ज्ञानेश्वरी / अध्याय आठवा /
अक्षरब्रह्मयोग / ओव्या ५९ ते ९९
अन्तकाले च मामेव स्मरन्मुक्त्वा कलेवरम्,
यः प्रयाति स मद्भावं याति नास्त्यत्र संशयः ॥ ५॥
जें आतांचि सांगितलें होतें, अगा अधियज्ञ म्हणितला जयातें।
जे आदीचि तया मातें, जाणोनि अंतीं ॥ ५९॥
आदीचि=अगोदरच
ते देह झोळ ऐसें मानुनी, ठेले आपणपें आपण होऊनी।
जैसा मठ गगना भरूनी, गगनींचि असे ॥ ६०॥
झोळ=खोटे
यें प्रतीतीचिया माजघरीं, तया निश्चयाची वोवरी।
आली म्हणोनि बाहेरी, नव्हेचि से ॥ ६१॥
वोवरी=खोली से=पर्वा,इच्छा
ऐसें सबाह्य ऐक्य संचलें, मीचि होऊनि असतां रचिलें।
बाहेरि भूतांचीं पांचही खवलें, नेणतांचि पडिलीं ॥ ६२॥
आतां उभयां उभेपण नाहीं जयाचें, मा पडिलिया गहन कवण तयाचें।
म्हणोनि प्रतीतीचिये पोटींचें, पाणी न हाले ॥ ६३॥
उभयां=जिवंत असतांना गहन=संकट
ते ऐक्याची आहे वोतिली, कीं नित्यतेचिया हृदयीं घातली।
जैसी समरससमुद्रीं धुतली, रूळेचिना ॥ ६४॥
वोतिली=बनली रूळेचिना=मळत नाही
पैं अथावीं घट बुडाला, तो आंतबाहेरी उदकें भरला।
पाठीं दैवगत्या जरी फुटला, तरी उदक काय फुटे ॥ ६५॥
अथावीं=खोल पाण्यात
ना तरी सर्पे कवच सांडिलें, कां उबारेनें वस्त्र फेडिलें।
तरी सांग पां काय मोडलें, अवेवामाजीं ॥ ६६॥
उबारेनें=उष्णतेने, गरम झाल्याने
तैसा आकार हा आहाच भ्रंशे, वांचूनि वस्तु ते सांचलीचि असे।
तेचि बुद्धि जालिया विसुकुसे, कैसेनि आतां ॥ ६७॥
आहाच=वरवरचा विसुकुसे=गोंधळ, डगमगणे
म्हणोनि यापरी मातें, अंतकाळीं जाणत सांते।
जे मोकलिती देहातें, तें मीचि होती ॥ ६८॥
सांते= असती मोकलिती=सोडती
एऱ्हवीं तरी साधारण, उरीं आदळलिया मरण।
जो आठव धरी अंतःकरण, तेंचि होइजे ॥ ६९॥
जैसा कवण एक काकुळती, पळतां पवनगती।
दुपाउलीं अवचितीं, कुहामाजी पडियेला ॥ ७०॥
दुपाउलीं = दोन पावलावर असलेल्या कुहामाजी=विहीर
आतां तया पडणयाआरौतें, पडण चुकवावया परौतें।
नाहीं म्हणोनि तेथें, पडावेंचि पडे ॥ ७१॥
आरौतें=अलीकडे,शिवाय परौतें=पलीकडे, दुसरे
तेंवि मृत्यूचेनि अवसरें एकें, जें येऊनि जीवासमोर ठाके।
तें होणें मग न चुके, भलतयापरी ॥ ७२॥
आणि जागता जंव असिजे, तंव जेणें ध्यानें भावना भाविजे।
डोळा लागतखेवों देखिजे, तेंचि स्वप्नीं ॥ ७३॥
यं यं वापि स्मरन् भावं त्यजत्यन्ते कलेवरम्।
तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभावितः ॥ ६ ॥
तेविं जितेनि अवसरें, जें आवडोनि जीवीं उरे।
तेंचि मरणाचिये मेरे, फार हों लागे ॥ ७४॥
अवसरें=वेळे मेरे=सीमेवर, क्षणी , फार हों लागे=उफाळून येतात
आणि मरणीं जया जें आठवे, तो तेचि गतीतें पावे।
म्हणोनि सदां स्मरावें, मातेंचि तुवां ॥ ७५॥
तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च।
मय्यर्पितमनोबुद्धिर्मामेवैष्यस्यसंशयम् ॥ ७ ॥
डोळां जें देखावें, कां कानी हन ऐकावें,
मनीं जें भावावें, बोलावें वाचे ॥ ७६॥
तें आतं बाहेरि आघवें, मीचि करूनि घालावें।
मग सर्वीं काळीं स्वभावें, मीचि आहें ॥ ७७॥
अर्जुना ऐसें जाहलिया, मग न मरिजे देह गेलिया।
मा संग्रामु केलिया, भय काय तुज ॥ ७८॥
तूं मनबुद्धि साचेंसीं, जरी माझिया स्वरूपीं अर्पिसी।
तरी मातेंचि गा पावसी, हे माझी भाक ॥ ७९॥
साचेंसीं =खरेच नक्की भाक=वचन, शपथ
हेंच कायिसया वरी होये, ऐसा जरी संदेहो वर्ततु आहे।
तरी अभ्यासूनि आदीं पाहें, मग नव्हे तरी कोपें ॥ ८०॥
कायिसया=कसे
अभ्यासयोगयुक्तेन चेतसा नान्यगामिना।
परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुन्तयन् ॥ ८॥
येणेंचि अभ्यासेंसिं योगु, चित्तासि करीं पां चांगु।
अगा उपायबळें पंगु, पहाड ठाकी ॥ ८१॥
चांगु=चांगला पावित्र
तेविं सदभ्यासें निरंतर, चित्तासि परमपुरूषाची मोहर।
लावें मग शरीर, राहो अथवा जावो ॥ ८२ ॥
जें नानागतीतें पाववितें, तें चित्त वरील आत्मयातें।
मग कवण आठवी देहातें, गेलें की आहे ॥ ८३॥
वरील =वरन करणे पाववितें= घेवून जाते
पैं सरितेचिनि ओघें, सिंधुजळा मीनलें ओघें।
तें काय वर्तत आहे मागें, म्हणोनि पाहों येते ॥ ८४॥
ना तें समुद्रचि होऊन ठेलें, तेविं चित्ताचें चैतन्य जाहालें।
जेथ यातायात निमालें, घनानंद जें ॥ ८५॥
घनानंद=परम आनंदी
कविं पुराणमनुशासितारमणोरणीयांसमनुस्मरेद्।
सर्वस्य धातरमचिन्त्यरूपमादित्यवर्णं तमसः परस्तात् ॥ ९ ॥
जयाचें आकारावीण असणें, जया जन्म ना निमणें।
जें आघवेंचि आघवेपणें, देखत असे ॥ ८६॥
आघवेपणें=साक्षित्वे संपूर्णत्वाने
जें गगनाहून जुनें, जं परमाणूहूनि सानें।
जयाचेनि सान्निधानें, विश्व चळे ॥ ८७॥
जें सर्वांतें यया विये, विश्व सर्व जेणें जिये,
हेतु जया बिहे, अचिंत्य जें ॥ ८८॥
विये=जन्म देणे बिहे=घाबरे
देखे वोळंबा इंगळु न चरे, तेजीं तिमिर न शिरे।
जें दिहाचें आंधारें, चर्मचक्षूसीं ॥ ८९॥
वोळंबा=वाळवी इंगळु=अग्नी
सुसडा सूर्यकणांच्या राशी, जो नित्य उदो ज्ञानियांसी।
अस्तमानाचें जयासी, आडनांव नाहीं ॥ ९०॥
सुसडा=स्वच्छ
प्रयाणकाले मनसाचलेन भक्त्या युक्तो योगबलेन चैव।
भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक् स तं परं पुरुषमुपैति दिव्यम् ॥ १० ॥
तया अव्यंगवाणेया ब्रह्मातें, प्रयाणकाले प्राप्ते।
जो स्थिरावलेनि चित्तें, जाणोनि स्मरे ॥ ९१॥
बाहेरी पद्मासन रचुनी, उत्तराभिमुख बैसोनि।
जीवीं सुख सूनि, कर्मयोगाचें ॥ ९२॥
सूनि=ठसवून
आंतु मिनलेनि मनोधर्मे, स्वरूपप्राप्तीचेनि प्रेमें।
आपेंआप संभ्रमें, मिळावया ॥ ९३॥
मिनलेनि= एकरूप झाला आपेंआप=स्वत: स्वत:ला संभ्रमें=समारंभ पूर्वक
आकळलेनि योगें, मध्यमा मध्यमार्गे।
अग्निस्थानैनि निगे, ब्रह्मरंघ्रा ॥ ९४॥
योगें=अष्टांग योग मध्यमा=सुषुम्ना अग्निस्थान=आज्ञाचक्र
तेथ अचेत चित्ताचा सांगातु, आहाचवाणा दिसे मांडतु।
जेथ प्राण गगनाआंतु, संचरे कां ॥ ९५ ॥
अचेत=देहाचा आहाचवाणा=वरवरचा गगनाआंतु=मुर्धन्याकाश
परी मनाचेनि स्थैयैं धरिला, भक्तीचिया भावना भरला।
योगबळें आवरला, सज्ज होउनी ॥ ९६॥
तो जडाजडातें विरवितु, भ्रूलतांमाजी संचरतु।
जैसा घंटानाद लयस्थु, घंटेसींच होय ॥ ९७॥
जडाजडातें = जड +अजड
कां झांकलिया घटींचा दिवा, नेणिजे काय जाहला केव्हां।
या रीती जो पांडवा, देह ठेवी ॥ ९८॥
तो केवळ परब्रह्म, जया परमपुरूष ऐसें नाम।
तें माझें निजधाम, होऊनि ठाके ॥ ९९॥
ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ
सुंदर !
ReplyDeleteसुंदर !
ReplyDelete