ज्ञानेश्वरी / अध्याय
नववा राजविद्याराजगुह्ययोग संत ज्ञानेश्वर
ओव्या १८८ ते २३८
महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिता:।
भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम् ॥ १३ ॥
तरी जयांचिये चोखटे मानसीं, मी होऊनि असें क्षेत्रसंन्यासी।
जयां निजेलियांतें उपासी, वैराग्य गा ॥ १८८ ॥
महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिता:।
भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम् ॥ १३ ॥
तरी जयांचिये चोखटे मानसीं, मी होऊनि असें क्षेत्रसंन्यासी।
जयां निजेलियांतें उपासी, वैराग्य गा ॥ १८८ ॥
निजेलियांतें =निजले असता चोखटे=शुद्ध
जयांचिया आस्थेचिया सद्भावा, आंतु धर्म करि राणिवा।
जयांचें मन ओलावा, विवेकासी ॥ १८९ ॥
राणिवा=राज्य
जे ज्ञानगंगे नाहाले, पूर्णता जेऊनि धाले।
जे शांतीसि आले, पालव नवे ॥ १९० ॥
जे परिणामा निघाले कोंभ, जे धैर्यमंडपाचे स्तंभ।
जे आंनदसमुद्रीं कुंभ, चुबकळोनि भरिले ॥ १९१ ॥
परिणामा=पूर्णावस्था
जयां भक्तीची येतुली प्राप्ती, जे कैवल्यातें परौतें सर म्हणती,
जयांचिये लीलेमाजीं नीति, जियाली दिसे ॥ १९२ ॥
जे आघवांचि करणीं, लेइले शांतीची लेणीं।
जयांचें चित्त गवसणी, व्यापका मज ॥ १९३ ॥
जे आघवांचि करणीं, लेइले शांतीची लेणीं।
जयांचें चित्त गवसणी, व्यापका मज ॥ १९३ ॥
आघवांचि=सर्व करणीं=इंद्रिये
ऐसे जे महानुभाव, जे दैविये प्रकृतीचें दैव।
जे जाणोनियां सर्व, स्वरुप माझे ॥ १९४ ॥
मग वाढतेनि प्रेमें, मातें भजती जे महात्मे।
परि दुजेपण मनोधर्में, शिवतलें नाही ॥ १९५ ॥
ऐसें मीच होऊनि पांडवा, करिती माझी सेवा।
परि नवलावो तो सांगावा, असे आइक ॥ १९६ ॥
सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रता: ॥
नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते ॥ १४ ॥
तरी कीर्तनाचेनि नटनाचें, नाशिले व्यवसाय प्रायश्चित्तांचे।
जे नामचि नाहीं पापाचें, ऐसें केलें ॥ १९७ ॥
नटनाचें=आनंदाने
यमदमा अवकळा आणिली, तीर्थें ठायावरुनि उठविली।
यमलोकीं खुंटिली, राहाटी आघवी ॥ १९८ ॥
यमु म्हणे काय यमावें, दमु म्हणे कवणातें दमावें।
तीर्थें म्हणती काय खावें, दोष ओखदासि नाहीं ॥ १९९ ॥
ओखदासि= औषध
ऐसे माझेनि नामघोषें, नाहीं करिती विश्वाचीं दुःखें।
अवघें जगचि महासुखें, दुमदुमित भरलें ॥ २०० ॥
ते पाहांटेवीण पाहावित, अमृतेंवीण जीववित।
योगेंवीण दावित, कैवल्य डोळां ॥ २०१ ॥
परि राया रंका पाड धरुं, नेणती सानेयां थोरां कडसणी करुं।
एकसरें आंनदाचे आवारु, होत जगा ॥ २०२ ॥
पाड= योग्यता (भेद) कडसणी=निवड
कहीं एकाधेनि वैकुंठा जावें, तें तिहीं वैकुंठचि केलें आघवें।
ऐसें नामघोषगौरवें, धवळलें विश्व ॥ २०३ ॥
तेजें सूर्य तैसे सोज्वळ, परि तोहि अस्तवे हें किडाळ।
चंद्र संपूर्ण एखादे वेळ, हे सदा पुरते।। २०४ ॥
किडाळ= दोष
मेघ उदार परि वोसरे, म्हणऊनि उपमेसी न पुरे।
हे निःशंकपणें सपांखरे , पंचानन ॥ २०५ ॥
सपांखरे=कृपाळू पंचानन=शिव शंकर
जयांचे वाचेपुढां भोजे, नाम नाचत असे माझें,
जें जन्मसहस्त्रीं वोळगिजे, एकवेळ मुखासि यावया ॥ २०६ ॥
भोजे=आनंदे वोळगिजे= सेवा करणे
तो मी वैकुंठीं नसें, एक वेळ भानुबिंबींही न दिसें।
वरी योगियांचींही मानसें, उमरडोनि जाय ॥ २०७ ॥
उमरडोनि=ओलांडून
परि तयांपाशीं पांडवा, मी हारपला गिंवसावा।
जेथ नामघोषु बरवा, करिती ते माझे ॥ २०८ ॥
कैसे माझां गुणीं धाले, देशकाळातें विसरले।
कीर्तनसुखें झाले, आपणपांचि।। २०९ ॥
कृष्ण विष्णु हरि गोविंद, या नामाचे निखळ प्रबंध।
माजी आत्मचर्चा विशद, उदंड गाती ॥ २१० ॥
विशद =उघड स्पष्ट विशुद्ध
प्रबंध= पुष्कळ मोठे लेख (येथे खूप उच्चार )
हें बहु असो यापरी, कीर्तित मातें अवधारीं।
एक विचरती चराचरीं, पांडुकुमरा ॥ २११ ॥
विचरती=फिरतात
मग आणिक ते अर्जुना, साविया बहुवा जतना।
पंचप्राणा मना, पाढाऊ घेउनी ॥ २१२ ॥
बहुवा जतना =तत्परतेने काळजीपूर्वक
पाढाऊ=वाटाड्या
बाहेरी यमनियमांची कांटी लाविली, आंतु वज्रासनाची पौळी पन्नासिली।
वरी प्राणायामांची मांडिलीं, वाहातीं यंत्रें ॥ २१३ ॥=
कांटी =काटेरी कुंपण पौळी पन्नासिली= कोट रचला
वाहातीं यंत्रें=प्राणायाम रुपी तोफा
तेथ उल्हाटशक्तीचेनि उजिवडे , मनपवनाचेनि सुरवाडें।
सतरावियेचें पाणियांडे, बळियाविलें ॥ २१४ ॥
उल्हाटशक्तीचेनि=कुंडलिनी उजिवडे=उजेडात
सुरवाडें=मदतीने अनुकुलतेने सतरावियेचें=चंद्र्कलेतील
पाणियांडे=तळे
तेव्हां प्रत्याहारें ख्याति केली, विकारांची संपिली बोहली।
इंद्रियें बांधोनि आणिलीं, हृदयाआंतु ॥ २१५ ॥
ख्याति=अंतर्मुख बोहली=भाषा
तंव धारणावारु दाटिले, महाभूतांतें एकवटिलें।
मग चतुरंग सैन्य निवटिलें, संकल्पाचें ॥ २१६ ॥
धारणा वारु दाटिले =रुपी घोडास कह्यात आणले
निवटिलें= नष्ट केले
तयावरी जैत रे जैत, म्हणोनि ध्यानाचें निशाण वाजत ।
दिसे तन्मयाचें झळकत, एकछत्र ॥ २१७ ॥
तन्मयाचें=स्वरुप ऐक्य
पांटी समाधिश्रियेचा अशेखा, आत्मानुभवराज्यसुखा।
पट्टाभिषेकु देखां, समरसें जाहला ॥ २१८ ॥
समाधिश्रियेचा=राज्यलक्ष्मी अशेखा=संपूर्ण
ऐसें हें गहन, अर्जुना माझें भजन।
आतां ऐकें सांगेन, जे करिती एक ॥ २१९ ॥
तरी दोन्ही पालववेरी, जैसा एक तंतु अंबरीं।
तैसा मीवांचूनि चराचरीं, जाणती ना ॥ २२० ॥
पालववेरी =पदर अंबरीं=वस्त्र
आदि ब्रह्मा करुनी, शेवटीं मशक धरुनी।
माजी समस्त हें जाणोनी, स्वरुप माझें ॥ २२१ ॥
मग वाड धाकुटें न म्हणती, सजीव निर्जीव नेणती।
देखिलिये वस्तू उजू लुंटिती, मीचि म्हणोनि ॥ २२२ ॥
वाड= मोठे उजू लुंटिती=सरळ लोटन घेती
आपुलें उत्तमत्व नाठवे, पुढील योग्यायोग्य नेणवे।
एकसरें व्यक्तिमात्राचेनि नांवें , नमूंचि आवडे ॥ २२३ ॥
जैसें उंचीं उदक पडिलें, तें तळवटवरी ये उगेलें।
तैसें नमिजे भूतजात देखिलें, ऐसा स्वभावोचि तयांचा ॥ २२४ ॥
उदक उगेलें
कां फळलिया तरुची शाखा, सहजें भूमीसी उतरे देखा।
तैसें जीवमात्रां अशेखां, खालावती ते ॥ २२५ ॥
खालावती=विनम्र होती
अखंड अगर्वता होऊनि असती, तयांतें विनयो हेचि संपत्ती।
जे जयजयमंत्रें अर्पिती, माझांचि ठायीं ॥ २२६ ॥
नमितां मानापमान गळाले, म्हणोनि अवचितें ते मीचि जहाले।
ऐसे निरंतर मिसळले, उपासिती ॥ २२७ ॥
अर्जुना हे गुरुवी भक्ती, सांगितली तुजप्रती।
आतां ज्ञानयज्ञें यजिती, ते भक्त आइकें ॥ २२८ ॥
गुरुवी=श्रेष्ठ
परि भजन करिती हातवटी, तूं जाणत आहासि किरीटी।
जे मागां इया गोष्टी, केलिया आम्हीं ॥ २२९ ॥
हातवटी=कौशल्य
तंव आथि जी अर्जुन म्हणे, तें दैविकिया प्रसादाचें करणें।
तरि काय अमृताचें आरोगणें, पुरे म्हणवे ॥ २३० ॥
आरोगणें=वाढणे
या बोला अनंतें, लागटा देखिलें तयातें।
कीं सुखावलेनि चित्तें, डोलतु असे ॥ २३१ ॥
लागटा=प्रेम भावनेने युक्त
म्हणे भलें केलें पार्था, एऱ्हवीं हा अनवसरु सर्वथा।
परि बोलवीतसे आस्था, तुझी मातें ॥ २३२ ॥
अनवसरु=काळवेळ नसणे
तंव अर्जुन म्हणे हें कायी, चकोरेंवीण चांदिणेंचि नाहीं।
जग निवविजे हा तयाचां ठायीं, स्वभावो कीं जी ॥ २३३ ॥
येरें चकोरें तियें आपुलिये चाडे, चांचु करिती चंद्राकडे।
तेविं आम्ही विनवुं तें थोकडे, देवो कृपासिंधु ॥ २३४ ॥
चाडे=इच्छा थोकडे=लहान
जी मेघ आपुलिये प्रौढी, जगाची आर्ति दवडी।
वांचूनि चातकाची ताहान केवढी, तो वर्षावो पाहुनी ॥ २३५ ॥
प्रौढी=उदारता मोठेपण
परि चुळा एकाचिया चाडे, जेविं गंगेतेंचि ठाकावें पडे।
तेंविं आर्त का बहु कां थोडें, तरि सांगावें देवा ॥ २३६ ॥
चुळा एकाचिया – एक ओंजळीसाठी ठाकावें पडे= जाणे भाग आहे
तेथें देवें म्हणितलें राहें, जो संतोषु आम्हां जाहला आहे।
तयावरी स्तुति साहे, ऐसें उरलें नाही ॥ २३७ ॥
पैं परिसतु आम्हासि निकियापरी, तेंचि वक्तृत्वा वऱ्हाडीक करी,
ऐसें पुरस्करोनि श्रीहरी,
आदरिलें बोलों ॥ २३८ ॥
वऱ्हाडीक=आमंत्रित
http://dnyaneshwariabhyas.blogspot.in/
========
============= ============
सुंदर !
ReplyDeleteविषयांतर : माझी वरील टीप ४.३३ ए एम् ही चुकीची वेळ कां दाखवत आहे ? आज पहिल्यांदाच असे घडले.!
ReplyDelete