Tuesday, April 12, 2016

ज्ञानेश्वरी अध्याय ६ वा ओव्या २६१ ते २९२



अध्याय ६ वा ओव्या २६१ ते २९२ 


वयसा तरी येतुलेवरी, एऱ्हवी बळाचा बळार्थु करी।
धैर्याची थोरी, निरुपम ॥ २६१ ॥
बळार्थु=पराक्रम

कनकद्रुमाचां पालवीं, रत्नकळिका नित्य नवी।
नखें तैसीं बरवीं, नवीं निघती ॥ २६२ ॥

कनकद्रुमाचां=सोन्याचे झाड

दांतही आन होती, परि अपाडें सानेजती।
जैसी दुबाहीं बैसे पांती, हिरेयांची ॥ २६३ ॥

अपाडें =फार सानेजती=छोटे  दुबाहीं=दोन्हीकडे
पांती=रांग, पंगत

माणिकुलियांचिया कणिया, सावियाची अणुमानिया।
तैसिया सर्वांगीं उधवती अणिया, रोमांचियां ॥ २६४ ॥

माणिकुलियांचिया=माणिकांचे तुकडे
अणुमानिया= अणु एवढे कण   

करचरणतळें, जैसीं कां रातोत्पळें।
पाखाळीं होती डोळे, काय सांगो ॥ २६५ ॥

रातोत्पळें=रात्री उमलणारी कमळे पाखाळीं=पखाली पाणीदार

निडाराचेनि कोंदाटें, मोतियें नावरती संपुटें।
मग शिवणी जैशी उतटे, शुक्तिपल्लवांची ॥ २६६ ॥

निडारा=पिकलेले  संपुटें=शिंपले  उतटे=उघडे शुक्ति=शिंपले

तैशीं पातिचिये कवळिये न समाये, दिठी जाकळोनि निघों पाहे,
आधिलीची परि होये, गगना कळिती ॥ २६७ ॥


पातिचिये=पापण्या कवळिये=मिठीत जाकळोनि= ओसंडणे
आधिलीची=अर्धोन्मलीत


आइके देह होय सोनियाचें, परि लाघव ये वायूचें।
जे आपा आणि पृथ्वीचे, अंशु नाहीं ॥ २६८ ॥

मग समुद्रपैलाडी देखे, स्वर्गींचा आलोचु आइके।
मनोगत ओळखे, मुंगियेचे।। २६९ ॥

आलोचु=विचार

पवनाचा वारिका वळघे, चाले तरी उदकीं पाऊल न लागे।
येणें येणें प्रसंगे, येती बहुता सिध्दी ॥ २७० ॥

वारिका=घोडा  वळघे=बसणे

आइकें प्राणाचा हातु धरुनि, गगनाची पाउटी करुनी।
मध्यमेचेनि दादराहुनी, हृदया आली ॥ २७१ ॥

पाउटी=पावूलवाट दादराहुनी=जिन्याने

ते कुंडलिनी जगदंबा, जे चैतन्यचक्रवर्तीची शोभा।
जया विश्वबीजाचिया कोंभा, साउली केली ॥ २७२ ॥

जे शून्यलिंगाची पिंडी, जे परमात्मया शिवाची कंरडी।
जे प्राणाची उघडी, जन्मभूमी ॥ २७३ ॥

रंडी=वेताचे भांडे  

हें असो ते कुंडलिनी बाळी, हृदयाआंतु आली।
तंव अनाहताचां बोलीं, चावळे ते ॥ २७४ ॥

चावळे=बडबडे

शक्तीचिया आंगा लागलें, बुद्धीचें चैतन्य होतें जाहलें।
तें तेणें आइकिलें, अळुमाळु ॥ २७५ ॥

अळुमाळु=हळुवार,थोडा  

घोषाच्या कुंडी, नादचित्रांची रुपडीं।
प्रणवाचिया मोडी, रेखिलीं ऐसीं ॥ २७६ ॥

घोषाच्या=परावाणी मोडी=आकृती

हेंचि कल्पावें तरी जाणिजे , परि कल्पितें कैचें आणिजे।
तरी नेणों काय गाजे, तिये ठायीं ॥ २७७ ॥

कल्पितें=मन .गाजे=वाजणे

विसरोनि गेलों अर्जुना, जंव नाशु नाही पवना।
तंव वाचा आथी गगना, म्हणोनि घुमे ॥ २७८ ॥

वाचा =ध्वनी आथी=असणे  घुमे=घुमणे

तया अनाहताचेनि मेघें, आकाश दुमदुमों लागे।
तंव ब्रह्मस्थानींचें बेगें, फिटलें सहजें ॥ २७९ ॥

बेगें=द्वार झाकण

आइकें कमळगर्भाकारें, जें महदाकाश दुसरें।
जेथ चैतन्य आधातुरें, करुनि असिजे ॥ २८० ॥

आधातुरें= तेजाने  

तया हृदयाच्या परिवरीं, कुंडलिनियां परमेश्वरी।
तेजाची शिदोरी, विनियोगिली।। २८१ ॥

परिवरीं=प्रांती विनियोगिली=घेवून आली

बुध्दीचेनि शाकें, हातबोनें निकें।
द्वैत जेथ न देखे, तैसें केलें ॥ २८२ ॥

शाकें,=भाजी हातबोनें=हातातील घास

ऐसी निजकांती हारविली, मग प्राणुचि केवळ जाहली।
ते वेळी कैसी गमली, म्हणावी पां ॥ २८३ ॥

हो कां जे पवनाची पुतळी, पांघुरली होती सोनेसळी।
ते फेडुनियां वेगळी, ठेवली तिया ॥ २८४ ॥

पुतळी=बाहुली सोनेसळी=पितांबर

नातरी वारयाचेनि आंगें झगटली, दीपाची दिठी निमटली।
कां लखलखोनि हारपली, वीजु गगनीं ॥ २८५ ॥

निमटली=विझवली

तैशी हृदयकमळवेऱ्हीं, दिसे सोनियाची जैशी सरी।
नातरी प्रकाशजळाची झरी, वाहत आली ॥ २८६ ॥

मग ते हृदयभूमी पोकळे, जिराली कां एके वेळे।
तैसें शक्तीचे रुप मावळे, शक्तीचिमाजीं।। २८७ ॥

तेव्हां तरी शक्तीचि म्हणिजे, एऱ्हवी तो प्राणु केवळ जाणिजे।
आतां नाद बिंदु नेणिजे, कला ज्योती ॥ २८८ ॥

मनाचा हन मारु, कां पवनाचा धरु।
ध्यानाचा आदरु, नाहीं परी ॥ २८९ ॥

हन मारु=नियमन  आदरु=आधार
आदरु=आरंभ

हे कल्पना घे सांडी, तें नाहीं इये परवडी।
हे महाभूतांची फुडी, आटणी देखां ॥ २९० ॥

सांडी =संपे परवडी=प्रकार  फुडी=स्पष्ट खरोखर

पिंडे पिंडाचा ग्रासु, तो हा नाथसंकेतीचा दंशु।
परि दाऊनि गेला उद्देशु, महाविष्णु ॥ २९१ ॥

पिंडे = शरीर पिंडाचा=जीव ग्रासु=घास नाश दंशु=मर्म

तया ध्वनिताचें केणें सोडुनी, यथार्थाची घडी झाडुनी।
उपलविली म्यां जाणुनि, ग्राहीक श्रोते ॥ २९२ ॥

ध्वनिताचें =गुढार्थ  केणें= गाठोडे   उपलविली=उघडली

ग्राहीक=गुणग्राही (ग्राहक)

1 comment:

  1. खुप अगम्य वाटले! अजून काही शब्दांर्थ देता आल्यास बरे होईल.

    ReplyDelete