Monday, May 30, 2016

ज्ञानेश्वरी अध्याय १० ओव्या २०६ ते २४९



 

ज्ञानेश्वरी / अध्याय दहावा / विभूती योग /संत ज्ञानेश्वर



  
श्रीभगवानुवाच, हन्त ते कथयिष्यामि दिव्या ह्यात्मविभूतयः,
  
प्राधान्यतः कुरुश्रेष्ठ नास्त्यन्तो विस्तरस्य मे ॥ १९॥

मी पितामहाचा पिता, हें आठवितांही नाठवे चित्ता।
कीं म्हणतसे बा पंडुसुता, भलें केलें ॥ २०६ ॥

अर्जुनातें बा म्हणे एथ कांहीं, आम्हां विस्मो करावया कारण नाहीं,
आंगें तो लेंकरूं काई, नव्हेचि नंदाचें ॥ २०७ ॥

आंगें=देहाने स्वत:

परि प्रस्तुत ऐसें असो, हें करवी आवडीचा अतिसो।
मग म्हणे आइकें सांगतसों, धनुर्धरा ॥ २०८ ॥

तरी तुवां पुसलिया विभूती, तयांचें अपारपण सुभद्रापती।
ज्या माझियाचि परि माझिये मती, आकळती ना ॥ २०९ ॥

आंगींचिया रोमा किती, जयाचिया तयासि न गणवती।
तैसिया माझिया विभूती, असंख्य मज ॥ २१० ॥

एऱ्हवीं तरी मी कैसा केवढा, म्हणोनि आपणपयांही नव्हेचि फुडा,
यालागीं प्रधाना जिया रूढा, तिया विभूती आइकें ॥ २११ ॥

फुडा=स्पष्ट ,माहिती

जिया जाणतलियासाठीं, आघवीया जाणितलिया होती किरीटी,
जैसें बीज आलिया मुठीं, तरूचि आला होय ॥ २१२ ॥

कां उद्यान हाता चढिलें, तरी आपैसीं सांपडलीं फळें फुलें।
तेवीं देखिलिया जिया देखवलें, विश्व सकळ ॥ २१३ ॥

एऱ्हवीं साचचि गा धनुर्धरा, नाहीं शेवटु माझिया विस्तारा।
पैं गगना ऐशिया अपारा, मजमाजीं लपणें ॥ २१४ ॥

  
अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशयस्थितः।
  
अहमादिश्च मध्यं च भूतानामन्त एव च ॥ २०॥

आइकें कुटिलालकमस्तका, धनुर्वेदत्र्यंबका।
मी आत्मा असें एकैका, भूतमात्राचां ठायीं ॥ २१५ ॥

कुटिलालक=कुरुळ्या केसांचा

आंतुलीकडे मीचि यांचा अंतःकरणीं, भूतांबाहेरी माझीच गंवसणी,
आदि मी निर्वाणीं, मध्यही मीचि ॥ २१६ ॥

जैसें मेघां या तळीं वरी, एक आकाशचि आंत बाहेरी।
आणि आकाशींचि जाले अवधारीं, असणेंही आकाशीं ॥ २१७ ॥

तळीं=खाली

पाठीं लया जे वेळीं जाती, ते वेळीं आकाशचि होऊनि ठाती।
तेवीं आदि स्थिती अंतगती, भूतांसि मी ॥ २१८ ॥

ऐसें बहुवस आणि व्यापकपण, माझें विभूतियोगें जाण।
तरी जीवचि करूनि श्रवण, आइकोनि आइक ॥ २१९ ॥

याहीवरी त्या विभूती, सांगणें ठेलें तुजप्रति।
सांगेन म्हणितलें तुज प्रीती, त्या प्रधाना आइकें ॥ २२० ॥

  
आदित्यानामहं विष्णुर्ज्योतिषां रविरंशुमान।
  
मरीचिर्मरुतानामस्मि नक्षत्राणामहं शशी ॥ २१॥

हें बोलोनि तो कृपावंतु, म्हणे विष्णु मी आदित्यांआंतु।
रवी मी रश्मिवंतु, सुप्रभांमाजीं ॥ २२१ ॥

सुप्रभ=तेजस्वी

मरूद्गणांच्या वर्गीं, मरीचि म्हणे मी शारङ्गी।
चंद्र मी गगनरंगीं, तारांमाजीं ॥ २२२ ॥

  
वेदानां सामवेदोऽस्मि देवानामस्मि वासवः।
  
इन्द्रियाणां मनश्चास्मि भूतानामस्मि चेतना ॥ २२॥

वेदांआंतु सामवेदु, तो मी म्हणे गोविंदु।
देवांमाजी मरुद्बंधु, महेंद्र तो मी ॥ २२३ ॥

इंद्रियांआंतु अकरावें, मन तें मी हें जाणावें।
भूतांमाजी स्वभावें, चेतना ते मी ॥ २२४ ॥

रुद्राणां शंकरश्चास्मि वित्तेशो यक्षरक्षसाम्।
वसूनां पावकश्चास्मि मेरुः शिखरिणामहम् ॥ २३॥

अशेषांही रुद्रांमाझारीं, शंकर जो मदनारी।
तो मी येथ न धरीं , भ्रांति कांहीं ॥ २२५ ॥

यक्षरक्षोगणांआंतु, शंभूचा सखा जो धनवंतु।
तो कुबेरु मी हें अनंतु, म्हणता जाहला ॥ २२६ ॥

मग आठांही वसूंमाझारीं, पावकु तो मी अवधारीं।
शिखराथिलियां सर्वोपरी, मेरु तो मी ॥ २२७ ॥

  
पुरोधसां च मुख्यं मां विद्धि पार्थ बृहस्पतिम्।
  
सेनानीनामहं स्कन्दः सरसामस्मि सागरः ॥ २४॥

  
महर्षीणां भृगुरहं गिरामस्म्येकमक्षरम्।
  
यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः ॥ २५॥

जो स्वर्गसिंहासना सावावो, सर्वज्ञते आदीचा ठावो।
तो पुरोहितांमाजीं रावो, बृहस्पती मी ॥ २२८ ॥

सावावो=मदत सहायक

त्रिभुवनींचिया सेनापतीं-, आंत स्कंदु तो मी महामती।
जो हरवीर्यें अग्निसंगती, कृत्तिकाआंतु जाहला ॥ २२९ ॥

सकळिकां सरोवरांसी, माजीं समुद्र तो मी जळराशी।
महर्षींआंतु तपोराशी, भृगु तो मी ॥ २३० ॥

अशेषांही वाचा, आंतु नटनाच सत्याचा।
तें अक्षर एक मी वैकुंठींचा, वेल्हाळु म्हणे ॥ २३१ ॥

नटनाच=उत्कर्ष   एक=(ॐ) वेल्हाळु=प्रिय

समस्तांही यज्ञांचा पैकीं, जपयज्ञु तो मी ये लोकीं।
जो कर्मत्यागें प्रणवादिकीं, निफजविजे ॥ २३२ ॥

निफजविजे=निष्पन्न होणे

नामजपयज्ञु तो परम, बाधूं न शके स्नानादि कर्म।
नामें पावन धर्माधर्म, नाम परब्रह्म वेदार्थें ॥ २३३ ॥

(ही ओवी काही प्रतीत नाही )

स्थावरां गिरीवरां आंतु, पुण्यपुंज जो हिमवंतु।
तो मी म्हणे कांतु, लक्ष्मियेचा ॥ २३४ ॥

  
अश्वत्थः सर्ववृक्षाणां देवर्षीणां च नारदः।
  
गन्धर्वाणां चित्ररथः सिद्धानां कपिलो मुनिः ॥ २६॥

  
उच्चैःश्रवसमश्वानां विद्धि माममृतोद्भिवम्।
  
ऐरावतं गजेन्द्राणां नराणां च नराधिपम् ॥ २७॥

कल्पद्रुम हन पारिजातु, गुणें चंदनुही वाड विख्यातु।
तरि ययां वृक्षजातां आंतु, अश्वत्थु तो मी ॥ २३५ ॥

देवऋषींआंतु पांडवा, नारदु तो मी जाणावा।
चित्ररथु मी गंधर्वां, सकळिकांमाजीं ॥ २३६ ॥

ययां अशेषांही सिद्धां-, माजीं कपिलाचार्यु मी प्रबुद्धा।
तुरंगजातां प्रसिद्धां-, आंत उचैःश्रवा मी ॥ २३७ ॥

तुरंग=घोडा

राजभूषण गजांआंतु, अर्जुना मी गा ऐरावतु।
पयोराशी सुर मथितु, अमृतांशु तो मी ॥ २३८ ॥

पयोराशी = क्षीरसागर  

ययां नरांमाजीं राजा, तो विभूतिविशेष माझा।
जयातें सकळ लोक प्रजा, होऊनि सेविती ॥ २३९ ॥

  
आयुधानामहं वज्रं धेनूनामस्मि कामधुक्।
  
प्रजनश्चास्मि कन्दर्पः सर्पाणामस्मि वासुकिः ॥ २८॥

  
अनन्तश्चास्मि नागानां वरुणो यादसामहम्।
  
पितृणामर्यमा चास्मि यमः संयमतामहम् ॥ २९॥

पैं आघवेयां हातियेरां, आंत वज्र तें मी धनुर्धरा।
जें शतमखोत्तीर्णकरा, आरूढोनि असे ॥ २४० ॥

शतमखोत्तीर्णकरा=इंद्र (शंभर यज्ञ करणारा )

धेनूंमध्यें कामधेनु, तें मी म्हणे विष्वक्सेनु।
जन्मवितयांआंत मदनु, तो मी जाणें ॥ २४१ ॥

सर्पकुळाआंत अधिष्ठाता, वासुकी गा मी कुंतीसुता।
नागांमाजीं समस्तां, अनंतु तो मी ॥ २४२ ॥

अगा यादसांआंतु, जो पश्चिमप्रमदेचा कांतु।
तो वरुण मी हें अनंतु, सांगत असे ॥ २४३ ॥

यादसां=जळ देवता
पश्चिमप्रमदेचा=पश्चिमदिशा रुपी कांता

आणि पितृगणां समस्तां-, माजीं अर्यमा जो पितृदेवता।
तो मी हें तत्त्वता, बोलत आहें ॥ २४४ ॥

जगाचीं शुभाशुभें लिहिती, प्राणियांच्या मानसांचा झाडा घेती।
मग केलियानुरूप होती, भोगनियम जे ॥ २४५ ॥

तयां नियमितयांमाजीं यमु, जो कर्मसाक्षी धर्मु।
तो मी म्हणे रामु, रमापती ॥ २४६ ॥

  
प्रल्हादश्चास्मि दैत्यानां कालः कलयतामहम्।
  
मृगाणां च मृगेन्द्रोऽहं वैनतेयश्च पक्षिणाम् ॥ ३०॥

अगा दैत्यांचिया कुळीं, प्रल्हादु तो मी न्याहाळीं।
म्हणौनि दैत्यभावादिमेळीं, लिंपेचिना ॥ २४७ ॥

पैं कळितयांमाजीं महाकाळु, तो मी म्हणे गोपाळु।
श्वापदांमाजीं शार्दूळु, तो मी जाण ॥ २४८ ॥

कळितयांमाजीं=हरण करणाऱ्यात शार्दूळु,=सिंह

पक्षिजातिमाझारीं, गरुड तो मी अवधारीं।
यालागीं जो पाठीवरी, वाहों शके मातें ॥ २४९ ॥

http://dnyaneshwariabhyas.blogspot.in/
ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ

1 comment: