ज्ञानेश्वरी / अध्याय आठवा /
अक्षरब्रह्मयोग / संत
ज्ञानेश्वर / ओव्या २०४ ते २७१( संपूर्ण )
यत्र काले त्वानावृत्तिमावृत्तिं चैव योगिनः।
प्रयाता यान्ति तं कालं वक्ष्यामि भरतर्षभ ॥ २३॥
तेवींचि आणिकेंही एके प्रकारें, जाणतां आहे सोपारें।
तरि देह सांडितेनि अवसरें, जेथ मिळती योगी ॥ २०४॥
अथवा अवचटें ऐसें घडे, जे अनवसरें देह सांडे।
तरि माघौतें येणें घडे, देहासीचि ॥ २०५॥
म्हणोनि काळशुद्धी जरी देह ठेवीती, तरी ठेवितखेवीं ब्रह्मचि होती।
एऱ्हवीं अकाळीं तरी येती, संसारा पुढती ॥ २०६॥
तैसें सायुज्य आणि पुनरावृत्ति, या दोन्ही अवसराअधीन आहाती।
तो अवसरू तुजप्रती, प्रसंगें सांगों ॥ २०७॥
तरि ऐकें गा सुभटा, पातलिया मरणाचा माजिवटा।
पांचै आपुलालिया वाटा, निघती अंती ॥ २०८॥
प्रयाता यान्ति तं कालं वक्ष्यामि भरतर्षभ ॥ २३॥
तेवींचि आणिकेंही एके प्रकारें, जाणतां आहे सोपारें।
तरि देह सांडितेनि अवसरें, जेथ मिळती योगी ॥ २०४॥
अथवा अवचटें ऐसें घडे, जे अनवसरें देह सांडे।
तरि माघौतें येणें घडे, देहासीचि ॥ २०५॥
म्हणोनि काळशुद्धी जरी देह ठेवीती, तरी ठेवितखेवीं ब्रह्मचि होती।
एऱ्हवीं अकाळीं तरी येती, संसारा पुढती ॥ २०६॥
तैसें सायुज्य आणि पुनरावृत्ति, या दोन्ही अवसराअधीन आहाती।
तो अवसरू तुजप्रती, प्रसंगें सांगों ॥ २०७॥
तरि ऐकें गा सुभटा, पातलिया मरणाचा माजिवटा।
पांचै आपुलालिया वाटा, निघती अंती ॥ २०८॥
माजिवटा=वेग, ग्लानी पांचै=पंचमहाभूते
ऐसा वरिपडिला प्रयाणकाळी, बुद्धीतें भ्रमु न गिळी।
स्मृति नव्हे आंधळी, न मरे मन ॥ २०९॥
वरिपडिला=प्राप्त झाला
हा चेतनावर्गु आघवा, मरणी दिसे टवटवा।
परि अनुभविलिया ब्रह्मभावा, गवसणी होऊनि ॥ २१०॥
गवसणी= आच्छादून, व्यापून
ऐसा सावध हा समवावो, आणि निर्वाणवेऱ्ही निर्वाहो।
हे तरीच घडे जरी सावावो, अग्नीचा आथी ॥ २११॥
समवावो=समुदाय सावावो=सहाय्य
पाहें पां वारेन कां उदकें, जैं दिवियांचें दिवेपण झांके।
तैं असतीच काय देखे, दिठी आपुली ॥ २१२॥
वारेन कां उदकें= पाणी वा वाऱ्याने
तैसें देहांतींचेनि विषमवातें, देह आंतबाहेरि श्लेष्माआतें।
तैं विझोनि जाय उजितें, अग्नीचें तें ॥ २१३॥
श्लेष्माआतें =कफाने उजितें=तेज, दीप्ती
ते वेळीं प्राणासि पाणु नाहीं, तेथ बुद्धि असोनि करील काई।
म्हणोनि अग्नीवीण देहीं, चेतना न थरे ॥ २१४॥
अगा देहींचा अग्नि जरी गेला, तरी देह नव्हे चिखलु वोला।
वायां आयुष्यवेळु आपुला, अंधारे गिंवसी ॥ २१५॥
आयुष्यवेळु=आयुष्याचा वेळ गिंवसी=शोधावा
आणि मागील स्मरण आघवें, तें तेणें अवसरें सांभाळावें।
मग देह त्यजूनि मिळावें, स्वरूपीं कीं ॥ २१६॥
तंव तया देहश्लेष्माचे चिखलीं, चेतनाचि बुडोनि गेली।
तेथ मागिली पुढिली हे ठेली, आठवण ॥ २१७॥
म्हणोनि आधीं अभ्यासु जो केला, तो मरण न येतां निमोनि गेला।
जैसें ठेवणें न दिसतां मालवला, दीपु हातींचा ॥ २१८॥
आतां असो हें सकळ, जाण पां ज्ञानासि अग्नि मूळ।
तया अग्नीचें प्रयाणीं बळ, संपूर्ण आथी ॥ २१९॥
अग्निर्ज्योतिरहः शुक्लः षण्मासा उत्तरायणम्।
तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जनाः ॥ २४॥
आंतु अग्निज्योतीचा प्रकाशु, बाहेरी शुक्लपक्षु आणि दिवसु।
आणि सा मासांमाजीं मासु, उत्तरायण ॥ २२०॥
सा=सहा
ऐशिया समयोगाची निरूती, लाहोनि जे देह ठेविती।
ते परब्रह्मचि होती, ब्रह्मविद ॥ २२१॥
निरूती=अनुकुलता लाहोनि=मिळून
अवधारीं गा धनुर्धरा, येथवरी सामर्थ्य यया अवसरा।
तेवींचि हा उजू मार्ग स्वपुरा, यावया पैं ॥ २२२॥
एथ अग्नि हें पहिलें पायतरें, ज्योतिर्मय हें दुसरें।
दिवस जाणें तिसरें, चौथें शुक्लपक्ष ॥ २२३॥
अवधारीं गा धनुर्धरा, येथवरी सामर्थ्य यया अवसरा।
तेवींचि हा उजू मार्ग स्वपुरा, यावया पैं ॥ २२२॥
एथ अग्नि हें पहिलें पायतरें, ज्योतिर्मय हें दुसरें।
दिवस जाणें तिसरें, चौथें शुक्लपक्ष ॥ २२३॥
पायतरें=पायरी
आणि सामास उत्तरायण, तें वरचील गा सोपान।
येणें सायुज्यसिद्धिसदन, पावती योगी ॥ २२४॥
सोपान=पायरी
हा उत्तम काळु जाणिजे, यातें अर्चिरादि मार्गु म्हणिजे।
आतां अकाळु तोही सहजें, सांगेन आईक ॥ २२५॥
अर्चिरा=प्रकाशमय मार्ग ,देवयान पंथ
धूमो रात्रिस्तथा कृष्णः षण्मासा दक्षिणायनम्।
तत्र चान्द्रमसं ज्योतिर्योती प्राप्य निवर्तते ॥ २५॥
तरि प्रयाणाचिया अवसरें, वात श्लेष्मां सुभरे ।
तेणें अंतःकरणीं आंधारें, कोंदले ठाके ॥ २२६ ॥
सुभरे=गच्च भरे दाट होणे
सर्वेंद्रियां लांकुड पडे, स्मृती भ्रमामाजीं बुडे।
मन होय वेडें, कोंडे प्राण ॥ २२७॥
लांकुड=ताठ होणे
अग्नीचें अग्निपण जाये, मग तो धूमचि अवघा होये।
तेणें चेतना गिंवसिली ठाये, शरीरींची ॥ २२८॥
गिंवसिली=झाकणे जाणे ,गुंतणे शरीरींची=शरीरातच
जैसें चंद्राआड आभाळ, सदट दाटे सजळ।
मग गडद ना उजाळ, ऐसें झांवळें होये ॥ २२९॥
कां मरे ना सावध, ऐसें जीवितासि पडे स्तब्ध।
आयुष्य मरणाची मर्याद-, वेळु ठाकी ॥ २३०॥
ऐसी मनबुद्धिकरणीं, सभोंवतीं धूमाकुळाची कोंडणी।
तेथ जन्में जोडलिये वाहणी, युगचि बुडे ॥ २३१।।
वाहणी=पद्धती(अभ्यास)
हां गा हातींचें जे वेळीं जाये, ते वेळीं आणिका लाभाची गोठी कें आहे।
म्हणऊनि प्रयाणीं तंव होये, येतुली दशा ॥ २३२॥
ऐसी देहाआंतु स्थिति, बाहेरि कृष्णपक्षु वरि राती।
आणि सा मासही वोडवती, दक्षिणायन ॥ २३३॥
इये पुनरावृतीचीं घराणीं, आघवीं एकवटती जयाचिया प्रयाणीं।
तो स्वरूपसिद्धीची काहाणी, कैसेनि आइके ॥ २३४॥
ऐसा जयाचा देह पडे, तया योगी म्हणोनि चंद्रवरी जाणें घडे।
मग तेथूनि मागुता बहुडे, संसारा ये ॥ २३५ ॥
बहुडे=फिरतो
आम्हीं अकाळ जो पांडवा, म्हणितला तो हा जाणावा।
आणि हाचि धूम्रमार्ग गांवा, पुनरावृत्तीचिया ॥ २३६॥
येर तो अर्चिरादि मार्गु, तो वसता आणि असलगु।
साविया स्वस्थु चांगु, निवृतीवरी ॥ २३७॥
वसता =रुळला ,वस्ती असलेला असलगु=सोपा निवृतीवरी=मोक्ष दायी
शुक्लकृष्णे गती ह्येते जगतः शाश्वते मते।
एकया यात्यनावृत्तिमन्यया वर्तते पुनः ॥ २६॥
ऐशिया अनादि या दोन्ही वाटा, एकी उजू एकी अव्हांटा।
म्हणवूनि बुद्धिपूर्वक सुभटा, दाविलिया तुज ॥ २३८॥
कां जे मार्गामार्ग देखावे, साच लटिकें वोळखावें।
हिताहित जाणावें, हिताचिलागीं ॥ २३९।।
पाहे पां नाव देखतां बरवी, कोणी आड घाली काय अथावीं।
कां सुपंथ जाणोनियां अडवीं, रिगवत असे।। २४०॥
आड =उडी अथावीं =महासागरी अडवीं=रानात
जो विष अमृत वोळखे, तो अमृत काय सांडू शके।
तेविं जो उजू वाट देखे, तो अव्हांटा न वचे ॥ २४१॥
म्हणोनि फुडें, पारखावें खरें कुडें।
पारखिलें तरे न पडे, अवसरें कहीं ॥ २४२॥
कुडें=खोटे
एऱ्हवीं देहांतीं थोर विषम, या मार्गाचें आहे संभ्रम।
जन्में अभ्यासिलियाचें हन काम, जाईल वायां ॥ २४३॥
थोर विषम=चांगली वाईट हन=खरोखर
जरी अर्चिरादि मार्गु चुकलियां, अवचटें धूम्रपंथें पडिलियां।
तरी संसारपांतीं जुंतलियां, भंवतचि असावें ॥ २४४॥
जुंतलियां=जुंपलीया भंवतचि=फिरत
हे सायास देखोनि मोठे, आतां कैसेनि पां एकवेळ फिटे।
म्हणोनि योगमार्गु गोमटे, शोधिले दोन्ही ॥ २४५॥
तंव एकें बह्मत्वा जाइजे, आणि एकें पुनरावृत्ते येइजे।
परि दैवगत्या जो लाहिजे, देहांतीं जेणें ॥ २४६॥
नैते सृती पार्थ जानन् योगी मुह्याति कश्चने।
तस्मात्सर्वेषु कालेषु योगसुक्तो भवार्जुन ॥ २७॥
ते वेळी म्हणितलें हें नव्हे, वायां अवचटें काय पावे।
देह त्यजुनि वस्तु होआवें, मार्गेचि कीं ॥ २४७॥
तरी आतां देह असो अथवा जावो, आम्ही तों केवळ वस्तूचि आहों।
कां जे दोरीं सर्पत्व वावो, दोराचिकडुनी ॥ २४८॥
मज तरंगपण असे कीं नसे, ऐसें हें उदकासी कहीं प्रतिभासे।
तें भलतेव्हां जैसें तैसें, उदकचि कीं ॥ २४९॥
तरंगाकारें न जन्मेचि, ना तरंगलोपें न निमेचि।
ते विदेही जे देहेंचि, वस्तु जाहले ॥ २५०॥
आतां शरीराचें तयाचिया ठाईं, आडनांवही उरलें नाहीं।
तरि कोणें काळें काई, निमे तें पाहें पां ॥ २५१॥
मग मार्गातें कासया शोधावें, कोणें कोठूनि कें जावें।
जरी देशकालादि आघवें, आपणचि असे ॥ २५२॥
आणि हां गा घटु जे वेळीं फुटे, ते वेळीं तेथींचें आकाश लागे नीटे वाटे।
वाटा लागे तरि गगना भेटे, एऱ्हवीं काय चुके ॥ २५३॥
पाहें पां ऐसें हन आहे, कीं तो आकारूचि जाये।
येर गगन तें गगनींचि आहे, घटत्वाहि आधीं ॥ २५४॥
ऐसिया बोधाचेनि सुरवाडें, मार्गामार्गाचें सांकडें।
तया सोऽहंसिद्धा न पडे, योगियांसी ॥ २५५॥
सुरवाडें = सुखाने सांकडें=संकट
याकारणें पांडुसुता, तुवां होआवे योगयुक्ता।
येतुलेनि सर्वकाळीं साम्यता, आपणपां होईल ॥ २५६॥
मग भलतेथ भलतेंव्हा, देहबंध असो अथवा जावा।
परि अबंधा नित्य ब्रह्मभावा, विघड नाहीं ॥ २५७॥
अबंधा=अनिर्बंध विघड=बिघाड
तो कल्पादि जन्मा नागवे, कल्पांतीं मरणें नाप्लवे।
माजीं स्वर्गसंसाराचेनि लाघवें, झकवेना ॥ २५८॥
नाप्लवे=न बुडणे लाघवें=गोडी चलाखी झकवेना =फसणे
येणें बोधें जो योगी होये, तयासीचि या बोधाचें नीटपण आहे।
कां जे भोगातें पेलूनि पाहें, निजरूपा ये ॥ २५९॥
पैं गा इंद्रादिकां देवां, जयां सर्वस्वें गाजती राणिवा।
तें सांडणें मानूनि पांडवा, डावली जो ॥ २६०॥
राणिवा=राजभोग
वेदेषु यज्ञेषु तपःसु चैव दानेषु यत्पुण्यफलं प्रदिष्टम्।
अत्येति तत्सर्वमिदं विदेत्वा योगी परं स्थानमुपैति चाद्यम् ॥ २८॥
जरी वेदाध्ययनाचे जालें, अथवा यज्ञाचें शेतचि पिकलें।
कीं तपोदानांचें जोडलें, सर्वस्व हन जें ॥ २६१॥
तया आघवां पुण्याचा मळा, भार आंतौनि जया ये फळा।
तें परब्रह्मा निर्मळा, सांटी न सरे ॥ २६२॥
सांटी=तुलना
जें नित्यानंदाचेनि मानें, उपमेचा कांटाळां न दिसे सानें।
पाहा पां वेदयज्ञादि साधनें, जया सुखा ॥ २६३॥
कांटाळां=तुलनेत
जें विटे ना सरे, भोगितयाचेनि पवाडें पुरे।
पुढती महासुखाचें सोयरें, भावंडचि ॥ २६४॥
पवाडें=इच्छा
ऐसें दृष्टीचेनि सुखपणें, जयासी अदृष्टाचें बैसणें।
जें शतमखाही आंगवणें, नोहेचि एका ॥ २६५॥
अदृष्टाचें =पूर्व जन्माचे पुण्य (प्रारब्ध )
आंगवणें=स्वाधीन ,भेटणे
तयातें योगीश्वर अलौकिकें, दिठीचेनि हाततुकें।
अनुमानती कौतुकें, तंव हळुवार आवडे ॥ २६६॥
हाततुकें=हाताने तोलून हळुवार=हळुवट (पा,भे,_) =हलके,गौण
मग तया सुखाची किरीटी, करुनियां गा पाउटी।
परब्रह्मचिये पाटीं, आरूढती ॥ २६७॥
पाउटी=पायरी पाटीं=पा.भे.पाठी, पदी
ऐसें चराचरैकभाग्य, जें ब्रह्मेशां आराधनेयोग्य।
योगियांचे भोग्य-, भोगधन जें ॥ २६८॥
ब्रह्मेशां=ब्रह्मा+महेश
जो सकळ कळांची कळा, जो परमानंदाचा पुतळा।
तो जिवाचा जिव्हाळा, विश्वाचिया ॥ २६९॥
जो सवर्ज्ञतेचा वोलावा, जो यादवकुळींचा कुळदिवा।
तो श्रीकृष्णजी पांडवा-, प्रति बोलिला ॥ २७०॥
ऐसा कुरुक्षेत्रींचा वृत्तांतु, संजयो रायासी असे सांगतु।
तेचि परियेसा पुढां मातु, ज्ञानदेव म्हणे ॥ २७१॥
॥ आठवा अध्याय
समाप्त ॥
सुंदर !
ReplyDelete