ज्ञानेश्वरी / अध्याय दहावा / विभूती योग /संत ज्ञानेश्वर
अहं सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते।
इति मत्वा भजन्ते मां बुधा भावसमन्विताः ॥ ८॥
तरि मीचि एक सर्वां, या जगा जन्म पांडवा।
आणि मजचिपासूनि आघवा, निर्वाहो यांचा ॥ ११२ ॥
कल्लोळमाळा अनेगा, जन्म जळींचि पैं गा।
आणि तयां जळचि आश्रयो तरंगा, जीवनही जळ ॥ ११३ ॥
कल्लोळमाळा=तरंग
ऐसें आघवांचि ठायीं, तया जळचि जेविं पाहीं।
तैसा मीवांचूनि नाहीं, विश्वीं इये ॥ ११४ ॥
ऐसिया व्यापका मातें, मानूनि जे भजती भलतेथें।
परि साचोकारें उदितें, प्रेमभावें ॥ ११५ ॥
भलतेथें=सर्वत्र ,कोठे ही
देशकाळवर्तमान, आघवें मजसीं करूनि अभिन्न।
जैसा वायु होऊन गगन, गगनींचि विचरे ॥ ११६ ॥
ऐसेनि जे निजज्ञानी, खेळत सुखें त्रिभुवनीं।
जगद्रूपा मनीं, सांठऊनि मातें ॥ ११७ ॥
जें जें भेटे भूत, तें तें मानिजे भगवंत।
हा भक्तियोगु निश्चित, जाण माझा ॥ ११८ ॥
मच्चित्ता मद्गतप्राणा बोधयन्तः परस्परम्।
कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च ॥ ९॥
चित्तें मीचि जाहाले, मियांचि प्राणें धाले।
जीवों मरों विसरले, बोधाचिया भुली ॥ ११९ ॥
भुली=रंगून गेल्यामुळे
मग तया बोधाचेनि माजे, नाचती संवादसुखाचीं भोजें।
आतां एकमेकां घेपे दीजे, बोधचि वरी ॥ १२० ॥
जैशीं जवळिकेंचीं सरोवरें, उचंबळलिया कालवती परस्परें।
मग तरंगासि धवळारें, तरंगचि होती ॥ १२१ ॥
धवळारें=घर
तैसी येरयेरांचिये मिळणी, पडत आनंदकल्लोळांची वेणी।
तेथ बोध बोधाचीं लेणीं, बोधेंचि मिरवी ॥ १२२ ॥
वेणी=केसांच्या वेणी (प्रमाणे जवळीक)
जैसें सूर्यें सूर्यातें वोंवाळिलें, कीं चंद्रें चंद्रम्या क्षेम दिधलें।
ना तरी सरिसेनि पाडें मीनले, दोनी वोघ ॥ १२३ ॥
तैसें प्रयाग होत सामरस्याचें, वरी वोसाण तरत सात्त्विकाचें।
ते संवादचतुष्पथींचे, गणेश जाहले ॥ १२४ ॥
वोसाण=पुरात वाहून आलेले चतुष्पथींचे =चौकातील
तेव्हां तया महासुखाचेनि भरें, धांवोनि देहाचिये गांवाबाहेरें।
मियां धाले तेणें उद्गारें, लागती गाजों ॥ १२५ ॥
पैं गुरुशिष्यांचां एकांतीं, जे अक्षरा एकाची वदंती।
ते मेघाचियापरी त्रिजगतीं, गर्जती सैंघ ॥ १२६ ॥
अक्षरा एकाची =ओंकाराची(गुरु मंत्र ) सैंघ=सगळीकडे
जैसी कमळकळिका जालेपणें, हृदयींचिया मकरंदातें राखों नेणें।
दे राया रंका पारणें, आमोदाचें ॥ १२७ ॥
तैसेंचि मातें विश्वीं कथित, कथितेनि तोषें कथूं विसरत।
मग तया विसरामाजीं विरत, आंगें जीवें ॥ १२८ ॥
ऐसें प्रेमाचेनि बहुवसपणें, नाहीं राती दिवो जाणणें।
केलें माझें सुख अव्यंगवाणें, आपणपेयां जिहीं ॥ १२९ ॥
तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम्।
ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते ॥ १०॥
तयां मग जें आम्ही कांहीं, द्यावें अर्जुना पाहीं।
ते ठायींचीच तिहीं, घेतली सेल ॥ १३० ॥
सेल=उत्तम भाग
कां जे ते जिया वाटा, निगाले गा सुभटा।
ते सोय पाहोनि अव्हांटा, स्वर्गापवर्ग ॥ १३१ ॥
ते सोय = तो मार्ग अव्हांटा=आडवाटा
म्हणोनि तिहीं जें प्रेम धरिलें, तेंचि आमुचें देणें उपाइलें।
परि आम्हीं देयावें हेंहि केलें, तिहींची म्हणियें ॥ १३२ ॥
उपाइलें=हातात आहे ,उपाय उरला
आतां यावरी येतुलें घडे, जें तेंचि सुख आगळें वाढें।
आणि काळाची दिठी न पडे, हें आम्हां करणें ॥ १३३ ॥
लळेयाचिया बाळका किरीटी, गवसणी करूनि स्नेहाचिया दिठी,
जैसी खेळतां पाठोपाठीं, माउली धांवे ॥ १३४ ॥
गवसणी=अंगरखा आवरण
तें जो जो खेळ दावी, तो तो पुढें सोनयाचा करूनि ठेवी।
तैसी उपास्तीची पदवी, पोषित मी जायें ॥ १३५ ॥
उपास्तीची पदवी=उपासनेची आवड
जिये पदवीचेनि पोषकें, ते मातें पावती यथासुखें।
हे पाळती मज विशेखें, आवडे करूं ॥ १३६ ॥
पाळती=पालन (भक्ती करुन वश करती ) आवडे=प्रिय
पैं गा भक्तासि माझें कोड, मज तयाचे अनन्यगतीची चाड।
कां जे प्रेमळांचें सांकड, आमुते घरीं ॥ १३७ ॥
सांकड= कमतरता ,मिळण्यास कठीण
पाहें पां स्वर्ग मोक्ष उपायिले, दोन्ही मार्ग तयाचिये वाहणी केले,
आम्हीं आंगही शेखीं वेंचिलें,
लक्ष्मियेसीं ॥ १३८ ॥
उपायिले =तयार करणे, मिळणे वाहणी=मोकळे केले
परि आपणपेंवीण जें एक, तें तैसेंचि सुख साजुक।
सप्रेमळालागीं देख, ठेविलें जतन ॥ १३९ ॥
आपणपेंवीण= देह मीपण याहून वेगळे (मुक्तीहून)
हा ठायवरी किरीटी, आम्ही प्रेमळु घेवों आपणपयासाठीं।
या बोलीं बोलिजत गोष्टी, तैसिया नव्हती गा ॥ १४० ॥
ठायवरी=येथ पर्यंत
तेषामेवानुकम्पार्थमहमज्ञानजं तमः।
नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता ॥ ११॥
म्हणोनि मज आत्मयाचा भावो, जिहीं जियावया केला ठावो।
एक मीवांचूनि वावो, येर मानिलें जिहीं ॥ १४१ ॥
तयां तत्त्वज्ञां चोखटां, दिवी पोतासाची सुभटा।
मग मीचि होऊनि दिवटा, पुढां पुढां चालें ॥ १४२ ॥
दिवी =मशाल पोतासाची=कापराची दिवटा=दिवा वाहणारा
अज्ञानाचिये राती-, माजीं तमाचि मिळणी दाटती।
ते नाशूनि घालीं परौती, करीं नित्योदयो ॥ १४३ ॥
ऐसें प्रेमळाचेनि प्रियोत्तमें, बोलिलें जेथ पुरुषोत्तमें।
तेथ अर्जुन मनोधर्में, निवालों म्हणतसे ॥ १४४ ॥
अहो जी अवधारा, भला केरु फेडिला संसारा।
जाहलों जननीजठरजोहरा-, वेगळा प्रभू ॥ १४५ ॥
केरु= भ्रम, मळ जोहरा=आग अग्नी
जी जन्मलेपण आपुलें, हें आजि मियां डोळां देखिलें।
जीवित हातां चढलें, आवडतसें ॥ १४६ ॥
आजि आयुष्या उजवण जाहली, माझिया दैवा दशा उदयली।
जे वाक्यकृपा लाधली, दैविकेनि मुखें ॥ १४७ ॥
उजवण= उजेड (सफल )
आतां येणें वचन तेजाकारें, फिटलें आंतील बाहेरील आंधारें।
म्हणोनि देखतसें साचोकारें, स्वरूप तुझें ॥ १४८ ॥
http://dnyaneshwariabhyas.blogspot.in/
ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ
सुंदर !
ReplyDelete