Tuesday, May 3, 2016

ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा ओव्या २९६ ते ३४३






ज्ञानेश्वरी / अध्याय नववा  राजविद्याराजगुह्ययोग  संत ज्ञानेश्वर
ओव्या २९६ ते ३४३

     
तपाम्यहमहं वर्षं निगृह्णाम्युत्सृजामि च।
     
अमृतं चैव मृत्युश्च सदसच्चाहमर्जुन ॥ १९ ॥

मी सूर्याचेनि वेषें, तपें तैं हें शोषे।
पाठीं इंद्र होऊनि वर्षें, तैं पुढती भरे ॥ २९६ ॥

अग्नि काष्ठें खाये, तें काष्ठचि अग्नि होये।
तेवि मरतें मारितें पाहें, स्वरुप माझें ॥ २९७ ॥

यालागीं मृत्यूचां भागीं जें जें, तेंही पैं रुप माझें।
आणि न मरतें तंव सहजें, अविनाशु मी ॥ २९८ ॥

तंव=त्यात

आता बहु बोलोनि सांगावें, तें एकिहेळां घे पां आघवें।
तरी सतासतही जाणावें, मीचि पैं गा ॥ २९९ ॥

एकिहेळां =एकदम सतासतही= सत असत

म्हणोनि अर्जुना मी नसें, ऐसा कवणु ठाव असे।
परि प्राणियांचें दैव कैसे, जे न देखती मातें ॥ ३०० ॥

तरंग पाणियेंवीण सुकती, रश्मि वातीवीण न देखती।
तैसे मीचि ते मी नव्हती, विस्मो देखे ॥ ३०१ ॥

मीचि ते, मी नव्हती= मी ते असून ,आपण भगवतरूप आहोत असे त्यांना वाटत नाही

हें आतबाहेर मियां कोंदलें, जग निखिल माझेंचि वोतिलें।
कीं कैसें कर्म तयां आलें , जे मींचि नाही म्हणती ॥ ३०२ ॥

परि अमृतकुहां पडिजे, कां आपणयातें कडिये काढिजे।
ऐसें आथी काय कीजे, अप्राप्तासि ॥ ३०३ ॥

ग्रासा एका अन्नासाठीं, अंधु धांवताहे किरीटी।
आडळला चिंतामणि पायें लोटी, आंधळेपणे ॥ ३०४ ॥

तैसें ज्ञान जैं सांडुनि जाये, तैं ऐसी हे दशा आहे।
म्हणोनि कीजे तें केलें नोहे, ज्ञानेंवीण ॥ ३०५ ॥

आंधळेया गरुडाचे पांख आहाती, ते कवणा उपेगा जाती।
तैसें सत्कर्माचे उपखे ठाती, ज्ञानेंवीण ॥ ३०६ ॥

उपखे=व्यर्थ

     
त्रैविद्या मां सोमपा: पूतपापा यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते।
     
ते पुण्यमासाद्य सुरेन्द्रलोकमश्नन्ति दिव्यान्दिवि देवभोगान् ॥ २० ॥

देख पां गा किरीटी, आश्रमधर्माचिया राहाटी।
विधिमार्गा कसवटी, जे आपणचि होती ॥ ३०७ ॥

कसवटी=परीक्षक

यजन करितां कौतुकें, तिहीं वेदांचा माथा तुके।
क्रिया फळेंसि उभी ठाके, पुढां जयां ॥ ३०८ ॥

ऐसे दीक्षित जे सोमप, जे आपणचि यज्ञाचें स्वरुप।
तींहीं तया पुण्याचेनि नांवें पाप, जोडिलें देखें ॥ ३०९ ॥

सोमप=सोमरस पिणारे

जे श्रुतित्रयांते जाणोनि, शतवरी यज्ञ करुनि।
यजिलिया मातें चुकोनि, स्वर्गु वरिती ॥ ३१० ॥

जैसें कल्पतरुतळवटीं, बैसोनि झोळिये पाडी गांठी।
मग निदैव निघे किरीटी, दैन्यचि करुं ॥ ३११ ॥

तैसे शतक्रतूं यजिलें मातें, कीं ईप्सिताति स्वर्गसुखांतें।
आतां पुण्य कीं हें निरुतें, पाप नोहे ॥ ३१२ ॥

शतक्रतूं= १०० यज्ञ

म्हणोनि मजवीण पाविजे स्वर्गु, तो अज्ञानाचा पुण्यमार्गु।
ज्ञानिये तयातें उपसर्गु, हानि म्हणती ॥ ३१३ ॥

उपसर्गु=संकट विघ्न

एऱ्हवीं तरी नरकींचें दुःख, पावोनि स्वर्गा नाम कीं सुख,
वांचूनि नित्यानंद गा निर्दोष, तें स्वरुप माझें ॥ ३१४ ॥

मज येतां पैं सुभटा, या द्विविधा गा अव्हांटा।
स्वर्गु नरकु या वाटा, चोरांचिया ॥ ३१५ ॥

स्वर्गा पुण्यात्मकें पापें येईजे, पापात्मकें पापें नरका जाइजे।
मग मातें जेणें पाविजे, तें शुद्ध पुण्य ॥ ३१६ ॥

आणि मजचिमाजीं असतां, जेणें मी दूरी होय पांडुसुता।
तें पुण्य ऐसें म्हणतां, जीभ न तुटे काई ॥ ३१७ ॥

परि हें असो आतां प्रस्तुत, ऐकें यापरि ते दीक्षित।
यजुनि मातें याचित, स्वर्गभोगु ॥ ३१८ ॥

मग मी न पविजे ऐसें, जें पापरुप पुण्य असे।
तेणें लाधलेनि सौरसें, स्वर्गा येती ॥ ३१९ ॥
सौरसें=गोडी

जेथ अमरत्व हेंचि सिंहासन, ऐरावतासारिखें वाहन।
राजधानीभुवन, अमरावती ॥ ३२० ॥

जेथ महासिद्धींची भांडारें, अमृताचीं कोठारें।
जियें गांवीं खिल्लारें, कामधेनूंचीं ॥ ३२१ ॥

जेथ वोळगे देव पाइका, सैघं चिंतामणीचिया भूमिका|
 विनोदवनवाटिका, सुरतरुंचिया ॥ ३२२ ॥

वोळगे=सेवा करणे  सैघं- सर्व, सगळीकडे
भूमिका=जमीन

गंधर्वगान गाणीं, जेथ रंभेऐशिया नाचणी।
उर्वशी मुख्य विलासिनी, अंतौरिया ॥ ३२३ ॥

अंतौरिया=स्त्रिया

मदन वोळगे शेजारे, जेथ चंद्र शिंपे सांबरें।
पवना ऐसें म्हणियारें, धांवणें जेथ ॥ ३२४ ॥

वोळगे=सेवा करणे सांबरें=सडा शिंपणे

पैं बृहस्पति आपण, ऐसे स्वस्तीश्रियेचे ब्राह्मण।
ताटियेचे सुरगण, बहुवस  जेथें ॥ ३२५ ॥

स्वस्तीश्रियेचे=आशीर्वाद देवून कल्याण करणारे 

लोकपाळरांगेचे, राउत जिये पदीचे।
उचैःश्रवा खांचे, खोणिये।। ३२६ ॥

राउत=घोडेस्वार
खांचे=कमी पडणे  खोणिये=वाहन

हें बहु असो जे ऐसे, भोग इंद्रसुखासरिसे।
ते भोगिजती जंव असे, पुण्यलेशु ॥ ३२७ ॥

     
ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति।
     
एवं त्रयीधर्ममनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते ॥ २१ ॥

मग तया पुण्याची पाउटी सरे, सवेंचि इंद्रपणाची उटी उतरे।
आणि येऊं लागती माघारें, मृत्युलोका ॥ ३२८ ॥

पाउटी=पुंजी (दर्जा) उटी=लेप

जैसा वेश्याभोगीं कवडा वेंचे, मग दारही चेपूं न ये तियेचें।
तैसें लाजिरवाणें दीक्षितांचें, काय सांगो ॥ ३२९ ॥

कवडा=पैसे धन

एवं थितिया मातें चुकले, जीहीं पुण्यें स्वर्ग कामिले।
तयां अमरपण तें वावों जालें, आतां मृत्युलोकु ॥ ३३० ॥

थितिया=स्थिर शाश्वत (जवळचा)

मातेचिया उदरकुहरीं, पचूनि विष्ठेचां दाथरीं।
उकडूनि नवमासवरी, जन्मजन्मोनि मरती ॥ ३३१ ॥

कुहरीं=गुहा   दाथरीं=थर

अगा स्वप्नीं निधान फावे, परि चेइलिया हारपे आघवें।
तैसें स्वर्गसुख जाणावें, वेदज्ञाचें ॥ ३३२ ॥

अर्जुना वेदविद जऱ्ही जाहला, तरी मातें नेणतां वायां गेला।
कणु सांडूनि उपणिला, कोंडा जैसा ॥ ३३३ ॥

म्हणऊनि मज एकेंविण, हे त्रयीधर्म अकारण।
आतां मातें जाणोनि कांहीं नेण, तूं सुखिया होसी ॥ ३३४ ॥

त्रयीधर्म=वेदोक्त धर्म

     
अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जना: पर्युपासते।
     
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ॥ २२ ॥

पैं सर्वभावेंसी उखितें, जे वोपिले मज चित्तें।
जैसा गर्भगोळु उद्यमातें , कोणाही नेणे ॥ ३३५ ॥

उखितें=पूर्णपणे वोपिले=विकले

तैसा मीवाचूनि कांही, आणिक गोमटेंचि नाहीं।
मजचि नाम पाहीं, जिणेया ठेविलें ॥ ३३६ ॥

ऐसे अनन्यगतिकें चित्तें, चिंतितसांते मातें।
जे उपासिती तयांतें, मीचि सेवीं ॥ ३३७ ॥

ते एकवटूनि जिये क्षणीं, अनुसरले गा माझिये वाहणी।
तेव्हांचि तयांची चिंतवणी, मजचि पडली ॥ ३३८ ॥

चिंतवणी=चिंता

मग तीहीं जें जें करावे, तें मजचि पडिलें आघवें।
जैशी अजातपक्षांचेनि जीवें, पक्षिणी जिये ॥ ३३९ ॥

अजातपक्षांचेनि=पंख न फुटलेला

आपुली तहानभूक नेणे, तान्हया निकें तें माउलीसीचि करणें।
तैसे अनुसरले जे मज प्राणें, तयांचेन काइसेनिहि न लजें मी ॥ ३४० ॥

तया माझिया सायुज्याची चाड, तरि तेंचि पुरवीं कोड।
कां सेवा म्हणती तरी आड, प्रेम सुयें ॥ ३४१ ॥

सुयें=ठेवणे

ऐसा मनीं जो जो भावो, तो तो पुढां पुढां लागें तयां देवों।
आणि दिधलियाचा निर्वाहो, तोहि मीचि करीं ॥ ३४२ ॥

निर्वाहो=संभाळ

हा योगक्षेमु आघवा, तयांचा मजचि पडिला पांडवा।
जयांचियां सर्वभावां, आश्रयो मी ॥ ३४३ ॥

http://dnyaneshwariabhyas.blogspot.in/

======== ================ ======

1 comment: