Sunday, April 3, 2016

ज्ञानेश्वरी अध्याय ६, ओव्या ५२ ते १०४

  

ज्ञानेश्वरी / अध्याय सहावा  ओव्या ५२  ते १०४ 

     
यं संन्यासमिति प्राहुर्योगं तं विध्दि पाण्डव।
     
न ह्यसंन्यस्त्यसंकल्पो योगी भवनि कश्चन ॥ २ ॥

ऐकें संन्यासी आणि योगी, ऐसी एक्यवाक्यतेची जगीं।
गुढी उभविली अनेगीं, शास्त्रांतरी ॥ ५२ ॥

अनेगीं=अनेकांनी

जेथ संन्यासिला संकल्पु तुटे, तेथचि योगाचें सार भेटे।
ऐसें हें अनुभवाचेनि धटें, साचें जया ॥ ५३ ॥

धटें=जाणणे

     
आरुरुक्षोर्मुनेर्योगं कर्म कारणमुच्यते।
     
योगारुढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते ॥ ३ ॥

आतां योगाचळाचा निमथा, जरी ठाकावा आथि पार्था।
तरी सोपाना या कर्मपथा, चुका झणीं ॥ ५४ ॥

योगाचळाचा=योगरुपी  पर्वत निमथा,=शिखर सोपाना=जीना
झणीं=नकोस

येणें यमनियमाचेनि तळवटें, रिगे असनाचिये पाउलवाटें।
येई प्राणायामाचेनि आडकंठें, वरौता गा ॥ ५५ ॥

तळवटें=पायथा रिगे=प्रवेशे आडकंठें=अवघड कडा वरौता=वरची बाजू  

मग प्रत्याहाराचा आधाडा, बुध्दीचियाहि पाया निसरडा।
जेथ हटिये सांडिती होडा, कडेलग ॥ ५६ ॥

आधाडा=तुटका कडा हटिये=हटयोगी होडा=पैजा
कडेलग=कडेलोट

तरी अभ्यासाचेनि बळें, प्रत्याहारीं निराळें ।
नखी लागेल ढाळें ढाळें, वैराग्याची ॥ ५७ ॥

नखी लागेल =नखांच्या मदतीने (वैराग्यरूपी)
ढाळें ढाळें=हळूहळू

ऐसा पवनाचेनि पाठारें, येतां धारणेचेनि पैसारें।
क्रमी ध्यानाचें चवरें, सांडे तंव ॥ ५८ ॥

पाठारें=पाठबळ  पैसारें=रस्ता,(टप्पा) चवरें=टोक, शिखर

मग तया मार्गाची धांव, पुरेल प्रवृत्तीचि हांव।
जेथ साध्यसाधना खेंव, समरसें होय ॥ ५९ ॥
खेंव=मिठी

जेथ पुढील पैस पारुखे, मागील स्मरावें तें ठाके।
ऐसिया सरिसीये भूमिके, समाधी राहे ॥ ६० ॥

पैस=पसारा व्याप

येणें उपायें योगारूढु, जो निरवधि जाहला प्रौढु।
तयाचिया चिन्हांचा निवाडु, सांगेन आइकें ॥ ६१ ॥

निवाडु=खुणा वेगळेपण

     
यदा हि नेन्द्रियार्थेषु न कर्मस्वनुषज्जते।
     
सर्वसंकल्पसंन्यासी योगारुढस्तदोच्यते ॥ ४ ॥

तरी जयाचिया इंद्रियांचिया घरा, नाहीं विषयांचिया येरझारा।
जो आत्मबोधाचिया वोवरां, पहुडला असे ॥ ६२ ॥

वोवरां=खोलीत

जयाचें सुखदुःखाचेनि आंगे, झगटलें मानस चेवो नेघे।
विषय पासींही आलियां से न रिगे, हे काय म्हणउनि ॥ ६३ ॥

चेवो=जाग   से= आठवण पर्वा चिंता

इंद्रियें कर्माच्या ठायी, वाढीनलीं परी कहीं।
फळहेतूची चाड नाहीं, अंतःकरणीं ॥ ६४ ॥

वाढीनलीं=वाढली

असतेनि देहें एतुला, जो चेतुचि दिसे निदेला।
 
तोचि योगारूढु भला, वोळखें तूं ॥ ६५ ॥

तेथ अर्जुन म्हणे अनंता, हें मज विस्मो बहु आइकतां।
सांगे तया ऐसी योग्यता, कवणें दीजे ॥ ६६ ॥

     
उध्दरेदात्मनाऽऽत्मानं नात्मानमवसादयेत।
     
आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनः ॥ ५ ॥

तंव हांसोनि श्रीकृष्ण म्हणे, तुझें नवल ना हें बोलणें।
कवणासि काय दिजेल कवणें, अद्वैतीं इये ॥ ६७ ॥

पै व्यामोहाचिये शेजे, बळिया अविद्या निद्रित होइजे।
ते वेळी दुःस्वप्न हा भोगिजे, जन्ममृत्यूंचा ॥ ६८ ॥

बळिया=आत्मा

पाठीं अवसांत ये चेवो, तैं तें अवघेंचि होय वावो।
ऐसा उपजे नित्य सद्भावो, तोहि आपणपांचि ॥ ६९ ॥

वावो=व्यर्थ

म्हणऊनि आपणचि आपणपेया, घातु कीजतु असे धनंजया।
चित्त देऊनि नाथिलिया, देहाभिमाना ॥ ७० ॥

     
बन्धुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः।
     
अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत ॥ ६ ॥

हा विचारुनि अहंकारु सांडिजे, मग असतीच वस्तु होइजे ।
तरी आपली स्वस्ति सहजें, आपण केली ॥ ७१ ॥

स्वस्ति=भले कल्याण

एऱ्हवीं कोशकीटकाचिया परी, तो आपणया आपण वैरी।
जो आत्मबुध्दी शरीरीं, चारुस्थळी ॥ ७२ ॥

चारुस्थळी=सुंदर जागा-शरीर

कैसे प्राप्तीचिये वेळे, निदैवा अंधळेपणाचे डोहळे।
कीं असते आपुले डोळे, आपण झांकी ॥ ७३ ॥

कां कवणु एकु भ्रमलेपणे, मी तो नव्हे गा चोरलों म्हणे।
ऐसा नाथिला छंद अंतःकरणें, घेऊनि ठाके ॥ ७४ ॥

एऱ्हवीं होय तें तोचि आहे, परि काई कीजे बुध्दी तैशी नोहे।
देखा स्वप्नींचेनि घायें, की मरे साचें ॥ ७५ ॥

घायें=घाव

जैसी ते शुकाचेनि आंगभारें, नळिका भोविन्नली एरी मोहरें ।
तेणें उडावें परी न पुरे, मनशंका ॥ ७६ ॥

भोविन्नली=फिरते

वायांचि मान पिळी, अटुवें हियें आंवळी।
टिटांतु नळी, धरुनि ठाके ॥ ७७ ॥

अटुवें=आटापिट करत संकोचत  हियें=छाती   टिटांतु= चवड्यात
 
म्हणे बांधला मी फुडा, ऐसिया भावनेचिया पडे खोडां।
कीं मोकळिया पायांचा चवडा, गोंवी अधिकें ॥ ७८ ॥

फुडा=नक्की निश्चित

ऐसा काजेंवीण आतुंडला, तो सांग पां काय आणिकें बांधला।
मग न सोडी जऱ्ही नेला, तोडुनि अर्धा ॥ ७९ ॥

म्हणऊनि आपणयां आपणचि रिपु, जेणें वाढविला हा संकल्पु।
येर स्वंयबुध्दी म्हणे बापु, जो नाथिलें नेघे ॥ ८० ॥

स्वंयबुध्दी=जाणता

     
जितात्मनः प्रशान्तस्य परमात्मा समाहितः।
     
शीतोष्णसुखदुःखेषु तथा मानापमानयोः ॥ ७ ॥

तया स्वांतःकरणजिता, सकळकामोपशांता।
परमात्मा परौता, दुरी नाहीं ॥ ८१ ॥

स्वांतःकरणजिता=स्व अंतकरण जिता
सकळकामोपशांता=सकळ काम उपशांत

जैसा किडाळाचा दोषु जाये, तरी पंधरे तेंचि होये।
तैसें जीवा ब्रम्हत्व आहे, संकल्पलोपीं ॥ ८२ ॥

किडाळाचा=किटाळ

हा घटाकारु जैसा, निमालिया तया अवकाशा।
नलगे मिळो जाणें आकाशा, आना ठाया ॥ ८३ ॥

तैसा देहाहंकारु नाथिला, हा समूळ जयाचा नाशिला।
तोचि परमात्मा संचला, आधींचि आहे ॥ ८४ ॥

आतां शीतोष्णाचिया वाहणी, तेथ सुखदुःखाची कडसणीं।
इयें न समाती कांही बोलणीं, मानापमानांची।। ८५ ॥

कडसणीं=निवड  समाती=विचलित करणे

जे जिये वाटा सुर्यु जाये, तेउतें तेजाचें विश्व होये।
तैसे तया पावे तें आहे, तोचि म्हणऊनि ॥ ८६ ॥

देखैं मेघौनि सुटती धारा, तिया न रुपती जैसिया सागरा।
तैशी शुभाशभें योगीश्वरा, नव्हती आनें ॥ ८७ ॥

मेघौनि=मेघातून

     
ज्ञानविज्ञानतृप्तात्मा कूटस्थो विजितेद्रियः।
     
युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकाज्चनः ॥ ८ ॥

जो हा विज्ञानात्मकु भावो, तया विचारितां जाहला वावो।
मग लागला जंव पाहों, तंव ज्ञान तें तोचि ॥ ८८ ॥

विज्ञानात्मकु=अनुभवा येणारे प्रपंच ज्ञान

आतां व्यापकु कीं एकदेशी, हे ऊहापोही जे ऐसी।
ते करावी ठेली आपैशी, दुजेनवीण ॥ ८९ ॥

ऐसा शरीरीचि परी कौतुकें, परब्रह्माचेनि पाडें तुके।
जेणें जिंतलीं एके, इंद्रिये गा ॥ ९० ॥

तो जितेंद्रियु सहजें, तोचि योगयुक्तु म्हणिजे।
जेणें सानें थोर नेणिजे, कवणें काळीं।। ९१ ॥

देखे सोनियाचें निखळ, मेरुयेसणें ढिसाळ।
आणि मातियेचें डिखळ, सरिसेंचि मानी ॥ ९२ ॥

ढिसाळ=मोठे डिखळ=ढेकूळ

पाहता पृथ्वीचें मोल थोडें, ऐसें अनर्घ्य रत्न चोखडें।
देखें दगडाचेनि पाडें, निचाडु ऐसा ॥ ९३ ॥

अनर्घ्य=अनमोल निचाडु=निरिच्छ


     
सुहृन्मित्रार्युदासीनमध्यस्थद्वेष्यबन्धुषु।
     
साधुष्वपि च पापेषु समबुध्दिर्विशिष्यते ॥ ९ ॥

तेथ सुहृद आणि शत्रु, कां उदासु आणि मित्रु।
हा भावभेद विचित्रु, कल्पुं कैंचा ॥ ९४ ॥

तया बंधु कोण काह्याचा, द्वेषिया कवणु तयाचा।
मीचि विश्व ऐसा जयाचा, बोधु जाहला ॥ ९५ ॥

मग तयाचिये दिठी, अधमोत्तम असे किरीटी।
काय परिसाचिये कसवटी, वानिया कीजे ॥ ९६ ॥

वानिया=व्यापारी

ते जैशी निर्वाण वर्णुचि करी, तैशी जयाचि बुध्दी चराचरीं।
होय साम्याची उजरी, निरंतर ॥ ९७॥

निर्वाण =उत्तम दर्जाचा   उजरी=उजेड  

जे ते विश्वाळंकाराचें विसुरे, जरी आहाती आनानें आकारें,
तरी घडले एकचि भांगारें, परब्रह्में ॥ ९८ ॥

विसुरे=विस्तार  

ऐसें जाणणें जें बरवें, ते फावलें तया आघवें।
म्हणौनि आहाचवाहाचें न झकवे, येणे आकारचित्रें ॥ ९९ ॥

आहाचवाहाचें=वरवरच्या

घापे पटामाजी दृष्टी, दिसे तंतूंचि सैंघ सृष्टी।
परी तो एकवांचुनि गोठी, दुजी नाहीं ॥ १०० ॥

घापे=घालता देता सैंघ=खूप सर्व

ऐसेनि प्रतीती हे गवसे, ऐसा अनुभव जयातें असे।
तोचि समबुध्दी हें अनारिसें, नव्हे जाणें ॥ १०१ ॥

जयाचें नांव तीर्थरावो , दर्शनें प्रशस्तीसि ठावो।
जयाचेनि संगें ब्रह्मभावो, भ्रांतासी ॥ १०२ ॥

प्रशस्तीसि=समाधान

जयाचेनि बोलें धर्मु जिये, दिठी महासिध्दितें विये।
देखें स्वर्गसुखादि इयें, खेळु जयाचा ॥ १०३ ॥

विये=उपजवे

विपायें जरी आठवला चित्ता, तरी दे आपुली योग्यता।
हें असो तयातें प्रशंसितां, लाभु आथि ॥ १०४ ॥

6 comments:

  1. उत्तम प्रयत्न आहे.

    ReplyDelete
  2. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
  3. आमचा प्रयत्न कसा आहे ते सांगा....
    श्री अथर्व प्रकाशनची मोबाईल ई-पुस्तके अवघ्या एक रुपयांत उपलब्ध....करा पटपट डाऊनलोड...
    अनुभव ज्ञानेश्वरी
    Anubhav Dnyneshwari
    http://ebooks.newshunt.com/Ebooks/default/Anubhav-Gyaneshvari/b-86947
    कृषि ज्ञानेश्वरी
    http://ebooks.newshunt.com/Ebooks/default/KRUSHI-DNYNESHWARI/b-87084
    इये मराठीचिये नगरी
    http://ebooks.newshunt.com/Ebooks/default/IYE-MARATHICHIYE-NAGARI/b-86983
    रानातल्या गोष्टी
    Ranatalya-goshati
    http://ebooks.newshunt.com/Ebooks/default/Ranatalya-Goshati/b-157541
    संकेतस्थळ
    Mouni Maharaj Guru of Raje Shivaji
    www.freewebs.com/mounimaharaj/
    contact 8237857621
    पुस्तकांच्या छापील प्रतिंसाठी संपर्क ः राजेंद्र कृष्णराव घोरपडे, श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कोल्हापूर 416007
    मोबाईल ः 9011087406

    ReplyDelete
  4. खूप छान आहे.फक्त एक विनंती आहे.जर ओव्यांमध्ये काही शब्द रिपीट झाले तर पुन्हा त्याचा अर्थ दिलेला नसतो.तो पुन्हा पुन्हा द्यायला जमेल का? आणि जर ते जमणार नसेल तर पूर्ण अध्यायातील अवघड शब्दांचे अर्थ अध्यायाच्या शेवटी देता येतील का? मला तुमच्या या ब्लॉगचा खुप आधार मिळतो ज्ञानेश्वरी वाचताना.

    ReplyDelete