Saturday, April 2, 2016

ज्ञानेश्वरी अध्याय ६ , ओव्या १ ते ५१



ज्ञानेश्वरी / अध्याय सहावा / संत ज्ञानेश्वर ओव्या १ ते ५१

मग रायातें म्हणे संजयो, तोचि अभिप्रावो अवधारिजो।
कृष्ण सागंती जो, योगरुप ॥ १॥

अभिप्रावो=आशय

सहजें ब्रह्मरसाचें पारणें, केलें अर्जुनालागीं नारायणें।
की तेचि अवसरी पाहुणे, पातलों आम्ही ॥ २॥

पारणें=उपवास सोडणे

कैसी दैवाची थोरी नेणिजे, जैसें तान्हेलिया तोय सेविजे।
कीं तेंचि चवी करुनि पाहिजे, तंव अमृत आहे ॥ ३॥

तोय=पाणी

तैसे आम्हां तुम्हां जाहले, जें आडमुठी तत्व फावलें।
तंव धृतराष्ट्रे म्हणितलें, हें न पुसों तूंते ॥ ४॥

आडमुठी=अचानक, संभव नसतांना

तया संजया येणें बोलें, रायाचें हृदय चोजवलें ।
जें अवसरीं आहे घेतलें, कुमारांचिया ॥ ५ ॥

चोजवलें=व्यापले    अवसरीं=वेळी

हें जाणोनि मनीं हांसिला, म्हणे म्हातारा मोहें नाशिला।
एऱ्हवीं बोलु तरी भला जाहला, अवसरीं ये ॥ ६ ॥
भला = चांगला थोर

परि तैं तैसें कैसेनि होईल, जात्यंधा कैसें पाहेल।
तेवींचि येरु से घेईल, म्हणौनि बिहे ॥ ७ ॥

से घेईल= रागावेल

परि आपण चित्तीं आपुलां, निकियापरि संतोषला।
जे तो संवादु फावला, कृष्णार्जुनांचा ॥ ८ ॥

निकियापरि=चांगला

तेणें आनंदाचेनि धालेपणें, साभिप्राय अंतःकरणें।
आतां आदरेंसी बोलणें, घडेल तया ॥ ९॥

तो गीतेमाजी षष्ठींचा, प्रसंगु असे आयणीचा।
जैसा क्षीरार्णवीं अमृताचा, निवाडु जाहला ॥ १० ॥

आयणीचा= चातुर्याचा ,युक्तीचा ,बुद्धीचा
निवाडु=निवडणे वेगळे करणे

तैसें गीतार्थाचें सार, जे विवेकसिंधूचे पार।
नाना योगविभवभांडार, उघडलें कां ॥ ११ ॥

योगविभव= योग वैभव

जें आदिप्रकृतीचें विसवणें, जे शब्दब्रह्मासि न बोलणें।
जेथूनि गीतावल्लीचें ठाणें, प्ररोहो पावे ॥ १२ ॥

विसवणें=विसावणे  शब्दब्रह्मासि=वेद
प्ररोहो=विस्तार

तो अध्याय हा सहावा, वरि साहित्याचिया बरवा।
सांगिजैल म्हणौनि परिसावा, चित्त देउनी ॥ १३ ॥

माझा मराठाचि बोलु कौतुकें, परि अमृतातेहीं पैजासीं जिंके।
ऐसीं अक्षरें रसिकें, मेळवीन ॥ १४ ॥

जिये कोंवळिकेचेनि पाडें, दिसती नादींचे रंग थोडे।
वेधें परिमळाचें बीक मोडे, जयाचेनि ॥ १५ ॥

पाडें=पुढे वेधें=आकर्षण ओढीने बीक =बळ  नादींचे=नादब्रह्म तरंग (संगीत )

ऐका रसाळपणाचिया लोभा, कीं श्रवणींचि होति जिभा।
बोले इंद्रियां लागे कळंभा , एकमेकां ॥ १६ ॥

कळंभा=भांडण

सहजें शब्दु तरि विषो श्रवणाचा, परि रसना म्हणे हा रसु आमुचा,
घ्राणासि भावो जाय परिमळाचा, हा तोचि होईल ॥ १७ ॥

नवल बोलतीये रेखेची वाहणी, देखतां डोळ्यांही पुरों लागे धणी।
ते म्हणती उघडली खाणी, रुपाची हे ॥ १८ ॥

धणी =संतुष्ट   रेखेची=शब्दचित्र    वाहणी=ओघ

जेथ संपूर्ण पद उभारे, तेथ मनचि धांवे बाहिरें ।
बोलु भुजाहि आविष्करें, आलिंगावया ॥ १९ ॥

ऐशी इंद्रिये आपुललिया भावीं, झोंबती परि तो सरिसेपणेंचि बुझावी,
जैसा एकला जग चेववी, सहस्त्रकरु ॥ २० ॥

बुझावी=संतुष्ट करी

तैसें शब्दाचें व्यापकपण, देखिजे असाधारण।
पाहातयां भावज्ञां फावती गुण, चिंतामणीचे ॥ २१ ॥

भावज्ञां = भावार्थ कळला त्यास, गुणज्ञ

हें असोतु या बोलाचीं ताटें भलीं, वरी कैवल्यरसें वोगरिलीं।
ही प्रतिपत्ति मियां केली, निष्कामासी ॥ २२ ॥

प्रतिपत्ति=जेवण मेजवानी, कार्यारंभ

आता आत्मप्रभा नीच नवी, तेचि करुनी ठाणदिवी।
जो इंद्रियांतें चोरुनि जेवी, तयासीचि फावे ॥ २३ ॥

ठाणदिवी=समई चोरुनि = ताब्यात ठेवून

येथ श्रवणाचेनि पांगे-, वीण श्रोतयां होआवें लागे।
हे मनाचेनि निजांगें, भोगिजे गा ॥ २४ ॥

पांगे=आश्रये

आहाच बोलाचि वालीफ फेडिजे, आणि ब्रह्माचियाचि आंगा घडिजे,
मग सुखेंसी सुरवाडिजे, सुखाचिमाजीं ॥ २५ ॥

आहाच=वरवरच्या वालीफ=टरफल

ऐसें हळुवारपण जरी येईल, तरीच हें उपेगा जाइल।
एरव्हीं आघवी गोठी होईल, मुकिया बहिरयाची ॥ २६ ॥

परी तें असो आतां आघवें, नलगे श्रोतयांते कडसावें।
जे एथ अधिकारिये स्वभावें, निष्कामकामु ॥ २७ ॥

कडसावें=कस पाहावा

जिहीं आत्मबोधाचिया आवडी, केली स्वर्गसंसाराचि कुरोंडी।
ते वांचुनी एथींची गोडी, नेणती आणिक ॥ २८ ॥

कुरोंडी=ओवाळणे

जैसा वायसीं चंद्र नोळखिजे, तैसा ग्रंथु हा प्राकृतीं नेणिजे।
आणि तो हिमांशुचि जेवि खाजें, चकोराचें ॥ २९ ॥

वायसीं=कावळा प्राकृतीं=सामान्य हिमांशुचि=चंद्रप्रकाश खाजें=भोजन

तैसा सज्ञानासी तरी हा ठावो, अज्ञानासी आन गांवो।
म्हणौनि बोलावया विषय पहाहो, विशेषें नाहीं ॥ ३० ॥

परी अनुवादलो मी प्रसंगे, तें सज्जनी उपसाहावें लागे।
आतां सांगेन काय श्रीरंगे, निरोपिलें जें ॥ ३१ ॥

उपसाहावें= क्षमा करणे

ते बुध्दीही आकळितां सांकडें, म्हणऊनि बोलीं विपायें सांपडे।
परि निवृत्तिकृपादीपउजियेडें, देखेन मी ॥ ३२ ॥

सांकडें=कठीण विपायें=संकटी पेचात उजियेडें=प्रकाशात

जें दिठीही न पविजे, तें दिठीविण देखिजे।
जरी अतींद्रिय लाहिजे, ज्ञानबळ ॥ ३३ ॥

ना तरी जें धातुवादाही न जोडे, तें लोहींचि पंधरें सापडे।
जरी दैवयोगें चढे, परिसु हातां ॥ ३४ ॥

धातुवादाही=किमयागार पंधरें=सोने

तैसी सद्गुरुकृपा होये, तरी करितां काय आपु नोहे।
म्हणौनि तें अपार मातें आहे, ज्ञानदेवो म्हणे ॥ ३५ ॥
आपु=स्वाधीन

तेणें कारणें मी बोलेन, बोली अरुपाचे रुप दावीन।
अतींद्रिय परि भोगवीन, इंद्रियांकरवीं ॥ ३६ ॥

आइका यश श्री औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य।
हे साही गुणवर्य, वसती जेथ ॥ ३७ ॥

म्हणोनि तो भगवंतु, जो निःसंगाचा सांगातु।
तो म्हणे पार्था दत्तचित्तु, होई आतां ॥ ३८ ॥


     
श्रीभगवानुवाचः अनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः।
     
स संन्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रियः ॥ १ ॥

आइकें योगी आणि संन्यासी जनीं, हे एकचि सिनानें झणीं मानी,
एऱ्हवी विचारिजती जंव दोन्ही, तंव एकचि ते ॥ ३९ ॥

सिनानें=वेगळे झणीं=नको

सांडिजे दुजया नामाचा आभासु, तरी योगी तोचि संन्यासु।
पहातां ब्रह्मीं नाही अवकाशु, दोहींमाजीं ॥ ४० ॥

अवकाशु=फरक

जैसें नामाचेनि अनारिसपणें, एका पुरुषाते बोलावणें।
कां दोहीं मार्गीं जाणें, एकचि ठाया ॥ ४१ ॥

अनारिसपणें=वेगळेपण

नातरी एकचि उदक सहजें, परी सिनानां घटीं भरिजें।
तैसें भिन्नत्व जाणिजे, योगसंन्यासांचें ॥ ४२ ॥

सिनानां=वेगळ्या अलग

आइकें सकळ संमते जगीं, अर्जुना गा तोचि योगी।
जो कर्में करुनि रागी, नोहेचि फळीं ॥ ४३ ॥

रागी=अपेक्षिजे  

जैसी मही हे उद्भिजें, जनी अहंबुध्दीवीण सहजें।
आणि तेथींची तियें बीजें, अपेक्षीना ॥ ४४ ॥

मही=पृथ्वी उद्भिजें=उपजवे जनी=जगी

तैसा अन्वयाचेनि आधारें, जातीचेनि अनुकारें।
जें जेणें अवसरें, करणें पावे ॥ ४५ ॥

अन्वयाचेनि=शास्त्र

तें तैसेंचि उचित करी, परी साटोपु नोहे शरीरीं।
आणि बुध्दीही करोनि फळवेरीं, जायेचिना ॥ ४६ ॥

साटोपु=अहंकार

ऐसा तोचि संन्यासी, पार्था गा परियेसीं।
तोचि भरंवसेनिसीं, योगीश्वरु ॥ ४७ ॥

वांचूनि उचित कर्म प्रासंगिक, तयातें म्हणे हे सांडीन बध्दक।
तरी टांकोटांकी आणिक, मांडिचि तो ॥ ४८ ॥

जैसा क्षाळुनियां लेपु एकु, सवेंचि लाविजे आणिकु।
तैसेनि आग्रहाचा पाइकु, विचंबे वायां ॥ ४९ ॥

क्षाळुनियां=धुवून विचंबे =सायास करी

गृहस्थाश्रमाचें वोझें, कपाळी आधींच आहे सहजें।
की तेंचि संन्याससवा ठेविजे, सरिसें पुढती ॥ ५० ॥

म्हणौनि अग्निसेवा न सांडितां, कर्माची रेखा नोलांडितां।
आहे योगसुख स्वभावता, आपणापांचि ॥ ५१ ॥



==================================================

2 comments: