ज्ञानेश्वरी. अध्याय सहावा
शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः।
नात्युच्छ्रितं नातिनीचं चैलाजिनकुशोत्तरम् ॥ ११ ॥
तरी विशेषे आतांचि बोलिजेल, परि तें अनुभवें उपेगा जाईल।
म्हणौनि तैसें एक लागेल, स्थान पहावें ॥ १६३ ॥
जेथ आराणुकेचेनि कोडें, बैसलिया उठों नावडे।
वैराग्यासी दुणीव चढे, देखलिया जें ॥ १६४ ॥
आराणुकेचेनि=समाधान कोडें =कौतुके दुणीव=दुणावणे
जो संती वसविला ठावो, संतोषासि सावावो।
मना होय उत्सावो, धैर्याचा ॥ १६५ ॥
सावावो=सहायक
अभ्यासुचि आपणयातें करी , हृदयातें अनुभव वरि।
ऐसी रम्यपणाची थोरी, अखंड जेथ ॥ १६६ ॥
जया आड जातां पार्था, तपश्चर्या मनोरथा।
पाखांडियाही आस्था, समूळ होय ॥ १६७ ॥
पाखांडियाही=नास्तिक
स्वभावें वाटे येतां, जरी वरपडा जाहला अवचितां।
तरी सकामुही परि माघौता, निघों विसरे ॥ १६८ ॥
वरपडा=प्राप्त
ऐसेनि न राहतयातें राहावी, भ्रमतयातें बैसवी।
थापटुनि चेववी, विरक्तीतें ॥ १६९ ॥
राहतयातें=राहणारा भ्रमतयातें=भटकणारा चेववी=उठवी
हें राज्य वर सांडिजे, मग निवांता एथेंचि असिजे।
ऐसे शृंगारियांहि उपजे, देखतखेंवो ॥ १७० ॥
शृंगारियांहि=विलासी
जें येणें मानें बरवंट, आणि तैसेच अतिचोखट।
जेथ अधिष्ठान प्रगट, डोळां दिसे ॥ १७१ ॥
बरवंट =उत्तम अधिष्ठान=ब्रह्म
आणिकही एक पहावें, साधकीं वसतें होआवें।
आणि जनाचेनि पायरवें, रुळेचिना ॥ १७२ ॥
पायरवें=पदरव,वर्दळ रुळेचिना=रूळणे
जेथ अमृताचेनि पाडें, मुळेहीसकट गोडें ।
जोडती दाटें झाडें, सदा फळतीं ॥ १७३ ॥
पाउला पाउला उदकें, वर्षाकाळेंही अतिचोखें।
निर्झरें का विशेखें, सुलभें जेथ ॥ १७४ ॥
हा आतपुही अळुमाळु, जाणिजे तरी शीतळु।
पवन अति निश्चळु, मंद झुळके ॥ १७५ ॥
आतपुही=ऊन
बहुत करुनि निःशद्ब, दाट न रिगे श्वापद।
शुक हन षट्पद, तेउतें नाहीं ॥ १७६ ॥
शुक =पोपट षट्पद=भुंगे
पाणिलगें हंसें, दोनी चारी सारसें।
कवणें एके वेळे बैसे, तरी कोकिळही हो ॥ १७७ ॥
निरंतर नाही, तरी आलीं गेलीं कांहीं।
होतु कां मयुरेंही, आम्ही ना न म्हणों ॥ १७८ ॥
परि आवश्यक पांडवा, ऐसा ठावो जोडावा।
तेथ निगूढ मठ होआवा, कां शिवालय ॥ १७९ ॥
दोहींमाजी आवडे तें, जें मानलें होय चित्तें।
बहुतकरुनि एकांते, बैसिजे गा ॥ १८० ॥
म्हणोनि तैसें ते जाणावें, मन राहातें पाहावें।
राहेल तेथ रचावें, आसन ऐसें।। १८१ ॥
वरि चोखट मृगसेवडी, माजी धूतवस्त्राची घडी।
तळवटीं अमोडी, कुशांकुर ॥ १८२ ॥
मृगसेवडी=मृगाजिन अमोडी= साग्र,संपूर्ण
सकोमळ सरिसे, सुबध्द राहती आपैसे।
एकें पाडें तैसें, वोजा घाली ॥ १८३ ॥
एकें पाडें =एका पातळीत वोजा=योग्य
परि सावियाचि उंच होईल, तरी आंग हन डोलेल।
नीच तरी पावेल, भूमिदोषु ॥ १८४ ॥
म्हणौनि तैसें न करावें, समभावें धरावें।
हें बहु असो होआवें, आसन ऐसें ॥ १८५ ॥
तत्रैकाग्नं मनः कृत्वा यतचित्तेद्रियक्रियः।
उपविश्यासने युञ्ज्याद योगमात्मविशुध्दये ॥ १२ ॥
मग तेथ आपण, एकाग्र अंतःकरण।
करुनि सद्गुरुस्मरण, अनुभविजे ॥ १८६ ॥
तैसें स्मरतेनि आदरें, सबाह्य सात्विकें भरे।
जंव काठिणपण विरे, अहंभावाचे ॥ १८७ ॥
विषयांचा विसरु पडे, इंद्रियांची कसमस मोडे।
मनाची घडी घडे, हृदयामाजीं ॥ १८८ ॥
कसमस=अस्थिरता
ऐसें ऐक्य हें सहजें, फावें तंव राहिजे।
मग तेणेंचि बोधें बैसिजे, आसनावरी ॥ १८९ ॥
आतां आंगाते आंग करी, पवनातें पवनु धरी।
ऐसी अनुभवाची उजरी, होंचि लागे ॥ १९० ॥
प्रवृत्ती माघौति मोहरे, समाधि ऐलाडि उतरे।
आघवें अभ्यासु सरे, बैसतखेंवो ॥ १९१ ॥
मोहरे =वळणे ऐलाडि=ऐलतीरी बैसतखेंवो=बसता क्षणी
मुद्रेची प्रौढी ऐशी, तेचि सांगिजेल आतां परियेसीं ।
तरी उरु या जघनासी, जडोनि घालीं ॥ १९२ ॥
उरु =मांडी जघनासी=पोटरी
चरणतळें देव्हडी, आधारद्रुमाचा बुडीं।
सुघटितें गाढीं, संचरीं पां ॥ १९३ ॥
देव्हडी=वाकडे आधारद्रुमाचा=आधार चक्र
सव्य तो तळीं ठेविजे, तेणें सिवणीमध्यु पीडिजे।
वरी बैसे तो सहजें, वामचरणु ॥ १९४ ॥
सिवणी=शिवण सव्य=उजवा वामचरणु=डावा पाय
गुद मेंढ्राआंतौति, चारी अंगुळें निगुतीं ।
तेथ सार्ध सार्ध प्रांती, सांडुनियां ॥ १९५ ॥
मेंढ्रा=लिंग आंतौति=मधील
सार्ध =दीड बोटाचा भाग
माजि अंगुळ एक निगे, तेथ टांचेचेनि उत्तराभागें।
नेहेटिजे वरि आंगें, पेललेनि ॥ १९६ ॥
नेहेटिजे=रोवणे
उचलिले कां नेणिजे, तैसें पृष्ठांत उचलिजे।
गुल्फद्वय धरिजे, तेणेंचि मानें ॥ १९७ ॥
पृष्ठांत=
गुल्फद्वय=दोन्ही घोटे
मग शरीर संचु पार्था, अशेषुही सर्वथा।
पार्ष्णीचा माथा, स्वयंभु होय ॥ १९८ ॥
मग शरीर संचु पार्था, अशेषुही सर्वथा।
पार्ष्णीचा माथा, स्वयंभु होय ॥ १९८ ॥
पार्ष्णीचा= टाचेचा
अर्जुना हें जाण, मूळबंधाचें लक्षण ।
वज्रासन गौण, नाम यासी ॥ १९९ ॥
ऐसी आधारीं मुद्रा पडे, आणि आधींचा मार्गु मोडे।
तेथ अपानु आंतलीकडे , वोहोंटो लागे ॥ २००॥
अर्जुना हें जाण, मूळबंधाचें लक्षण ।
वज्रासन गौण, नाम यासी ॥ १९९ ॥
ऐसी आधारीं मुद्रा पडे, आणि आधींचा मार्गु मोडे।
तेथ अपानु आंतलीकडे , वोहोंटो लागे ॥ २००॥
आधींचा=खालचा आंतली=आतील वोहोंटो=ओह्टने
सुंदर !
ReplyDeleteआसनासिठिचे उत्तम वर्णन
ReplyDelete