Monday, April 25, 2016

ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा, ओव्या १ ते ५६ संत ज्ञानेश्वर



ज्ञानेश्वरी / अध्याय नववा  राजविद्याराजगुह्ययोग  ओव्या १ ते ५६

तरि अवधान एकवेळें दीजे, मग सर्व सुखासि पात्र होईजे।
हें प्रतिज्ञोत्तर माझें, उघड ऐका ॥ १ ॥

परि प्रौढी न बोलें हो जी, तुम्हां सर्वज्ञांचां समाजीं।
देयावें अवधान हे माझी, विनवणी सलगीची ॥ २ ॥

प्रौढी=आढ्यता मोठेपण गर्व    सलगीची=प्रेमाची जवळीक

कां जे लळेयांचे लळें सरती, मनोरथाचे मनौरे पुरती।
जरी माहेरें श्रीमंतें होती, तुम्हा ऐसी ॥ ३ ॥

लळेयांचे=हट्ट करणाऱ्या लाडक्यांचे लळें=लाड
मनौरे=मनोरथ

तुमचेया दिठिवेचिया वोले, सासिन्नले प्रसन्नतेचे मळे।
ते साऊली देखोनि लोळें, श्रांतु जी मी ॥ ४ ॥

सासिन्नले=बहरले श्रांतु=थकला

प्रभू तुम्ही सुखामृताचे डोहो, म्हणोनि आम्ही आपुलिया स्वेच्छा वोलावों लाहों।
येथ जरी सलगी करू बिहों, तरी निवो कें पां ॥ ५ ॥

वोलावों =भिजणे निवो कें=कसा शांत होईल

नातरी बालक बोबडां बोलीं, कां वाकुडां विचुकां पाऊलीं।
तें चोज करूनि माऊली, रिझे जेवीं ॥ ६ ॥

चोज=प्रेम रिझे=आनंदे

तेवी तुम्हा संतांचा पढियावो, कैसेनि तरि आम्हांवरी हो।
या बहुवा आळुकिया जी आहों, सलगी करीत ॥ ७ ॥

पढियावो=प्रेम  आळुकिया= इच्छा आस

वांचूनि माझिये बोलतीये योग्यते, सर्वज्ञ भवादृश श्रोते।
काय धड्यावरी सारस्वतें, पढों सिकिजे ॥

भवादृश= जाणते  सारस्वतें= शारदा पुत्र  

अवधारां आवडे तेसणां धुंधुरु, परि महातेजीं न मिरवे काय करूं।
अमृताच्या ताटी वोगरूं, ऐसी रससोय कैंची ॥ ९ ॥

आवडे=वाटे  तेसणां =तेवढा  धुंधुरु=काजवा

अहो हिमकरासी विंजणे, की नादापुढे आइकवणे।
लेणियासी लेणें, हें कहीं आथी ॥ १० ॥

हिमकरासी=चंद्र   विंजणे=वारा घालणे

सांगा परिमळें काय तुरंबावें, सागरें कवणे ठायीं नाहावें।
हें गगनचि आडें आघवें, ऐसा पवाडु कैंचा ॥ ११ ॥

तुरंबावें=गंध घ्यावा आडें=आच्छादणे  

तैसें तुमचें अवधान धाये, आणि तुम्ही म्हणा हें होये।
ऐसें वक्तृत्व कवणा आहे, जेणे रिझा तुम्ही ॥ १२ ॥

धाये=तृप्त होणे

तरि विश्वप्रगटतिया गभस्ती, हातिवेनि न कीजे आरती।
कां चुळोदकें अपांपती, अर्घ्यु नेदिजे ॥ १३ ॥

गभस्ती=सूर्य हातिवेनि=काडवात काकडा दिवटी
चुळोदकें=ओंजळभर पाणी अपांपती=समुद्र


प्रभु तुम्ही महेशाचिया मूर्ती, आणि मी दुबळा अर्चितसे भक्ती।
म्हणोनि बेल जऱ्ही गंगावती, तऱ्ही स्वीकाराल की ॥ १४ ॥

गंगावती=निर्गुडीचा पाला

बाळक बापाचिये ताटीं रिगे, रिगौनि बापातेंच जेवऊं लागे।
की तो संतोषलेनि वेगें, मुखचि वोडवी ॥ १५ ॥

वोडवी=पुढे करणे

तैसा मी तुम्हांप्रती, चावटी करितसे बाळमती।
तरी तुम्हीं संतोषिजे ऐसी जाती, प्रेमाची या ॥ १६ ॥

चावटी=बडबड

आणि तेणे आपुलेपणाचेनि मोहें, तुम्ही संत घेतले असा बहुवे।
म्हणोनि केलिये सलगीचा नोहे, आभारु तुम्हां ॥ १७ ॥
बहुवे=अतिशय (प्रेमाने)

अहो तान्हेयाची लागता झटे, तरी अधिकचि पान्हा फुटे।
रोषें प्रेम दुणवटे, पढियंतयाचेनि ॥ १८ ॥

पढियंतयाचेनि=प्रियकराचे

म्हणऊनि मज लेंकुरवाचेनि बोलें, तुमचें कृपाळूपण निदैले।
ते चेइलें हें जी जाणवलें, यालागीं बोलिलों मी ॥ १९ ॥

निदैले=निजले चेइलें=जागले

एऱ्हवीं चांदणे पिकविजत आहे चेपणी, कीं वारया धापत आहे वाहणी।
हां हो गगनासी गंवसणी, घालिजे केवी ॥ २० ॥

चेपणी=आढी  धापत = घालत  वाहणी=गती गंवसणी=आवरण
 
आइकां पाणी वोथिजावे न लगे, नवनीतीं माथुला न रिगे।
तेविं लाजिलें व्याख्यान न निगे, देखोनि जयांते ॥ २१ ॥

वोथिजावे=पातळ करणे  माथुला=मंथन (रवी)

हें असो शब्दब्रह्म जिये बाजे, शब्द मावळलेया निवांतु निजे।
तो गीतार्थु मऱ्हाटिया बोलिजे, हा पाडु काई ॥ २२ ॥

बाजे=खाटेवर  पाडु=अधिकार सामर्थ

परि ऐसियाही मज धिंवसा, तो पुढतियाचि येकी आशा।
जे धिटींवा करूनि भवादृश्यां, पढियंता होआवें ॥ २३ ॥

धिंवसा=इच्छा धिटींवा =धैर्य भवादृश्यां=जाणत्याचा  

परि आतां चंद्रापासोनि निवविते, जें अमृताहूनि जीववितें।
तेणें अवधान कीजो वाढतें, मनोरथा माझिया ॥ २४ ॥

कां जैं दिठिवा तुमचा वरुषे, तैं सकळार्थसिद्धि मती पिके।
एऱ्हवी कोंभेला उन्मेषु सुके, जरी उदास तुम्ही ॥ २५ ॥

कोंभेला =कोंब आला   उन्मेषु=ज्ञान

सहजें तरी अवधारा, वक्तृत्वा अवधानाचा होय चारा।
तरी कोंभेला दोंदें पेलती अक्षरां, प्रमेयाचीं ॥ २६ ॥

दोंदें पेलती=पोट सुटणे

अर्थ बोलाची वाट पाहे, तेथ अभिप्रावो अभिप्रायातें विये।
भावाचा फुलौरा होत जाये, मतिवरी ॥ २७ ॥

अभिप्रावो=आशय

म्हणूनि संवादाचा सुवावो ढळे, तरी हृदयाकाश सारस्वतें वोळे।
आणि श्रोता दुश्चिता तरि वितुळे, मांडला रसु ॥ २८

सुवावो=अनुकूळ वारा   वितुळे=क्षीण होणे
सारस्वतें =साहित्यरुपी मेघांनी  वोळे=ओलावणे वर्षाकरणे  

अहो चंद्रकांतु द्रवता कीर होये, परि ते हातवटी चंद्री कीं आहे।
म्हणऊनि वक्ता तो वक्ताचि नव्हे, श्रोतेनि वीण ॥ २९ ॥

हातवटी=कौशल्य

परी आतां आमुतें गोड करावें, ऐसे तांदुळी कायसा विनवावे।
साइखडियाने काइ प्रार्थावें, सूत्रधारातें ॥ ३० ॥

साइखडियाने=कळसूत्री बाहुलीने

काय तो बाहुलियांचिया काजा नाचवी, कीं आपुलियें जाणिवेची कळा वाढवी।
म्हणऊनि आम्हां या ठेवाठेवी, काय काज ॥ ३१ ॥

काजा=कार्यासाठी

तंव गुरु म्हणती काइ जाहलें, हें समस्तही आम्हां पावलें।
आतां सांगे जें निरोपिलें, नारायणें ॥ ३२ ॥

येथ संतोषोनि निवृत्तिदासें, जी जी म्हणऊनि उल्हासें।
अवधारां श्रीकृष्ण ऐसे, बोलते जाहले ॥ ३३ ॥

     
श्री भगवानुवाचः इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे।
     
ज्ञानं विज्ञानसहितं यज्ज्ञात्वा मोक्षसेऽशुभात् ॥ १ ॥

नातरि अर्जुना हें बीज, पुढती सांगिजेल तुज।
जें हें अंतःकरणींचे गुज, जीवाचिये ॥ ३४ ॥

येणें मानें जीवाचें हियें फोडावें, मग तुज कां पां मज सांगावे।
ऐसें काहीं स्वभावें, कल्पिशी जरी ॥ ३५ ॥

हियें=हृदय
तरी परियेसीं प्राज्ञा, तूं आस्थेचीच संज्ञा।
बोलिलिये गोष्टींची अवज्ञा, नेणसी करुं ॥ ३६ ॥

संज्ञा=नाव ,खुण

म्हणोनि गूढपण आपुलें मोडो, वरि न बोलावेंही बोलावें घडो।
परि आमुचिचे जीवींचें पडो, तुझां जीवीं ॥ ३७ ॥

अगा थानीं कीर दूध गूढ, परि थानासीचि नव्हे कीं गोड।
म्हणोनि सरो कां सेवितयाची चाड, जरी अनन्य मिळे ॥ ३८ ॥

थानीं=स्तन सेवितयाची=सेवन करणारा चाड=इच्छा आवड

मुडाहूनि बीज काढिलें, मग निर्वाळलिये भूमी पेरिलें।
तरी तें सांडीविखुरीं गेलें, म्हणों ये कायी ॥ ३९ ॥

मुडाहूनि=कणगी निर्वाळलिये=नांगरल्या

यालागीं सुमनु आणि शुद्धमती, जो अनिंदकु अनन्यगती।
पैं गा गौप्यही परि तयाप्रती, चावळिजें सुखें ॥ ४० ॥

चावळिजें=बोलावे

तरि प्रस्तुत आतां गुणीं इहीं, तूं वांचूनि आणिक नाहीं।
म्हणोनि गुज तरी तुझां ठायीं, लपवूं नये ॥ ४१ ॥

आतां किती नावानावा गुज, म्हणतां कानडें वाटेल तुज।
तरि ज्ञान सांगेन सहज, विज्ञानेंसीं ॥ ४२ ॥

नावानावा=पुन:पुन्हा  कानडें= चमत्कारिक विचित्र

परि तेंचि ऐसेनि निवाडें, जैसें भेसळलें खरें कुडें।
मग काढिजे फाडोवाडें, पारखूनियां ॥ ४३ ॥

कुडें=खोटे   फाडोवाडें=वेगवेगळे

कां चांचूचेनि सांडसें, खांडिजे पय पाणी राजहंसें।
तुज ज्ञान विज्ञान तैसें, वांटूनि देऊं ॥ ४४ ॥

सांडसें=चिमटा पय=दुध

मग वारयाचियां धारसां, पडिला कोंडा कां नुरेचि जैसा।
आणि अन्नकणाचा आपैसा, राशि जोडे ॥ ४५ ॥

धारसां=प्रवाह

तैसें जें जाणितलेयासाठीं, संसार संसाराचिये गांठी।
लाऊनि बैसवी पाटीं, मोक्षश्रियेचां ॥ ४६ ॥

संसार=प्रपंच भास    पाटीं=पदी

     
राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमम्।
     
प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम् ॥ २ ॥

जें जाणणेयां आघवेयांचां गांवीं , गुरुत्वाची आचार्यपदवी।
जें सकळ गुह्यांचा गोसावी, पवित्रां रावो ॥ ४७ ॥

आघवेयांचां =सर्व  गुरुत्वाची=मोठेपण  गोसावी=स्वामी

आणि धर्माचें निजधाम, तेंविंचि उत्तमाचे उत्तम।
पैं जया येतां नाहीं काम, जन्मांतराचें ॥ ४८ ॥

मोटकें गुरुमुखें उदैजत दिसे, आणि हृदयीं स्वयंभचि असे।
प्रत्यक्ष फावो लागे तैसें, आपैसया ॥ ४९ ॥

मोटकें=थोडेसे   फावो लागे=प्राप्त होणे

तेविंचि पैं गा सुखाचां पाउटीं, चढतां येइजे जयाचिया भेटी।
मग भेटल्या कीर मिठी, भोगणेयाहि पडे ॥ ५० ॥

पाउटीं=पायऱ्या
परि भोगाचिया ऐलीकडिलिये मेरे, चित्त उभें ठेलेंचि सुखा भरे।
ऐसें सुलभ आणि सोपारें, वरि परब्रह्म ॥ ५१ ॥

मेरे=तीर

पैं गा आणिकही एक याचें, जें हाता आले तरी न वचे।
आणि अनुभवितां कांहीं न वेचे, वरि विटेहि ना ॥ ५२ ॥

वचे=संपणे वेचे =खर्च होणे

येथ जरी तूं तार्किका, ऐसी हन घेसी शंका।
ना येवढी वस्तु हे लोकां, उरली केविं पां ॥ ५३ ॥

एकोत्तरेयाचिया वाढी, जे जळतिये आगीं घालिती उडी।
ते अनायासें स्वगोडी, सांडिती केविं ॥ ५४ ॥

एकोत्तरेयाचिया=शंभरावर एक अधिक मिळावे म्हणून  

तरि पवित्र आणि रम्य, तेविंचि सुखोपायेंचि गम्य।
आणि स्वसुख परि धर्म्य, वरि आपणपां जोडे ॥ ५५ ॥

ऐसा अवघाचि सुरवाडु आहे, तरी जनाहातीं केविं उरो लाहे।
हा शंकेचा ठावो कीर होये, परि न धरावी तुवां ॥ ५६ ॥

सुरवाडु=सुखकर   उरो लाहे=उरत नाही

==== ===== ================ =======

2 comments: