Thursday, May 5, 2016

ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा ओव्या ४०७ ते ४७४






ज्ञानेश्वरी / अध्याय नववा  राजविद्याराजगुह्ययोग  संत ज्ञानेश्वर
ओव्या ४०७ ते ४७४
      समोऽहं सर्वभूतेषु न मे द्वेष्योऽस्ति न प्रिय:।
     
ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम् ॥ २९ ॥

तो मी पुससी कैसा, तरि जो सर्वभूतीं सदा सरिसा।
जेथ आपपरु ऐसा, भागु नाहीं ॥ ४०७ ॥

जे ऐसिया मातें जाणोनि, अहंकाराचा कुरुठा मोडोनि।
जे जीवें कर्मे करुनि, भजती मातें ॥ ४०८ ॥

कुरुठा=घर

ते वर्तत दिसती देहीं, परि ते देहीं ना माझां ठायीं।
आणि मी तयांचा हृदयीं, समग्र असें ॥ ४०९ ॥

सविस्तर वटत्व जैसें, बीजकणिकेमाजीं असे।
आणि बीजकणु वसे, वटीं जेवीं ॥ ४१० ॥

तेवीं आम्हां तयां परस्परें, बाहेरी नामाचींचि अंतरें।
वांचुनि आंतुवट वस्तुविचारें, मी तेचि ते ॥ ४११ ॥

आंतुवट=अंतरंगी

आतां जायांचें लेणें, जैसें आंगावरी आहाचवाणें।
तैसें देह धरणें, उदास तयांचें ॥ ४१२ ॥

जायांचें=उसने दुसऱ्याचे  आहाच= उगाच वरवर

परिमळु निघालिया पवनापाठीं, मागें वोस फूल राहे देठीं।
तैसें आयुष्याचिये मुठी, केवळ देह ॥ ४१३ ॥

येर अवष्टंभु जो आघवा, तो आरुढोनि मद्भावा।
मजचि आंतु पांडवा,   पैठा जाहला ॥ ४१४ ॥

अवष्टंभु=अहंकार   पैठा=वस्ती करता  स्थिर
 
     
अपि चेत्सुदुराचारो भजते मामनन्यभाक्।
    
साधुरेव स मन्तव्यः सम्यग्व्यवसितो हि सः ॥ ३० ॥

ऐसें भजतेनि प्रेमभावें, जयां शरीरही पाठीं न पवे।
तेणें भलतया व्हावें, जातीचिया ॥ ४१५ ॥

पाठीं न पवे= परत {शरीर(जन्म)} मिळत नाही

आणि आचरण पाहातां सुभटा, तो दुष्कृताचा सेल वांटा।
परि जीवित वेचिलें चोहटां, भक्तीचिया कीं ॥ ४१६ ॥

सेल=शेलका

अगा अंतींचिया मती, साचपण पुढिले गती।
म्हणोनि जीवित जेणें भक्ती, दिधलें शेखीं ॥ ४१७ ॥

शेखीं=शेवटी

तो आधीं जरी अनाचारी, तरी सर्वोत्तमुचि अवधारीं।
जैसा बुडाला महापूरीं, न मरतु निघाला ॥ ४१८ ॥

तयाचें जीवित ऐलथडिये आलें, म्हणोनि बुडालेपण जेवीं वायां गेलें,
तेवीं नुरेचि पाप केलें, शेवटलिये भक्ती ॥ ४१९ ॥

यालागीं दुष्कृती जऱ्ही जाहला, तरि अनुतापतीर्थीं न्हाला।
न्हाऊनि मजआंतु आला, सर्वभावें ॥ ४२० ॥

तरि आतां पवित्र तयाचेंचि कुळ, अभिजात्य तेंचि निर्मळ।
जन्मलेया फळ, तयासीच जोडलें ॥ ४२१ ॥

अभिजात्य=श्रेष्ठ    

तो सकळही पढिन्नला, तपें तोचि तपिन्नला।
अष्टांग अभ्यासिला, योगु तेणें ॥ ४२२ ॥

हें असो बहुत पार्था, तो उतरला कर्मे सर्वथा।
जयाची अखंड गा आस्था, मजचिलागीं ॥ ४२३ ॥

उतरला=सुटला मुक्त झाला

अवघिया मनोबुद्धीचिया राहटी, भरोनि एकनिष्ठेचिया पेटी।
जेणें मजमाजीं किरीटी, निक्षेपिली ॥ ४२४ ॥

राहटी=व्यापार बाजार निक्षेपिली=अर्पिली

     
क्षिप्रं भवति धर्मात्मा शश्वच्छान्तिं निगच्छति।
     
कौन्तेय प्रति जानीहि न मे भक्त: प्रणश्यति ॥ ३१ ॥

तो आतां अवसरें मजसारिखा होइल, ऐसाही भाव तुज जाइल।
हां गा अमृताआंत राहील, तया मरण कैचें ॥ ४२५ ॥

पै सूर्य जो वेळु नुदैजे, तया वेळा कीं रात्र म्हणिजे।
तेवीं माझिये भक्तीविण जें कीजे, तें महापाप नोहे ॥ ४२६ ॥

म्हणोनि तयाचिया चित्ता, माझी जवळीक पांडुसुता।
तेव्हांचि तो तत्वता, स्वरुप माझें ॥ ४२७ ॥

जैसा दीपें दीपु लाविजे, तेथ आदील कोण हें नोळखिजे।
तैसा सर्वस्वें जो मज भजे, तो मी होऊनि ठाके ॥ ४२८ ॥

आदील=अगोदरचा

मग माझी नित्य शांती, तया दशा तेचि कांती।
किंबहुना जिती, माझेनि जीवें, ४२९ ॥

कांती= वलय तेज

एथ पार्था पुढतपुढती, तेंचि तें सांगो किती।
जरी मियां चाड तरी भक्ती, न विसंबिजे गा ॥ ४३० ॥

पुढतपुढती=पुनःपुन्हा

अगा कुळाचिया चोखटपणा नलगा, अभिजात्य झणीं श्लाघा,
व्युत्पत्तीचा वाउगा, सोसु कां वहावा ॥ ४३१ ॥

अभिजात्य =श्रेष्ठ     झणीं श्लाघा = नको आत्मस्तुती

व्युत्पत्तीचा=शास्त्र अध्यापनाचा   वाउगा=व्यर्थ

कां रुपे वयसा माजा, आथिलेपणें कां गाजा।
एक भाव नाहीं माझा, तरी पाल्हाळ तें ॥ ४३२ ॥

रुपे वयसा माजा,= रूप तारुण्याचा गर्व
आथिलेपणें=असलेली(संपत्ती आदी ) गाजा=बडबड  

कणेंविण सोपटें, कणसें लागलीं आथी एक दाटें।
काय करावें गोमटें, वोस नगर ॥ ४३३ ॥

सोपटें= कणीस  

नातरी सरोवर आटलें, रानीं दुःखिया दुःखी भेटलें।
कां वांझ फुलीं फुललें, झाड जैसें ॥ ४३४ ॥

तैसें सकळ तें वैभव, अथवा कुळजातीगौरव।
जैसें शरीर आहे सावेव, परि जीवचि नाहीं ॥ ४३५ ॥

तैसें माझिये भक्तीविण, जळो तें जियालेंपण।
अगा पृथ्वीवरी पाषाण, नसती काई ॥ ४३६ ॥

पैं हिंवराची दाट साउली, सज्जनीं जैसी वाळिली।
तैसीं पुण्यें डावलूनि गेलीं, अभक्तांतें ॥ ४३७ ॥

हिंवराची=एक प्रकारचे काटेरी झाड

निंब निंबोळियां मोडोनि आला, तरी तो काउळियांसीचि सुकाळु जाहला।
तैसा भक्तिहीनु वाढिन्नला, दोषांचिलागीं ॥ ४३८ ॥

मोडोनि=खूप भरून (मोडेपर्यंत)

कां षड्रस खापरीं वाढिले, वाढूनि चोहटां रात्री सांडिले।
ते सुणियांचेचि ऐसे झाले, जियापरी ॥ ४३९ ॥

सुणियां=कुत्रा

तैसें भक्तीहीनाचें जिणें, जो स्वप्नींही परि सुकृत नेणे।
तेणे संसारदुःखासी आवंतणें, वोगरिलें गा ॥ ४४० ॥

सुकृत=पुण्य आवंतणें=निमंत्रण वोगरिलें=वाढले

म्हणोनि कुळ उत्तम नोहावें, जाती अंत्याही व्हावें।
वरि देहाचेनि नांवें, पशूचेंही लाभो ॥ ४४१ ॥

पाहें पां सावजें हातिरुं धरिलें, तेणें तया काकुळती मातें स्मरिलें।
कीं तयाचें पशुत्व वावो जाहलें, पातलिया मातें ॥ ४४२ ॥

हातिरुं=हत्ती

     
मां हि पार्थ व्यपाश्रित्य येऽपि स्यु: पापयोनय:।
     
स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेऽपि यान्ति परां गतिम् ॥ ३२ ॥

अगा नांवें घेता वोखटीं, जे आघवेया अधमांचिये शेवटीं।
तिये पापयोनीही किरीटी, जन्मले जे ॥ ४४३ ॥

वोखटीं=वाईट

ते पापयोनि मूढ, मूर्ख ऐसे जे दगड।
परि माझां ठायीं दृढ, सर्वभावें ॥ ४४४ ॥

जयांचिये वाचे माझे आलाप, दृष्टी भोगी माझेंचि रुप।
जयांचें मन संकल्प, माझाचि वाहे ॥ ४४५ ॥

माझिया कीर्तीविण, जयांचे रिते नाहीं श्रवण।
जयां सर्वांगीं भूषण, माझी सेवा ॥ ४४६ ॥

जयांचें नाव विषो नेणे, जाणीव मजचि एकातें जाणे।
जया ऐसें लाभे तरी जिणें, एऱ्हवीं मरण ॥ ४४७ ॥

विषो=विषय

ऐसा आघवाचि परि पांडवा , जिहीं आपुलिया सर्वभावा |
जियावयालागीं वोलावा, मीचि केला ॥ ४४८ ॥

ते पापयोनीही होतु कां, ते श्रुताधीतही न होतुं कां।
परि मजसीं तुकितां तुकितां तुका, तुटी नाहीं ॥ ४४९ ॥

श्रुताधीतही=शास्त्रे ऐकला  विद्वान
तुकितां=मोजता तुका= तुलनेस

पाहें पां भक्तिचेनि आथिलेपणें, दैत्यीं देवां आणिलें उणें।
माझें नृसिंहत्व लेणें, जयाचिये महिमे ॥ ४५० ॥
 
आथिलेपणें=संपन्नता

तो प्रल्हादु गा मजसाठीं, घेतां बहुतें सदा किरीटी।
कां जें मियां द्यावें ते गोष्टी, तयाचिया जोडे ॥ ४५१ ॥

तो प्रल्हादु गा मजसाठीं..=प्रल्हादाची भक्ती केली तरी

एऱ्हवीं दैत्यकुळ साचोकारें, परि इंद्रही सरी न लाहे उपरें।
म्हणोनि भक्ति गा एथ सरे, जाति अप्रमाण ॥ ४५२ ॥

सरी=बरोबरी लाहे=मिळे

राजाज्ञेचीं अक्षरें आहाती, तियें चामा एका जया पडती।
तया चामासाठीं जोडती, सकळ वस्तु ॥ ४५३ ॥

चामा=चाम्रपत्र

वांचूनि सोनें रुपें प्रमाण नोहे, एथ राजाज्ञाचि समर्थ आहे।
तेंचि चाम एक जैं लाहे, तेणें विकती आघवीं ॥ ४५४ ॥

तेणें विकती आघवीं=प्राप्त होते सारे

तैसें उत्तमत्व तैंचि तरे, तैंचि सर्वज्ञता सरे।
जैं मनोबुद्धि भरे, माझेनि प्रेमें ॥ ४५५ ॥

तरे=टिकेल    सरे=मान्य होईल

म्हणोनि कुळ जाति वर्ण, हें आघवेंचि गा अकारण।
एथ अर्जुना माझेपण, सार्थक एक ॥ ४५६ ॥

तेंचि भलतेणें भावें, मन मजाआंतु येतें होआवें।
आलें तरी आघवें, मागील वावो ॥ ४५७ ॥

जैसे तवंचि वहाळ वोहळ, जंव न पवती गंगाजळ।
मग होऊनि ठाकती केवळ, गंगारुप ॥ ४५८ ॥

कां खैर चंदन काष्ठें, हे विवंचना तंवचि घटे।
जंव न घापती एकवटें, अग्नीमाजीं ॥ ४५९ ॥

घापती=घालती

तैसे क्षत्री वैश्य स्त्रिया, कां शूद्र अंत्यादि इया।
जाती तंवचि वेगळालिया, जंव न पवती मातें ॥ ४६० ॥

मग जाती व्यक्ती पडे बिंदुलें, जेव्हां भाव होती मज मीनले।
जैसे लवणकण घातले, सागरामाजीं ॥ ४६१ ॥

बिंदुलें=शून्यवत होणे नष्ट होणे
 
तंववरी नदानदींचीं नांवें, तंवचि पूर्वपश्चिमेचे यावे।
जंव न येती आघवे, समुद्रामाजीं ॥ ४६२ ॥

हेंचि कवणें एकें मिसें, चित्त माझां ठायीं प्रवेशे।
येतुलें हो मग आपैसें, मी होणे असे ॥ ४६३ ॥

अगा वरी फोडावयाचि लागीं, लोहो मिळो कां परिसाचां आंगीं।
कां जे मिळतिये प्रसंगीं, सोनेंचि होईल ॥ ४६४ ॥

पाहें पां वालभाचेनि व्याजें, तिया व्रजांगनांचीं निजें।
मज मीनलिया काय माझें, स्वरुप नव्हतीचि ॥ ४६५ ॥

वालभ=प्रीती      व्रजांगनांचीं=गोपी    निजें =स्वत:ला

नातरी भयाचेनि मिसें, मातें न पविजेचि काय कंसें।
कीं अखंड वैरवशें, चैद्यादिकीं ॥ ४६६ ॥

अगा सोयरेपणेंचि पांडवा, माझें सायुज्य यादवां।
कीं ममत्वें वासुदेवा-, दिकां सकळां ॥ ४६७ ॥

नारदा ध्रुवा अक्रूरा, शुका हन सनत्कुमारा।
यां भक्ती मी धनुर्धरा, प्राप्यु जैसा ॥ ४६८ ॥

तैसाचि गोपीसी कामें, तया कंसा भयसंभ्रमें।
येरा घातकेयां मनोधर्में, शिशुपालादिकां।। ४६९ ॥

अगा मी एकुलाणीचें खागें, मज येवों ये भलतेनि मार्गे।
भक्ती कां विषयें विरागें, अथवा वैरें ॥ ४७० ॥

एकुलाणीचें=अखेरचा खागें= मुक्काम

म्हणोनि पार्था पाहीं, प्रवेशावया माझां ठायीं।
उपायांची नाहीं, केणि एथ ॥ ४७१ ॥

केणि=पोते गठ्ठा (वानी पाभे)

आणि भलतिया जाती जन्मावें, मग भजिजे कां विरोधावें।
परि भक्त कां वैरिया व्हावें, माझियाचि ॥ ४७२ ॥

अगा कवणें एके बोलें, माझेपण जऱ्ही जाहालें।
तरी मी होणें आलें, हाता निरुतें।। ४७३ ॥

यापरि पापयोनीही अर्जुना, कां वैश्य शूद्र अंगना।
मातें भजतां सदना, माझिया येती ॥ ४७४ ॥

  http://dnyaneshwariabhyas.blogspot.in/

1 comment: