Saturday, April 16, 2016

अध्याय ६ वा ओव्या ४२१ ते ४९७ (संपूर्ण )



अध्याय ६ वा ओव्या ४२१ ते ४९७ (संपूर्ण )

     
असंयतात्मना योगो दुष्पाप इति मे मतिः।
     
वश्यात्मना तु यतता शक्योऽवाप्तुमुपायतः ॥ ३६ ॥

एऱ्हवीं विरक्ती जयांसि नाही, जे अभ्यासीं न रिघती कहीं।
तयां नाकळे हें आम्हीही, न मनू कायी ॥ ४२१ ॥

परी यमनियमांचिया वाटा न वचिजे, कहीं वैराग्याची से न करिजे,
केवळ विषयजळीं ठाकिजे, बुडी देऊनी ॥ ४२२ ॥

या जालिया मानसा कहीं, युक्तीची कांबी लागली नाहीं।
तरी निश्चळ होईल काई, कैसेनि सांगे ॥ ४२३ ॥

या जालिया =झालीय (जन्मापासून)  कांबी=(रित) कमान, काठी

म्हणोनि मनाचा निग्रह होये, ऐसा उपाय जो आहे।
तो आरंभीं मग नोहे, कैसा पाहों ॥ ४२४ ॥

मग नोहे=मग न होणार

तरी योगसाधन जितुकें, कें अवघेचि काय लटिकें।
परि आपणयां अभ्यास न ठाके, हेंचि म्हण ॥ ४२५ ॥

ठाके=न जमे
आंगी योगाचें होय बळ, तरी मन केतुलें चपळ।
काय महदादि हें सकळ, आपु नोहे ॥ ४२६ ॥

आपु=स्वाधीन

तेथ अर्जुन म्हणे निकें, देवो बोलती तें न चुके।
साचचि योगबळेंसीं न तुके, मनोबळ ॥ ४२७ ॥

तरी तोचि योगु कैसा केवीं जाणों, आम्ही येतुले दिवस याची मातुही नेणों।
म्हणोनि मनातें जी म्हणों, अनावर ॥ ४२८ ॥

हा आतां आघवेया जन्मा, तुझेनि प्रसादें पुरुषोत्तमा।
योगपरिचयो आम्हां, जाहला आजी ॥ ४२९ ॥

     
अर्जन उवाच -अयतिः श्रध्दयोपेतो योगात् चलितमानसः।
     
अप्राप्य योगसंसिध्दि कां गतिं कृष्ण गच्छति ॥ ३७ ॥

     
कच्चित् नोभयविभ्रष्टश्छिन्नाभ्रमिव नश्यति।
     
अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्राह्मणः पथि ॥ ३८ ॥

     
एतत् मे संशयं कृष्ण छेत्तुमर्हस्यशेषतः।
     
त्वदन्यः संशयस्यास्य छेत्ता न ह्युपपद्दते ॥ ३९ ॥

परि आणिक एक गोसांविया, मज संशयो असे साविया।
तो तूंवांचूनि फेडावया, समर्थु नाहीं ॥ ४३० ॥

म्हणोनि सांगे गोविंदा, कवण एकु मोक्षपदा।
झोंबत होता श्रध्दा, उपायेंविण ॥ ४३१ ॥

इद्रिंयग्रामोनि निघाला, आस्थेचिया वाटा लागला।
आत्मसिद्धीचिया पुढिला, नगरा यावया ॥ ४३२ ॥

तंव आत्मसिद्धी न ठकेचि, आणि मागुतें न येववेचि।
ऐसा अस्तु गेला माझारींचि, आयुष्यभानु ॥ ४३३ ॥

जैसें अकाळीं आभाळ, अळुमाळु सपातळ।
विपायें आलें केवळ, वसे ना वर्से ॥ ४३४ ॥

तैसी दोन्ही दुरावलीं, जे प्राप्ती तंव अलग ठेली।
आणि अप्राप्तीही सांडवली, श्रध्दा तया ॥ ४३५ ॥

ऐसा वोलांतरला काजीं, जो श्रध्देचांचि समाजीं।
बुडाला तया हो जी, कवण गति ॥ ४३६ ॥

वोलांतरला=अंतरला

     
श्रीभगवानुवाच-पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते।
     
न हि कल्याणकृत् कश्चित् दुर्गतिं तात गच्छति ॥ ४० ॥

तंव कृष्ण म्हणती पार्था, जया मोक्षसुखीं आस्था।
तया मोक्षावांचुनि अन्यथा, गती आहे गा ॥ ४३७ ॥

परि एतुलेंचि एक घडे, जें माझारी विसवावें पडे।
तेंही परि ऐसेनि सुरवाडें, जो देवां नाहीं ॥ ४३८ ॥

विसवावें=विसावा घेणे सुरवाडें=सुख घ्यावे

एऱ्हवी अभ्यासाचा उचलतां, पाउलीं जरी चालतां।
तरी दिवसाआधीं ठाकिता, सोऽहंसिध्दीतें ॥ ४३९ ॥

परि तेतुला वेगु नव्हेचि, म्हणऊनि विसांवा तरी निकाचि।
पाठीं मोक्षु तंव तैसाचि, ठेविला असे ॥ ४४० ॥

     
प्राप्य पुण्यकृतां लोकानुषित्वा शाश्वतीः समाः।
     
शुचीनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोऽभिजायते ॥ ४१ ॥

ऐसें कवतिक हें कैसें, जें शतमखा लोक सायासें।
ते तो पावे अनायासें, कैवल्यकामु ॥ ४४१ ॥

शतमखा= शत यज्ञ

मग तेथिंचे जे अमोघ, अलौकिक भोग।
भोगितांही सांग, कांटाळे मन ॥ ४४२ ॥

हा अंतरायो अवचितां, कां वोढवला भगवंता।
ऐसा दिविभोग भोगितां, अनुतापी नित्य ॥ ४४३ ॥

पाठीं जन्मे संसारी, परि सकळ धर्माचिया माहेरीं।
लांबा उगवे आगरीं, विभवश्रियेचा ॥ ४४४ ॥

लांबा=एक प्रकारचा चांगला भात विभवश्रियेचा=वैभव श्री युक्त

जयातें नीतिपंथे चालिजे, सत्यधूत बोलिजे।
देखावें तें देखिजे, शास्त्रदृष्टी ॥ ४४५ ॥

वेद तो जागेश्वरु, जया व्यवसाय निजाचारु।
सारासारविचारु, मंत्री जयाते ॥ ४४६ ॥

जागेश्वरु,=जागृत देवता

जयाचा कुळीं चिंता, जाली ईश्वराची पतिव्रता।
जयातें गृहदेवता, आदि ऋध्दि ॥ ४४७ ॥

चिंता=ईश चिंतन ऋध्दि=संपती

ऐसी निजपुण्याची जोडी, वाढिन्नली सर्वसुखाची कुळवाडी।
तिये जन्मे तो सुरवाडी, योगच्युतु ॥ ४४८ ॥

सुरवाडी=सुखे

     
अथवा योगिनामेव कुले भवति धीमताम्।
     
एतद्धि दुर्लभतरं लोके जन्म यदिदृश्यम्।। ४२ ॥

     
तत्र तं बुद्धिसंयोगं लभते पौर्वदेहिकम्।
     
यतते च ततो भूयः संसिद्धौ कुरुनन्दन ॥ ४३ ॥

अथवा ज्ञानाग्निहोत्री, जे परब्रह्मण्य श्रोत्री।
महासुखक्षेत्रीं, आदिवंत ॥ ४४९ ॥

श्रोत्री=वैदिक   आदिवंत= मूळ निवासी, वतनदार

जे सिद्धांताचिया सिंहासनीं, राज्य करिती त्रिभुवनीं।
जे कूंजते कोकिल वनीं, संतोषाचां ॥ ४५० ॥

जे विवेकग्रामींचां मुळीं, बैसले आहाति नित्य फळीं।
तया योगियांचिया कुळीं, जन्म पावे ॥ ४५१ ॥

आहाति=सेविती

मोटकी देहाकृती उमटे, आणि निजज्ञानाची पाहांट फुटे।
सूर्यापुढें प्रगटे, प्रकाशु जैसा ॥ ४५२ ॥

तैसी दशेची वाट न पहातां, वयसेचिया गांवा न येतां।
बाळपणींच सर्वज्ञता, वरी तयातें ॥ ४५३ ॥

तिये सिद्धप्रज्ञेचेनि लाभें, मनचि सारस्वतें दुभे।
मग सकळ शास्त्रे स्वयंभें, निघती मुखें ॥ ४५४ ॥

ऐसें जे जन्म, जयालागीं देव सकाम।
स्वर्गीं ठेले जप होम, करिती सदा ॥ ४५५ ॥

अमरीं भाट होईजे, मग मृत्युलोकातें वानिजे।
ऐसें जन्म पार्था गा जे, तें तो पावे ॥ ४५६ ॥

अमरीं=देव

     
पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते ह्यवशोऽपि सः।
     
जिज्ञासुरपि योगस्य शब्दब्रह्मातिवर्तते ॥ ४४ ॥

आणि मागील जे सद्बुद्धि, जेथ जीवित्वा जाहाली होती अवधि।
मग तेचि पुढती निरवधि, नवी लाहे ॥ ४५७ ॥

अवधि=अंत निरवधि=अपार

तेथ सदैवा आणि पायाळा, वरि दिव्यांजन होय डोळां।
मग देखे जैसीं अवलीळा, पाताळधनें ॥ ४५८ ॥

तैसें दुर्भेद जे अभिप्राय, कां गुरुगम्य हन ठाय।
तेथ सौरसेंवीण जाय, बुद्धी तयाची ॥ ४५९ ॥

सौरसेंवीण=यत्नावाचून

बळियें इंद्रियें येती मना, मन एकवटे पवना।
पवन सहजें गगना, मिळोंचि लागे ॥ ४६० ॥

ऐसें नेणों काय आपैसें, तयातेंचि कीजे अभ्यासें।
समाधी घर पुसे, मानसाचें।। ४६१ ॥

जाणिजे योगपीठीचा भैरवु, काय आरंभरंभेचा गौरवु।
की वैराग्यसिद्धीचा अनुभवु, रुपा आला ॥ ४६२ ॥

भैरवु=शिवरूप आरंभरंभेचा=आरंभरुपी पार्वती

हा संसारु उमाणितें माप, का अष्टांगसामग्रीचें द्वीप।
जैसे परिमळेंचि धरिजे रुप, चंदनाचें ॥ ४६३ ॥

उमाणितें=मोजण्याचे

तैसा संतोषाचा काय घडिला, कीं सिद्धिभांडारीहूनि काढिला।
दिसे तेणें मानें रुढला, साधकदशे ॥ ४६४ ॥

     
प्रयत्नाद् यतमानस्तु योगी संशुद्धकिल्बिषः।
     
अनेकजन्मसंसिद्धस्ततो याति परां गतिम् ॥ ४५ ॥

जे वर्षशतांचिया कोडी, जन्मसहस्त्रांचिया आडी।
लंघितां पातला थडी, आत्मसिद्धीची ॥ ४६५ ॥

कोडी=करोडो आडी=अडथळे थडी=किनारा

म्हणोनि साधनजात आघवें, अनुसरे तया स्वभावें।
मग आयतिये बैसे राणिवे, विवेकाचिये ॥ ४६६ ॥

स्वभावें=सहजच

पाठीं विचारितया वेगां, तो विवेकुही ठाके मागां।
मग अविचारणीय तें आंगा, घडोनि जाय ॥ ४६७ ॥

तेथ मनाचें मेहुडें विरे, पवनाचे पवनपण सरे।
आपणपां आपण मुरे, आकाशही ॥ ४६८ ॥

मेहुडें=ढग

प्रणवाचा माथा बुडे, येतुलेनि अनिर्वाच्य सुख जोडे।
म्हणोनि आधींचि बोलु बहुडे, तयालागीं ॥ ४६९ ॥

बहुडे,=अपुरे

ऐसी ब्रह्माची स्थिती, जे सकळां गतींसी गती।
तया अमूर्ताची मूर्ती, होऊनि ठाके ॥ ४७० ॥

तेणें बहुतीं जन्मीं मागिलीं, विक्षेपांची पाणिवळें झाडिलीं।
म्हणोनि उपजतखेंवो बुडाली, लग्नघटिका ॥ ४७१ ॥

पाणिवळें=केरकचरा

आणि तद्रूपतेसीं लग्न, लागोनि ठेलें अभिन्न।
जैसे लोपलें अभ्र गगन, होऊनि ठाके ॥ ४७२ ॥

तैसें विश्व जेथ होये, मागौतें जेथ लया जाये।
तें विद्यमानेंचि देहें, जाहला तो गा ॥ ४७३ ॥

विद्यमानेंचि=सध्या असूनही

     
तपस्विभ्योऽधिको योगी ज्ञानिभ्योऽपि मतोऽधिकः।
     
कर्मिभ्यश्चाधिको योगी तस्मात् योगी भवार्जुन ॥ ४६ ॥

जया लाभाचिया आशा, करुनि धैर्यबाहूंचा भंरवसा।
घालीत षट्कर्माचा धारसा, कर्मनिष्ठ ॥ ४७४ ॥

धारसा=प्रवाह (संतत धार)

कां जिये एकी वस्तुलांगी, बाणोनि ज्ञानाची व्रजांगी।
झुंजत प्रपंचेंशीं समरंगीं, ज्ञानिये गा ॥ ४७५ ॥

व्रजांगी=चिलखत

अथवा निलागें निसरडा, तपोदुर्गाचा आडकडा।
झोंबती तपिये चाडा, जयाचिया ॥ ४७६ ॥

निलागें=आधार नसलेला

जें भजतियांसी भज्य, याज्ञिकांचे याज्य।
एवं जें पूज्य, सकळां सदा ॥ ४७७ ॥

तेंचि तो आपण, स्वयं जाहला निर्वाण।
जें साधकांचें कारण, सिद्ध तत्व ॥ ४७८ ॥

म्हणोनि कर्मनिष्ठां वंद्यु, तो ज्ञानियांसि वेद्यु।
तापसांचा आद्यु, तपोनाथु ॥ ४७९ ॥

पैं जीवपरमात्मसंगमा, जयाचें येणें जाहले मनोधर्मा।
तो शरीरीचि परि महिमा, ऐसी पावे ॥ ४८० ॥

म्हणोनि याकारणें , तूंतें मी सदा म्हणें।
योगी होई अंतःकरणें, पंडुकुमरा ॥ ४८१ ॥

     
योगिनामपि सर्वेषां मद्गतेनान्तरात्मना।
     
श्रद्धावान् भजते यो मां स मे युक्ततमो मतः ॥ ४७ ॥

अगा योगी जो म्हणिजे, तो देवांचा देव जाणिजे।
आणि सुखसर्वस्व माझें, चैतन्य तो ॥ ४८२ ॥

जया भजता, भजन भजावें, हे भक्तिसाधन जें आघवें।
ते मीचि जाहलों अनुभवें, अखंडीत ॥ ४८३ ॥

मग तया आम्हां प्रीतीचें, स्वरुप, बोली निर्वचे।
ऐसें नव्हे गा, तो साचें, सुभद्रापती ॥ ४८४ ॥

निर्वचे=शब्दात न सांगता येणे

तया एकवटलिया प्रेमा, जरी पाडें पाहिजे उपमा।
तरी मी देह तो आत्मा, हेचि होय ॥ ४८५ ॥

ऐसे भक्तचकोरचंद्रें, त्रिभुवनैकनरेंद्रे ।
बोलिलें गुणसमुद्रें, संजयो म्हणे ॥ ४८६ ॥

तेथ आदिलापासोनि पार्था, ऐकिजे ऐसीचि आस्था।
दुणावली हें यदुनाथा, पावों सरले ॥ ४८७ ॥

आदिलापासोनि =सुरवातीपासून ऐकिजे=ऐकायची
पावों सरले=समजले

कीं सावियाचि मनीं तोषला, जे बोला आरिसा जोडला।
तेणें हरिखें आतां उपलवला, निरुपील ॥ ४८८ ॥

हरिखें=आनंदे  उपलवला=प्रफुल्लीत झाला
                                            
तो प्रसंगु आहे पुढां, जेथ शांतु दिसे उघडा।
तो पालविजेल मुडा, प्रमेयबीजांचा ॥ ४८९ ॥

पालविजेल=उघडेल ,विस्तारेल    मुडा=कणगी

जें सात्विकाचेनि वडपें, गेलें आध्यात्मिक खरपें।
सहजें निरोळले वाफे, चतुरचित्ताचे ॥ ४९० ॥

वडपें=वर्षाव  खरपें=रुक्षता डिखळ   निरोळले=तयार झाले

वरी अवधानाचा वाफसा, लाधला सोनयाऐसा।
म्हणोनि पेरावया धिंवसा, निवृतीसी ॥ ४९१ ॥

वाफसा=वाफा धिंवसा=इच्छा

ज्ञानदेव म्हणे मी चाडें, सद्गुरुंनी केलें कोडें।
माथां हात ठेविला तें फुडें, बीजचि वाइलें ॥ ४९२ ॥

मी चाडें= इच्छा धरताच   कोडें=कौतुके  फुडें=उघड निश्चित

म्हणऊनि येणे मुखें जें जें निगे, तें संतांच्या हृदयीं साचचि लागे।
हें असो सांगों श्रीरंगे, बोलिले जें ॥ ४९३ ॥

परी ते मनाचा कानी ऐकावें, बोल बुद्धीचां डोळां देखावें।
हे सांटोवाटीं घ्यावें, चित्ताचिया ॥ ४९४ ॥

सांटोवाटीं=मोबदल्यात

अवधानाचेनि हातें, नेयावें हृदयाआंतौते।
हे रिझवितील आयणीतें, सज्जनांचिये ॥ ४९५ ॥

आयणीतें=बुद्धीला  

हे स्वहितातें निवविती, परिणामातें जीवविती।
सुखाची वाहविती, लाखोली जीवां ॥ ४९६ ॥

लाखोली=लक्ष फुले (विपुल)

आतां अर्जुनेंसीं श्रीमुकुंदे, नागर बोलिजेल विनोदें।
तें वोंवियेचेनि प्रबंधें, सांगेन मी ॥ ४९७ ॥

नागर=सुंदर  विनोदें=कौतुके

इति श्रीमद्भगवदगीतासुपनिषत्सु ब्रम्हविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे आत्मसंयम योगो नाम षष्ठोऽध्यायः
॥ ॐ श्रीसच्चिनन्दार्पणमस्तु ॥


http://dnyaneshwariabhyas.blogspot.in/

2 comments: