Saturday, April 16, 2016

ज्ञानेश्वरी अध्याय ६ ओव्या ३४५ ते ४२०



अध्याय ६ वा ओव्या  ३४५ ते ४२०

    नात्यश्नतस्तु योगोऽस्ति न चैकान्तमनश्नतः।
     
न चाति स्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन ॥ १६ ॥

जो रसनेद्रियाचा अंकिला, कां निद्रेसी जीवें विकला।
तो नाहीं एथ म्हणितला, अधिकारिया ॥ ३४५ ॥

रसनेद्रियाचा=जिभेला अंकिला=स्वाधीन

अथवा आग्रहाचिये बांदोडी, क्षुधा तृषा कोंडी।
आहारातें तोडी, मारुनियां ॥ ३४६ ॥

बांदोडी=बंधनात काराग्रही

निद्रेचिया वाटा न वचे, ऐसा दृढिवेचेनि अवतरणें नाचे।
तें शरीरचि नव्हे तयाचें, मा योगु कवणाचा ॥ ३४७ ॥

दृढिवेचेनि =हट्टाने अवतरणें=प्रकटपणे, मोकाट

म्हणोनि अतिशयें विषयो सेवावा, तैसा विरोधु नव्हावा।
कां सर्वथा निरोधु करावा, हेंही नको ॥ ३४८ ॥

     
युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु।
     
युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखहा ॥ १७ ॥

आहार तरी सेविजे, परि युक्तीचेनि मापें मविजे ,
क्रियाजात आचरिजे, तयाचि स्थिती ॥ ३४९ ॥

मविजे=मोजावा

मितलां बोली बोलिजे, मितलिया पाउलीं चालिजे।
निद्रेही मानु दीजे, अवसरें एकें ॥ ३५० ॥

मितलां= मोजके बेताचे 

जागणें जरी जाहलें, तरी व्हावे तें मितलें।
येतुलेनि धातुसाम्य संचले, असेल सुखें ॥ ३५१ ॥

ऐसें युक्तीचेनि हातें, जें इंद्रियां वोपिजे भातें।
तै संतोषासी वाढतें, मनचि करी ॥ ३५२ ॥

वोपिजे=देणे अर्पिणे  भातें=खाणे

     
यदा विनियतं चित्तमात्मन्येवावतिष्ठते।
     
निःस्पृहः सर्वकामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा ॥ १८ ॥

बाहेर युक्तीची मुद्रा पडे, तंव आंत सुख वाढे।
तेथें सहजचि योगु घडे, नाभ्यासितां ॥ ३५३ ॥

जैसें भाग्याचिये भडसें, उद्यमाचेनि मिसें।
मग समृध्दीजात आपैसें, घर रिघे ॥ ३५४ ॥

भडसें= पूर लोट

तैसा युक्तीमंतु कौतुकें, अभ्यासाचिया मोहरा ठाके।
आणि आत्मसिद्धीची पिके, अनुभवु तयाचा ॥ ३५५ ॥

मोहरा ठाके =सामोरा होणे  प्रवृत्त होणे

म्हणोनि युक्ती हे पांडवा, घडे जया सदैवा।
तो अपवर्गाचिये राणिवा, अळंकरिजे ॥ ३५६ ॥

अपवर्गाचिये=मोक्ष राणिवा=राज्य

     
यथा दीपो निवातस्थो नेङ्गते सोपमा स्मृता।
     
योगिनो यतचित्तस्य युञ्जतो योगमात्मनः ॥ १९ ॥

युक्ती योगाचे आंग पावे, ऐसें प्रयाग जें होय बरवें।
तेथ क्षेत्रसंन्यासें स्थिरावें, मानस जयाचें ॥ ३५७ ॥

प्रयाग=तीर्थ (संगम )

तयातें योगायुक्त म्हण, हेंही प्रसंगे जाण।
तें दीपांचे उपलक्षण, निर्वातींचिया ॥ ३५८ ॥

उपलक्षण=उपमा

आतां तुझें मनोगत जाणोनि, कांही एक आम्ही म्हणोनि।
तें निकें चित्त देउनी, परिसावें गा ॥ ३५९ ॥

तूं प्राप्तीची चाड वाहसी, परि अभ्यासीं दक्ष नव्हसी।
तें सांग पा काय बिहसी, दुवाडपणा ॥ ३६० ॥

बिहसी =भिणे   दुवाडपणा=अवघड

तरी पार्था हें झणें, सायास घेशीं हो मनें।
वायां बागूल इये दुर्जनें, इंद्रिये करिती ॥ ३६१ ॥

झणें=नको सायास=कष्ट बागूल= भिती घालणे बाऊ करणे

पाहें पां आयुष्याचा अढळ करी, जें सरतें जीवित वारी।
तया औषधातें वैरी, काय जिव्हा न म्हणे ॥ ३६२ ॥

ऐसें हितासि जें जें निकें, तें सदाचि या इद्रिंयां दुःखे।
एऱ्हवी सोपें योगासारिखें, कांही आहे ॥ ३६३ ॥

     
यत्रोपरमते चित्तं निरुध्दं योगसेवया।
     
यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति ॥ २० ॥

     
सुखमात्यन्तिकं यत् तद् बुध्दीग्राह्यमतीद्रिंय।
     
वेत्ति यत्र न चैवायं स्थितश्चलति तत्त्वतः ॥ २१ ॥

म्हणोनि आसनाचिया गाढीका, जो आम्ही अभ्यासु सांगितला निका,
तेणे होईल तरी हो कां, निरोधु यया ॥ ३६४ ॥

गाढीका=दृढ .गाढ पक्के

एऱ्हवी तरी येणें योगें, जै इद्रिंया विंदाण लागे।
तै चित्त भेटों रिगे, आपणपेयां ॥ ३६५ ॥

विंदाण=वेसन   आपणपेयां=चैतन्यास

परतोनि पाठिमोरें ठाके, आणि आपणियांते आपण देखे।
देखतखेवों वोळखे, म्हणे तत्त्व हें मी ॥ ३६६ ॥

तिये ओळखीचिसरिसें, सुखाचिया साम्राज्यीं बैसे।
मग चित्तपण समरसें, विरोनि जाय ॥ ३६७ ॥

जयापरतें आणिक नाहीं, जयातें इद्रिंयें नेणती कहीं।
तें आपणचि आपुलिया ठायीं, होऊनि ठाके ॥ ३६८ ॥

नेणती=जाणणे

     
यं लब्धा चापरं लाभं मन्यते नाधिकं ततः।
     
यस्मिन स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते ॥ २२ ॥

मग मेरुपासूनि थोरें, देह दुःखाचेनि डोंगरे।
दाटिजो पां परि भरें, चित्त न दटे ॥ ३६९ ॥

परि भरें=पडिभरे=भाराने

कां शस्त्रें वरी तोडिलिया, देह अग्निमाजीं पडलिया।
चित्त महासुखीं पहुडलिया, चेवोचि नये ॥ ३७० ॥

ऐसें आपणपां रिगोनि ठाये, मग देहाची वास न पाहे।
आणिकचि सुख होऊनि जाये, म्हणूनि विसरे ॥ ३७१ ॥

     
तं विद्यात् दुःखसंयोगवियोगं योगसंज्ञितम्।
     
स् निश्चयेन योक्तव्यो योगोऽनिर्विण्णचेतसा ॥ २३ ॥

जया सुखाचिया गोडी, मग आर्तीची सेचि सोडी।
संसाराचिया तोंडीं, गुंतलें जें ॥ ३७२ ॥

आर्तीची= सेचि=इच्छा

जे योगाची बरव, संतोषाची राणीव।
ज्ञानाची जाणीव, जयालागीं ॥ ३७३ ॥

बरव=शोभा राणीव=राज्य

तें अभ्यासिलेनि योगें, सावयव देखावें लागें।
देखिलें तरी आंगें, होईजेल गा ॥ ३७४ ॥

     
संकल्पप्रभवान् कामांस्त्यक्त्वा सर्वानशेषतः।
     
मनसैवेद्रियग्रामं विनियम्य समन्ततः ॥ २४ ॥

तरि तोचि योगु बापा, एके परि आहे सोपा।
जरी पुत्रशोकु संकल्पा, दाखविजे ॥ ३७५ ॥

पुत्रशोकु संकल्पा= संकल्पातून उत्पन्न होणारे विषय

हा विषयातें निमालिया आइके, इंद्रियें नेमाचिया धारणीं देखे।
तरी हियें घालूनि मुके, जीवितांसी ॥ ३७६ ॥

निमालिया=मिटल्यावर मेल्यावर  धारणीं=बंधनी

ऐसें वैराग्य हें करी, तरी संकल्पाची सरे वारी।
सुखें धृतीचिया धवळारीं, बुद्धी नांदे ॥ ३७७ ॥

वारी=येरझार धृती=शांती धवळारीं=घरात

     
शनैः शनैरुपरमेत् बुध्या धृतिगृहीतया।
     
आत्मसंस्थं मनः कृत्वा न किचिंदपि चिन्तयेत् ॥ २५ ॥

     
यतो यतो निश्चरति मनश्चञ्चलमस्थिरम्।
     
ततस्ततो नियम्यैतदात्मन्येव वशं नयेत् ॥ २६ ॥

बुद्धी धैया होय वसौटा, मनातें अनुभवाचिया वाटा।
हळु हळु करी प्रतिष्ठा, आत्मभुवनीं ॥ ३७८ ॥

वसौटा=आश्रय

याही एके परी, प्राप्ती आहे विचारीं।
हें न ठके तरी सोपारी, आणिक ऐकें ॥ ३७९ ॥

सोपारी=सोपे

आतां नियमुचि हा एकला, जीवें करावा आपुला।
जैसा कृतनिश्चयाचिया बोला, बाहेरा नोहे ॥ ३८० ॥

जरी येतुलेनि चित्त स्थिरावें, तरी काजा आलें स्वभावें।
नाही तरी घालावें, मोकलुनी ॥ ३८१ ॥

मोकलुनी=मोकळे सोडून

मग मोकलिलें जेथ जाईल, तेथूनि नियमूचि घेऊनि येईल।
ऐसेनि स्थैर्याची होईल, सवे ययां ॥ ३८२ ॥

     
प्रशान्तमनसं ह्येनं योगिनं सुखमुत्तमम्।
     
उपैति शान्तरजसं ब्रह्मभूतकल्मषम् ॥ २७ ॥

पाठीं केतुलेनि एके वेळी, तया स्थैर्याचेनि मेळें।
आत्मस्वरुपाजवळें, येईल सहजें ॥ ३८३ ॥

तयातें देखोनि आंगा घडेल, तेथ अद्वैतीं द्वैत बुडेल।
आणि ऐक्यतेजें उघडेल, त्रैलोक्य हें ॥ ३८४ ॥

आकाशीं दिसे दुसरें, ते अभ्र जैं विरे।
तै गगनचि कां भरे, विश्व जैसें ॥ ३८५ ॥

तैसे चित्त लया जाये, आणि चैतन्यचि आघवें होये।
ऐसी प्राप्ति सुखोपायें, आहे येणें ॥ ३८६ ॥

     
युञ्जन्नेवं सदात्मनं योगी विगतकल्मषः।
     
सुखेन ब्रह्मसंस्पर्शमत्यन्तं सुखमश्नुते ॥ २८ ॥

या सोपिया योगस्थिती, उकलु देखिला गा बहुतीं।
संकल्पाचिया संपत्ती, रुसोनियां ॥ ३८७ ॥

उकलु=उलगडा

तें सुखाचेनि सांगातें, आलें परब्रह्मा आंतौतें।
तेथ लवण जैसें जळातें, सांडु नेणे ॥ ३८८ ॥

आंतौतें=मध्ये प्रवेशने  लवण-मीठ

तैसें होय तिये मेळीं, मग साम्यरसाचिया राऊळीं।
महासुखाची दिवाळी, जगेंसि दिसे ॥ ३८९ ॥

ऐसें आपुले पायवरी, चालिजे आपुले पाठीवरी।
हें पार्था नागवे तरी, आन ऐकें ॥ ३९० ॥

पायवरी =पायांनी पाठीवरी= (परत) पाठीमागे(ब्रह्मस्थिती कडे ) चालणे  
नागवे= न जमणे,(न सापडणे)

     
सर्वभूस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि।
     
इक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः ॥ २९ ॥

     
यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति।
     
तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति ॥ ३० ॥

तरी मी तंव सकळ देहीं, असे एथ विचारु नाहीं।
आणि तैसेंति माझ्या ठायीं, सकळ असे ॥ ३९१ ॥

हें ऐसेंचि संचलें, परस्परें मिसळलें।
बुद्धी घेपे एतुलें, होआवें गा ॥ ३९२ ॥

संचलें =झाले घेपे=घेईल ग्रहण करेल

एऱ्हवीं तरी अर्जुना, जो एकवटलिया भावना।
सर्वभूतीं अभिन्ना, मातें भजे ॥ ३९३ ॥

भूतांचेनि अनेकपणें, अनेक नोहे अंतःकरणें।
केवळ एकत्वचि माझें जाणें, सर्वत्र जो ॥ ३९४ ॥

मग तो एक हा मियां, बोलता दिसतसे वायां।
एऱ्हवीं न बोलिजे तरी धनंजया, तो मीचि आहें ॥ ३९५ ॥

दीपा आणि प्रकाशा, एकवंकीचा पाडु जैसा।
तो माझ्या ठायी तैसा, मी तयामाजीं ॥ ३९६ ॥

एकवंकीचा=एकमेकाचा

जैसा उदकाचेनि आयुष्यें रसु, कां गगनाचेनि माने अवकाशु।
तैसा माझेनि रुपें रुपसु, पुरुष तो गा ॥ ३९७ ॥

     
सर्वभूतस्थितं यो मां भजत्येकत्वमास्थितः।
     
सर्वथा वर्तमानोऽपि स योगी मयि वर्तते ॥ ३१ ॥

जेणें ऐक्याचिये दिठी, सर्वत्र मातेचि किरीटी।
देखिला जैसा पटीं, तंतु एकु ॥ ३९८ ॥

कां स्वरुपें तरी बहुतें आहाती, परि तैसी सोनीं बहुवें न होती।
ऐसी ऐक्याचळाची स्थिती, केली जेणें ॥ ३९९ ॥

स्वरुपें=सुंदर दागिने

ना तरी वृक्षांचीं पानें जेतुलीं, तेतुलीं रोपे नाहीं लाविलीं।
ऐसी अद्वैतदिवसें पाहली, रात्री जया ॥ ४०० ॥

तो पंचात्मकीं सांपडे, तरी मग सांग पा कैसेनि अडे।
जो प्रतीतीचेनि पाडें , मजसी तुके ॥ ४०१ ॥

पंचात्मकीं=पंच भुते अडे=अडकेल

माझें व्यापकपण आघवें, गवसलें तयाचेनि अनुभवें।
तरी न म्हणतां स्वभावें, व्यापकु जाहला ॥ ४०२ ॥

आतां शरीरीं तरी आहे, परि शरीराचा तो नोहे।
ऐसें बोलवरी होये, तें करु ये काइ ॥ ४०३ ॥

     
आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति योऽर्जुन।
     
सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः ॥ ३२ ॥

म्हणोनि असो तें विशेषें, आपणपेयांसारिखें।
जो चराचर देखे, अखंडित ॥ ४०४ ॥

सुखदुःखादि वर्मे, कां शुभाशुभे कर्में।
दोनी ऐसी मनोधर्में, नेणेचि जो ॥ ४०५ ॥

जें समविषम भाव, आणिकही विचित्र जें सर्व।
तें मानी जैसे अवयव, आपुले होती ॥ ४०६ ॥

हें एकैक काय सांगावें, जया त्रैलोक्यचि आघवें।
मी ऐसें स्वभावें, बोधा आलें ॥ ४०७ ॥

तयाही देह एकु कीर आथी, लौकिकीं सुखदुःखी तयातें म्हणती,
परि आम्हांतें ऐसीचि प्रतीती, परब्रह्मचि हा ॥ ४०८ ॥

म्हणोनि आपणपां विश्व देखिजे, आणि आपण विश्व होईजे।
ऐसे साम्यचि एक उपासिजे, पांडवा गा ॥ ४०९ ॥

हें तूतें बहुतीं प्रसंगीं, आम्ही म्हणों याचिलागीं।
जे साम्यापरौति जगीं प्राप्ति नाहीं।। ४१०।।

     
अर्जुन उवाच - योऽयं योगस्त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन।
     
एतस्याहं न पश्यामि चञ्चलत्वात् स्थित्तिं स्थिराम् ॥ ३३ ॥

     
चञ्चलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवद् दृढम्।
     
तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम् ॥ ३४ ॥

अर्जुन म्हणे देवा, तुम्ही सांगा कीर आमुचिया कणवा।
परी न पुरों जी स्वभावा, मनाचिया ॥ ४११ ॥

हें मन कैसें केवढें, ऐसें पाहों म्हणों तरी न सांपडें।
एऱ्हवी राहाटावया थोडें, त्रैलोक्य यया ॥ ४१२ ॥

म्हणोनि ऐसें कैसें घडेल , जे मर्कट समाधी येईल।
कां राहा म्हणितलिया राहेल, महावातु ॥ ४१३ ॥

जें बुध्दीतें सळी, निश्चयाते टाळी।
धैर्येसी हातफळी, मिळऊनि जाय ॥ ४१४ ॥

सळी=छळी हातफळी मिळऊनि =हातावर तुरी देवून  

जें विवेकातें भुलवी, संतोषासी चाड लावी।
बैसिजे तरी हिंडवी, दाही दिशा ॥ ४१५ ॥

चाड=इच्छा ,विचार

जें निरोधलें घे उवावो, जया संयमुचि होय सावावो।
तें मन आपुला स्वभावो, सांडील काई ॥ ४१६ ॥

उवावो=उसळी  सावावो=सहायक


म्हणोनि मन एक निश्चळ राहेल, मग आम्हांसी साम्य होईल।
हें विशेषेंही न घडेल, तयालागीं ॥ ४१७ ॥

     
श्रीभगवानुवाच - असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम्।
     
अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते ॥ ३५ ॥

तंव कृष्ण म्हणती साचचि, बोलत आहासि तें तैसेंचि।
यया मनाचा कीर चपळचि, स्वभावो गा ॥ ४१८ ॥

परि वैराग्यचेनि आधारें, जरि लाविलें अभ्यासाचिये मोहरें।
तरि केतुलेनि एके अवसरें, स्थिरावेल ॥ ४१९ ॥

कां जें यया मनाचें एक निकें, जें देखिले गोडीचिया ठाया सोके,
म्हणोनि अनुभवसुखचि कवतिकें, दावीत जाइजे ॥ ४२० ॥

1 comment: