ४९

नमो विशदबोधविदग्धा, विद्यारविंदप्रबोधा,
पराप्रमेयप्रमदा, विलासिया ॥ १ ॥
विशद=स्पष्ट करणारा , बोध=आत्मबोध ,विदग्धा=चतुर
विद्या=ब्रह्मविद्या अरविंद=कमळ प्रबोधा=जागे करणारा (विकसित)
पराप्रमेय स्वरूपाचे वर्णन करणे हे  परावाणीचे प्रमेय 
प्रमेयप्रमदा विलासिया =या प्रमेय रुपी स्त्री बरोबर विलास करणारा

नमो संसारतमसूर्या, अप्रतिमपरमवीर्या,
तरुणतरतूर्या, लालनलीला ॥ २ ॥

संसारतमसूर्या=संसार रुपी अंधाराचा नाश करणारा सूर्य
तरुणतरतूर्या=भरास आलेली तरुण अशी तुर्या अवस्था
लालनलीला=तिचे लाड व पालन करणे ही तयाची क्रीडा

नमो जगदखिलपालना, मंगळमणिनिधाना,
सज्जनवनचंदना, आराध्यलिंगा ॥ ३ ॥

मंगळमणिनिधाना=कल्याण रुपी रत्नाची खाण
आराध्यलिंगा=शिवलिंग स्वरूपा (स्वानुभूती)

नमो चतुरचित्तचकोरचंद्रा, आत्मानुभवनरेंद्रा,
श्रुतिसारसमुद्रा, मन्मथमन्मथा ॥ ४ ॥

मन्मथमन्मथा=मदनाला मोहात पाडणारा

नमो सुभावभजनभाजना, भवेभकुंभभंजना,
विश्वोद्भसवभुवना, श्रीगुरुराया ॥ ५ ॥

सुभावभजनभाजना=सुप्रितीने भजन करण्यास योग्य

भवेभकुंभभंजना=भवरुपी हत्तीचे गंडस्थळ फोडणारा सिंह
विश्वोद्भवभुवना=विश्व उद्भवाचे आश्रय

तुमचा अनुग्रहो गणेशु, जैं दे आपुला सौरसु,
तैं सारस्वतीं प्रवेशु, बाळकाही आथी ॥ ६ ॥

सौरसु,=सामर्थ्य सारस्वतीं= विद्या

जी दैविकीं उदार वाचा, जैं उद्देशु दे नाभिकाराचा,
तैं नवरससुधाब्धीचा, थावो लाभे ॥ ७ ॥

दैविकीं=दैवी नाभिकाराचा=अभय
थावो=ठाव

जी आपुलिया स्नेहाची वागेश्वरी, जरी मुकेयातें अंगिकारी,
तो वाचस्पतीशीं करी, प्रबंधुहोडा ॥ ८

वागेश्वरी=सरस्वती वाचस्पतीशीं=बृहस्पती प्रबंधु=ग्रंथरचना  होडा=पैज

हें असो दिठी जयावरी झळके, कीं हा पद्मकरु माथां पारुखे,
तो जीवचि परि तुके, महेशेंसीं ॥ ९ ॥

पारुखे,=पांघरतो ठेवतो

एवढें जिये महिमेचें करणें, तें वाचाबळें वानूं मी कवणें,
कां सूर्याचिया आंगा उटणें, लागत असे ? ॥ १० ॥

उटणें=(अंग उजळण्यासाठी लावायचे )

केउता कल्पतरुवरी फुलौरा ?, कायसेनि पाहुणेरु क्षीरसागरा ?,
कवणें वासीं कापुरा, सुवासु देवों ? ॥ ११ ॥

केउता=कशाला कायसेनि=अश्यासाठी

चंदनातें कायसेनि चर्चावें, अमृतातें केउतें रांधावें,
गगनावरी उभवावें, घडे केवीं ? ॥ १२ ॥

उभवावें=मंडप उभारावे  

तैसें श्रीगुरूचें महिमान, आकळितें कें असे साधन ?,
हें जाणोनि मियां नमन, निवांत केलें ॥ १३ ॥

जरी प्रज्ञेचेनि आथिलेपणें, श्रीगुरूसामर्थ्या रूप करूं म्हणे,
तरि तें मोतियां भिंग देणें, तैसें होईल ॥ १४ ॥

भिंग देणें=अभ्रक पुटे चढवणे

कां साडेपंधरया रजतवणी, तैशीं स्तुतींचीं बोलणीं,
उगियाचि माथा ठेविजे चरणीं, हेंचि भलें ॥ १५ ॥

साडेपंधरया =सोने    रजतवणी=चांदीचा मुलामा

मग म्हणितलें जी स्वामी, भलेनि ममत्वें देखिलें तुम्हीं,
म्हणौनि कृष्णार्जुनसंगमीं, प्रयागवटु जाहलों ॥ १६

प्रयागवटु= प्रयागावरील वटवृक्ष

मागां दूध दे म्हणतलियासाठीं, आघविया क्षीराब्धीची करूनि वाटी,
उपमन्यूपुढें धूर्जटी, ठेविली जैसी ॥ १७ ॥

धूर्जटी= भगवान शंकर

ना तरी वैकुंठपीठनायकें, रुसला ध्रुव कवतिकें,
बुझाविला देऊनि भातुकें, ध्रुवपदाचें ॥ १८ ॥

भातुकें=खाऊ

तैसी जे ब्रह्मविद्यारावो, सकळ शास्त्रांचा विसंवता ठावो,
ते भगवद्गीनता वोंविये गावों, ऐसें केलें ॥ १९ ॥

जे बोलणियाचे रानीं हिंडतां, नायकिजे फळलिया अक्षराची वार्ता |
परि ते वाचाचि केली कल्पलता, विवेकाची ॥ २० ॥

बोलणियाचे रानीं=शब्दरूपी रानात
फळलिया अक्षराची वार्ता, =कुणा वृक्षाला अर्थरूपी विवेक रुपी फळ आल्याची गोष्ट

होती देहबुद्धी एकसरी, ते आनंदभांडारा केली वोवरी।
मन गीतार्थसागरीं, जळशयन जालें ॥ २१ ॥

एकसरी=तादात्म्य वोवरी= खोली, जागा   

ऐसें एकेक देवांचें करणें, तें अपार बोलों केवीं मी जाणें।
तऱ्ही अनुवादलों धीटपणें, ते उपसाहिजो जी ॥ २२ ॥

आतां आपुलेनि कृपाप्रसादें, मियां भगवद्गीता वोंवीप्रबंधें।
पूर्वखंड विनोदें, वाखाणिलें ॥ २३ ॥

विनोदें=आनंदे

प्रथमीं अर्जुनाचा विषादु, दुजीं बोलिला योगु विशदु।
परि सांख्यबुद्धीसि भेदु, दाऊनियां ॥ २४ ॥

तिजीं केवळ कर्म प्रतिष्ठिलें, तेंचि चतुर्थीं ज्ञानेंशीं प्रगटिलें।
पंचमीं गव्हरिलें, योगतत्त्व ॥ २५ ॥

गव्हरिलें=गूढपणे सूचीतार्थे सांगितला

तेचि षष्ठामाजीं प्रगट, आसनालागोनि स्पष्ट।
जीवात्मभाव एकवट, होती जेणें ॥ २६ ॥

तैसी जे योगस्थिती, आणि योगभ्रष्टां जे गती।
तें आघवीचि उपपत्ती, सांगितली षष्ठीं ॥ २७ ॥

तयावरी सप्तमीं, प्रकृतिपरिहार उपक्रमीं।
करूनि भजती जे पुरुषोत्तमीं, ते बोलिले चाऱ्ही ॥ २८
प्रकृतिपरिहार- प्रकृतिवर मात  

पाठीं सप्तमींची प्रश्नसिद्धी, बोलोनि प्रयाणसमयसिद्धी।
एवं ते सकळवाक्यअवधि, अष्टमाध्यायीं ॥ २९ ॥

सप्तमींची=सातव्यातील अवधि=समाप्त

मग शब्दब्रह्मीं असंख्याकें, जेतुला कांहीं अभिप्राय पिके।
तेतुला महाभारतें एकें, लक्षें जोडे ॥ ३० ॥

शब्दब्रह्मीं=वेदात

तिये आघवांचि जें महाभारतीं, तें लाभे कृष्णार्जुनवाचोक्तीं।
आणि जो अभिप्रावो सातेंशतीं, तो एकलाचि नवमीं ॥ ३१ ॥

म्हणौनि नवमींचिया अभिप्राया, सहसा मुद्रा लावावया।
बिहाला मग मी वायां, गर्व कां करूं ? ॥ ३२

अहो गूळासाखरे मालयाचे, हे बांधे तरी एकाचि रसाचे।
परि स्वाद गोडियेचे, आनआन जैसे ॥ ३३ ॥

मालयाचे= काकवी

एक जाणोनियां बोलती, एक ठायें ठावो जाणविती।
एक जाणों जातां हारपती, जाणते गुणेंशीं ॥ ३४

ठायें =स्थिरावती    दुसरी ओळ =(जाणणे, जाणायचे तत्व ,जाणणारा ऐक्य )

हें ऐसें अध्याय गीतेचे, परि अनिर्वाच्यपण नवमाचें।
तो अनुवादलों हें तुमचें, सामर्थ्य प्रभू ॥ ३५ ॥

अनिर्वाच्यपण=शब्दातीत

अहो एकाचि शाटी तपिन्नली, एकीं सृष्टीवरी सृष्टी केली।
एकीं पाषाणीं वाऊनि उतरलीं, समुद्रीं कटकें ॥ ३६ ॥

एकाचि शाटी=वाशिष्टाची  एकीं.. सृष्टीवरी=विश्वामित्र ..
एकीं पाषाणीं =नळाने  वाऊनि=तारून

एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें, एकीं चुळींचि सागरातें भरिलें।
तैसें मज मुकयाकरवीं बोलविलें, अनिर्वाच्य तुम्हीं ॥ ३७ ॥

एकीं आकाशीं=हनुमान , एकीं चुळींचि=अगस्ती

परि हें असो एथ ऐसें, राम रावण झुंजिन्नले कैसे।
राम रावण जैसे, मीनले समरीं ॥ ३८ ॥

तैसें नवमीं कृष्णाचें बोलणें, तें नवमीचियाचि ऐसें मी म्हणें।
या निवाडा तत्त्वज्ञु जाणें, जया गीतार्थु हातीं ॥ ३९ ॥

एवं नवही अध्याय पहिले, मियां मतीसारिखे वाखाणिले।
आतां उत्तरखंड उवाइलें, ग्रंथाचें ऐका ॥ ४० ॥

उवाइलें=विस्तार विशद

जेथ विभूति प्रतिविभूती, प्रस्तुत अर्जुना सांगिजेती।
ते विदग्धा रसवृत्ती, म्हणिपैल कथा ॥ ४१ ॥

विदग्धा=चतुरपणे पांडीत्याने

देशियेचेनि नागरपणें, शांतु शृंगारातें जिणें।
तरि ओंविया होती लेणें, साहित्यासि ॥ ४२ ॥

देशियेचेनि=मराठी भाषा नागरपणें=सौंदर्ये

मूळ ग्रंथींचिया संस्कृता, वरि मऱ्हाठी नीट पढतां।
अभिप्राय मानलिया उचिता, कवण भूमी हें न चोजवे ॥ ४३ ॥

जैसें अंगाचेनि सुंदरपणें, लेणिया आंगचि होय लेणें।
तेथ अळंकारिलें कवण कवणें, हें निर्वचेना ॥ ४४ ॥

तैसी देशी आणि संस्कृत वाणी, एका भावार्थाच्या सोकासनीं।
शोभती आयणी, चोखट आइका ॥ ४५ ॥

सोकासनीं=सुखासनी  आयणी=बुद्धीने(अंतकरणाने) चोखट=शुध्द

उठावलिया भावा रूप, करितां रसवृत्तीचें लागे वडप।
चातुर्य म्हणे पडप, जोडलें आम्हां ॥ ४६ ॥

वडप=वर्षाव  पडप=लाभ प्रतिष्ठा

तैसें देशियेचें लावण्य, हिरोनि आणिलें तारुण्य।
मग रचिलें अगण्य, गीतातत्त्व ॥ ४७ ॥

जो चराचर परमगुरु, चतुर चित्तचमत्कारु।
तो ऐका यादवेश्वरु, बोलता जाहला ॥ ४८ ॥

ज्ञानदेव निवृत्तीचा म्हणे, ऐसें बोलिलें श्रीहरी तेणें।
अर्जुना आघवियाची मातु अंतःकरणें, धडौता आहासि ॥ ४९ ॥

धडौता=धड ,नीट

===============  ===================  ===========

1 comment: