Thursday, April 14, 2016

ज्ञानेश्वरी अध्याय ६ ओव्या २९३ ते ३४४

   

अध्याय ६ वा ओव्या २९३ ते ३४४


 युञ्जन्नेनं सदाऽत्मानं योगी नियतमानसः।
     
शान्ति निर्वाणपरमां मत्संस्थामधिगच्छति ॥ १५ ॥

ऐकें शक्तीचें तेज लोपे, तेथ देहींचे रुप हारपे।
मग तो डोळ्यांमाजी लपे, जगाचिया ॥ २९३ ॥

डोळ्यांमाजी लपे-लोकांना न दिसणे

एऱ्हवीं आधिलाची ऐसें, सावयव तरी दिसे।
परी वायूचें कां जैसें, वळिलें होय ॥ २९४ ॥

आधिलाची=अगोदर होता तसाच वळिलें-बनविले

नातरी कर्दळीचा गाभा, बुंथी सांडोनि उभा।
कां अवयवचि नभा, निवडला तो ॥ २९५ ॥

बुंथी= आवरण, सोपटे खोळ निवडला=येणे (पा,भे.उदवला)

तैसें होय शरीर, तैं तें म्हणिजे खेचर।
हें पद होतां चमत्कार, पिंडजनी ॥ २९६ ॥

खेचर=वायूगामी  पद=रूप पिंडजनी=लोकांना

देखें साधकु निघोनि जाय, मागां पाउलांची वोळ राहे।
तेथ ठायी ठायी होये, हे अणिमादिक ॥ २९७ ॥

वोळ=ठसे

परि तेणें काय काज आपणयां, अवधारी ऐसा धनंजया।
लोप आथी भूतत्रया, देहींचा देहीं ॥ २९८ ॥

पृथ्वीतें आप विरवी, आपातें तेज जिरवी।
तेजातें पवनु हरवी, हृदयामाजीं।। २९९ ॥

पाठीं आपण एकला उरे, परि शरीराचेनि अनुकारें,
मग तोही निगे अंतरें, गगना मिळे ॥ ३०० ॥

आपण=(येथे) पवन अंतरें= पुढे नंतर गगना=मस्तकाकाश

ते वेळी कुंडलिनी हे भाष जाये, मारुत ऐसें नाम होये।
परि शक्तीपण तें आहे, जंव न मिळे शिवीं ॥ ३०१ ॥

मारुत=वायू शिवीं=शिवास (शिव-शक्ती)

मग जालंधर सांडी, ककारांत फोडी।
गगनाचिये पाहाडीं, पैठी होय ॥ ३०२ ॥

ककारांत=टाळूवर काकीमुखस्थान इंद्रियांचे ऐक्य होणारे

ते ॐकाराचिये पाठी, पाय देत उठाउठी।
पश्यंतीचिये पाउटी, मागां घाली ॥ ३०३ ॥

पाउटी=पायरी पावूलवाट

पुढां तन्मात्रा अर्धवेरी, आकाशाचां अंतरी।
भरती गमे सागरीं, सरिता जेवीं ॥ ३०४ ॥

तन्मात्रा अर्धवेरी=ओमकाराच्या तन्मात्रा अर्ध मात्रा पर्यंतच्या

मग ब्रह्मरंध्री स्थिरावोनी, सोहंभावाच्या बाह्या पसरुनी।
परमात्मलिंगा धांवोनि, आंगा घडे ॥ ३०५ ॥

आंगा घडे= मिठी मारे

तंव महाभूतांची जवनिका फिटे, मग दोहींसि होय झटें,
तेथ गगनासकट आटे, समरसीं तिये ॥ ३०६ ॥

जवनिका=जवळीक दोहींसि=शिव शक्ती झटें,=ऐक्य

पैं मेघाचेनि मुखीं निवडिला, समुद्र कां वोघीं पडिला।
तो मागुता जैसा आला, आपणपेयां ॥ ३०७ ॥

तेवीं पिंडाचेनि मिषें, पदीं पद प्रवेशे।
तें एकत्व होय तैसें, पंडुकुमरा ॥ ३०८ ॥

पदीं पद= शिव शिवात

आतां दुजें हन होतें, कीं एकचि हें आइतें।
ऐशिये विवंचनपुरतें, उरेचिना।। ३०९ ॥

हन= खरच का

गगनीं गगन लया जाये, ऐसें जे कांहीं आहे।
तें अनुभवें जो होये, तो होऊनि ठाके ॥ ३१० ॥


गगनीं गगन मुर्ध्यन्याकाशाचा चिदाकाशात लय
तें अनुभवें=(ब्रह्म स्थिती)

म्हणोनि तेथिंची मातु, न चढेचि बोलाचा हातु।
जेणें संवादाचिया गांवाआंतु, पैठी कीजे ॥ ३११ ॥

पैठी=गावी

अर्जुना एऱ्हवीं तरी, इया अभिप्रायाचा गर्वु धरी।
ते पाहें पां वैखरी, दुरी ठेली ॥ ३१२ ॥

अभिप्रायाचा=सांगायचा (शब्दात)

भ्रूलता मागिलीकडे, तेथ मकाराचेंचि आंग न मांडे।
सडेया प्राणा सांकडें, गगना येतां ॥ ३१३ ॥

भ्रूलता=त्रिकटू स्थान (आज्ञा चक्र) आंग न मांडे=शिरकाव न होणे
सडेया-एकटा सांकडें=अवघडे

पाठीं तेथेंचि तो भासळला, तंव शब्दाचा दिवो मावळला,
मग तयाहि वरी आटु भविन्नला, आकाशाचा ॥ ३१४ ॥

भासळला=संपला भविन्नला=घडला

आतां महाशून्याचिया डोहीं, जेथ गगनसीचि ठावो नाहीं।
तेथ तागा लागेल काई, बोलाचा इया ॥ ३१५ ॥

तागा=ठाव

म्हणोनि आखरामाजीं सांपडे, कीं कानावरी जोडे।
हे तैसें नव्हे फुडें, त्रिशुध्दी गा ॥ ३१६ ॥

फुडे= खरोखर त्रिशुध्दी =त्रिवार

जैं कही दैवें, अनुभविलें फावे।
तैं आपणचि हें ठाकावें, होऊनिया ॥ ३१७ ॥

पुढती जाणणें तें नाहींचि, म्हणोनि असो किती हेंचि।
बोलावें आतां वायांचि, धनुर्धरा ॥ ३१८ ॥

ऐसें शब्दजात माघौतें सरे, तेथ संकल्पाचें आयुष्य पुरे।
वाराही जेथ न शिरे, विचाराचा ॥ ३१९ ॥

जें उन्मनियेचें लावण्य, जें तुर्येचें तारुण्य।
अनादि जें अगण्य, परमतत्व ॥ ३२० ॥

उन्मनि=अमनवस्था तुर्येचें= ज्ञानरूपवस्था
अगण्य=मोजता ना येणारे

जें आकाराचा प्रांतु, जें मोक्षाचा एकांतु।
जेथ आदि आणि अंतु, विरोनि गेले ॥ ३२१ ॥

जें विश्वाचें मूळ, जें योगद्रुमाचें फळ।
जें आनंदाचें केवळ, चैतन्य गा ॥ ३२२ ॥

जें महाभूतांचें बीज, जें महातेजाचें तेज।
एवं पार्था जें निज, स्वरुप माझें ॥ ३२३ ॥

ते हे चर्तुभुज कोंभेली, जयाची शोभा रुपा आली।
देखोनि नास्तिकीं नोकिली, भक्तवृंदें ॥ ३२४ ॥

कोंभेली =अंकुरले  नोकिली=पिडली

तें अनिर्वाच्य महासुख, पैं आपणचि जाहले जे पुरुष।
जयांचे कां निष्कर्ष, प्राप्तीवेरीं ॥ ३२५ ॥

निष्कर्ष=निश्चय, खात्री

आम्ही साधन हें जें सांगितलें , तेंचि शरीरीं जिहीं केलें।
ते आमुचेनि पाडें आले, निर्वाळलेया ॥ ३२६ ॥

पाडें=सारखे योग्य निर्वाळलेया=शुद्ध होवून

परब्रह्माचेनि रसें, देहाकृतीचिये मुसें।
वोतींव जाहले तैसे, दिसती आंगें ॥ ३२७ ॥

कां जें आपण आतां देवो , हा बोलिलो जो उपावो।
तो प्राप्तीचा ठावो, म्हणोनि घडे ॥ ३२९ ॥

इये अभ्यासीं जे दृढ होती, ते भरंवसेनि ब्रह्मत्वा येती।
हें सांगतियाची रीती, कळलें मज ॥ ३३० ॥

देवा गोठीचि हे ऐकतां, बोधु उपजतसे चित्ता।
मा अनुभवें तल्लीनता, नव्हेल केंवी ॥ ३३१ ॥

बोधु=ज्ञान मा=तर मग

म्हणऊनि एथ कांही, अनारिसें नाहीं।
परि नावभरी चित्त देई, बोला एका ॥ ३३२ ॥

अनारिसें=वेगळे निराळे

आतां कृष्णा तुवां सांगितला योगु, तो मना तरी आला चांगु।
परि न शकें करुं पांगु, योग्यतेचा ॥ ३३३ ॥

पांगु=कमतरता उणीव

सहजें आंगिक जेतुली आहे, तेतुलियाची जरी सिध्दि जाये।
तरी हाचि मार्ग सुखोपायें, अभ्यासीन ॥ ३३४ ॥

आंगिक=अंगचे बळ

नातरी देवो जैसें सांगतील, तैसें आपणपां जरी न ठकेल।
तरी योग्यतेवीण होईल, तेचिं पुसों ॥ ३३५ ॥

ठकेल=जमेल योग्यतेवीण होईल = योग्यतेवाचून साधेल

जीवींचिये ऐसी धारण, म्हणोनि पुसावया जाहलें कारण।
मग म्हणे तरी आपण, चित्त देइजो ॥ ३३६ ॥


हां हो जी अवधारिलें, जें हें साधन तुम्हीं निरुपिलें।
तें आवडतयाहि अभ्यासिलें, फावों शके ॥ ३३७ ॥

आवडतयाहि=आवडेल रुचेल त्यानेही   फावों=साधेल  

कीं योग्यतेवीण नाहीं, ऐसें हन आहे कांही।
तेथ कृष्णा म्हणती तरी काई , धनुर्धरा।। ३३८ ॥

हें काज कीर निर्वाण, परि आणिकही जें कांही साधारण।
तेंही अधिकाराचे वोडवेविण, काय सिध्दि जाय ॥ ३३९ ॥

कीर=खरोखर निर्वाण=मोक्ष वोडवेविण=असल्याविना

पैं योग्यता जे म्हणिजे, ते प्राप्तीची आधीन जाणिजे।
कां जे योग्य होऊनि कीजे, तें आरंभी फळें ॥ ३४० ॥

आरंभी=आरंभिले

तरी तैसी एथ कांही, सावियाचि केणी नाहीं।
आणि योग्यांची काई, खाणी असे ॥ ३४१ ॥

सावियाचि =सहज लाभणारी   केणी=बाजारपेठ
योग्यांची= पा.भे .योग्यतेची

नावेक विरक्तु, जाहला देहधर्मी नियतु।
तरि तोचि नव्हे व्यवस्थितु, अधिकारिया ॥ ३४२ ॥

येतुलालिये आयणीमाजि येवढें, योग्यपण तूतेंही जोडे।
ऐसें प्रसंगे सांकडें, फेडिलें तयाचें ॥ ३४३ ॥

आयणी=प्रमाण कस
सांकडें=संकट आशंका

मग म्हणे पार्था, ते हे ऐसी व्यवस्था।
अनियतासि सर्वथा, योग्यता नाहीं ॥ ३४४ ॥

अनियतासि=अनियमित यथेष्ट वागणारा
=====================================================

1 comment:

  1. ‘अणिमादिक’ अर्थ/गर्भार्थ काय?
    बाकी छान

    ReplyDelete