Friday, April 1, 2016

ज्ञानेश्वरी अध्याय ५, ओव्या १४४ ते १८०(संपूर्ण)


ज्ञानेश्वरी अध्याय पांचवा(संपूर्ण)

कर्मसंन्यास योग अध्याय ओव्या १४४  ते  १८०  


अर्जुना अंनत सुखाच्या डोहीं, एकसरा तळुचि घेतला जिहीं।
मग स्थिराऊनी तेही, तेंचि जाहले ॥ १४४ ॥

अथवा आत्मप्रकाशें चोखें, जो आपणपेंचि विश्व देखे।
तो देहेंचि परब्रह्म सुखें, मानूं येईल ॥ १४५ ॥

जें साचोकारें परम, ना तें अक्षर निःसीम।
जिये गांवींचे निष्काम, अधिकारिये ॥ १४६ ॥

साचोकारें =वस्तुत: निष्काम=निरिच्छ
निःसीम=मर्यादा नसलेले

जे महर्षीं वाढले, विरक्तां भागा फिटलें।
जे निःसंशया पिकलें, निरंतर ॥ १४७ ॥

वाढले=(जेवायास ठेवले )
भागा फिटलें =वाट्यास आले  
निःसंशया =संशय नसलेला  पिकलें=मिळाले,फलद्रूप झाले  

कामक्रोधवियुक्तानां यतीनां यतचेतसाम्।
अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनाम् ॥ २६ ॥

जिहीं विषयांपासोनि हिरतलें, चित्त आपुलें आपण जिंतिले।
ते निश्चित जेथ सुतले, चेतीचिना ॥ १४८ ॥

हिरतलें =हिरावले सुतले=निजले  चेतीचिना=उठेनात  

तें परब्रह्म निर्वाण, जें आत्मविदांचें कारण।
तेचि ते पुरुष जाण, पंडुकुमरा ॥ १४९ ॥  

आत्मविदांचें=आत्मसाक्षात्कारी

ते ऐसे कैसेनि जाहले, जे देहींचि ब्रह्मत्वा आले।
हें ही पुससी तरी भलें, संक्षेपे सांगो ॥ १५० ॥
 
     
स्पर्शान् कृत्वा बहिर्बाह्यांश्चक्षुश्चैवान्तरे भ्रवोः।
     
प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यन्तरचारिणौ ॥ २७ ॥

तरी वैराग्यचेनि आधारें, जिहीं विषय दवडुनि बाहिरें।
शरीरीं एकंदरें, केलें मन ॥ १५१ ॥

एकंदरें=एकरूप एकाग्र

सहजें तिहीं संधी भेटी, जेथ भ्रुपल्लवां पडे गांठी।
तेथ पाठमोरी दिठी, पारुखोनियां ॥ १५२ ॥

भेटी=मिळतात  पारुखोनियां=वळवून   

सांडूनि दक्षिण वाम, प्राणापानसम।
चित्तेंसीं व्योम-, गामिये करिती ॥ १५३ ॥

व्योम=चिदाकाश

     
यतेद्नियमनोबुद्धिर्मुनिर्मोक्षपरायणः।
     
विगतेच्छाभयक्रोधो यः सदा मुक्त एव सः ॥ २८ ॥

तेथ जैसीं रथ्योदकें सकळें, घेऊनि गंगा समुद्री मिळे।
मग एकैक वेगळें, निवडु नये ॥ १५४ ॥

रथ्योदकें=पथावरील पाणी

तैसी वासनांतराची विवंचना, मग आपैसी पारुखे अर्जुना।
जे वेळी गगनीं लयो मना, पवनें कीजे ॥ १५५ ॥

विवंचना=चिंता विचार   पारुखे=थांबते 

जेथ हें संसारचित्र उमटे, तो मनोरुपु पटु फाटे।
जैसें सरोवर आटे, मग प्रतिमा नाहीं ॥ १५६ ॥

पटु=पडदा

तैसें मनपण मुदल जाये, मग अंहभावादिक कें आहे।
म्हणोनि शरीरेंचि ब्रह्म होये, अनुभवी तो ॥ १५७ ॥


     
भोक्तारं यज्ञतपसां सर्वलोकमहेश्वरम्।
     
सुहृद सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति ॥ २९ ॥

आम्ही मागां हन सांगितलें, जे देहींचि ब्रह्मत्व पावले।
ते येणें मार्गे आले, म्हणऊनिया ॥ १५८ ॥

हन=हेच खरे

आणि यमनियमांचे डोंगर, अभ्यासाचे सागर।
क्रमोनि हे पार, पातले ते ॥ १५९ ॥

तिहीं आपणपें करुनि निर्लेप, प्रंपचाचें घेतलें माप।
मग साचाचेंचि रुप, होऊनि ठेले ॥ १६० ॥

निर्लेप=शुद्ध   माप=झाडा साचाचेंचि=ब्रह्म

ऐसा योगयुक्तीचा उद्देशु, जेथ बोलिला हृषीकेशु।
तेथ अर्जुनु सुदंशु, म्हणोनि चमत्कारला ॥ १६१ ॥

सुदंशु=मर्मज्ञ जाणकार   चमत्कारला=चकित झाला

तें देखिलिया कृष्णें जाणितलें, मग हांसोनि पार्थातें म्हणितलें।
तें काई पां चित्त उवाइलें, इये बोलीं तुझे ॥ १६२ ॥

उवाइलें=आनंदले

तंव अर्जुन म्हणे देवो, परचित्तलक्षणांचा रावो।
भला जाणितला जी भावो, मानसु माझा ॥ १६३ ॥

परचित्तलक्षणांचा=मनकवडा

म्यां जें काहीं विवरुनि पुसावें, ते आधींचि कळले देवें।
तरी बोलिलें तेंचि सांगावें, विवळ करुनि ॥ १६४ ॥

विवळ=स्पष्ट
 
एऱ्हवीं तरी अवधारा, जो दाविला तुम्हीं अनुसारा।
तो पव्हण्याहूनि पायउतारा, सोहपा जैसा ॥ १६५ ॥

अवधारा=ऐका   अनुसारा=मार्ग
पव्हण्याहूनि=पोह्ण्यापेक्षा

तैसा सांख्याहूनि प्रांजळा, तरी आम्हांसारिखियां  
एथ आहाति कांही परि काळा, तो साहों ये वर ॥ १६६ ॥

प्रांजळा=सोपा  अभोळां=दुर्बळ
आहाति = लागेल(आहे)  काळा=काळ .साहों ये = सहन करत येईल
वर=परंतु

म्हणोनि एक वेळ देवा, तोचि पडताळा घेयावा।
विस्तरेल तरी सांगावा, साद्यंतुचि ॥ १६७ ॥
विस्तरेल=विस्तार झाला तरी

तंव कृष्ण म्हणती हो कां, तुज हा मार्ग गमला निका,
तरी काय जाहलें ऐंकिजो कां, सुखें बोलों ॥ १६८ ॥

अर्जुना तु परिससी, परिसोनि अनुष्ठिसी।
तरी आम्हांसीचि वानी कायसी, सांगावयाची ॥ १६९ ॥

वानी=कमतरता

आधींच चित्त मायेचें, वरी मिष जाहलें पढियंताचे,
आतां तें अद्भुतपण स्नेहाचें, कवण जाणे ॥ १७० ॥

पढियंताचे=प्रिय

ते म्हणों कारुण्यरसाची वृष्टि , कीं नवया स्नेहाची सृष्टि।
हें असे नेणिजे दृष्टी, हरीची वानूं ॥ १७१ ॥

नवया=नवीन

जे अमृताची वोतली, कीं प्रेमचि पिऊन मातली।
म्हणोनि अर्जुनमोहें गुंतली, निघों नेणे ॥ १७२ ॥

हें बहु जें जें जल्पिजेल, तेथें कथेसि फांकु होईल।
परि स्नेह रुपा नयेल, बोलवरी ॥ १७३ ॥

जल्पिजेल=बडबड बोलेल फांकु=विस्तार
बोलवरी=बोलून शब्दात

म्हणोनि विसुरा काय येणें, तो ईश्वरु आकळावा कवणें।
जो आपुलें मान नेणे, आपणचि ॥ १७४ ॥

विसुरा=विस्तार
तरी मागीला ध्वनीआंतु, मज गमला सावियाचि मोहितु।
जे बलात्कारें असे म्हणतु, परिस बापा ॥ १७५ ॥

ध्वनीआंतु=संभाषण

अर्जुना जेणें भेदें, तुझें कां चित्त बोधे।
तैसें तैसें विनोदें, निरुपिजेल ॥ १७६ ॥

विनोदें=आनंदे

तो काइसया नाम योगु, तयाचा कवण उपेगु।
अथवा अधिकारप्रसंगु, कवणा येथ ॥ १७७ ॥

नाम= नाव

ऐसें जें जें कांही, उक्त असे इये ठाई।
तें आघवेंचि पाहीं, सांगेन आतां ॥ १७८ ॥

उक्त=सांगायचे

तूं चित्त देऊनि अवधारीं, ऐसें म्हणोनि श्रीहरी।
बोलिजेल ते पुढारी, कथा आहे ॥ १७९ ॥

पुढारी=पुढील

श्रीकृष्ण अर्जुनासी संगु, न सांडोनि सांगेल योगु।
तो व्यक्त करु प्रसंगु, म्हणे निवृत्तिदासु ॥ १८० ॥

संगु=सख्य

इति श्रीमदभगवदगीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे योगगर्भो नाम पञ्चमोऽध्यायः।

ॐ श्रीसच्चिदानन्दार्पणमस्तु ॥

http://dnyaneshwariabhyas.blogspot.in/

1 comment:

  1. पांचव्या अध्यायाची सुगम समाप्ती

    ReplyDelete