ज्ञानेश्वरी
/ अध्याय ८ वा / ओव्या १०० ते १५१/ अक्षरब्रह्मयोग
यदक्षरं वेदविदो वदन्ति विशन्ति यद्यतयो वीतरागाः।
यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति यत्ते पदं संग्रहेण प्रवक्ष्ये ॥ ११॥
सकळां जाणणेयां जे लाणी, तिये जाणिवेची जे खाणी।
तयां ज्ञानियांचिये आयणी, जयातें अक्षर म्हणिपे ॥ १००॥
लाणी=शेवट आयणी=बुद्धी
चंडवातेंही न मोडे, तें गगनचि कीं फुडें।
वांचूनि जरे होईल मेहुडें, तरी उरेल कैंचे ॥ १०१॥
चंडवातेंही =महावादळ फुडें=खरोखर मेहुडें=मेहुडे
वांचूनि=अन्यथा
तेविं जाणणेया जें आकळिलें, तें जाणवलेपणेंचि उमाणलें।
मग नेणवेचि तया म्हणितलें, अक्षर सहजें ॥ १०२॥
जाणणेया=बुद्धीला जे कळले
जाणवलेपणेंचि = जाणल्यामुळे उमाणलें=मोजले गेले
(ते क्षर )
नेणवेचि=त्याउलट जे कधीच कळत नाही
(ते अक्षर )
म्हणोनि वेदविद नर, म्हणती जयातें अक्षर।
जें प्रकृतीसी पर, परमात्मरूप।। १०३॥
वेदविद=वेद जाणणारे
आणि विषयांचें विष उलंडूनि, जे सर्वेंद्रियां प्रायश्चित देऊनि।
आहाति देहाचिया बैसोनि, झाडातळी ॥ १०४॥
ते यापरी विरक्त, जयाची निरंतर वाट पाहात।
निष्कामासि अभिप्रेत, सर्वदा जें ॥ १०५॥
अभिप्रेत=हवेसे
जयाचिया आवडी, न गणिती ब्रह्मचर्यादि सांकडी।
निष्ठुर होऊनि बापुडी, इंद्रिये करिती ॥ १०६॥
सांकडी=संकट बापुडी=लीन
ऐसें जें पद, दुर्लभ आणि अगाध।
जयाचिये थडिये वेद, चुबुकळिले ठेले ॥ १०७॥
चुबुकळिले=गटांगळ्या खाती
तें तें पुरूष होती, जे यापरी लया जाती।
तरी पार्था हेचि स्थिती, एक वेळ सांगो ॥ १०८॥
तेथ अर्जुनें म्हणितलें स्वामी, हेंचि म्हणावया होतों पां मी।
तंव सहजें कृपा केली तुम्ही, तरी बोलिजो कां ॥ १०९॥
परि बोलावें तें अति सोहोपें, तेथें म्हणितलें त्रिभुवनदीपें।
तुज काय नेणों संक्षेपें, सांगेन ऐक ॥ ११०॥
तरी मना या बाहेरिलीकडे, यावयाची साविया सवे मोडे।
हें हृदयाचिया डोहीं बुडे, तैसें कीजे ॥ १११॥
साविया=सहज सवे=सवय
सर्वद्वाराणि संयम्य मनो हृदि निरूध्य च।
मूर्ध्न्याधायात्मनः प्राणमास्थितो योगधारणाम् ॥ १२॥
परी हें तरीच घडे, जरी संयमाची अखंडें।
सर्वद्वारी कवाडें, कळासती ॥ ११२॥
बंद करून
तरी सहजें मन कोंडलें, हृदयींचि असेल उगलें।
जैसें करचरणीं मोडलें, परिवरू न संडी ॥ ११३॥
उगलें=उगा
तैसें चित्त राहिल्या पांडवा, प्राणाचा प्रणवुचि करावा।
मग अनुवृत्तिपंथें आणावा, मूर्ध्निवरी ॥११४॥
अनुवृत्तिपंथें=सुषुम्नानाडी मार्गे
तेथ आकाशीं मिळे न मिळे , तैसा धरावा धारणाबळें।
जंव मात्रात्रय मावळे, अर्धबिंबीं ॥ ११५॥
मात्रात्रय=अ ऊ म आकाशीं=शून्यी
तंववरी तो समीरु, निराळी कीजे स्थिरू।
मग लग्नीं जेविं ॐकारू, बिंबींच विलसे ॥ ११६॥
समीरु= प्राणवायू निराळी =वेगळा लग्नीं=एकरूप होता (शून्यात )
ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन्मामनुस्मरन्।
यः प्रयाति त्यजन्देहं स याति परमां गतिम् ॥ १३॥
तैसें ॐ हें स्मरों सरे, आणि तेथेंचि प्राणु पुरे।
मग प्रणवांतीं उरे, पूर्णघन जें ॥ ११७॥
पूर्णघन=परब्रह्म, महाशुन्य, समग्र
म्हणोनि प्रणवैकनाम, हें एकाक्षर ब्रह्म।
जो माझें स्वरूप परम, स्मरतसांता ॥१ १८॥
सांता=असता
यापरी त्यजी देहातें, तो त्रिशुद्धी पावे मातें।
जया पावनया परौतें, आणिक पावणें नाहीं ॥ ११९॥
पावनय=परमपावन
तेथे अर्जुना जरी विपायें, तुझ्या जीवीं हन ऐसें जाये।
ना हें स्मरण मग होये, कायसयावरी अंती ॥ १२०॥
इंद्रियां अनुघडु पडलिया, जीवितचें सुख बुडालिया।
आंतुबाहेरी उघडलिया, मृत्युचिन्हें ॥ १२१॥
अनुघडु=अवरोध असमर्थ
ते वेळीं बैसवेंचि कवणें, मग कवण निरोधी करणें।
तेथे काह्याचेनि अंतकःरणें, प्रणव स्मरावा ॥ १२२॥
तरि गा ऐशिया ध्वनी, झणें थारा देशी हो मनीं।
पैं नित्य सेविला मी निदानीं, सेवकु होयें ॥ १२३॥
ध्वनी =आशंका झणें=नको
अनन्यचेताः सततं यो मां स्मरति नित्यशः।
तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः ॥ १४॥
मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयमशाश्वतम्।
नाप्नुवंति महात्मानः संसिद्धिं परमां गताः ॥ १५ ॥
जे विषयांसि तीळांजळी देऊनी, प्रवृत्तीवरी निगड वाउनी।
मातें हृदयीं सूनी, भोगताती ॥ १२४॥
निगड=बंधन बेडी वाउनी=घालून सूनी=ठेवून (शिरवुन)
परि भोगितया आराणुका, भेटणें नाहीं क्षुधादिकां।
तेथ चक्षुरादि रंकां, कवण पाडु ॥ १२५॥
आराणुका=समाधान
ऐसे निरंतर एकवटले, जे अंतःकरणी मजशीं लिगटले।
मीचि होऊनि आटले, उपासैती ॥ १२६॥
लिगटले=लगटले
तयां देहावसान जैं पावे, तैं तिहीं मातें स्मरावें।
मग म्यां जरी पावावें, तरि उपास्ति ते कायसी ॥ १२७॥
उपास्ति=उपासना
पैं रंकु एक आडलेपणें, काकुळती अंती धांवा गा धांवा म्हणे।
तरि तयाचिये ग्लानी धांवणे, काय न घडे मज ॥ १२८॥
रंकु=दरिद्री
आणि भक्तांही तेचि दशा, तरी भक्तीचा सोसु कायसा।
म्हणऊनि हा ध्वनी ऐसा, न वाखाणावा ॥ १२९॥
ध्वनी =शंका वाखाणावा=महत्व वा थारा देणे
तिहीं जे वेळीं मी स्मरावा, ते वेळीं स्मरला कीं पावावा।
तो आभारूही जीवा, साहवेचि ना ॥ १३०॥
आभारूही=उपकार ओझे
तें ऋणवैपण देखोनि आंगी, मी आपुलियाचि उत्तीर्णत्वालागीं।
भक्तांचिया तनुत्यागीं, परिचर्या करीं ॥ १३१॥
उत्तीर्णत्वालागीं=देणे लागतो म्हणून उतराई होण्यासाठी
परिचर्या=सेवा
देहवैकल्याचा वारा, झणें लागेल या सकुमारां।
म्हणोनि आत्मबोधाचे पांजिरां, सूयें तयांतें ॥ १३२॥
देह वैकल्याचा=व्याकुळता पांजिरां=पिंजरा सूयें=देणे, ठेवणे
वरि आपुलिया स्मरणाची उवाइली, हींवाऐसी करीं साउली।
ऐसेनि नित्य बुद्धि संचली, मी आणीं तयांतें ॥ १३३॥
उवाइली=पसरली (आनंददायी ) हींवाऐसी=थंडगार
संचली=स्थिर
म्हणोनि देहांतींचें सांकडें, माझियां कहींचि न पडे।
मी आपुलियांतें आपुलीकडे, सुखेंचि आणीं ॥ १३४॥
सांकडें=संकट माझियां=माझा त्याला
वरचील देहाची गंवसणी फेडुनी, आहाच अहंकाराचे रज झाडुनी।
शुद्ध वासना निवडुनी, आपणापां मेळवी ॥ १३५॥
गंवसणी=आवरण कपडे आहाच =वरवरचे
आणि भक्तां तरी देहीं, विशेष एकवंकीचा ठाव नाहीं।
म्हणऊनि अव्हेरू करितां कांही, वियोग ऐसा न वाटे ॥ १३६॥
एकवंकीचा=ऐक्यता देह तादात्मता
ना तरी देहांतींचि मियां यावें, मग आपणपें यांतें न्यावें।
हेंही नाहीं जे स्वभावें, ते आधींचि मज मीनले ॥ १३७॥
मीनले=एकरूप झाले
येरी शरीराचिया सलिलीं, असतेपण हे साउली।
वांचूनि चंद्रिका ते ठेली, चंद्रींचि आहे।। १३८॥
साउली=छाया
ऐसे जे नित्ययुक्त, तयांसि सुलभ मी सतत।
म्हणाऊनि देहांतीं निश्चित, मीचि होती ॥ १३९॥
मग क्लेशतरूची वाडी, जे तापत्रयाग्नीची सगडी।
जे मृत्युकाकासि कुरोंडी, सांडिली आहे ॥ १४०॥
सगडी=शेगडी कुरोंडी=वोवाळून टाकलेला (बळी)
जें दैन्याचें दुभतें, जें महाभयातें वाढवितें।
जें सकळ दुःखाचें पुरतें, भांडवल ॥ १४१॥
जें दुर्मतीचें मूळ, जें कुमार्गाचें फळ।
जें व्यामोहाचें केवळ, स्वरूपचि ॥ १४२॥
व्यामोहाचें=भ्रम
जें संसाराचें बैसणें, जें विकाराचें उद्यानें।
जें सकळ रोगांचें भाणें, वाढिलें आहे ॥ १४३॥
भाणें=खाणे ,ताट
जें काळाचा खिचउशिटा, जें आशेचा आंगवठा।
जन्ममरणाचा वोलिंवटा, स्वभावें जें ॥ १४४॥
खिचउशिटा=उष्टा खिचडी आंगवठा=मूर्तीमंत रूप
वोलिंवटा=वाहती वाट
जें भुलीचें भरींव, जें विकल्पाचें वोतींव।
किंबहुना पेंव, विंचुवांचें ॥ १४५॥
जें व्याघ्राचें क्षेत्र, जें पण्यांगनेचें मैत्र।
जें विषयविज्ञानयंत्र, सुपूजित ॥ १४६॥
पण्यांगनेचें=वेश्या सुपूजित=प्रसिध्द
जें लांवेचा कळवळा, निवालिया विषोदकाचा गळाळा।
जें विश्वासु आंगवळा, संवचोराचा ॥ १४७॥
लांवेचा=हडळ गळाळा=घोट आंगवळा=सोबत
संवचोराचा=संभावित चोर
जें कोढियाचें खेंव, जें काळसर्पाचें मार्दव।
गोरियाचें स्वभाव, गायन जें ॥ १४८॥
कोढियाचें =कोडी माणसाची खेंव=मिठी
गोरियाचें=पारधी
जें वैरियाचा पाहुणेर, जें दुर्जनाचा आदर।
हें असो जें सागर, अनर्थाचा ॥ १४९॥
जें स्वप्नीं देखिलें स्वप्न, जें मृगजळें सासिन्नलें वन।
जें धूम्ररजांचें गगन, ओतलें आहे ॥ १५०॥
सासिन्नलें=वाढले भरास आले गगन=मेघ
ऐसें जें हें शरीर, तें ते न पवतीचि पुढती नर।
जे होऊनि ठेले अपार, स्वरूप माझें ॥ १५१॥
http://dnyaneshwariabhyas.blogspot.in/
============== ============== ====
सुंदर !
ReplyDelete