Sunday, April 24, 2016

ज्ञानेश्वरी अध्याय ८ ओव्या १५२ ते २०३






ज्ञानेश्वरी / अध्याय आठवा / अक्षरब्रह्मयोग / संत ज्ञानेश्वर /    ओव्या  १५२ ते  २०३



     आब्रह्मभुवनाल्लोकाः पुनरावर्तिनोऽर्जुन।
     मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते ॥ १६॥

एऱ्हवीं ब्रह्मपणाचिय भडसे, न चुकतीचि पुनरावृत्तीचे वळसे।
परि निवटलियाचें जैसें, पोट न दुखे ॥ १५२॥

भडसे= मोठेपण थोरपणा पुनरावृत्तीचे वळसे= पुनर्जन्म फेरे
निवटलियाचें=मेलेल्याचे

ना तरी चेइलियानंतरें, न बुडिजे स्वप्नींचेनि महापूरें।
तेवीं मातें पावलें ते संसारें, लिंपतीचि ना ॥ १५३॥

चेइलियानंतरें=उठल्यावर जाग येता

एऱ्हवीं जगदाकाराचें सिरें, जें चिरस्थायीयांचे धुरे।
ब्रह्मभुवन गा चवरें, लोकाचळाचें ॥ १५४॥

सिरें=शिरोभाग श्रेष्ठ  चिरस्थायीयांचे =चिरंजीव 
धुरे=प्रमुख चवरें=शिखर

जिये गांवींचा पहारू दिवोवरी, एका अमरेंद्राचें आयुष्य न धरी।
विळोनि पांतीं उठी एकसरी, चवदाजणांची ॥ १५५॥

पहारू=प्रहर दिवोवरी=दिवस विळोनि=विलय होवून पांतीं=पंगत

     सहस्त्रयुगपर्यंतमहर्यद् ब्रह्मणो विदुः।
     रात्रिं युगसहस्त्रान्तां तेऽहोरात्रविदो जनाः ॥ १७॥

जैं चौकडिया सहस्त्र जाये, तैं ठायेठावो विळुचि होये।
आणि तैसेंचि सहस्त्र भरिये पाहें, रात्री जेथ ॥ १५६॥

चौकडिया सहस्त्र = चार युगाचा एक असे हजार
ठाये ठावो=जातात तेव्हा  विळुचि=दिवस

येवढें अहोरात्र जेथिंचें, तेणें न लोटती जे भाग्याचे।
देखती ते स्वर्गींचे, चिरंजीव ॥ १५७॥

लोटती =मरती 

येरां सुरगणांची नवाई, विशेष सांगावी तेथ काई।
मुद्दल इंद्राचीचि दशा पाहीं, जे दिहाचे चौदा ॥ १५८॥

दिहाचे=दिवसाचे

परि ब्रह्मयाचियाहि आठां पहारांतें, आपुलिया डोळां देखते।
जे आहाति गा तयांतें, अहोरात्रविद म्हणिपे ॥ १५९॥

     अव्यक्ताद् व्यक्तयः सर्वाः प्रभवन्त्यहरागमे।
     रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैवाव्यक्तसंज्ञके ॥ १८॥

     भूतग्रामः स एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते।
     रात्र्यागमेऽवशः पार्थ प्रभवत्यहरागमे ॥ १९ ॥

तये ब्रह्मभुवनीं दिवसें पाहे, ते वेळीं गणना केंही न समाये।
ऐसें अव्यक्ताचें होये, व्यक्त विश्व ॥ १६०॥

गणना =मोजणी केंही= कोठेही 


पुढती दिहाची चौपाहारी फिटे, आणि हा आकारसमुद्र आटे।
पाठीं तैसाचि मग पाहांटे, भरों लागे ॥ १६१॥

चौपाहारी=चार प्रहर

शारदीयेचिये प्रवेशीं, अभ्रें जिरती आकाशीं।
मग ग्रीष्मांतीं जैशीं, निगती पुढती ॥ १६२॥

तैसी ब्रह्मदिनाचिये आदी, हे भूतसृष्टीची मांदी।
मिळे जंव सहस्त्रावधी, निमित्त पुरे ॥ १६३॥

मांदी=समूह    निमित्त पुरे (पा.भे.)=निमती युगे

पाठीं रात्रीचा अवसरू होये, आणि विश्व अव्यक्तीं लया जाये।
तोही युगसहस्त्र मोटका पाहे, आणि तैसेंचि रचे ॥ १६४॥

मोटका=एवढाच

हें सांगावया काय उपपत्ति, जें जगाचा प्रळयो आणि संभूति।
इथे ब्रह्मभुवनींचिया होती, अहोरात्रमाजीं ॥ १६५॥

उपपत्ति=कारण        संभूति=उत्पत्ति ,उगम

कैसें थोरिवेचें मान पाहें पां, हो सृष्टिबीजाचा साटोपा।
परि पुनरावृत्तीचिया मापा, शीग जाहला ॥ १६६॥

थोरिवेचें मान =ब्रह्म देवाचे मोठेपण 
साटोपा=साठवण    शीग=शिगोशीग

एऱ्हवीं त्रैलोक्य हें धनुर्धरा, तिये गांवींचा गा पसारा।
तो हा दिनोदयीं एकसरां, मांडतु असे ॥ १६७॥

तो=(ब्रह्मा )

पाठीं रात्रीचा समो पावे, आणि अपैसाचि सांटवे।
म्हणिये जेथींचें तेथ स्वभावें, साम्यासि ये ॥ १६८॥

अपैसाचि=आपोआप  सांटवे =लीन होय
 
जैसें वृक्षपण बीजासि आलें, कीं मेघ हें गगन जाहालें।
तैसें अनेकत्व जेथ सामावलें, तें साम्य म्हणिपे ॥ १६९॥

     परस्तस्मात्तु भावोऽन्योऽव्यक्तोऽव्यक्तात्सनातनः।
     यः स सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति ॥ २०॥

तेथ समविषम न दिसे कांही, म्हणोनि भूतें हे भाष नाही।
जेविं दूधचि जाहालिया दहीं, नामरूप जाय ॥ १७० ॥

समविषम=कमी अधिक

तेंविं आकारलोपासरिसें, जगाचें जगपण भ्रंशे।
परि जेथ जाहालें तें जैसें, तैसेंचि असे ॥ १७१॥

तैं तया नांव सहज अव्यक्त, आणि आकारा वेळीं तेंचि व्यक्त।
हें एकास्तव एक सूचित, एऱ्हवीं दोनी नाही ॥ १७२॥

जैसें आटलिया स्वरूपें, आटलेपण ते खोटी म्हणिपे।
पुढती तो घनाकारू हारपे, जे वेळीं अळंकार होती ॥ १७३॥


हीं दोन्ही जैशीं होणीं, एकीं साक्षीभूत सुवर्णी।
तैसी व्यक्ताव्यक्ताची कडसणी, वस्तूच्या ठायी ॥ १७४॥

कडसणी= कसास लावणे ,विचार करणे    वस्तूच्या=ब्रह्म

तें तरी व्यक्त ना अव्यक्त, नित्य ना नाशवंत।
या दोहीं भावाअतीत, अनादिसिध्द ॥ १७५॥

जें हें विश्वचि होऊनि असे, परि विश्वपण नासिलेनि न नासे।
अक्षरें पुसिल्या न पुसे, अर्थु जैसा ॥ १७६।।

पाहें पां तरंग तरी होत जात, परि तेथ उदक तें अखंड असत।
तेवीं भूताभावीं नाशिवंत, अविनाश जें ॥ १७७॥

भूताभावीं=भूतमात्री

ना तरी आटतिये अळंकारी, नाटतें कनक असे जयापरी।
तेवीं मरतिये जीवाकारीं, अमर जें आहे ॥ १७८॥

     अव्यक्तोऽक्षर इत्युक्तस्तमाहुः परमां गतिम्।
     यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम ॥ २१॥

     पुरुषः स परः पार्थ भक्त्या लभस्त्वनन्या।
     यस्यातःस्थानि भूतानि येन सर्वमिदं ततम् ॥ २२ ॥

जयातें अव्यक्त म्हणों ये कोडें, म्हणतां स्तुति हें ऐसें नावडे ॥
जें मनबुद्धी न सांपडे, म्हणऊनियां ॥ १७९॥

कोडें=कौतुके नावडे=वाटत नाही

आणि आकारा आलिया जयाचें, निराकारपण न वचे।
आकारलोपें न विसंचे, नित्यता गा ॥ १८०॥

विसंचे= बिघडेना नष्ट होणे

म्हणोनि अक्षर जें म्हणिजे, तेवीचि म्हणतां बोधुही उपजे।
जयापरौता पैसु न देखिजे, या नाम परमगति ॥ १८१॥

पैसु=विस्तार

परि आघवा इहीं देहपुरीं, आहे निजेलियाचे परी।
जे व्यापारू करवी ना करी, म्हणऊनियां ॥ १८२॥

एऱ्हवीं जे शारीरचेष्टा, त्यांमाजीं एकही न ठके गा सुभटा।
दाही इंद्रियांचिया वाटा, वाहतचि आहाति ॥ १८३॥

दाही=दश
ठके=फसणे .सापडणे

उकलूनि विषयांचा पेटा, होता मनाचां चोहटा।
तो सुखदुःखाचा राजवांटा, भीतराहि पावे ॥ १८४

पेटा=पेटारे चोहटा=चौरस्त्यावर राजवांटा = मुख्य वाटा भाग
भीतरा=जीवा 

परि रावो पहुडलिया सुखें, जैसा देशींचा व्यापारू न ठके।
प्रजा आपुलालेनि अभिलाखें, करितचि असती ॥ १८५॥

तैसें बुद्धीचें हन जाणणें, कां मनाचें घेणेंदेणें।
इंद्रियांचें करणें, स्फुरण वायूचें ॥ १८६॥

हे देहक्रिया आघवी, न करितां होय बरवी।
जैसा न चलवितेनि रवी, लोकु चाले ॥ १८७॥

अर्जुना तयापरी, सुतला ऐसा आहे शरीरीं।
म्हणोनि पुरूषु गा अवधारीं, म्हणिपे जयातें ॥ १८८॥

सुतला=निजला

आणि प्रकृति पतिव्रते, पडिला एकपत्नीव्रतें।
येणेंही कारणें जयातें, पुरूषु म्हणों ये ॥ १८९॥

पैं वेदाचें बहुवसपण, देखेचिना जयाचें आंगण।
हें गगनाचें पांघरूण, होय देखा ॥ १९०॥

बहुवसपण=ज्ञान     हें= हे (तत्व)

ऐसें जाणूनि योगीश्वर, जयातें म्हणती परात्पर।
जें अनन्यगतीचें घर, गिंवसीत ये ॥ १९१॥

जे तनू वाचा चित्ते, नाइकती दुजिये गोष्टीतें।
तयां एकनिष्ठेचें पिकतें, सुक्षेत्र जें ॥ १९२।।

हें त्रैलोक्यचि पुरूषोत्तम, ऐसा साच जयाचा मनोधर्मु।
तया आस्तिकाचा आश्रमु, पांडवा गा ॥ १९३॥

जें निगर्वाचें गौरव, जें निर्गुणाची जाणीव।
जें सुखाची राणीव, निराशांसी ॥ १९४॥

निगर्वाचें=गर्व नसलेले राणीव=साम्राज्य निराशांसी=आशा नसलेले

जें संतोषियां वाढिलें ताट, जें अचिंता अनाथाचें मायपोट।
भक्ती उजू वाट, जया गांवा ॥ १९५॥

अचिंता=चिंता सोडलेला  मायपोट=आश्रय

हें एकैक सांगोनि वायां, काय फार करूं धनंजया।
पैं गेलिया जया ठाया, तो ठावोचि होइजे ॥ १९६॥

हिंवाचिया झुळुका, जैसें हिंवचि पडे उष्णोदका।
कां समोर हालिया अर्का, तमचि प्रकाशु ॥ १९७॥

हालिया=(पा.भे.)जालिया

तैसा संसारू जया गांवा, गेला सांता पांडवा।
होऊनि ठाके आघवा, मोक्षाचाचि ॥ १९८॥

तरी अग्नीमाजीं आलें, जैसें इंधनचि अग्नि जहालें
पाठीं न निवडेचि कांही केलें, काष्ठपण ॥ १९९॥

ना तरी साखरेचा माघौता, बुध्दिमंतपणेंही करितां।
परि ऊंस नव्हे पांडुसुता, जियापरी ॥ २००॥

बुध्दिमंतपणेंही=कितीही चातुर्ये

लोहाचें कनक जहालें, हें एकें परिसेंचि केलें।
आतां आणिक कैंचें तें गेलें, लोहत्व आणी ॥ २०१॥

म्हणोनि तूप होऊनि माघौतें, जेवीं दूधपण न येचि निरूतें।
तेविं पावोनियां जयातें, पुनरावृत्ति नाहीं ॥ २०२॥

तें माझें परम, साचोकारें निजधाम।
हें आंतुवट तुज वर्म, दाविजत असें।। २०३॥

साचोकारें =साच खरोखर      आंतुवट=अंतरंगातील

1 comment: