Monday, April 4, 2016

ज्ञानेश्वरी अध्याय ६ ओव्या १०५ ते १६२



ज्ञानेश्वरी / अध्याय सहावा / संत ज्ञानेश्वर ओव्या १०५ ते १६२


     
योगी युञ्जीत सततमात्मानं रहसि स्थितः।
     
एकाकी यतचित्तात्मा निराशीरपरिग्रहः ॥ १० ॥

पुढती अस्तवेना ऐसें, जया पाहलें अद्वैतदिवसें।
मग आपणपांचि आपण असे, अखंडित ॥ १०५ ॥

अस्तवेना=मावळेना

ऐसिया दृष्टी जो विवेकी, पार्था तो एकाकी।
सहजें अपरिग्रही जो तिहीं लोकी, तोचि म्हणऊनि ॥ १०६ ॥

ऐसियें असाधारणें, निष्पन्नाचीं लक्षणें।
आपुलेनि बहुवसपणें, श्रीकृष्ण बोले ॥ १०७ ॥

निष्पन्नाचीं = प्राप्त झालेल्याची
बहुवसपणें=अधिक प्रमाणात

जो ज्ञानियांचा बापु, देखणेयांचे दिठीचा दीपु।
जया दादुलयाचा संकल्पु, विश्व रची ॥ १०८ ॥

दादुलयाचा=समर्थ

प्रणवाचिये पेठे, जाहलें शब्दब्रह्म माजिठें।
तें जयाचिया यशा धाकुटें, वेढूं न पुरे ॥ १०९ ॥

माजिठें=वस्त्र धाकुटें=कमी लहान

जयाचेनि आंगीकें तेजें, आवो रविशशीचिये वणिजे।
म्हणौनि जग हें वेसजे-, वीण असे तया ॥ ११० ॥

आवो=आव डौल वणिजे=व्यापार
वेसजेवीण=कर्महीन

हां गा नांवचि एक जयाचें, पाहतां गगनही दिसे टांचे।
गुण एकेक काय तयाचे, आकळशील तूं ॥ १११ ॥

टांचे=लहान

म्हणोनि असो हें वानणें, सांगों नेणों कवणांची लक्षणें।
दावावीं मिषें येणें, कां बोलिलों तें ॥ ११२ ॥

वानणें=कौतुक करणे 

ऐकें द्वैताचा ठावोचि फेडी, ते ब्रह्मविद्या कीजेल उघडी।
तरी अर्जुना पढिये हे गोडी, नासेल हन ॥ ११३ ॥

पढिये=प्रिय लाडका

म्हणोनि तें तैसे बोलणें, नव्हे सपातळ आड लावणें।
केलें मनचि वेगळवाणें, भोगावया ॥ ११४ ॥

सपातळ=झिरझिरीत पडदा

जया सोहंभाव अटकु, मोक्षसुखालागोनि रंकु।
तयाचिये दिठीचा झणें कळंकु, लागेल तुझिया प्रेमा ॥ ११५ ॥

अटकु=अडथळा   रंकु=दरिद्री  कळंकु=कलंक नजर  

विपायें अंहभाव ययाचा जाईल, मी तेंचि हो जरी होईल।
तरी मग काय कीजेल, एकलेया ॥ ११६ ॥

दिठीचि पाहतां निविजे , कां तोंड भरोनि बोलिजे।
नातरी दाटुनि खेंव दीजे, ऐसें कोण आहे ॥ ११७ ॥

आपुलिया मना बरवी, असमाई गोठी जीवीं।
ते कवणेंसि चावळावी, जरी ऐक्य जाहलें ॥ ११८ ॥

असमाई=राहत मावत नाही चावळावी=बोलावी

इया काकुळती जनार्दनें, अन्योपदेशाचेनि हातासनें।
बोलामाजि मन मनें , आलिंगुं सरले ॥ ११९ ॥

हातासनें= मिषाने हातवटी  

हें परिसतां जरी कानडें, तरी जाण पां पार्थ उघडें।
कृष्णसुखाचेंचि रुपडें, वोतलें गा ॥ १२० ॥

कानडें=कठीण

हें असो वयसेचिये शेवटीं, जैसें एकचि विये वांझोटी।
मग ते मोहाची त्रिपुटी, नाचों लागे ॥ १२१ ॥

तैसें जाहले अनंता, ऐंसे तरी मी न म्हणतां।
जरी तयाचा न देखतां, अतिशयो एथ ॥ १२२ ॥

पाहा पां नवल कैसें चोज, कें उपदेशु केउतें झुंज।
परी पुढें वालभाचे भोज, नाचत असे ॥ १२३ ॥

चोज=लाड वालभाचे=प्रियकर व्यक्ती भोज=आवड ,आनंद

आवडी आणि लाजवी, व्यसन आणि शिणवी।
पिसें आणि न भुलवी, तरी तेंचि काइ ॥ १२४ ॥

म्हणउनि भावार्थु तो ऐसा, अर्जुन मैत्रियेचा कुवासा।
कीं सुखे श्रृंगारलिया मानसा, दर्पणु तो ॥ १२५ ॥

कुवासा=आश्रय

यावरी बाप पुण्यपवित्र, जगीं भक्तिबीजासि सुक्षेत्र।
तो कृष्णकृपे पात्र, याचिलागीं ॥ १२६ ॥

हो का आत्मनिवेदनातळींची, जे पीठिका होय सख्याची।
पार्थु अधिष्ठात्री तेथिंची, मातृका गा ॥ १२७ ॥

पीठिका=भूमिका अधिष्ठात्री=प्रमुख मातृका=देवता

पासींचि गोसावी न वर्णिजे, मग पाइकाचा गुण घेईजे ।
ऐसा अर्जुने तो सहजें, पढिये हरी ॥ १२८ ॥

पाहां पां अनुरागें भजे , जे प्रियोत्तमें मानिजे।
ते पतीहून काय न वर्णिजे, पतिव्रता ॥ १२९ ॥

तैसा अर्जुनचि विशेषें स्तवावा, ऐसें आवडलें मज जीवा।
जे तो त्रिभुवनाचिया दैवां, एकायतनु जाहला।। १३० ॥

दैवां =नशिबा एकायतनु-घर

जयाचिया आवडीचेनि पांगें, अमूर्तुही मूर्ति आवगे।
पूर्णाहि परी लागे, अवस्था जयाची ॥ १३१॥

आवगे =घेतो अवस्था=उत्कंठा आवड

तंव श्रोते म्हणती दैव, कैसी बोलाची हवाव।
काय नादातें हन बरव, जिणोनी आली ॥१३२॥
दैव=भाग्य हवाव=रंग बरव=शोभा

हां हो नवल नोहे देशी, मऱ्हाटी बोलिजे तरी ऐसी।
वाणें उमटताहे आकाशीं, साहित्यरंगाचें ॥१३३॥

कैसें उन्मेखचांदिणें तार, आणि भावार्था पडे गार।
हेचि श्लोकार्थकुमुदी तरी फार, साविया होती ॥१३४॥

तार=टपोरे  साविया=सहज

चाडचि निचाडां करी, ऐसी मनोरथीं ये थोरी।
तेणें विवळले अंतरी, तेथ डोलु आला ॥१३५॥

विवळले=उगवणे उदय पावणे

तें निवृत्तिदासें जाणितलें, मग अवधान द्या म्हणितलें ॥
नवल पांडवकुळीं पाहलें, कृष्णदिवसें ॥१३६॥

देवकीया उदरीं वाहिला। यशोदा सायासें पाळिला ॥
कीं शेखीं उपेगा गेला, पांडवासी ॥१३७॥

शेखीं= शेवटी


म्हणऊनि बहु दिवस वोगळावा, कां अवसरु पाहोनि विनवावा।
हाही सोसु तया सदैवा, पडेचिना ॥१३८॥

वोगळावा=सेवा

हें असो कथा सांगें वेगीं, मग अर्जुन म्हणे सलगी।
देवा इयें संतचिन्हें हन आंगीं, न ठकती माझां ॥१३९॥

एऱ्हवीं या लक्षणांचिया निजसारा, मी अपाडें कीर अपुरा।
परि तुमचेनि बोलें अवधारा, थोरावें जरी ॥१४०॥

निजसारा= सारभूत  अपाडें =फार  थोरावें= मोठेपणयोग्यता  येणे

जी तुम्ही चित्त देयाल, तरी ब्रह्म मियां होईजेल।
काय जाहलें अभ्यासिजेल, सांगाल जे ॥ १४१ ॥

हां हो नेणों कवणाची काहाणी, आइकोनि श्लाघत असों अंतःकरणीं,
ऐसी जाहलेपणाची शिरयाणी, कायसी देवा ॥ १४२ ॥

श्लाघत = इच्छा करणे स्तवन करणे   शिरयाणी=महती

हें आंगे म्या होइजो का, येतुलें गोसावी आपुलेपणें कीजो कां।
तंव हांसोनि श्रीकृष्ण हो कां, करुं म्हणती ॥ १४३ ॥

गोसावी=प्रभू

देखा संतोषु एक न जोडे, तंवचि सुखाचें सैंघ सांकडें।
मग जोडलिया कवणीकडे, अपुरें असे।। १४४ ॥

सैंघ= सर्व अनेक

तैसा सर्वेश्वरु बळिया सेवकें, म्हणोनि ब्रह्मही होय तो कौतुकें।
परि कैंसा भारें आतला पिके, दैवाचेनि ॥ १४५ ॥
आतला=व्यापला

जो जन्मसहस्रांचियासाठीं, इंद्रादिकांही महागु भेटी।
तो आधीनु केतुला किरीटी, जे बोलुहि न साहे ॥ १४६ ॥

मग ऐका जें पांडवें, म्हणितले ब्रह्म म्यां होआवें।
तें अशेषही देवें, अवधारिलें ॥ १४७ ॥

तेथ ऐसेंचि एक विचारिलें, जे या ब्रह्मत्वाचे डोहळे जाहले।
परि उदरा वैराग्य आहे आलें, बुध्दीचिया ॥ १४८ ॥

एऱ्हवीं दिवस तरी अपुरे, परि वैराग्यवसंताचेनि भरें।
जे सोंहभाव महुरें, मोडोनि आला ॥ १४९ ॥

मोडोनि= भरून ओथंबून  

म्हणोनि प्राप्तिफळीं फळतां, यासि वेळु न लागेल आतां।
हो विरक्तु ऐसा अंनता, भरंवसा जाहला ॥ १५० ॥

म्हणे जें जें हा अधिष्ठील। तें आरंभींच यया फळेल।
म्हणौनि सांगितला न वचेल, अभ्यासु वायां ॥ १५१ ॥

अधिष्ठील=सुरु करेल मांडेन  वचेल-जाईल

ऐसें विवरोनियां श्रीहरी, म्हणितलें तिये अवसरीं।
अर्जुना हा अवधारीं, पंथराजु ॥ १५२ ॥

तेथ प्रवृत्तितरुच्या बुडीं, दिसती निवृत्तिफळाचिया कोडी।
जिये मार्गीचा कापडी, महेशु आझुनि ॥ १५३ ॥
कोडी = कोटी   कापडी=यात्रेकरू

पैं योगवृंदे वहिलीं, आडवीं आकाशीं निघालीं।
कीं तेथ अनुभवाच्या पाउलीं, धोरणु पडिला ॥ १५४ ॥

आडवीं=आडमार्गे  आकाशीं=महाशुन्यी  धोरणु पडिला=सुलभता आली

तिहीं आत्मबोधाचेनि उजुकारें, धांव घेतली एकसरें।
कीं येर सकळ मार्ग निदसुरे, सांडुनियां ॥ १५५ ॥

निदसुरे=अज्ञान मार्ग  उजुकारें-सरळ मार्ग

पाठीं महर्षी येणें आले, साधकांचे सिध्द जाहाले।
आत्मविद थोरावले, येणेंचि पंथें ॥ १५६ ॥

आत्मविद=आत्मज्ञ थोरावले=श्रेष्ठ

हा मार्गु जैं देखिजे, तैं तहान भूक विसरिजे।
रात्रिदिवसु नेणिजे, वाटे इये ॥ १५७ ॥

चालतां पाऊल जेथ पडे, तेथ अपवर्गाची खाणी उघडे।
आव्हांटलिया तरी जोडे, स्वर्गसुख ॥ १५८ ॥

अपवर्गाची=मोक्ष  आव्हांटलिया=आडवाटे

निगिजे पूर्वींलिया मोहरा, कीं येइजे पश्चिमेचिया घरा।
निश्चळपणें धनुर्धरा, चालणें येथिंचें ॥ १५९ ॥

मोहरा=मार्गे

येणें मार्गें जया ठाया जाइजे, तो गांवो आपणचि होइजे।
हें सांगो काय सहजें, जाणसी तूं ॥ १६० ॥

तेथ म्हणितलें देवा, तरी तेंचि मग केव्हां।
कां आर्तीसमुद्रौनि न काढावा, बुडतु जी मी ॥ १६१ ॥

आर्ती=उत्कंठा

तवं श्रीकृष्ण म्हणती ऐसें, हें उत्संखळ बोलणें कायसें।
आम्हीं सांगतसों आपैसें, वरि पुशिले तुवां ॥ १६२ ॥


उत्संखळ=उताविळ

1 comment: