Thursday, April 28, 2016

ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा, ओव्या १३१ ते १८७



ज्ञानेश्वरी / अध्याय नववा  राजविद्याराजगुह्ययोग  संत ज्ञानेश्वर
ओव्या १३१ ते १८७

     
मयाध्यक्षेण प्रकृति: सूयते सचराचरम्।
     
हेतुनानेन कौन्तेय जगद्विपरिवर्तते ॥ १० ॥

जे लोकचेष्टां समस्तां, जैसा निमित्तमात्र कां सविता।
तैसा जगत्प्रभवीं पंडुसुता, हेतु मी जाणें ॥ १३१ ॥

कां जें मियां अधिष्ठिलिया प्रकृती, होती चराचराचिया संभूती |
म्हणोनि मी हेतु हें उपपत्ती, घडे यया ॥ १३२ ॥

संभूती=जन्म उपपत्ती=युक्तिवाद

आतां येणें उजिवडें निरुतें, न्याहाळीं पां ऐश्वर्ययोगातें।
जे माझां ठायीं भूतें, परी भूतीं मी नसें ॥ १३३ ॥

अथवा भूतें ना माझां ठायीं, आणि भूतांमाजि मी नाहीं।
या खुणा तुं कही, चुकों नको ॥ १३४ ॥

हें सर्वस्व आमुचें गूढ, परि दाविलें तुज उघड।
आतां इंद्रियां देऊनि कवाड, हृदयीं भोगीं ॥ १३५ ॥

कवाड=दरवाजा लावून

हा दंशु जंव नये हातां, तंव माझें साचोकारेपण पार्था।
न संपडे गा सर्वथा , जेविं भुसीं कणु ॥ १३६ ॥

दंशु=वर्म ज्ञान

एऱ्हवीं अनुमानाचेनि पैसें, आवडे कीर कळलें ऐसें।
परि मृगजळाचेनि वोलांशें, काय भूमि तिमे ॥ १३७ ॥

पैसें =विस्तारे आवडे=वाटते तिमे=भिजते

जें जाळ जळीं पांगिलें, तेथ चंद्रबिंब दिसे आंतुडलें।
परि थडिये काढूनि झाडिलें, तेव्हां बिंब कें सांगे ॥ १३८ ॥

तैसें बोलवरि वाचाबळें, वायांचि झकविजती प्रतीतीचे डोळे।
मग साचोकारें बोधावेळे, आथि ना होईजे ॥ १३९ ॥

झकविजती=फसती  आथि=असा इथे

     
अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम्।
     
परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम् ॥ ११ ॥

किंबहुना भवा बिहा या, आणि साचें चाड आथि जरी मियां।
तरि तुम्हीं गा उपपत्ती इया, जतन कीजे ॥ १४० ॥

उपपत्ती = खुणा 

एऱ्हवीं वेधली दिठी कवळें, ते चांदणियाते म्हणे पिंवळें।
तेविं माझां स्वरुपीं निर्मळे, देखाल दोष ॥ १४१ ॥

कवळें=कावीळ

नातरी ज्वरें विटाळले मुख, ते दुधातें म्हणे कडू विख।
तेविं अमानुषा मानुष, मानाल मातें ॥ १४२ ॥

म्हणऊनि पुढती तूं धनंजया, झणें विसंबसी या अभिप्राया।
जे इया स्थूलदृष्टी वायां, जाइजेल गा ॥ १४३ ॥

पैं स्थूलदृष्टी देखती मातें, तेंचि न देखणें जाण निरुतें।
जैसें स्वप्नींचेनि अमृतें, अमरा नोहिजे ॥ १४४ ॥

निरुतें=खरोखर नीट

एऱ्हवीं स्थूलदृष्टी मूढ, मातें जाणती कीर दृढ।
परि तें जाणणेंचि जाणणेया आड, रिगोनि ठाके ॥ १४५ ॥

जैसा नक्षत्राचिया आभासा-, साठीं घातु झाला तया हंसा।
माजीं रत्नबुद्धीचिया आशा, रिगोनियां ॥ १४६ ॥

माजीं=आतमध्ये

सांगे गंगा या बुद्धी मृगजळ, ठाकोनि आलियाचें कवण फळ ।
काय सुरतरु म्हणोनि बाबुळ , सेविली करी ॥ १४७ ॥

हा निळयाचा दुसरा , या बुद्धी हातु घातला विखारा।
कां रत्ने म्हणोनि गारा, वेंची जेविं ॥ १४८ ॥

निळयाचा=नीलरत्नहार   विखारा=सर्प

अथवा निधान हें प्रगटलें, म्हणोनि खदिरांगार खोळे भरिले।
कां साउली नेणतां घातलें, कुहां सिंहें ॥ १४९ ॥

साउली =छाया प्रतिबिंब  कुहां=विहीर

तेविं मी म्हणोनि प्रपंचीं, जिहीं बुडी दिधली कृतनिश्चयाची।
तिहीं चंद्रासाठीं जेविं जळींची, प्रतिमा धरिली ॥ १५० ॥

तैसा कृतनिश्चय वायां गेला, जैसा कोण्ही एकु कांजी प्याला।
मग परिणाम पाहों लागला, अमृताचा ॥ १५१ ॥

तैसें स्थूलाकारीं नाशिवंते, भरंवसा बांधोनि चित्तें।
पाहती मज अविनाशातें, तरी कैंचा दिसें ॥ १५२ ॥

काइ पश्चिमसमुद्राचिया तटा, निघिजत आहे पूर्विलिया वाटा।
कां कोंडा कांडतां सुभटा, कणु आतुडे ॥ १५३ ॥

तैसें विकारलें हें स्थूळ, जाणितलेया मी जाणवतसें केवळ।
काइ फेण पितां जळ, सेविलें होय ॥ १५४ ॥

म्हणोनि मोहिलेनि मनोधर्में, हेंचि मी मानूनि संभ्रमें।
मग येथिंचीं जियें जन्मकर्में, तियें मजचि म्हणती ॥ १५५ ॥

येतुलेनि अनामा नाम, मज अक्रियासि कर्म।
विदेहासि देहधर्म, आरोपिती ॥ १५६ ॥

मज आकारशून्या आकारु, निरुपाधिका उपचारु।
मज विधिविवर्जिता व्यवहारु, आचारादिक ॥ १५७ ॥

मज वर्णहीना वर्णु, गुणातीतासि गुणु।
मज अचरणा चरणु, अपाणिया पाणी ॥ १५८ ॥

मज अमेया मान, सर्वगतासी स्थान।
जैसें सेजेमाजी वन, निदेला देखे ॥ १५९ ॥

अमेया= अपरिमित

तैसें अश्रवणा श्रोत्र, मज अचक्षूसी नेत्र।
अगोत्रा गोत्र, अरुपा रुप ॥ १६० ॥

मज अव्यक्तासि व्यक्ती, अनार्तासी आर्ती।
स्वयंतृप्ता तृप्ती, भाविती गा ॥ १६१ ॥

मज अनावरणा प्रावरण, भूषणातीतासि भूषण।
मज सकळकारणा कारण, देखती ते ॥ १६२ ॥

मज सहजातें करिती, स्वंयभातें प्रतिष्ठिती।
निरंतराते आव्हानिती, विसर्जिती गा ॥ १६३ ॥

मी सर्वदा स्वतःसिद्धु, तो कीं बाळ तरुण वृद्धु।
मज एकरुपा संबंधु, जाणती ऐसे ॥ १६४ ॥

मज अद्वैतासि दुजें, मज अकर्तायासि काजें।
मी अभोक्ता कीं भुंजें, ऐसें म्हणती ॥ १६५ ॥

भुंजें=भोगता

मज अकुळाचें कुळ वानिती, मज नित्याचेनि निधनें शिणती।
मज सर्वांतराते कल्पिती, अरि मित्र गा ॥ १६६ ॥

मी स्वानंदाभिरामु, तया मज अनेकां सुखांचा कामु।
अवघाची मी असे समु, कीं म्हणती एकदेशी ॥ १६७ ॥

मी आत्मा एक चराचरीं, म्हणती एकाचा कैंपक्ष करीं।
आणि कोपोनि एकातें मारीं, हेंचि वाढविती ॥ १६८ ॥

किंबहुना ऐसे समस्त, जे हे मनुष्यधर्म प्राकृत।
तयाचि नांव मी ऐसें विपरीत, ज्ञान तयांचें ॥ १६९ ॥

जंव आकारु एक पुढां देखती, तंव हा देव येणें भावें भजती।
मग तोचि बिघडलिया टाकिती, नाहीं म्हणोनि ॥ १७० ॥

मातें येणें येणें प्रकारें, जाणती मनुष्य ऐसेनि आकारें।
म्हणऊनि ज्ञानचि तें आंधारें, ज्ञानासि करी ॥ १७१ ॥

     
मोघाशा मोघकर्माणो मोघज्ञाना विचेतस:।
     
राक्षसीमासुरीं चैव प्रकृतिं मोहिनीं श्रिता: ॥ १२ ॥

यालागीं जन्मलेचि ते मोघ, जैसें वार्षियेवीण मेघ।
कां मृगजळाचे तरंग, दुरुनीचि पाहावे ॥ १७२ ॥

मोघ=व्यर्थ

अथवा कोल्हेरीचे असिवार, नातरीं वोडंबरीचे अळंकार।
कीं गंधर्वनगरीचे आवार, आभासती कां ॥ १७३ ॥

कोल्हेरीचे असिवार=मातीचे घोडेस्वार वोडंबरीचे=जादुगार
गंधर्वनगरीचे=आकाशीच्या ढगांचे

सांवरी वाढिन्नल्या सरळा, वरि फळ ना आंतु पोकळा।
कां स्तन जाले गळां, शेळिये जैसे ॥ १७४ ॥

सांवरी=शेर ,काड्या निवडुंग

तैसें मूर्खाचें तयां जियालें, आणि धिक् कर्म तयांचें निपजलें।
जैसें सांवरी फळ आलें, घेपे ना दीजे ॥ १७५ ॥

मग जें कांहीं ते पढिन्नले, तें मर्कटें नारळ तोडिले।
कां आंधळ्या हातीं पडिलें, मोती जैसें ॥ १७६ ॥

किंबहुना तयांचीं शास्त्रें, जैशी कुमारींहाती दिधलीं शस्त्रें।
कां अशौच्या मंत्रें, बीजें कथिलीं ॥ १७७ ॥

तैसें ज्ञानजात तयां, आणि जें कांहीं आचरलें गा धनंजया।
तें आघवेंचि गेलें वायां, जे चित्तहीन ॥ १७८ ॥

पैं तमोगुणाची राक्षसी, जे सद्बुद्धीतें ग्रासी।
विवेकाचा ठावोचि पुसी, निशाचरी ॥ १७९ ॥

तिये प्रकृती वरपडे जाले, म्हणऊनि चिंतेचेनि कपोलें गेले।
वरि तामसीयेचिये पडिले, मुखामाजीं ॥ १८० ॥

वरपडे=प्राप्त ,अधीन  कपोलें=नशिबी

जेथ आशेचिये लाळे, आंतु हिंसा जीभ लोळे।
तेवींचि संतोषाचे चाकळे, अखंड चघळी ॥ १८१ ॥

चाकळे=चघळ

जे अनर्थाचे कानवेरी, आवाळुवें चाटीत निघे बाहेरी।
जे प्रमादपर्वतींचि दरी, सदाचि मातली ॥ १८२ ॥

कानवेरी=कानापर्यंत  आवाळुवें=ओठाचा खालचा भाग
जेथ द्वेषाचिया दाढा, खसखसां ज्ञानाचा करिती रगडा।
जे अगस्तीगवसणी मूढां, स्थूलबुद्धी ॥ १८३ ॥

अगस्तीगवसणी=अगस्ती ऋषीचे कुंभ आवरण
(ज्यातून त्यांचा जन्म झाला )

ऐसे आसुरिये प्रकृतीचां तोंडीं, जे जाले गा भूतोंडीं।
ते बुडोनि गेले कुंडीं, व्यामोहाचां ॥ १८४ ॥

भूतोंडीं=भुतांनं टाकलेला बळी व्यामोहाचां=भ्रांती

एवं तमाचिये पडिले गर्ते, न पविजतीचि विचाराचेनि हातें।
हें असो ते गेले जेथें, ते शुद्धीचि नाहीं ॥ १८५ ॥

म्हणोनि असोतु इयें वायाणीं, कायशीं मूर्खाचीं बोलणीं।
वायां वाढवितां वाणी, शिणेल हन ॥ १८६ ॥

वायाणीं=व्यर्थ 

ऐसें बोलिले देवें, तेथ जी म्हणितलें पांडवें।
आइकें जेथ वाचा विसवे, ते साधुकथा ॥ १८७ ॥


http://dnyaneshwariabhyas.blogspot.in/


=============  ================== ========

1 comment:

  1. हे समजायला जरा अवघड वाटलं . असो .

    ReplyDelete