Monday, April 18, 2016

ज्ञानेश्वरी अध्याय ७ ओव्या ६८ ते १४६



ज्ञानेश्वरी / अध्याय सातवा/ ज्ञान विज्ञान योग / संत ज्ञानेश्वर महाराज
ओव्या ६८ ते १४६

दैवी ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यया।
मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते ॥ १४ ॥



आतां महदादि हे माझी माया। उतरोनियां धनंजया।
मी होईजे हें आया। कैसेनि ये ? ॥ ६८ ॥

आया=आकलन ग्रहण साध्य
(मायानदी वर्णन सुरु)

जिये ब्रह्माचळाचा आधाडा। पहिलिया संकल्पजळाचा उभडा।
सवेंचि महाभूतांचा बुडबुडा। साना आला ॥ ६९ ॥

आधाडा=तुटका कडा  संकल्पजळाचा =उगमाचे जळ
उभडा= (पाण्याचा) लोट  साना=लहान

जे सृष्टिविस्ताराचेनि वोघें। चढत काळकळनेचेनि वेगें।
प्रवृत्तिनिवृत्तीचीं तुंगें। तटें सांडी ॥ ७० ॥

काळकळनेचेनि=कालगतीच्या तुंगें=उंच 

जे गुणघनाचेनि वृष्टिभरें। भरली मोहाचेनि महापूरें।
घेऊनि जात नगरें। यमनियमांचीं ॥ ७१ ॥

वृष्टिभरें=पावसाने

जे द्वेषाच्या आवर्तीं दाटत। मत्सराचे वळसे पडत।
माजीं प्रमादादि तळपत। महामीन ॥ ७२ ॥

आवर्तीं=भोवरे वळसे=वळण महामीन=मोठे मासे

जेथ प्रपंचाचीं वळणें। कर्माकर्मांचीं वोभाणें।
वरी तरताती वोसाणें। सुखदुःखांचीं ॥ ७३ ॥

वोभाणें=पूर वोसाणें=पाला पाचोळा

रतीचिया बेटा। आदळती कामाचिया लाटा।
जेथ जीवफेन संघटा। सैंघ दिसे ॥ ७४ ॥

संघटा=समुदाय ,पुंजके सैंघ=खूप

अहंकाराचिया चळिया। वरि मदत्रयाचिया उकळिया।
जेथ विषयोर्मीच्या आकळिया। उल्लाळ घेती ॥ ७५ ॥

चळिया=लाटा  उकळिया=उकळी  आकळिया=तरंगा स्वाधीन होवून
उल्लाळ=उसळ्या

उदयास्ताचे लोंढे। पाडीत जन्ममरणाचे चोंढे।
जेथ पांचभौतिक बुडबुडे। होती जाती ॥ ७६ ॥

चोंढे=खड्डे

सम्मोह विभ्रम मासे। गिळिताती धैर्याचीं आविसें।
तेथ देव्हडे भोंवत वळसे। अज्ञानाचे ॥ ७७ ॥

आविसें=आमिष  देव्हडे=वक्रगतीने  

भ्रांतीचेनि खडुळें। रेवले आस्थेचे अवगाळें।
रजोगुणाचेनि खळाळें। स्वर्गु गाजे ॥ ७८ ॥

खडुळें=गढूळ पाणी , अवगाळें =गाळ

तमाचे धारसे वाड। सत्त्वाचें स्थिरपण जाड।
किंबहुना हे दुवाड। मायानदी ॥ ७९ ॥

धारसे=धारा लोट  वाड=मोठी जाड=गंभीर दुवाड=कठीण

पैं पुनरावृत्तीचेनि उभडें। झळंबती सत्यलोकींचे हुडे।
घायें गडबडती धोंडे। ब्रह्मगोळकाचे ॥ ८० ॥

उभडें=लोटांनी  झळंबती=हलणे हादरणे   हुडे=तट  
घायें=आघाते

तया पाणियाचेनि वहिलेपणें। अझुनी न धरिती वोभाणें।
ऐसा मायापूर हा कवणें। तरिजेल गा ? ॥ ८१ ॥

वोभाणें=पूर वेग अझुनी=अजूनही वहिलेपणें=वेगळेपण

येथ एक नवलावो। जो जो कीजे तरणोपावो।
तो तो अपावो। होय तें एक ॥ ८२ ॥

एक स्वयंबुद्धीच्या बाहीं। रिगाले तयांची शुद्धीचि नाहीं।
एक जाणिवेचे डोहीं। गर्वेंचि गिळिले ॥ ८३ ॥

बाहीं=बाहू

एकीं वेदत्रयाचिया सांगडी। घेतल्या अहंभावाचिया धोंडी।
ते मदमीनाच्या तोंडीं। सगळेचि गेले ॥ ८४ ॥

सांगडी=भोपळ्याचा तराव

एकीं वयसेचें जाड बांधले। मग मन्मथाचिये कांसे लागले।
ते विषयमगरीं सांडिले। चघळूनियां ॥ ८५ ॥

वयसेचें=तारुण्य बळ   जाड बांधले =कमर कसून

आतां वार्धक्याच्या तरंगा-, माजीं मतिभ्रंशाचा जरंगा।
तेणें कवळिजताती पैं गा। चहूंकडे ॥ ८६ ॥

जरंगा=जाळे

आणि शोकाचा कडा उपडत। क्रोधाच्या आवर्तीं दाटत।
आपदागिधीं चुंबिजत। उधवला ठायीं ॥ ८७ ॥

कडा =(येथे)काठ  उपडत=आपटत  उधवला=वर आला

मग दुःखाचेनि बरबटें बोंबले। पाठीं मरणाचिये रेवे रेवले।
ऐसे कामाचे कांसे लागले। ते गेले वायां ॥ ८८ ॥

बरबटें=चिखल रेवे=वाळू गाळ

एकीं यजनक्रियेची पेटी। बांधोनि घातली पोटीं।
ते स्वर्गसुखाच्या कपाटीं। शिरकोनि ठेले ॥ ८९ ॥

कपाटीं=कपार खोबणी  

एकीं मोक्षीं लागावयाचिया आशा। केला कर्मबाह्यांचा भरंवसा।
परी ते पडिले वळसां। विधिनिषेधांच्या ॥ ९० ॥

कर्मबाह्यांचा =कर्म बाहूबळ  वळसां=भोवरा

जेथ वैराग्याची नाव न रिगे। विवेकाचा तागा न लगे।
वरि कांहीं तरों ये योगें। तरी विपाय तो ॥ ९१

नाव =होडी   तागा=थांग टिकाव विपाय=विरळा

ऐसें तरी जीवाचिये आंगवणें। इये मायानदीचें तरणें।
हें कासयासारिखें बोलणें। म्हणावें पां ॥ ९२ ॥

आंगवणें=बळाने पां= (ते ऐक)

जरी अपथ्यशीळा व्याधी। कळे साधूसी दुर्जनाची बुद्धी।
कीं रागी सांडी रिद्धी। आली सांती ॥ ९३ ॥

रागी=लोभी    सांती-असता

जरी चोरां सभा दाटे। अथवा मीनां गळु घोटे।
ना तरी भेडा उलटे। विवसी जरी ॥ ९४ ॥

दाटे =घाबरे  भेडा-भित्रा   विवसी-हडळ

पाडस वागुर करांडी। कां मुंगी मेरु वोलांडी।
तरी मायेची पैलथडी। देखती जीव ॥ ९५ ॥

वागुर =जाळे     करांडी=कुरतडी

म्हणौनि गा पंडुसुता। जैसी सकामा न जिणवेचि वनिता।
तेवीं मायामय हे सरिता। न तरवें जीवां ॥ ९६ ॥

जिणवेचि=जिंकवेना

येथ एकचि लीला तरले। जे सर्वभावें मज भजले।
तयां ऐलीच थडी सरलें। मायाजळ ॥ ९७ ॥

जयां सद्गुरुतारूं फुडें। जे अनुभवाचे कांसे गाढे।
जयां आत्मनिवेदन तरांडे। आकळलें ॥ ९८ ॥

कांसे=आधार  तरांडे=तराफा

जे अहंभावाचें वोझें सांडुनी। विकल्पाचिया झुळका चुकाउनी।
अनुरागाचा निरुता होउनि। पाणिढाळु ॥ ९९ ॥

झुळका=धारा  अनुरागाचा =प्रपंच प्रीती
निरुता =स्पष्ट    पाणिढाळु= उतार ओहोटी

जया ऐक्याचिया उतारा। बोधाचा जोडला तारा।
मग निवृत्तीचिया पैल तीरा। झेंपावले जे ॥ १०० ॥

ते उपरतीच्या वांवीं सेलत। सोऽहंभावाचेनि थावें पेलत।
मग निघाले अनकळित। निवृत्तितटीं ॥ १०१ ॥

वांवीं=हात सेलत=पोहत थावें=बळाने धीराने
अनकळित=सहज

येणें उपायें मज भजले। ते हे माझी माया तरले।
परि ऐसे भक्त विपाइले। बहुवस नाहीं ॥ १०२ ॥

विपाइले=विरळा


न मां दुष्कृतिनो मूढाः प्रपद्यन्ते नराधमाः।
माययापहृतज्ञाना आसुरं भावमाश्रिताः ॥ १५ ॥





चतुर्विधा भजन्ते मां जनाः सुकृतिनोऽर्जुन।
आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ ॥ १६ ॥



जे बहुतां एकां अव्हांतरु। अहंकाराचा भूतसंचारु।
जाहला म्हणौनि विसरु। आत्मबोधाचा ॥ १०३ ॥

अव्हांतरु= इतरांना 

ते वेळीं नियमाचें वस्त्र नाठवे। पुढील अधोगतीची लाज नेणवे।
आणि करिताति जें न करावें। वेदु म्हणे ॥ १०४ ॥

पाहें पां शरीराचिया गांवा। जयालागीं आले पांडवा।
तो कार्यार्थु आघवा। सांडूनियां ॥ १०५ ॥

इंद्रियग्रामींचे राजबिदीं। अहंममतेचिया जल्पवादीं।
विकारांतरांचि मांदीं। मेळवूनियां ॥ १०६ ॥

राजबिदीं=राजमार्ग  जल्पवादीं=बडबडी  मांदीं=समूह

दुःखशोकांच्या घाईं। मारिलियाची सेचि नाहीं।
हे सांगावया कारण काई। जे ग्रासिले माया ॥ १०७ ॥

घाईं=घाव सेचि=पर्वा चिंता

म्हणौनि ते मातें चुकले। ऐका चतुर्विध मज भजले।
जिहीं आत्महित केलें। वाढतें गा ॥ १०८ ॥

तो पहिला आर्तु म्हणिजे। दुसरा जिज्ञासु बोलिजे।
तिजा अर्थार्थी जाणिजे। ज्ञानिया चौथा ॥ १०९ ॥



तेषां ज्ञानी नित्ययुक्त एकभक्तिर्विशिष्यते।
प्रियो हि ज्ञानिनोऽत्यर्थमहं स च मम प्रियः ॥ १७ ॥



तेथ आर्तु तो आर्तीचेनि व्याजें। जिज्ञासु तो जाणावयालागीं भजे।
तिजेनि तेणें इच्छिजे। अर्थसिद्धि ॥ ११० ॥

आर्तु =पीडित आर्तीचेनि=दु:खामुळे अर्थसिद्धि=परमार्थ सिद्धी

मग चौथियाच्या ठायीं। कांहींचि करणें नाहीं।
म्हणौनि भक्तु एकु पाहीं। ज्ञानिया जो ॥ १११ ॥

जे तया ज्ञानाचेनि प्रकाशें। फिटलें भेदाभेदांचें कडवसें।
मग मीचि जाहला समरसें। आणि भक्तुही तेवींचि ॥ ११२ ॥

कडवसें=अंधार

परि आणिकांचिये दिठी नावेक। जैसा स्फटिकुचि आभासे उदक।
तैसा ज्ञानी नव्हे कौतुक। सांगतां तो ॥ ११३ ॥

जैसा वारा कां गगनीं विरे। मग वारेपण वेगळें नुरे।
तेवीं भक्त हे पैज न सरे। जरी ऐक्या आला ॥ ११४ ॥

पैज=पण

जरी पवनु हालवूनि पाहिजे। तरी गगनावेगळा देखिजे।
एऱ्हवीं गगन तो सहजें। असे जैसें ॥ ११५ ॥

तैसें शरीरीं हन कर्में। तो भक्तु ऐसा गमे।
परी अंतरप्रतीतिधर्मे। मीचि जाहला ॥ ११६ ॥

आणि ज्ञानाचेनि उजिडलेपणें। मी आत्मा ऐसें तो जाणें।
म्हणौनि मीही तैसेंचि म्हणें। उचंबळला सांता ॥ ११७ ॥

सांता=आनंदाने

हां गा जीवापैलीकडिलीये खुणे। जो पावोनि वावरों जाणें।
तो देहाचेनि वेगळेपणें। काय वेगळा होय ? ॥ ११८ ॥



उदाराः सर्व एवैते ज्ञानी त्वात्मैव मे मतम्।
आस्थितः स हि युक्तात्मा मामेवानुत्तमां गतिम् ॥ १८ ॥



म्हणौनि आपुलाल्या हिताचेनि लोभें। मज आवडे तोहि भक्त झोंबे।
परी मीचि करी वालभें। ऐसा ज्ञानिया एकु ॥ ११९ ॥

आवडे=रुचणे  वालभें=प्रेम

पाहें पां दुभतयाचिया आशा। जगचि धेनूसि करीतसे फांसा।
परि दोरेंवीण कैसा। वत्साचा बळी ॥ १२० ॥

फांसा=बांधतात बळी=बळकट प्रेम

कां जे तनुमनुप्राणें। तें आणिक कांहींचि नेणें।
देखे तयातें म्हणे। हे माय माझी ॥ २१ ॥

तें येणें मानें अनन्यगती। म्हणौनि धेनुही तैसीचि प्रीति।
यालागीं लक्ष्मीपती। बोलिले साचें ॥ १२२ ॥

हें असो मग म्हणितलें। जे कां तुज सांगितलें।
तेही भक्त भले। पढियंते आम्हां ॥ १२३ ॥

पढियंते=प्रिय

परि जाणोनियां मातें। जे पाहों विसरले मागौतें।
जैसें सागरा येऊनि सरितें। मुरडावें ठेलें ॥ १२४ ॥

तैसी अंतःकरणकुहरीं जन्मली। जयाची प्रतीतिगंगा मज मीनली।
तो मी हे काय बोली। फार करूं ? ॥ १२५ ॥

अंतःकरणकुहरीं= अंतःकरण गुहेत

एऱ्हवीं ज्ञानिया जो म्हणिजे। तो चैतन्यचि केवळ माझें।
हें न म्हणावें परि काय कीजे। न बोलणें बोलों ॥ १२६ ॥

 

बहूनां जन्मनामन्ते ज्ञानवान्मां प्रपद्यते।
वासुदेवः सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः ॥ १९ ॥



जे तो विषयांची दाट झाडी-, माजीं कामक्रोधांचीं सांकडीं।
चुकावूनि आला पाडीं। सद्वासनेचिया ॥ १२७ ॥

सांकडीं=संकटे   पाडीं=पहाडी

मग साधुसंगें सुभटा। उजू सत्कर्माचिया वाटा।
अप्रवृत्तीचा अव्हांटा। डावलूनि ॥ १२८ ॥

उजू=सरळ  अव्हांटा=आडवाटा 

आणि जन्मशतांचा वाहतवणा। तेविंची आशेचिया न लेचि वाहणा।
तेथ फलहेतूचा उगाणा। कवणु चाळी ॥ १२९ ॥ 

वाहतवणा=प्रवास   वाहणा=पादत्राण  उगाणा=हिशोब ,गणना

ऐसा शरीरसंयोगाचिये राती-, माजीं धांवतां सडिया आयती।
तंव कर्मक्षयाची पाहाती। पाहांट जाली ॥ १३० ॥

सडिया=एकटा  आयती=तयारी

तैसीच गुरुकृपा उखा उजळली। ज्ञानाची वोतपली पडली।
तेथ साम्याची ऋद्धि उघडली। तयाचिये दिठी ॥ १३१ ॥

उखा=उषा  वोतपली=कोवळे उन ऋद्धि=संपत्ती

ते वेळीं जयाकडे वास पाहे, तेउता मीचि तया एकु आहे।
अथवा निवांत जरी राहे। तऱ्ही मीचि तया ॥ १३२ ॥

हें असो आणिक कांहीं। तया सर्वत्र मीवांचूनि नाहीं।
जैसें सबाह्य जळ डोहीं। बुडालिया घटा ॥ १३३ ॥

तैसा तो मजभीतरीं। मी तया आंतुबाहेरी।
हें सांगिजेल बोलवरी। तैसें नव्हे ॥ १३४ ॥

म्हणौनि असो हें इयापरी। तो देखे ज्ञानाची वाखारी।
तेणें संसरलेनि करी। आपु विश्व ॥ १३५ ॥

वाखारी=वखार साठा 
संसरलेनि= ज्ञानाने व्यवहार करून ,ज्ञानरूप होवून    
आपु=स्वाधीन

हें समस्तही श्रीवासुदेवो। ऐसा प्रतीतिरसाचा वोतला भावो।
म्हणौनि भक्तांमाजीं रावो। आणि ज्ञानिया तोचि ॥ १३६ ॥

जयाचिये प्रतीतीचा वाखारां। पवाडु होय चराचरा।
तो महात्मा धनुर्धरा। दुर्लभु आथी ॥ १३७ ॥

वाखारां=वखार साठा पवाडु=कीर्ती

येर बहुत जोडती किरीटी। जयांचीं भजनें भोगासाठीं।
जे आशातिमिरें दृष्टी। विषयांध जाले ॥ १३८ ॥

 

कामैस्तैस्तैर्हृज्ञानाः प्रपद्यन्तेऽन्यदेवताः।
तं तं नियममास्थाय प्रकृत्या नियताः स्वया ॥ २० ॥



आणि फळाचिया हांवा। हृदयीं कामा जाला रिगावा।
कीं तयाचिये घसणी दिवा। ज्ञानाचा गेला ॥ १३९ ॥

घसणी=संसर्गे ,संकर्पे

ऐसे उभयतां आंधारीं पडले। म्हणौनि पासींचि मातें चुकले।
मग सर्वभावें अनुसरले। देवतांतरां ॥ १४० ॥

आधींच प्रकृतीचे पाइक। वरी भोगालागीं तंव रंक।
मग तेणें लोलुपत्वें कौतुक। कैसेनि भजती ॥ १४१ ॥

रंक=भिकारी

कवणीं तिया नियमबुद्धि। कैसिया हन उपचारसमृद्धि।
कां अर्पण यथाविधि। विहित करणें ॥ १४२ ॥



यो यो यां यां तनुं भक्तः श्रद्धयार्चितुमिच्छति।
तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम् ॥ २१ ॥



पैं जो जिये देवतांतरीं। भजावयाची चाड करी।
तयाची ते चाड पुरी। पुरविता मी ॥ १४३ ॥

देवोदेवीं मीचि पाहीं। हाही निश्चयो त्यासि नाहीं।
भावो ते ते ठायीं। वेगळा धरिती ॥ १४४ ॥



स तया श्रद्धया युक्तस्तस्याराधनमीहते।
लभते च ततः कामान्मयैव विहितान्हि तान् ॥ २२ ॥



मग तिया श्रद्धायुक्त। तेथिंचें आराधन जें उचित।
तें सिद्धिवरी समस्त। वर्तो लागे ॥ १४५ ॥

ऐसें जेणें जें भाविजे। तें फळ तेणें पाविजे।
परी तेंही सकळ निपजे। मजचिस्तव ॥ १४६ ॥

=========================================================================

1 comment: